सोबतचा लेख कृपया लक्षपूर्वक वाचावा ही विनंती, मग प्रतिक्रीया नाही दिल्यात तरी चालेल..
१५ आॅगस्ट १९४७ला देश ब्रिटीशांच्या जोखडातून मुक्त झाला आणि १९५० सालच्या आजच्याच दिवशी भारतीय राज्यघटनेचा अंमल सुरू होऊन देश सार्वभोम झाला. स्वतंत्र झाल्यापासून घटनेचा अंमल सुरू होईपर्यंत भारताला ‘स्वतंत्र वसाहती’चा दर्जा होता, ‘स्वतंत्र देशा’चा नाही..
आज भारतीय प्रजासत्ताक स्थापन होऊन ६७ वर्ष झाली. प्रजासत्ताक म्हणजे प्रजेचं राज्य. लोकशाहीची मला माहित असलेला अर्थ म्हणजे ‘लोकांनी लोकांसाठी चालवलेलेले लोकांचे राज्य’. ही व्याख्या पूर्वी कधीतरी शाळेत असताना दोन मार्कांसाठी पाठ केलेली अजुनही आठवते. या व्याख्येतल्या अर्थापेक्षाही त्यातील लय आणि तालामुळे ती जास्त लक्षात राहीली. खरं तर आजच्या परिस्थितीत अशीही ही व्याख्या अर्थहीन झाली आहे सर्वांनाच कळतंय पण मान्य मात्र कोणीच करत नाही आणि प्रजासत्ताकाला खरा धोका हाच आहे.
लोकांनी लोकांसाठी चालवलेल्या लोकांच्या राज्याचा अर्थ आज ‘पब्लिक प्राॅपर्टी’ असा झालेला आहे. थोडक्यात सांगायचं तर रेल्वेच्या डब्यासारखी आज देशाची अवस्था झालेली आहे. “माझं नाही, पब्लिकचं आहे ना, मग जाऊ दे, मेरे को क्या करना है”, येवढं बोलायचं आणि मोकळं व्हायचं, मग कसं बरं बरं वाटतं, एकदा का एखादी गोष्ट ‘पब्लिक प्राॅपर्टी झाली, की मग त्याच्यावर मावा खाऊन थुंकायला, मोडतोड करायला आपण मोकळे होतो तसं देशाचं झालेलं आहे. देश कुठे आपला आहे, तो तर पब्लिकचा म्हणून बिनधास्त त्याची वाट लावा हे सर्रास आणि राजरोस सुरू आहे. रेल्वे कसं सारखं अनाउन्समेंट करून करून लोकांच्या मनावर बिंबवते की, “भारतीय रेल आपकी संपत्ती है, कृपया इसे साफ-सुथरा रखे, कृपया इसे नुकसान न पहूॅचाए”. अशी अनाऊन्समेंट किंचित बदलून “भारत देश आपका है, कृपया इसे साफ-सुथरा रखे, कृपया इसे नुकसान न पहूॅचाए” देशाच्या बाबतीत करायची वेळ आता आली आहे. ग्रामपंचायत ते संसद व सर्व शासकीय कार्यालयांत तर अनुराधा पौडवालांच्या गायत्री मंत्राच्या दोन ओळीच्या गाण्यासारखी ही उदघोषणा २४ तास वाजवत राहीली पाहीजे..
लोकांच्या नांवावर लोकांचीच लुट करून फक्त स्त:त:च्या परीवाराचीच धन कररणं सुरू आहे. सर्व सत्तेची पदं आपल्याच कुटूंबात कशी राहातील याची काळजी घेतली जात आहे आणि याचं निर्लज्ज समर्थनही केलं जात आहे. जगासमोर मिरवायल लोकशाही परंतू आपल्या रक्तात हजारो वर्षांच्या परंपरेने मुरलेली ‘राजेशाही’च घटनेच्या साक्षीने चालू आहे..। राजा असल्याशिवाय राज्य चालायचं कसं ही आपली मानसिकताच आहे. शिक्षनाने यावर काहीच फरक पडलेला नाही..एखाद्या वरीष्ठ नेत्याला म्हणून तर ‘जाणता राजा’ असं नांव द्यावंसं वाटतं, ‘जाणता नेता’ नाही..
वर ‘परीवाराने परिवारासाठी चालवलेलं परिवाराचं राज्य’ हे एक उदाहरण म्हणून दिलं आहे.. अशा अनेक गोष्टी सांगता येतील. सांगायला कशाला हवंय, तुम्हालाही आजुबाजूला दररोज दिसत असती. आजही पैसे खाल्ल्याशिवाय सरकारी कार्यालयातील एकही कागद हलत नाही ही वस्तुस्थिती आहे..लोकांचेच करोडो-अब्जो रुपये दरवर्षी खर्च करूनही एक चांगला (उत्तम नव्हे) रस्ता मिळत नाही. जनतेला काय हवंय या पेक्षा नेत्यांना काय हवंय याचा विचार प्राधान्याने केला जातो..याला कोणताही पक्ष, संघटना अपवाद नाही. खरी काळजी जनतेलाही याचं काहीच वाटत नाही ही आहे..लोक पक्षाचे पाईक असतात, कार्यकर्ते असतात, नेतेही असतात, देशाचं मात्र कोणीच काही नसतं हे दुर्दैव आहे..!!
कोणताही ‘दिन’साजरा करण्यासाठी नसतो तर त्या दिवशी तो दिवस आपण का साजरा करतो याचं मनन-चिंतन करण्यासाठी असतो. प्रजासत्ताक दिनाचंही तसंच आहे. एकमेकांना ह्या दिवसाच्या छापील शुभेच्छा दिल्या की आपली जबाबदारी संपत नाही याचं भान आपल्याला कधी येणार? आणि ज्या दिवशि ते येईल, त्या दिवशी खऱ्या अर्थानं ‘प्रजासत्ताक’ लागू होईल असं मला वाटतं..
आपल्या ‘दीन’ झालेल्या प्रजासत्ताकाचा ‘दिन’ करून प्रजासत्ताक आपला ‘दीन (धर्म)’ कसा होईल याचा प्रयत्न करणं माझ्यासहीत आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे..
भारतीय रेलनेही मेकओव्हर सुरू केलाय, आता आपल्यालाही देशाचा मेक ओव्हर सुरू करायला हवाय, चला, आतापासून सुरूवात करूया..!!
-नितीन साळुंखे
9321811091
salunkesnitin@gmail.com
Leave a Reply