नवीन लेखन...

वाणिज्य शाखेतील डॉक्टरेटची पदवी

Ph.D. या पदवीसाठीचे महाराष्ट्रातील नियम बदलत आहेत. उच्च शिक्षणाच्या क्षेत्रातील सर्वोच्च अशा या पदवी परीक्षेसंदर्भात बरेच विचारमंथनही चालू आहे. नियमांच्या चौकटीशिवाय खरा प्रश्न असतो तो विद्यारर्थ्याला कार्यप्रेरित करण्याचा, त्याला प्रोत्साहन देण्याचा ! संशोधनाच्या कार्याचा उद्देश विद्यार्थी उच्चविद्याविभूषित होणे हा आहेच, परंतु त्याचा अभ्यास हा समाजाला उपयोगी, हितकारक कसा बनेल हे पाहणेदेखील आवश्यक आहे. डॉक्टरेट करणार्‍या विद्यार्थ्याला प्रेरणा मिळावी, या दृष्टीकोनातून लिहिलेला लेख……..

प्रास्ताविक –

डॉक्टरेटची पदवी ही त्या त्या विद्याशाखेतील विद्यापीठीय सर्वोच्च पदवी मानली जाते, शिक्षणक्षत्रातही डॉक्टरेट या पदवीला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. विद्यापीठीय शिक्षणक्रमात डॉक्टरेट पूर्वीच्या सर्व परीक्षांसाठी म्हणजे पदविका – स्नातक पदवी – पदव्युत्तर निष्णात तसेच संशोधनात्मक तत्त्वचिंतनाची म्हणून विद्यावाचस्पती ह्या पदवी-परीक्षांसाठी विहित अभ्यासक्रम असतो. त्यामुळे त्या शिक्षणाची काही ना काही औपचारिक व्यवस्था असते, अभ्यासक्रम ठरवून दिलेला असतो, लेखी वा तोंडी परीक्षेची पद्धती असते व त्यावरून गुणमेलनाचे व श्रेणी ठरविण्याचे निकष लावले जातात. अंतिमत: संबंधित विद्यार्थ्याला उत्तीर्ण झाल्यास स्नातक किंवा निष्णात अशी बिरुदे मिळतात.

डॉक्टरेटचा अभ्यास केव्हा व कसा ?

डॉक्टरेटचा अभ्यासक्रमाला प्रारंभ केव्हा व कसा करावा ? याबाबत वेगवेगळे विचारप्रवाह आढळतात. परंपरेने डॉक्टरेटचा अभ्यास हा गंभीर प्रकृतीचा मानला गेल्याने पदव्युत्तर शिक्षणानंतरही विवेकी, संयत विचार करण्याची दृष्टी विकसित झाल्याशिवाय डॉक्टरेटच्या अभ्यासक्रमाला प्रारंभ करू नये, असा अलिखित संकेत आहे. माझ्या मते सामान्यत: ३५ ते ४५ या वयोगटातच डॉक्टरेटचा अभ्यास हाती घ्यावा व पूर्ण करावा. त्यामुळे वरीलप्रमाणे विचारांची परिपक्वता पूर्णपणे विकसित झालेली असते, लौकिक अर्थाने व्यावसायिक स्थैर्यही आलेले असते आणि शारीरिक व मानसिक जडत्वही अजून निर्माण झालेले नसते. आपल्या पदव्युत्तर अभ्यासानंतर पुरेसा अवधी गेल्यामुळे आपल्या विद्याशाखेमधील विविध विषयांचे सिंहावलोकन व चिंतन करता येते व त्यातील उपशाखांचे बदलते स्वरूप व त्यातील विचारप्रवाह तसेच अद्ययावत माहिती यांचा पाठपुरावाही करता येतो. डॉक्टरेट करण्यापूर्वी एम.फिल. ही पूर्वपदवी अत्यावश्यक नसतील तरी उपयुक्त जरूर असते. या अभ्यासक्रमांतून आपल्या ज्ञानशाखेतील संशोधनपद्धतींचा अभ्यास होत जातो आणि संशोधनाला पोषक अशी मानसिक बेठक तयार होते. याशिवाय डॉक्टरेटचा अभ्यास हाती घेण्यापूर्वी विविध ठिकाणी होणार्‍या संशोधन कार्यशाळांतून, चर्चासत्रातून सहभाग घ्यावा. सुरुवातीला इतरांचे संशोधनपर लेख / विचार ऐकावेत आणि यथावकाश आपल्या आवडीच्या विषयांवर थोडे-थोडे लेखनही सुरू करावे.

विषय निश्चिती व मार्गदर्शक निश्चिती –

डॉक्टरेटच्या अभ्यासात अनेक गोष्टी योगायोगाच्या असतात, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. विषयनिश्चती आधी की मार्गदर्शक निश्चिती आधी हे सांगणे अवघड आहे; परंतु आपल्या आवडीच्याच आणि संशोधनमूल्य असणार्‍या विषयातच डॉक्टरेटचे संशोधन करावे आणि त्या विषयाला न्याय देऊ शकणार्‍या मार्गदर्शकाकडून मार्गदर्शक व्हावे हे मात्र निश्चितच !समाजशास्त्राच्या सर्व शाखांतील ज्ञान म्हणजे “उपयोजित” (applied) ज्ञान आहे, असे म्हणता येईल, म्हणजेच या ज्ञानशाखेतील संकल्पनांची व प्रयोगांची उदाहरणे हरघडीच्या व्यवहारी जीवनातून दिसतात. विशेषत: वाणिज्य आणि व्यवस्थापनशास्त्र अशा समाजशास्त्रातील संशोधकांनी व्यापक वाणिज्य विश्वातील अद्ययावत घडामोडींची ओळख करून घेतली पाहिजे. त्यासाठी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध मासिके, पाक्षिके, नियतकालिके वाचत राहिली पाहिजे. त्यातून व्यापारउदिमांचा धावता इतिहास, त्यांची संघटनात्मक बांधणी व नियोजन तसेच त्यांच्या चालू घडीच्या समस्या कोणत्या ? याबाबत माहिती मिळू शकेल. आपल्याला आवडणार्‍या विषयांमधील चालू घडीच्या व्यवहारी जगाला भेडसावणार्‍या समस्यांमध्ये संशोधनमूल्य (Research germs) आहेत ना ? हे जरूर पहावे. अशा प्रकारच्या डॉक्टरेटच्या अभ्यासाला योग्य अशा ३ /४ विषयांवर लक्ष केंद्रित करून त्यांचा सारखेपणानेच अभ्यास / विचार सुरू करावा आणि यथायोग्य वेळी मार्गदर्शक गुरूंच्या सल्ल्यानुसार एक विषय निश्चित करावा. या विषयाचा आवाका देखील हळूहळू फुलत जाणारा असतो. त्यातील अनेक बाबी सुरुवातीला अनभिज्ञ असतात. यातच डॉक्टरेटच्या रहस्याने सारे कुतूहल साठवलेले आहे. डॉक्टरेटचा अभ्यास हा विद्यापीठीय शिक्षणक्रमाचा भाग असूनही तो अद्यापही आपल्या पूर्वीच्या विद्याश्रमाच्या धर्तीवर गुरुकुल पद्धतीनुसार गुरुकडून आपल्या विषयातील एक-एक टप्पा समजून घेत (एक-एक संथा घेत घेत) पूर्ण करावयाचा असाच राहिलेला आहे. आपल्या मार्गदर्शकावर विद्यार्थ्यांची अढळ श्रद्धा हवी, पूर्ण विश्वास हवा. तसेच मार्गदर्शकांनाही हा विद्यार्थी डॉक्टरेट पूर्ण करेल ना, याची नाडीपरीक्षा हवी ! विद्यार्थ्यांच्या अथक प्रयत्नांबरोबरच मार्गदर्शकाने विद्यार्थ्यांच्या कामाबातची एक प्रकारची गोपनीयता राखत त्याला सतत प्रोत्साहन द्यायला हवे. संशोधक विद्यार्थ्याने अभ्यासाच्या वेगवेगळ्या पद्धती अंगीकारून, या विषयाची आपली आवड व निवड योग्य कशी ? त्यातील संशोधनाचे महत्व उपयुक्त कसे ? हे अभ्यासाचे कोडे प्रश्नांच्या उत्तरातून हळूहळू उलगडत न्यावे; तर मार्गदर्शकाने विषयाचा मूळ गाभा पूर्णपणे नियंत्रणाखाली व मध्यवर्ती ठेवून या संशोधन प्रकल्पाची बांधणी योग्य दिशेने, योग्य टप्प्यातून, सखोल परंतु आटोपशीर होत आहे ना याची खबरदारी घ्यावी. डॉक्टरेटचा अभ्यासाचा प्रवास हा मार्गदर्शक व विद्यार्थ्यांच्या या भूमिकांच्या जुगलबंदीची नौबतच जणू ! विद्यार्थ्याने वेगवेगळ्या टप्प्यांवर आपल्या विचारांतून, प्रकट चिंतनातून आणि नियमित आचरणातून या संशोधक वृत्तीची चुणूक दाखवावयास हवी, अर्थात मर्यादाशील राहून ! तर मार्गदर्शकानेही कधी गांभीर्याने, कधी आनंदाने, कधी रागावून, तर कधी विद्यार्थ्या धोक्याचा कंदील दाखवून तर कधी कौकाची थाप पाठीवर देत विद्यार्थ्यांचे नितिधैर्य कायम उंचावर राखावयाचे असते. थोडक्यात म्हणजे परस्परांना योग्य तो आत्मविश्वास देतदेतच डॉक्टरेटच्या अभ्यासक्रमातील पावले उचलली तर रंगत वाढत जाते व सर्वांनाच कामाचे समाधान मिळते.

प्रबंध लिखाणासाठी स्वयंस्फूर्ती –

डॉक्टरेटचा अभ्यास हा इतर विद्यापीठीय शिक्षणापेक्षा वेगळा असल्यामुळे त्यासाठी विशिष्ट प्रकारची मानसिक बैठकच व्हायला हवी. स्वतंत्रपणे स्वत:चे असे काम व्हावयाचे असल्यामुळे संशोधक विद्यार्थी हा एकाकीपणे काम करतो, परंतु मार्गदर्शकांच्या वेळोवेळी मदतीने व सहकार्यामुळे मार्गक्रमण पूर्ण करणे सहज शक्य होते. डॉक्टरेट करताना प्रथमपासूनच आपली मनाची उभारी, सातत्य, चिकाटी हवी. “मला प्रबंध पूर्ण करायचाच आहे.” हे सतत स्वत:ला बजवायला हवे. सुरुवातीला आपल्या विषयाची, कार्यपद्धतीची, संभाव्य धोक्याची, एकूण लागणार्‍या कालखंडाची पुरेशी स्पष्ट कल्पना नसते. बहुधा अज्ञातशक्तीवर श्रद्धा ठेवूनच कामाला सुरुवात करावी लागते. दर दहा विद्यार्थ्यांमधील २-३ विद्यार्थीच डॉक्टरेट पूर्ण करतात व त्यातून एखादाच कालांतराने मार्गदशर्क होतो. प्रबंधलिखाणाच्या अभ्यासात विद्यार्थ्यांच्या मनात सतत एक प्रकारची अस्वस्थता व ध्यास असावा लागतो तरच कामातील बिनचूकपणा व निश्चितपणा साधण्याची ऊर्मी जागी राहते व आपण सतर्क राहतो. जेथून जेथून माहिती व ज्ञान मिळू शकते, तिथे तिथे प्रयत्न केले पाहिजेत. त्यासाठी लहान-थोर, छोटी-मोठी संस्था, शहर-ग्रामीण भाग असा भेद न करता आपल्या अभ्यासाच्या विषयांवर नितांत प्रेम करायला हवे. तरच कामाची गोडी वाढते व कामाला योग्य ती गती येते. डॉक्टरेटचा अभ्यास आनंदाचा व्हावा, ओझे बनू नये ! प्रबंधलिखाणाच्या कामात ४-५ वर्षात अनेक क्षण व प्रसंग कसोटीचे येतात. आपल्या बौद्धिक क्षमतेचे तसेच शारीरिक व आर्थिक कुवतीचेही बळ पणाला लागते. याच काळात विद्यार्थ्यांच्या तसेच मार्गदर्शक गुरूंकडून अडचणीचे, कालापव्ययाचे प्रसंग घडतात. आजारपण, इतर अपरिहार्य कामे, नोकरी-व्यवसायातील परिस्थिती, कौटुंबिक परिस्थिती व वातावरण, तसेच सर्वसामान्य सामाजिक ताणतणाव यांमुळे  नियोजित वेळी नियोजित टप्पे गाठता येत नाहीत. त्यामुळे तुमच्या शारीरिक, मानसिक व कौटुंबिक स्वास्थ्यावर परिणाम होतो. अशा परिस्थितीत संशोधकाने मनोधैर्य टिकवणे ही एक नहत्त्वाची परीक्षाच बनते. अभ्यासाच्या कालखंडात विशेषत: प्रवासात अनेक प्रकारचे चांगले व वाईट अनुभव येतात. अंतराच्या बदलाने, वेळांच्या अवेळा झाल्यामुळे काही वेळा प्रवासाचे गणित चुकते, जेवणाच्या वेळा बदलाव्या लागतात, प्रवास खडतर होतात, एकाच ठिकाणी पुन्हा पुन्हा हेलपाटे मारावे लागतात. अधिकार्‍यांच्या भेटी होऊनही प्रतिसाद थंड व निरुत्साहित करणारा मिळतो. आपले आर्थिक गणित बिघडून त्याचाही ताण पडतो, शरीरस्वास्थ्य बिघडून तातडीची वैद्यकीय मदत, औषधोपचार, विश्रांतीची गरज पडते. ह्या कसोटीच्या कालखंडानंतर पूर्णपणे तयार झालेला प्रबंध पाहताना खूप समाधान मिळते. या कालखंडात मार्गदर्शक गुरूंचे सततचे प्रोत्साहनाचे शब्द, उदंड आत्मविश्वास, कठोर परिश्रम, घरातील सर्वांचा विशेषत: पती वा पत्नीचा पूर्ण पाठिंबा अभ्यासूवृत्ती याबरोबरच सर्व योगायोगाने घडून येणे यामुळे प्रबंध लेखनाची मार्गक्रमणा करणे, ईप्सित धैर्य म्हणजे डॉक्टरेट साध्य करणे शक्य होते.

शेवटी डॉक्टरेटची पदवी ही एकाच व्यक्तीचे श्रेय नसून अनेकांच्या शुभेच्छा व आशिर्वादांचे ते फलित आहे व त्यामुळे डॉक्टरेट ही सार्‍या घरादारालाच मिळते, हे शंभर टक्के खरे आहे !

डॉक्टरेटच्या अभ्यासातील वेळेचे नियोजन –

डॉक्टरेटच्या अभ्यासात स्वयंअभ्यासनाची बैठक मोडलेली असते. तसेच इतर व्यावसायिक, कौटुंबिक जबाबदार्‍या व वातावरणातील बदलामुळे एकाग्रचित्त होण्यासाठी वेळ लागतो. परंतु सतत “मला डॉक्टरेट पूर्ण करावयाचीच आहे” हे मनाला बजावत रहावे लागते. एक प्रकारची अंतर्मनाची ऊर्मीच हे साध्य करू शकते. डॉक्टरेटच्या कामात वेळोवेळी अनेकांचे हातभार महत्त्वाचे असतात.

विद्यापीठाच्या नियमांत डॉक्टरेटसाठी किमान दोन वर्षांचा कालावधी म्हटला असल्यामुळे काहीजण पूर्व अभ्यासानंतरच नाव नोंदणी करून दोन वर्षांत प्रबंध पूर्ण करतात. मला असे वाटते की, एकूण चार ते पाच वर्षांचा काळच डॉक्टरेटसाठी आवश्यक असतो. त्यामध्ये सातत्य, नेमकेपणा, वेळेचा सदुपयोग, कामातील विविधता, जसे की, वाचन, लेखन, चिंतन, भाषणे, सभांमध्ये विचार मांडणे, लेख लिहिणे, वरिष्ठांच्या भेटी, सरकारी कार्यालयातून भेटी, ग्रंथालयांना भेटी, माहितीचे संकलन, संगणकीकरण, कच्चा मसुदा तपासणे, नकाशे, सूची तयार करणे, प्रबंधाची मांडणी आकर्षक बनविणे इ. सर्व प्रकार आहेत. याशिवाय आपल्या मार्गदर्शकांशी सतत, नियमितपणे संपर्क ठेवून त्यांच्या सूचनांप्रमाणे बदल करणे आवश्यक असते.

या विविध प्रकारच्या कामात बदल ठेवला तर कामाचा कंटाळा / तिरस्कार येत नाही. आपणही सतत आपल्या संशोधनाच्या कामातच मग्न राहतो. अभ्यासाच्या अगदी सुरुवातीच्या दिवसांत सर्वांनाच दररोज खूप वेळ द्यावा असे वाटते परंतु नंतर अनेक वेळा “आता पुढे काय ?” अशीही परिस्थिती निर्माण होते. तेव्हा मन शांत ठेवून काही काळ जाऊ देणे आवश्यक असते. काही वेळा, काही दिवस / काही महिने अभ्यासक्रमात खंडही पडतो. हाती काहीच लागत नाही. असेही वाटते अभ्यासाला योग्य दिशा मिळत नाही, असे वेगवेगळे अनुभव येतात. अशा वेळी निराश न होता, पुन्हा पुन्हा चिंतन करावे. वाचन, ग्रंथालयाच्या भेटी, मार्गदर्शकांची चर्चा इ. विविध प्रयत्नांतून योग्य दिशा सापडते व पुन्हा हुरूप वाढतो. प्रबंध संपादनातील वेळेचे नियोजन म्हणजे सुरुवातीला दिवसातून २ तास अभ्यास अशी योजना करावी. विविध पुस्तके जमवावीत, वाचावीत. कंटाळा आला तर चक्क घराबाहेर पडून ग्रंथालयाला भेटी द्याव्यात, अनेक जाणकार व्यक्तींशी चर्चा करावी, त्यांची मते जाणून घ्यावीत, योग्य संधी मिळताच लेख लिहावेत, भाषणे द्यावीत.

असे असावे संशोधन केंद्र –

प्रचलित नियमांनुसार संशोधन विद्यार्थ्याने संशोधन केंद्राशी नाव नोंदवणे आड़श्यक असते. त्यातील पारंगत संशोधन मार्गदर्शक व जाणकारांशिवाय या केंद्राने विभागश: अनेक छोटे मोठे संशोधन प्रकल्प पूर्ण केले असावेत. या संशोधन केंद्रांचा जनसंपर्क चांगला असावा. परिसरातील संस्था-संघटनांचे संस्थात्मक सभासद त्यांनी घेतलेले असावे. त्या संस्था-संघटनांच्या वरिष्ठ पदाधिकार्‍यांशी संशोधन केंद्रांचा नियमित संपर्क असावा. संशोधन केंद्रात स्वतंत्र, समृद्ध संशोधन वर्गाचे ग्रंथालय विकसित व्हावे, त्यामध्ये राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील मसिके, नियतकालिके उपलब्ध असावीत, संशोधन केंद्रांचे स्वतंत्र वार्षिक अंदाजपत्रक तसेच योजनांचे भांडवली खर्चाचे अंदाज पत्रक असावे. संशोधन केंद्राचा दृष्टिकोन उपक्रमशील परंतु व्यावसायिक माहिती केंद्रासारखा असावा.

डॉक्टरेटच्या अभ्यासासाठीच्या भौतिक गरजा –

डॉक्टरेटचा अभ्यास करताना अनेक इतर भौतिक सुविधांची गरज भासते. स्वतंत्र अभ्यासगृह म्हणजे उपयुक्त अशी वातावरण निर्मितीच होय. त्यामध्ये स्वतंत्र अभ्यासगृह म्हणजे उपयुक्त अशी वातावरण निर्मितीच होय. त्यामध्ये स्वतंत्र बैठक व्यवस्था, संदर्भग्रंथांसाठी कपाट, हाताशी स्टेशनरी, विचारपूर्वक ठरविलेली फायलिंगची पद्धत, प्रवासासाठीची आवश्यक ती साधनसामग्री, भेटीगाठींच्या वेळापत्रकाबरोबरच संदर्भ परवानगी, सतर्कता इत्यादी गोष्टी आवश्यक बनतात. डॉक्टरेटच्या अभ्यासासाठी विद्यार्थ्याने वेळेचे नियोजन करायला हवे. एकाग्रचित्त बैठकीबरोबरच कामात विविधता हवी. वाचन, लेखन, चिंतन, भेटीगाठी, सरकारी कार्यालये तसेच संस्थांतून संदर्भाचे संकलन, माहितीचे संगणकीकरण अशा अनेक कामांसाठी वेळेचे नियोजन करावे. सुरुवातीच्या काळात दररोज कमीत कमी ठराविक वेळेपासून सुरुवात करून हळूहळू संशोधनाच्या विचारंशिवाय दुसरे काहीही न सुचविण्याच्या अवस्थेपर्यंत साधना होत जाणे आवश्यक असते.

भौतिक गरजांबरोबर संशोधनकार्य हाती घेताना आर्थिक नियोजन करणेही आवश्यक असते. नोंदणीपासून डॉक्टरेटची पदवी जाहीर होईपर्यंत अनेक टप्प्यांवर फी, ग्रंथालय वर्गणी, पुस्तक खरेदी, स्टेशनरी, प्रवासखर्च या व अशा अनेक प्रकारचा खर्च अपेक्षित असतो. त्याची योग्य ती तरतूद करणे हितकारक ठरते.

सारांश –

डॉक्टरेटच्या अभ्यासात म्हणजे “स्वान्त सुखाय” हाती घेतलेला ज्ञानयज्ञच होय. त्यामध्ये आपल्या स्वत:च्या बुद्धीला आव्हानात्मक वाटलेल्या तसेच दीर्घकाळात समाजोपयोगी होऊ शकणार्‍या प्रकल्पाची निवड करणे आवश्यक आहे. या कामात सर्व शक्ती व बुद्धीनिशी प्रबंध सादर करणे हा जसा एक भाग तसा अनेकांचे पाठबळ, साहाय्य, मार्गदर्शनही महत्त्वाचे असते. डॉक्टरेट पदवीबरोबर एक प्रकारची चिंतनाची स्वयंशिस्त विचारांची नेमकी दिशा, वेळेची शिस्त या उपलब्धी देखील महत्त्वाच्या आहेत; परंतु या परीक्षेसाठी कटिबद्ध होण्यापूर्वी अनेक प्रकारच्या साधनसुविधांची जुळवाजुळव, मानसिक शारिरीक तयारी तसेच चिकाटीने व श्रद्धेने कष्ट घेतले पाहिजेत. डॉक्टरेट या पदवीला शिक्षणक्षेत्रात जसे अनन्यसाधारण महत्त्व आहे, तशी त्यांची वाटचालही बिकट आहे. म्हणूनच या अभ्यासक्रमातील सर्व टप्पे पुरेसे स्पष्टपणे माहिती करून घेऊन त्यात उतरणे अगत्याचे आहे. संपूर्णपणे स्वयंप्रेरित व स्वनिर्मित अभ्यासाच्या या परिक्षेसाठी अधिकाधिक विद्यार्थी प्रेरित व्हावेत या हेतूने केलेला हा लेखन प्रपंच संशोधकांना उपयुक्त ठरावा.

— डॉ. संजय कंदलगावकर

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..