नवीन लेखन...

पर्यटन विचार

मानव हा निसर्गाचाच एक अविभाज्य असल्यामुळे घटक निसर्गातील विविधता त्याच्या मनाला फार पूर्वीपासून म्हणजे आदिमानवाच्या काळापासून आकर्षित करीत असावी. शिकार करून आपला उदरनिर्वाह करणाऱ्या मानवाला शिकारीच्या शोधात दूरवर जावे लागत असे. एका ठिकाणी मिळणारी शिकार कमी झाली की त्याला ते जंगल सोडून दुसऱ्या जंगलात जावे लागे. त्यानंतर मानवाला कृषी आणि पशू पालनाचा शोध लागल्यावर तो काहीसा स्थिर झाला. तरी त्या काळी पृथ्वीवर वनांचे प्रमाण जास्त आणि शेतीयोग्य जमीन अल्पप्रमाणात असल्याने सपाट, शेतीयुक्त जमिनीच्या शोधात आणि नवीन कुरणांच्या शोधात भटकंती करावी लागत असे. ही दोन्ही कारणे जरी त्याच्या उदरभरणाच्या संबंधीत असली तरी प्रत्येक नव्या मुलुखात वेगळ्या निसर्ग सौंदर्यात त्याला आनंद मिळत असे. अर्थात हे त्याचे फिरणे पर्यटन नसून स्थलांतर स्वरूपात मोडणारे होते.

पुढील काळात माणसाला आर्थिक, सामाजिक, राजकीय आणि धार्मिक अशा कारणासाठी अनेकदा स्थलांतरे करण्याची गरज निर्माण झाली. वसाहतवादासाठी ब्रिटिश, फ्रेंच, डच, पोर्तुगीझ आणि स्पॅनिश यांनी १७ व्या शतकात भारतात आणि अमेरिकेत केलेली स्थलांतरे सामाजिक आणि आर्थिक स्वरूपाची होती. तर १९४७ साली निर्वासितांनी पाकिस्तानातून भारतात केलेले स्थलांतर हे धार्मिक स्वरूपाचे होते. आजही अनेक भारतीय मुले मुली अर्थार्जनासाठी जगभर स्थायिक होताना दिसतात. त्यातही अर्थार्जनाबरोबर पर्यटनाचा आनंद असतोच.

पर्यटनाची आवड माणसाला मूलभूत असली तरी पूर्वी सर्वच समाजाला पर्यटन शक्य होत नव्हते. काही कारणपरत्वे ठराविक व्यक्तीमात्र अगदी इ.स. पूर्व. ३००० वर्षापासून पर्यटन करीत होते. हिंदू धर्माच्या उत्कर्षासाठी महर्षी व्यास, ब्रह्मर्षी वसिष्ठ, राजश्री विश्वमित्र, महर्षी पराशर यांनी अनेकदा भारतभ्रमण केल्याचे दाखले आहेत. महर्षी पराशरांनी समाजातील राक्षसीवृत्ती नष्ट करण्यासाठी भारतभ्रमण केले होते. याच भ्रमण काळात यमुनातीरी त्याची आणि मत्सगंधेची भेट झाली. त्यातून व्यासांचा जन्म झाला. महर्षी व्यास आठ वर्षाचे असताना पुन्हा महर्षी पराशर यमुनातीरी आले. त्यांची त्याच्या आठ वर्षाच्या मुलाशी व्यासांशी भेट झाली. महर्षी व्यासांना सोबत घेऊन पराशर पुन्हा भारत भ्रमणासाठी निघून गेले असे महाभारतात स्पष्ट उल्लेख आहेत.

इ. स. पूर्व ६ व्या शतकात भारतात जैन आणि बौद्ध धर्मांचा उदय झाला. सम्राट अशोकाचा राजाश्रय मिळाल्यावर बौद्ध भिक्षूंनी धर्म प्रसारार्थ भारतभर भ्रमण केलेच. परंतु ते श्रीलंका, चीन, जपान, थायलंड, ब्रह्मदेश, तिबेट, कोरीया आणि जावा इत्यादी आशियायी देशात धर्मप्रसारार्थ फिरत होते. या व्यतिरिक्त अभ्यासासाठी आले. अनुभवासाठी अनेक परदेशी प्रवासी, चीन आणि अन्य देशातून येत असत. ह्यू एन संग सारख्या प्रवाशांनी भारतभर फिरून आपली निरिक्षणे नोंदवून ठेवली आहेत. वास्को- दी -गामा, कोलंबस यांसारख्या धाडसी पोर्तुगीज खलाशांनी १५व्या शतकाच्या उत्तरार्धात जलपर्यटन केले आणि त्यांना अमेरिकेचा शोध आणि भारताचा जलमार्ग प्राप्त झाले. हा इतिहास आहे.

भारत हा खंडप्राय देश असून भौगोलिक आणि जैविक विविधतेने नटला आहे. त्यात हिमालय, विंध्य, सह्याद्री, अरवली सारख्या पर्वत रांगा आहेत. गंगा, यमुना, गोदावरी, कावेरी सारख्या विस्तीर्ण खोरी असलेल्या बारमाही नद्या आहेत. पठारे आहेत. वाळवंट आहे.

भारताला तीन बाजूंनी समुद्र किनारा लाभला आहे. त्यामुळे भारताला विपुल जैविक विविधताही लाभली आहे. ४५००० विविध प्रकारची वनस्पती आहे. १५००० फुलांच्या जाती एकट्या भारतात आहेत. ८१००० प्राणी कीटक असून १२२८ प्रकारचे मासे भारतीय समुद्रात सापडतात. परंतु इतकी विविधता असून, पर्यटनाला भरपूर वाव असूनही पर्यटन क्षेत्राचा म्हणावा तसा विकास झालेला नाही.

त्याचे मुख्य कारण म्हणजे मध्ययुगीन कालखंडात काही धर्ममार्तंडांनी आपल्या स्वार्थासाठी चुकीच्या कल्पना धर्माच्या नावावर समाजात रुजविल्या होत्या. जसे की काशीला मरण आले की मरणोत्तर स्वर्गप्राप्ती होते. तीर्थक्षेत्री पितरांचे श्राद्ध, पिंडदान, गोदान, सुवर्णदान केल्याने पितरांना मोक्ष मिळतो. सात समुद्र उल्लंघन करणे हे महापाप आहे. परदेशप्रवास केल्यास शुद्धी करून घ्यावी लागते. या अशा खुळचट कल्पनांमुळे पर्यटन म्हणजे तीर्थक्षेत्री जाणे एवढाच पर्यटनाचा अर्थ उरला होता. त्यातून त्रिस्थळी यात्रा, चारधाम, नर्मदा परिक्रमा, बारा ज्योतिर्लिंग, अष्टविनायक, अकरा मारुती या शिवाय पर्यटन होत नसे. त्यात आजच्यासारख्या वाहतूकीच्या सोई उपलब्ध नसल्याने दूरच्या प्रवासाला जाणे सहज शक्य होत नव्हते. पायी चालत अथवा बैलगाडीतून प्रवास करावा लागत असे. त्यात नगर, नाशिक, खानदेश या भागात भिल्ल तर चंबळच्या खोऱ्यात पेंढारी यांच्याकडून प्रवाशांचे वित्त लुटले जात असे. जीव आणि वित्त संरक्षण नसल्याने प्रवासात अडचण येत असे.

परंतु तीर्थयात्रेला जाण्याची इच्छा असलेले पर्यटक त्यातूनही मार्ग काढीत असत. राज्यकर्ते लढायासाठी बाहेर पडत तेव्हा त्यांच्याबरोबर संरक्षणाखाली यात्रा घडत असत. त्यासाठी लढाईवर जाणाऱ्या सरदारांकडे वशिला लावून सहभागी होता येत होते. १७६१ च्या पानिपत युद्धाच्या वेळी एक लाख सैनिक उत्तरेत गेले होते. तेव्हा जवळजवळ तेव्हढीच संख्या बाजारबुणगे, हमाल, पाणके आणि यात्रेकरू होते.

काही वेळा काही राजकीय व्यक्ती निवृत्ती घेऊन काशीस वास्तव्य करून राहात. अमृतराव पेशवे, चिमणाजी पेशवे, प्रतापसिंह महाराज, रावसाहेब पेशव्यांची पत्नी रमाबाई, बाळाजीपंत नातू अशा अनेक श्रीमंत व्यक्ती लवाजम्यानिशी काशीस वास्तव्य करून होत्या. त्यांच्या आधारे सामान्य लोकांची तीर्थयात्रा घडत असे.

पेशवाईत पर्यटकांना तीर्थयात्रेस जाण्यासाठी आणखी एक संधी प्राप्त होत असे. राज्यकर्ते, पेशवे किंवा त्यांच्या कुटुंबातील कोणी व्यक्ती मृत्यू पावल्यास अस्थी, विसर्जनासाठी कोणा ब्राह्मण सरदारासोबत काशीस किंवा प्रयागक्षेत्री पाठविण्याची प्रथा होती. त्यासाठी लाखो रुपये सरकारी खजिन्यातून खर्च होत असे. अशाप्रसंगी तीन चारशे पर्यटक आपली तीर्थयात्रा त्यांच्याबरोबर उरकून घेत असत. पहिला पेशवा बाळाजी विश्वनाथ याच्या अस्थी प्रयागक्षेत्री पाठविल्याची नोंद आहे. तसेच बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेब यांचा पानिपतच्या पराभवाच्या धक्क्याने २३ जून १७६१ रोजी मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या अस्थी नारो केशव बर्वे यांच्या बरोबर काशीस पाठविण्यात आल्या होत्या. या दोन्ही घटनांत पर्यटक यात्रेकरू सोबत गेले होते.

याशिवाय पेशव्यांचे कुटुंबीय जेव्हा यात्रेसाठी निघत तेव्हा त्यांच्यासोबत संरक्षणासाठी फौज असल्याने पर्यटक त्याचा फायदा घेत असत. बाजीराव पेशव्यांच्या मातोश्री राधाबाई ९ ते ११ नोव्हेंबर १७२८ या दरम्यान पंढरपूर तुळजापूरला गेल्या होत्या.

त्यांच्या सोबतीने अनेक स्त्रियांनी पंढरपूर, तुळजापूरची यात्रा केली होती. तसेच राधाबाई १४ फेब्रुवारी १७३५ रोजी काशीयात्रेसाठी गेल्या होत्या. उत्तर भारतात तेव्हा बाजीराव पेशव्यांचा चांगलाच दरारा होता. त्यामुळे राधाबाईचा ठिकठिकाणच्या राजे रजवाडे यांचेकडून सत्कार होत होता. जोधपूरच्या राजाने त्यांचा सत्कार करून त्यांना रु.५००० वाट खर्चासाठी दिले होते. तसेच महंमदशाह बंग या बाजीरावाच्या शत्रूने त्यांना वाटखर्चासाठी रु.१००० दिल्याची इतिहासात नोंद आहे. ही राधाबाईंची यात्रा मथुरा, वृंदावन, कुरुक्षेत्र, प्रयाग आणि काशी अशी मोठी असल्याने नेहमीपेक्षा कितीतरी अधिक यात्रेकरू सोबत असावेत, नक्की आकडा इतिहासाला ठावूक नाही. ही यात्रा मे १७३६ पर्यंत चालली होती.

पर्यटनाला सर्वार्थाने खरे महत्त्व प्राप्त झाले ते गेल्या पन्नास वर्षात. लोकांना आणि सरकारला पर्यटनाचे फायदे समजले. पर्यटकांना पर्यटनाची सवय लागावी या हेतूने सरकारने काही सवलती देवू केल्या. काही खाजगी कंपन्यांना कामगारांना वार्षिक प्रवास भत्ता देण्यास सुरुवात केली. त्यातून पर्यटनाला बरे दिवस येवू लागले. पायाभूत सुविधा वाढू लागल्या. पर्यटन क्षेत्रात मोठमोठी हॉटेल्स तयार होवू लागली. स्थानिक लोकांना रोजगार मिळाला. स्थानिक कलांना बाजारपेठ उपलब्ध होवू लागली. पैशाचे केंद्रीकरण न होता पैसा देशभर फिरू लागला. सरकारी उत्पन्न वाढू लागले आणि मुख्य म्हणजे, पर्यटन म्हणजे तीर्थयात्रा हे समीकरण जावून नैसर्गिक सृष्टीसौंदर्य, ऐतिहासिक स्थळे, थंड हवेची ठिकाणे ही पर्यटनाची केंद्र बनली. पर्यटनाची पूर्वीची संकल्पनाच बदलून गेली.

आज शहरी भागात पर्यटकांची संख्या वाढत आहे. लोकांच्या हाती गरजेपेक्षा जास्त पैसा येत आहे. पर्यटकांची संख्या वाढत असली तरी पर्यटन ही संकल्पना अधिकाधिक विकृत बनत चालली आहे. कुटुंबात बसून पर्यटनस्थळ निश्चित करून त्यासाठी स्वतः आरक्षण करणे, पर्यटन स्थळाची आगाऊ माहिती गोळा करणे हे आता अपवादानेच दिसते. अगदी पाच दहा टक्के पर्यटकच आपल्या सहली आपण आयोजित करतात. इतरांसाठी ट्रॅव्हल कंपन्या गल्लोगल्ली निघाल्या आहेत. त्यांच्या आयोजित सहलीत एकदा पैसे भरले की आरक्षणे, परदेशी प्रवासासाठीचा व्हिसा सारे काही त्या कंपन्याच करतात. ‘चार दिवस पाच रात्री’ किंवा त्याहून जास्त मुक्कामाच्या या सहली असतात. पंचतारांकीत हॉटेलमध्ये वास्तव्य असते. या चार दिवसांत चाळीस प्रेक्षणीय स्थळे कंपन्या दाखवितात. अर्थात म्हणून या प्रवासी कंपन्यांचे महत्त्व कमी होत नाही. कारण या कंपन्यांचीही समाजाला गरज असतेच. ज्या ठिकाणी अतिरेकी हल्ले, नक्षलवादी किंवा बोडो यांचे प्राबल्य असते अशा ठिकाणी पर्यटन करताना अशा कंपन्यांबरोबर जाणेच श्रेयस्कर असते. प्रसंगी तातडीने मदत मिळू शकते. त्याचप्रमाणे पर्यटक वयोवृद्ध असतील आणि कुटुंबाची सोबत नसेल तेव्हा या कंपन्या वृद्ध पर्यटकांची आत्मियतेने काळजी घेतात. तेव्हा त्यांचे महत्त्व मान्यच करायला हवे.

आज पर्यटकांनी पर्यटन अधिक गांभीर्याने घेणे आवश्यक झाले आहे. काही अपवाद सोडले तर बहुतेक पर्यटक स्थळदर्शनापेक्षा भ्रमणध्वनीवर स्थळांचे फोटो काढण्यात धन्यता मानतात. काश्मिरला गेल्यावर ‘दल’ सरोवरात ‘हाऊस बोटीत’ हौसेने बसतात. परंतु भोवतालचा नजारा पहाण्यापेक्षा सेल्फी काढण्याला महत्त्व देतात. ‘आम्ही ते स्थळ पाहिले’ यापेक्षा ‘आम्ही तेथे गेलो होतो’ याला जास्त महत्त्व आले आहे.

पर्यटनात मुंबईहून निघून दिल्लीला किंवा चेन्नईला जाणे अपेक्षित नसते. हे म्हणजे आपल्या घरातील एका खोलीतून दुसऱ्या खोलीत जाण्यासारखे असते. पर्यटनात त्या प्रदेशाच्या अंतर्गत भागात जावून तेथिल लोकांचे जीवनमान, राहणी, पेहराव, भाजा, संस्कृती, कला आणि खाद्यजीवन, निसर्ग सौंदर्य जाणून घेणे असते. आज पर्यटक परप्रांतात गेले की महाराष्ट्रीय भोजनाची अपेक्षा करतात आणि परदेशी गेले की भारतीय जेवणाचा शोध घेतात. हे कुठेतरी बदलायला हवे.

दक्षिण भारत म्हणजे गोपुरांचा प्रदेश, हजार हजार वर्षापूर्वीची शेकडो मंदिरे तेथे ताठ मानेने आपली वास्तू शैली आणि शिल्पे जपून उभी आहेत. हजार वर्षापूर्वीची कला आणि शैली पर्यटकांना खुणावित असतात. परंतु त्यांच्याकडे आकर्षित होतात ते परकीय पर्यटक. भारतीय पर्यटक देवदर्शन करून निघून जातात. सालारजंग वस्तूसंग्रहालय परदेशी पर्यटक आठ आठ दिवस दररोज सकाळी १० ते ५ पाहात बसतात. तेव्हा भारतीय पर्यटकांचे १५-२० मिनिटात पूर्ण संग्रहालय पाहून होते. शेवटी पर्यटकाला पर्यटनाची दृष्टी ही असावी लागते. अर्थात त्यालाही अपवाद असतातच. काही पर्यटक पर्यटनात तेथील खाद्यजीवनाचा आस्वाद घेतात. स्थानिक कलेचे कौतुक करतात. त्यांच्यासाठी पर्यटन हा अभ्यास असतो.

महेश गुप्ते

(व्यास क्रिएशन्स च्या पर्यटन दिवाळी २०२२ ह्या अंकामधून प्रकाशित)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..