नवीन लेखन...

पंचकर्म, रोगप्रतिकारशक्ती आणि व्याधिक्षमत्व

व्यास क्रिएशनच्या आरोग्यम दिवाळी २०२० च्या अंकामध्ये प्रकाशित झालेला वैद्य सचिन उत्पात यांचा लेख


कॉलेजला पोहोचायला उशीर होतोय असे घड्याळ ओरडून सांगत असल्यामुळे घाई-घाईत जिना उतरत असतानाच शेजारच्या प्रमिलाकाकूंचा आवाज कानावर पडला, ‘अरे सचिन, तो काढा आणखी किती दिवस घ्यायचा आहे? आज तब्बल साडेचार महिने झाले बघ.’ यावर संध्याकाळी सांगण्याचे आश्वासन देऊन मी तिथून काढता पाय घेतला खरा, पण गेल्या पाच-सहा महिन्यातील घटना, माझ्या मनाच्या कॅनव्हासवर उमटू लागल्या आणि वास्तव, कल्पना, भास यांची सरमिसळ झालेलं समाजमन मला साद घालू लागलं की, आरोग्याविषयी सर्वत्र संभ्रमाचं वातावरण जे बनलेले आहे त्यातून बाहेर काढून समाजमनाला उभारी देण्यासाठी योग्य स्वरूपात माहिती समोर ठेवून परिस्थितीचे आकलन करून देण्याची आवश्यकता आहे. तेव्हाच ‘आरोग्यम्’च्या अनुप्रिताताईंचा फोन आला आणि त्यांनी पंचकर्म आणि व्याधिक्षमत्व या संबंधाने लिहिण्याची विनंती केली, त्यासाठी हा लेखनप्रपंच!

आज खरं तर पंचकर्म या विषयावर खूपच माहिती प्रसृत होताना दिसते. मग ती इलेक्ट्रॉनिक किंवा प्रिंट मिडियाच्या माध्यमातून असो अथवा निरनिराळ्या समाजमाध्यमांच्या व्यासपीठावरून असो. त्यामुळे पंचकर्म हा शब्द माहिती नाही अशी व्यक्ती विरळच! तरी देखील वाचकांसाठी पंचकर्म म्हणजे काय याची अगदी मोजक्या शब्दात तोंडओळख करून देतो.

‘पंचकर्म’ म्हणजे नावाप्रमाणेच पाच कर्मे असलेली अथवा पाच कर्मांचा समावेश असलेली चिकित्सा पद्धती. खरं तर नावात पाच असले तरी आणखीही काही कर्मांचा यात अंतर्भाव होतो. पण प्रमुख प्रक्रिया पाच! त्यामध्ये वमन, विरेचन, बस्ती, नस्य आणि रक्तमोक्षण यांचा समावेश होतो. वमन म्हणजे औषधी काढे पाजून रुग्णास उलटी ( vomiting) करावयास लावणे. विरेचन म्हणजे विधिपूर्वक रुग्णास जुलाबाचे औषध पाजणे. गुदावाटे औषधी काढे, तेल, औषधांनी युक्त दूध पिचकारीच्या सहाय्याने आत सोडणे म्हणजे बस्ती. नस्य म्हणजे औषधी चूर्ण, तेल, तूप अथवा वनस्पतींचा रस नाकात सोडणे आणि रक्तमोक्षण म्हणजे निरनिराळ्या प्रकारानी शरीरातून रक्त काढून टाकणे.

पंचकर्म कुणी करावे/ कुणी करू नये:
कोणत्याही चिकित्सा पद्धतीला Do’s आणि Don’ts असतातच, तसे पंचकर्मालाही आहेत. पण ढोबळमनाने सांगायचे झाले तर पंचकर्मे अगदी पण ढोबळमानाने सांगायचे झाले तर पंचकर्मे अगदी बालवयापासून ते वृद्धापकाळापर्यंत करता येतात. तथापि त्यात कर्मपरत्वे वेगवेगळे नियम आहेत. साधारणत: ७०/७५ वर्षांच्या पुढे आणि बालवयात सर्व कर्मे करता येत नाहीत विशेषतः नस्य आणि बस्ती ही कर्मे मात्र त्याला अपवाद आहेत. पंचकर्माचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ते जसे व्याधितावस्थेत अर्थात एखादा रोग झाल्यानंतर करता येते तसेच स्वस्थ व्यक्तींमध्ये रोग होऊ नये म्हणून देखील करता येते. सर्वसाधारणपणे जे अगदी लहान अथवा वृद्ध आहेत, रोगामुळे ज्यांचे शरीर अगदी दुर्बल झालेले आहे, जे अतिशय सुकुमार आहेत, ज्या महिला गर्भवती आहेत अशांना शक्यतो पंचकर्म चिकित्सा करू नये.

पंचकर्मासंबंधी पाळावायचे नियम: –
सामान्यपणे पंचकर्म करताना काही नियमांचे पालन करावे लागते. Code of conduct म्हणूया हवं तर. तर हे असे काही नियम आहेत ज्यांचे पालन जर केले गेले नाही तर शरीराला अनेक दुर्धर रोग जडू शकतात. पंचकर्म चिकित्सा चालू असताना तसेच झाल्यानंतर पुढचे काही दिवस मोठ्याने बोलणे टाळावे, जोरजोराने हसणे टाळावे, खूप पायी चालणे, मोठा प्रवास वर्ज्य करावा, दुपारची झोप घेऊ नये तसेच रात्री जागरण करू नये, स्निग्ध आणि गरम गरम जेवावे. एकदा खाल्लेले पचल्याशिवाय पुन्हा अन्न सेवन करू नये (थोडक्यात, कमीत कमी तीन तास), मैथुन टाळावे. याकाळात शरीर काहीसे नाजुक झालेले असते त्यामुळे अतिशय काळजीपूर्वक त्याची रक्षा करणे आवश्यक असते.

पंचकर्म आणि रोगप्रतिकारशक्ती: –
रोगप्रतिकारशक्ती हा शब्द आपण अनेक वेळा वाचतो, ऐकतो आणि लिहितो सुद्धा! पण रोग प्रतिकार शक्ती म्हणजे नेमके काय? शरीराला नेहमी दोन पातळींवर लढावे लागते; एक म्हणजे रोग होऊ नये म्हणून झगडा आणि दुसरे म्हणजे रोग निर्माण झाल्यानंतर लवकरात लवकर तो बरा करण्यासाठीची खटपट. या दोन्हीसाठी प्रतिकार शक्तीची आवश्यकता असते. त्यालाच रोगप्रतिकारशक्ती किंवा व्याधिक्षमत्व म्हणतात. वास्तविक पाहता व्याधिक्षमत्व आणि रोगप्रतिकारशक्ती हे दोन्ही शब्द समानार्थी म्हणून वापरले जातात परंतु या लेखापुरते आपण जरा लेखन स्वातंत्र्य घेऊ (writer’s liberty ). रोगप्रतिकारशक्ती म्हणजे एकदा रोग झाल्यानंतर त्याला फार हात पाय पसरू न देता त्वरेने शरीराबाहेर घालवून देणारी शरीराची यंत्रणा आणि व्याधिक्षमत्व म्हणजे रोग होऊ नये यासाठी प्रयत्नशील असलेली शरीराची शक्ती.

आधी रोगप्रतिकारशक्तीवर पंचकर्माचा परिणाम काय होतो त्याचा विचार करूया.

हल्ली अनेक वेगवेगळ्या चिकित्सा पद्धती अस्तित्वात आहेत, पण बरेचदा रोगापेक्षा इलाज भयंकर होतो आणि मग रोगमुक्त झालेले शरीर इतके अधू असते की त्यातून सावरायला शरीराला खूप कष्ट पडतात. पंचकर्म चिकित्सा मात्र एका हाताने रोगावर हल्ला चढवते तर दुसऱ्या हाताने शरीराला सावरते. अगदी पिक्चरमधल्या अमरेन्द्र बाहुबलीसारखी! उदाहरणार्थ वमन अथवा विरेचन करण्यापूर्वी काही दिवस औषधांनी सिद्ध केलेले तूप प्यायला दिले जाते. त्यामुळे शरीर सक्षम राहते व पंचकर्मासारखी प्रक्रिया विनासायास पार पडते. थोडक्यात पंचकर्माद्वारे एक रोग बरा तर होतो पण त्यातून दुसरा निर्माण होत नाही, शिवाय रोगाचे समूळ उच्चाटन होते. आयुर्वेदात म्हटलेलेच आहे

-दोषा कदाचित् कुप्यन्ति जिता लंघनपाचनैः ।
येस्तु संशोधनैः शुद्धा न तेषां पुनरुद्भव ।।(चरक)

पंचकर्माच्या साहाय्याने अनेक रोगांची यशस्वी चिकित्सा करता येते. जसे आम्लपित्त, श्वास (दमा), संधिवात, आमवात, मणक्यांचे विकार, सोरायसिस, पॅरॅलिसिस इ.

पंचकर्म आणि व्याधिक्षमत्व: –
आता व्याधिक्षमत्वाकडे वळूया. व्याधिक्षमत्व म्हणजे सोप्या भाषेत सांगायचे झाले तर immunity. एखादा रोग होऊच नये यासाठी कार्यरत असलेली शरीराची यंत्रणा. रोगाचे जंतू अनेक शरीरात प्रवेश करतात पण रोगाची लक्षणे मात्र काही ठराविक शरीरातच निर्माण होतात की, ज्यांचे व्याधिक्षमत्व कमजोर असते. उर्वरित लोक हे Asymptomatic या सदराखाली येतात.

अक्षेत्रे बीजं उत्सृष्टम् अंतरेव विनश्यति ।
अतृणे पतितो वह्निः स्वयमेव उपशम्यति ।

या दोन्ही सूत्रांचे संदर्भ वेगवेगळे असले तरी ती सूत्रे व्याधिक्षमत्वाचे महत्त्व अधोरेखित करतात. त्यांचा मथितार्थ असा की शरीर जर सक्षम असेल तर रोगाला बळी पडणार नाही. पंचकर्म तर या विषयात ‘मास्टर’ आहे. मुळात स्वस्थ व्यक्तीचे स्वास्थ्य टिकवणे हे आयुर्वेदाने स्वतःचे प्रथम कर्तव्य मानले आहे आणि या लढाईतील प्रमुख अस्त्र म्हणजे पंचकर्म ! पंचकर्माचा वर्षभरातील योग्य काळी योग्य अवलंब केला तर रोग होण्याचा संभव नाहीसा होतो. ठराविक ऋतूंमध्ये ठराविक पंचकर्म करण्याच्या या प्रक्रियेला ‘ऋतु शोधन’ असे म्हटले जाते.

वर्षाचे एकूण सहा ऋतू असतात. हेमंत, शिशिर, वसंत, ग्रीष्म, वर्षा आणि शरद. कोणत्या ऋतूमध्ये कोणत्या दोषाचा प्रभाव असतो व त्यासाठी कोणते पंचकर्म प्रभावी ठरते, हे वरील तालिकेमध्ये निर्देशित केलेले आहे.

पंचकर्माच्या माध्यमातून या ठराविक काळामध्ये निसर्गचक्राच्या नियमाला अनुसरून जे दोष शरीरामध्ये वाढतात ते जर शरीराच्या बाहेर काढले तर साहजिकच रोग निर्माण होण्याची शक्यता नाहीशी होते. काही वर्षापर्यंत जर या पद्धतीने उपचार घेतले तर अनेक वर्षे निरामय आयुष्य जगणे शक्य आहे. पण त्याचबरोबर पथ्यपालनही महत्त्वाचे असते.

सध्या संपूर्ण जग कोरोनासारख्या महामारीच्या प्रभावातून जात असताना आयुर्वेदासारख्या सनातन परंतु काळाच्या कसोटीवर सर्व प्रकारे सार्थ ठरलेल्या चिकित्सा पद्धतीचा अवलंब करणे आवश्यक आहे. ज्यावेळी जनपदोद्ध्वंसासारखी (pandemic situation) अवस्था निर्माण होते, त्यावेळी त्याचा प्रतिकार करण्यासाठी पंचकर्मासारखे दुसरे शस्त्र नाही. याद्वारे शरीर बलवान/ व्याधीक्षम होण्यास मदत तर होतेच, पण जर यदाकदाचित शरीर रोगाला बळी पडलेच तरी देखील व्याधिप्रतिकार उत्तम प्रकारे होऊन शरीराला पुनर्स्वास्थ्य प्रस्थापित करण्याला साहाय्य होते.

अरे बापरे, बराच वेळ झाला, प्रमिलाकाकू माझी वाट पहात असतील; मला निघाले पाहिजे. पुन्हा कधीतरी भेटूया. तोपर्यंत सर्वांना निरामय आयुष्याच्या आणि दीपावलीच्या शुभेच्छा !

सर्वे सन्तु निरामयाः ।
वैद्य. सचिन उत्पात 

उपप्राचार्य,
एम. इ. एस. आयुर्वेद महाविद्यालय,
ता. खेड, जि. रत्नागिरी.
८४११९७२६२६
panchakarmaexpert@gmail.com

(व्यास क्रिएशनच्या आरोग्यम दिवाळी २०२० च्या अंका मधून)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..