नवीन लेखन...

ऑनलाइन प्रवेश : शंका-समाधान

Online Admissions - FAQ

ऑनलाइन प्रवेश : शंका-समाधान

दहावीचा निकाल लागला आणि अकरावीच्या प्रवेशाचे वेध विद्यार्थी-पालकांना लागले आहेत. तशातच ही प्रक्रिया यंदा मुंबईत (एमएमआरडीए प्रदेशाकरिता) ऑनलाइन पद्धतीने राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. http://fyjc.org.in/mumbai/ या वेबसाइटवर जाऊन विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज भरता येणार आहेत. यावर्षी ही प्रक्रिया मुंबईत यशस्वी झाली की पुढील वर्षीपासून संपूर्ण राज्यभरात ऑनलाइन पद्धतीने अकरावीचे प्रवेश देण्याचा शासनाचा मानस आहे. या पार्श्वभूमीवर पालक-विद्यार्थ्यांच्या मनात या प्रक्रियेविषयी अनेक शंका आहेत. अशा काही सातत्याने उपस्थित केल्या जाणार्‍या मूलभूत शंकांचे समाधान.

इयत्ता अकरावीच्या ऑनलाईन प्रवेशाची या वर्षीच आवश्यकता का भासली?

दरवर्षी विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी अनेक कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये रांगा लावाव्या लागतात. एकापेक्षा अधिक महाविद्यालयांत अर्ज सादर करताना पैसा, वेळ खर्च होतो. विद्यार्थ्यांना आणि पालकांना होणारा हा त्रास कमी करावा, या हेतूने यावर्षी अकरावीची प्रवेशप्रक्रिया ऑनलाईन करण्याचा निर्णय घेण्यात आला.

ऑनलाईन प्रवेश पद्धती म्हणजे काय?

विद्यार्थ्यांनी विकल्प अर्ज (Option Form) इंटरनेट सुविधा असलेल्या संगणकाद्वारे भरायचा आहे. त्यानंतर या भरलेल्या फॉर्मच्या दोन प्रिंट आऊट घेऊन त्यांच्या जवळच्या सादरीकरण केंद्र (submission centre) मध्ये सादर करायचे आहेत. त्यावेळी मूळ शैक्षणिक प्रमाणपत्राच्या झेरॉक्स प्रती पण जोडायच्या आहेत. ही सर्व प्रक्रिया म्हणजे ऑनलाईन प्रवेश पद्धती होय. अल्पसंख्याक व्यवस्थापनाच्या जागा (Minority Seats) व व्यवस्थापनाच्या जागा (Management Seats) याव्यतिरिक्त इतर सर्व अर्ज ऑनलाईनच स्वीकारले जातील.

ऑनलाईन प्रवेश पद्धती कोण राबविणार आहे?

विभागीय शिक्षण उपसंचालक, मुंबई विभाग हे महाराष्ट्र ज्ञान महामंडळाच्या (एमकेसीएल) तांत्रिक मदतीने ऑनलाईन प्रवेशप्रक्रिया पूर्ण करणार आहेत.

ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेसाठी मार्गदर्शन कोठे उपलब्ध होईल?

एमएमआरडीए क्षेत्रासाठी वीस झोन तयार करण्यात आले आहेत. या प्रत्येक झोनसाठी एक कनिष्ठ महाविद्यालय समन्वयक (co-ordinator) म्हणून घोषित केले आहेत. विद्यार्थ्यांना आपल्या झोनमधील समन्वयक केंद्रावर प्रवेशाबाबतची सर्व माहिती मिळेल. तसेच सर्व सादरीकरण केंद्रावर मार्गदर्शन उपलब्ध होईल. विद्यार्थी आपल्या क्षेत्रातील शिक्षण अधिकार्‍याशी सुद्धा संपर्क साधू शकतात.

विद्यार्थ्यांस प्रत्येक कनिष्ठ महाविद्यालयास जाऊन फॉर्म भरावा लागेल का?

नाही. ऑनलाईन पद्धतीच्या एकाच फॉर्मवर महाविद्यालयांचे १ ते १५० विकल्प (Option) विद्यार्थ्यांना भरता येतील.

ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याची व्यवस्था कोठे केलेली आहे?

विद्यार्थ्याला स्वत:च्या घरी अथवा अन्यत्र उपलब्ध असलेल्या संगणकावर जेथे इंटरनेटची सुविधा उपलब्ध असेल तेथून ऑनलाईन फॉर्म भरुन दोन प्रिंटआऊट घेता येतील. याव्यतिरिक्त त्यांच्या स्वत:च्या शाळेत संगणक व इंटरनेट सुविधा उपलब्ध असल्यास तिथूनही ऑनलाईन फॉर्म भरता येईल. याशिवाय पुस्तिकेत दिलेल्या सादरीकरण केंद्रावर (submission centre) सुध्दा ऑनलाईन अर्ज भरण्याची सोय आहे. त्याशिवाय वरीलपैकी काहीही उपलब्ध नसल्यास एमकेसीएलची केंद्रे उपलब्ध असणार आहेत.

संगणकावरुन अर्ज भरुन त्याच्या दोन प्रिंटआऊट घेतल्यावर काम संपले काय?

नाही. यानंतर दोन्ही प्रिंटआऊट व आवश्यक प्रमाणपत्रांच्या झेरॉक्स कॉपी घेऊन सादरीकरण केंद्रावर (submission centre) सादर करावी. रु.१२५/- भरल्याची पोचपावती घेऊन प्रमाणपत्राची पडताळणी झाल्यानंतर प्रमाणपत्रे परत घेणे आवश्यक आहे. येथे विद्यार्थ्यांची फॉर्म भरण्याची प्रक्रिया पूर्ण होते.

विद्यार्थ्यांस प्राधान्यक्रमानुसार प्रवेश मिळेल का?

विद्यार्थ्यांनी भरलेले विकल्प (Option), त्यांची गुणवत्ता व त्याने मागितलेल्या महाविद्यालयांत उपलब्ध असलेल्या जागा यानुसार त्यांना प्रवेश मिळेल. त्याने दिलेल्या प्रथम क्रमांकाच्या विकल्प (Option) मध्ये गुणवतेनुसार त्याचा क्रमांक न लागल्यास, दुसरा, तिसरा विकल्प लक्षात घेऊन त्याला जागा उपलब्ध असलेल्या कनिष्ठ महाविद्यालयामध्ये प्रवेश मिळेल. विद्यार्थ्यांने दिलेल्या विकल्पांमध्ये त्याला प्रवेश मिळू शकला नाही तर त्याने दिलेल्या झोन व शाखांच्या प्राधान्यानुसार त्याला रिक्त जागा उपलब्ध असलेल्या कनिष्ठ महाविद्यालयामध्ये प्रवेश मिळेल.

विद्यार्थ्यांस प्रत्येक शाखेसाठी एकच फॉर्म भरावा लागेल की वेगवेगळे फार्म भरावे लागतील?

विद्यार्थ्यांस कला, विज्ञान, वाणिज्य व द्विलक्षी अभ्यासक्रम या सर्वांसाठी एकच फॉर्म भरता येईल.

विद्यार्थ्यांस पाहिजे असतील ते विषय मिळतील का?

ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमाफ वत विद्यार्थ्याला फक्त शाखेमध्ये प्रवेश मिळेल व त्यानंतर गुणवत्तेच्या आधारावर व जागांच्या उपलब्धतेवर प्राचार्यांच्या स्तरावर कनिष्ठ महाविद्यालय विषय देतील.

जे विद्यार्थी अपरिहार्य कारणास्तव व नैसर्गिक आपत्तीमुळे सदर प्रवेश प्रक्रियेपासून वंचित राहतील त्यांच्या प्रवेशाची सोय केली जाईल का?

ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ज्या महाविद्यालयांमध्ये जागा शिल्लक असतील तेथे अशा विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याचा प्रयत्न केला जाईल.

विद्यार्थ्यांस कमी गुण असतील तर पाहिजे त्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळण्याची शक्यता आहे का?

संबंधित महाविद्यालय प्राधान्यक्रमात लिहिलेले असतील तसेच त्या महाविद्यालयाच्या रिक्त जागांनुसार घोषित केलेल्या गुणवत्ता यादीत त्याचा क्रमांक असेल तर त्याला संबंधित कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश मिळेल.

गुणवत्ता यादी कॉलेजनिहाय लागेल काय? एमएमआरडीए क्षेत्रासाठी गुणवत्ता यादी एकच असेल का?

गुणवत्ता याद्या या कॉलेजनिहाय असतील. एमएमआरडीए क्षेत्रासाठी गुणवत्ता यादी एकच नसेल.

मॅनेजमेंटसाठी काही जागा राखून ठेवण्यात आल्या आहेत का?

मॅनेजमेंटसाठी ५ जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत.

मॅनेजमेंट कोट्यातील प्रवेशासाठी अर्ज करणार्‍या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत फॉर्म भरणे आवश्यक आहे का?

ऑनलाईन फॉर्म भरण्याची गरज नाही, परंतु ऑनलाईन प्रवेश अर्ज प्रत्येक विद्यार्थ्याने भरावा. हे विद्यार्थ्याच्या दृष्टीने फायदेशीर ठरेल. कारण काही कारणास्तव व्यवस्थापन कोट्यातून प्रवेश मिळाला नाही तर विद्यार्थ्यास इतर ठिकाणी प्रवेशाची संधी उपलब्ध होईल.

ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची गुणवत्ता यादी ज्या त्या कॉलेजमध्ये प्रदर्शित करण्यात येईल का?

होय. प्रत्येक महाविद्यालयाची गुणवत्ता यादी ही त्या त्या संबंधित महाविद्यालयात वेळोवेळी प्रदर्शित केली जाईल. तसेच ती संकेतस्थळावरही (website) उपलब्ध असेल. तसेच विद्यार्थ्यांच्या सुलभतेसाठी ज्या विद्यार्थ्यांकडे भ्रमणध्वनी क्रमांक (Mobile Number) उपलब्ध आहे, अशा विद्यार्थ्यांना त्यांचे नाव ज्या कनिष्ठ महाविद्यालयाच्या गुणवत्ता यादीत आले आहे, अशा किमान दोन महाविद्यालयांची नावे एसएमएसद्वारे कळविण्याचा एमकेसीएलद्वारे प्रयत्न करण्यात येईल.

मॅनेजमेंट कोट्यासाठी कॉलेज वेगळे फॉर्म भरुन घेतील का?

मॅनेजमेंट कोट्याचे (Management Quota) प्रवेश हे संबंधित व्यवस्थापनाद्वारे केले जातील. या प्रवेशांबाबतचे निर्णय संबंधित व्यवस्थापनाचे असतील.

वैधानिक व सामाजिक आरक्षण पाळले जाणार आहे का?

होय. वैधानिक व सामाजिक आरक्षण पाळले जाणार आहे.

वैधानिक व सामाजिक आरक्षणामध्ये अर्ज करणार्‍या उमेदवारांना गुणवत्तेनुसार खुल्या संवर्गात प्रवेश घेता येईल का?

होय. वैधानिक व सामाजिक आरक्षणामध्ये अर्ज करणार्‍या उमेदवारांना गुणवत्तेनुसार खुल्या संवर्गात प्रवेश घेता येईल.

वैधानिक व सामाजिक आरक्षणामध्ये अर्ज करणार्‍या उमेदवारांना शासकीय सोयी सवलती, शिष्यवृत्तीचा लाभ मिळेल का?

होय. वैधानिक व सामाजिक आरक्षणामध्ये अर्ज करणार्‍या उमेदवारांना शासकीय सोयी सवलती, शिष्यवृत्तीचा लाभ मिळेल.

उपकरणामध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाल्यास विहीत मुदतीत प्रवेश अर्ज सादर करता आला नाही तर अशा विद्यार्थ्याला अर्ज सादर करण्यास मुदतवाढ मिळेल का?

उपकरणामध्ये बिघाड झाल्यास निश्चित केलेल्या झोनल केंद्रात संपर्क अधिकार्‍याशी संपर्क साधावा व विहीत मुदतीत मदत मागावी.

अल्पसंख्याक (भाषिक/धार्मिक) दर्जा प्राप्त कनिष्ठ महाविद्यालयांना राखून ठेवलेल्या जागांचे प्रवेश कोण करणार?

अल्पसंख्यांक (भाषिक/धार्मिक) दर्जा प्राप्त कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अल्पसंख्यांकांसाठी राखून ठेवण्यात आलेल्या ५० जागा त्यांच्या स्तरावर भरण्यात येतील.

ऑनलाईन प्रवेशप्रक्रियेमध्ये गुणवत्ता यादीनुसार कॉलेजमध्ये प्रत्यक्ष प्रवेश कोण देणार?

संबंधित कनिष्ठ महाविद्यालय प्राधान्यक्रमाने गुणवत्ता यादीनुसार विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रवेश देतील. प्रवेशाच्या वेळी विद्यार्थ्याला सर्व मूळ प्रमाणपत्रे संबंधित कनिष्ठ महाविद्यालयाने निर्धारित केलेली फी जमा करणे आवश्यक राहील.

विद्यार्थ्यास गुणवत्ता यादी पाहण्यासाठी कॉलेज मधून स्वतंत्र फी आकारली जाईल का?

नाही. ती यादी महाविद्यालयाच्या सूचना-फलकावर जाहीर केली जाईल व ती फक्त कॉलेजनिहाय असेल.

ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेसाठी संपर्क अधिकारी असतील का?

एमएमआरडीए क्षेत्रात २० झोन तयार केलेले असून प्रत्येक झोनमध्ये झोनल केंद्र निश्चित करण्यात आले आहे. तेथे संपर्क अधिकारी उपलब्ध असतील. झोन व संपर्काधिकारी यांची यादी विद्यार्थ्यांना पुरविण्यात येणार्‍या माहिती पुस्तिकेत देण्यात आली आहे.

ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमध्ये गुणवत्ता यादीत नाव आलेले असताना संबंधित विद्यार्थ्याला कनिष्ठ महाविद्यालय प्रवेश नाकारु शकते का? प्रवेश नाकारल्यास संबंधित विद्यार्थ्यांनी काय करावे?

गुणवत्ता यादीत नाव आले असल्यास कनिष्ठ महाविद्यालयास विहीत वेळेत प्रवेश घेऊ इच्छिणार्‍या विद्यार्थ्याला प्रवेश नाकारु शकत नाही. मात्र प्रवेश देताना संबंधित विषयाची उपलब्धता, मुळ प्रमाणपत्राची ग्राह्यता व फीची रक्कम या बाबी विचारात घेतल्या जातील. प्रवेश नाकारल्यास विद्यार्थ्याने त्या झोनच्या संपर्क अधिकार्‍याशी संपर्क साधावा.

ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया एकाच फेरीत होणार आहे का? का एकापेक्षा जास्त फेर्‍या होतील?

नाही. एकापेक्षा अधिक फेर्‍या होणार आहेत.

मागीत वर्षाच्या शेवटच्या यादीतील शेवटच्या विद्यार्थ्याचे गुण (कट ऑफ मार्क्स) किती होते याची माहिती मिळेल का?

विद्यार्थ्यांना देण्यात येणार्‍या माहितीपुस्तिकेत सदरची माहिती दिली आहे.

शासनाने राखीव संवर्ग खेळाडू, स्वातंत्र्यसैनिक इत्यादींसाठी जागा राखून ठेवल्या आहेत का? असल्यास त्यांचे प्रमाण किती आहे?

होय. शासनाने विशिष्ट संवर्गासाठी जागा राखून ठेवल्या आहेत. संदर्भित शासन निर्णय माहिती पुस्तिकेत दिलेले आहेत.

प्रवेशासाठी विशिष्ट क्षेत्रात व्यवसायिक अभ्यासक्रमाच्या (व्होकेशनल) प्रवेशासाठी वाढीव गुण देण्यात येणार आहेत का?

फक्त व्यवसायिक अभ्यासक्रमाच्या (व्होकेशनल) प्रवेशासाठी वाढीव गुण निर्धारित केलेले आहेत. त्या संदर्भातील शासनादेश माहिती पुस्तिकेत दिलेला आहे. कला, विज्ञान व वाणिज्य या सर्वसाधारण शाखांसाठी प्रवेशासाठी कोणतेही वाढीव गुण दिले जाणार नाही.

इनहाऊस कोटा (एकाच संस्थेच्या त्याच परिसरातील माध्यमिक शाळांतील विद्यार्थ्यांकरिता राखून ठेवलेला कोटा) राखून ठेवण्यात आला आहे?

इनहाऊस कोट्यासाठी २० जागा राखून ठेवण्यात आल्या आहेत.

 

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..