नवीन लेखन...

नाईलचा बाहू

इजिप्तच्या इतिहासात पिरॅमिडना अतिशय महत्त्वाचं स्थान आहे. प्राचीन इजिप्तमधल्या राजघराण्यांतील व्यक्तींची थडगी असणारी ही पिरॅमिड, इजिप्तच्या चार-पाच हजार वर्षांपूर्वीपासूनच्या इतिहासाची साक्षीदार आहेत. या विविध पिरॅमिडपैकी खुफू, खाफ्री, मेनकाऊरी ही गिझाच्या पठारावर वसलेली पिरॅमिड विशेष प्रसिद्ध आहेत. ही पिरॅमिड इ.स.पूर्व सव्विसाव्या शतकाच्या सुमारास बांधली गेली. या प्रचंड रचनांच्या बांधकामात वापरली गेलेली सामग्रीसुद्धा प्रचंड होती. यात चुनखडीच्या मोठ्या शिळांचा समावेश होता. या शिळा सतरा किलोमीटर अंतरावरील टुरा येथून आणल्या गेल्याचे उल्लेख इतिहासात आढळतात. आता ही सामग्री या गिझाच्या पठारापर्यंत कशी आणली गेली असावी, हा तंत्रज्ञानाच्या दृष्टीनं एक उत्सुकतेचा विषय आहे. ही सामग्री नाईल नदीमार्गे आणली गेली असली तरी, नाईल नदी ही गिझाच्या पठारापासून (आज) सुमारे सात किलोमीटर अंतरावरून वाहते. उपलब्ध पुरावे हे, जुन्या काळी नाईल नदीला, पश्चिमेकडे गिझाच्या पठारापर्यंत जाणारी एखादी शाखा असल्याचं दर्शवतात. नाईल नदीच्या या शाखेद्वारे नाईल नदीचं पाणी गिझाच्या पठारापर्यंत पोचत असल्याचं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे. नाईल नदीच्या या शाखेच्या मदतीनं पिरॅमिडला लागणारी सामग्री गिझाच्या पठारापर्यंत आणली गेली असण्याची शक्यता त्यामुळे दिसून येते.

खुफू, खाफ्री, मेनकाऊरी ही तीन पिरॅमिड ज्या गिझाच्या पठारावर वसलेली आहेत, त्या गिझाच्या पठाराची लांबी सुमारे दोन किलोमीटर आणि रुंदी सुमारे दीड किलोमीटर इतकी आहे. या पठाराची त्याच्या पायथ्यापासूनची उंची वीस ते तीस मीटरच्या दरम्यान आहे. नाईल नदीची शाखा या पठाराच्या पूर्वेकडच्या पायथ्यापर्यंत वाहत असावी. ‘खुफू शाखा’ हे नाव दिलं गेलेल्या, नाईल नदीच्या या शाखेतील पाण्याची पातळी अर्थातच नाईल नदीच्या पातळीवर अवलंबून होती. नाईल नदीला पूर आला की खुफू शाखेच्या पाण्याची पातळी तब्बल सात मीटरपर्यंत वाढत असल्याचे उल्लेख आढळतात. मात्र ज्या काळात गिझा पठारावरची पिरॅमिड बांधली गेली त्या काळात, या खुफू शाखेची पातळी जलवाहतूकीसाठी खरोखरंच पुरेशी होती का, हे शोधणंसुद्धा गरजेचं होतं. ही पिरॅमिड बांधल्या गेल्याच्या काळातली खुफू शाखेच्या पाण्याची पातळी शोधून काढणारं एक संशोधन, फ्रान्समधील एक्स-मासे विद्यापीठातल्या हादेर शेइशा आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी अलीकडेच केलं आहे. या वैशिष्ट्यपूर्ण संशोधनात सुमारे आठ हजार वर्षांपूर्वीपासूनच्या खुफू शाखेच्या पाण्याच्या पातळीतील बदलांचा अभ्यास केला गेला आहे. हादेर शेईशा आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं हे संशोधन ‘प्रोसिडिंग्ज ऑफ दि नॅशनल अ‍ॅकॅडेमी ऑफ सायन्सेस’ या शोधपत्रिकेत प्रसिद्ध झालं आहे.

हादेर शेईशा आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी गिझाच्या पठाराच्या पूर्वेकडचा भाग आपल्या संशोधनासाठी निवडला. हा भाग नाईल नदीला येणाऱ्या पुराच्या पाण्यानं काही काळ झाकला जातो. या संशोधकांनी, या भागातील जमिनीत दूरदूरवरच्या अंतरावर एकूण पाच ठिकाणी छिद्रं पाडली. या छिद्रांची व्यवस्थित पाहणी केल्यानंतर, यातील दोन छिद्रं ही पुरातन काळी जिथे पाणी साठत असल्याची शक्यता होती, त्या भागात असल्याचं आढळलं. साहजिकच, पुढच्या संशोधनासाठी ही छिद्रं निवडली गेली. यातलं एक छिद्र हे सुमारे नऊ मीटर खोल होतं, तर दुसरं छिद्र हे सुमारे सात मीटर खोल होतं. इथली माती ही गाळाच्या थरांनी बनली असल्याचं या छिद्रांतून काढल्या गेलेल्या मातीच्या नमुन्यांवरून दिसून आलं. हे थर कालानुरूप एकावर एक जमा होत गेले होते. या छिद्रांतून या संशोधकांनी विविध खोलीवरच्या मातीचे शंभराहून अधिक नमुने घेतले व या नमुन्यांचं सूक्ष्मदर्शकाद्वारे तपशीलवार जीवशास्त्रीय विश्लेषण केलं. या मातीत वेगवेगळ्या खोलीवर वेगवेगळ्या वनस्पतींचे परागकण अस्तित्वात असल्याचं दिसून आलं. या परागकणांची त्यानंतर ओळख पटवण्यात आली, तसंच प्रत्येक नमुन्यातल्या प्रत्येक प्रकारच्या परागकणांचं प्रमाणही मोजलं गेलं.

सूक्ष्मदर्शकातून केलेल्या या निरीक्षणांत, या संशोधकांना या नमुन्यांत एकूण एकसष्ट प्रकारचे परागकण आढळले. हे परागकण ज्या वनस्पतींचे होते, त्या वनस्पती त्यांच्या आढळण्याच्या ठिकाणानुसार सात वेगवेगळ्या गटांत विभागता येत होत्या. यातले काही परागकण हे सतत पाणथळी स्वरूप असणाऱ्या भागात आढळणाऱ्या वनस्पतींचे होते, तर काही परागकण हे नाईल नदीच्या काठावर आढळणाऱ्या पपायरस, लव्हाळी, अशा वनस्पतींचे होते. काही परागकण हे नदीच्या प्रवाहापासून दूर वाढणाऱ्या खजूर, वाळुंज, यासारख्या वनस्पतींचे होते. काही परागकण हे नाईल नदी ही दक्षिणेकडील, आफ्रिकेतल्या ज्या उष्णकटिबंधीय प्रदेशातून वाहत येते, तिथल्या दमट हवामानात आढळणाऱ्या वनस्पतींचे होते.

या विविध प्रकारच्या वनस्पतींच्या परागकणांचं प्रमाण खोलीनुसार, मातीच्या थरानुसार वेगवेगळं होतं. परागकणांचे हे विविध प्रकार खुफू शाखेच्या, काळानुसार बदलत्या स्वरूपाचे निदर्शक होते. हादेर शेईशा आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी, या विविध थरांची वयं म्हणजे हे विविध थर जमा होण्याचा काळ जाणून घेतला. (मातीच्या नमुन्यांत आढळलेल्या सेंद्रिय पदार्थांतील कार्बनच्या एका समस्थानिकाच्या प्रमाणावरून त्या नमुन्याचं वय समजू शकतं.) मातीचे थर केव्हा जमले आहेत ते कळल्यामुळे, विविध थरांत आढळलेले परागकण कोणत्या काळात जमा झाले आहेत, ते समजू शकलं. यावरून कोणत्या काळात त्या परिसरात कोणकोणत्या वनस्पती अस्तित्वात होत्या, त्याचा अंदाज आला व त्यावरून विविध काळात खुफू शाखेचं पाणी कसं पसरलं होतं, याचं चित्र उभं करता आलं. हादेर शेईशा आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी यानंतर, आपल्या या निष्कर्षांची, आफ्रिकेतल्या त्या काळातल्या हवामानाशी सांगड घातली. खुफू शाखेच्या स्थितीचे परागकणांवरून काढलेले निष्कर्ष आणि आफ्रिकेलं त्या काळातलं हवामान, यांचा व्यवस्थित मेळ बसत असल्याचं, दोहोंतील संबंधांवरून दिसून आलं व त्यामुळे या संशोधनातून काढलेल्या निष्कर्षांना दुजोरा मिळाला.

दक्षिणेकडून उत्तरेला वाहत येऊन भूमध्य समुद्राला मिळणाऱ्या, नाईल नदीच्या पातळीत गेल्या आठ हजार वर्षांत अनेक लहानमोठे चढ-उतार झाले असल्याचं या संशोधनावरून दिसून आलं आहे. सुमारे आठ हजार वर्षांपूर्वी म्हणजे इ.स.पूर्व सहा हजारच्या सुमारास आफ्रिकेत अतिदमट हवामानाचा काळ होता. या काळात पूर्व आफ्रिकेत पावसाचं प्रमाण लक्षणीय होतं. त्यामुळे पूर्व आफ्रिकेतून नाईल नदीला मोठ्या प्रमाणात पाण्याचा पुरवठा होत असावा. कारण या काळात इजिप्तमधील नाईल नदीतल्या पाण्याची पातळी बरीच वर असल्याचं हादेर शेईशा आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं संशोधन दर्शवतं. या काळात, नाईलची शाखा असणारी खुफू शाखाही सक्रिय होती व तिचं पाणी गिझा पठारापर्यंत सहजपणे पोचत होतं. याच काळात, इ.स.पूर्व पाच हजारच्या सुमारास इजिप्तमधली सुरुवातीची राजवट अस्तित्वात आली. यानंतर इ.स.पूर्व २,६०० ते इ.स.पूर्व २,५०० या काळात, प्राचीन इजिप्तमधल्या ‘चौथ्या राजवटी’तील खुफू, खाफ्री, मेनकाऊरी हे राजे होऊन गेले. या राजांच्या नावे ओळखली जाणारी तीन पिरॅमिड ही याच काळात बांधली गेली. गिझाच्या पठारावरची ही पिरॅमिड बांधली गेली तेव्हा, खुफू शाखेत मोठ्या प्रमाणात पाणी असल्याचं हादेर शेईशा आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या संशोधनावरून दिसून येतं. या संशोधनावरून, पिरॅमिडला लागणारी विविध सामग्री खुफू शाखेतून गिझाच्या पठाराच्या पायथ्याशी आणली गेली असण्याच्या शक्यतेला बळकटी मिळाली आहे.

नाईल नदीच्या खुफू ‘बाहू’नं गिझाच्या पठारावरील पिरॅमिडच्या बांधणीत मोठी भूमिका बजावली असली तरी, या अगोदरच नाईल नदीची पातळी खाली जायला सुरुवात झाली असल्याचं या संशोधकांना आढळलं. कारण आफ्रिकेतला अतिदमट हवामानाचा काळ संपला होता. नाईल नदीला पूर्व आफ्रिकेतून होणारा पाणीपुरवठा रोडावला होता. मात्र नाईल नदीची पातळी आता जरी घटू लागली असली तरीही, खुफू शाखेला पाणी पुरवण्याइतकी ती पुरेशी होती. पिरॅमिड बांधली गेली त्या शतकात, खुफू शाखेची पातळी एकेकाळच्या कमाल पातळीच्या तुलनेत चाळीस टक्क्यांवर स्थिरावली होती. ही पातळी नेहमीच्या वाहतूकीसाठी योग्य होती. मोठ्या सामग्रीच्या वाहतूकीसाठी मात्र नाईल नदीला वार्षिक पूर येऊन, खुफू शाखेची पातळी वाढेपर्यंत थांबावं लागत असावं.

नंतरच्या काळात तात्पुरत्या स्वरूपाची वाढ वगळता, नाईल नदीची पातळी अधिकाधिक खालावत गेली. इ.स.पूर्व १०००च्या सुमारास ती इतकी खालावली की, नाईल नदी वाहत असूनही या भागातला परिसर वैराण होऊ लागला. नाईल नदीच्या पातळीबरोबरच खुफू शाखेची पातळीही अतिशय कमी होत गेली. त्यानंतरच्या चारशे वर्षांच्या काळात नाईल नदी घटलेल्या पातळीच्या स्वरूपात वाहतच राहिली; परंतु नाईल नदीच्या खुफू शाखेचं अस्तित्व मात्र संपुष्टात आलं!

चित्रवाणीः

— डॉ. राजीव चिटणीस.

छायाचित्र सौजन्य: Harvard University, scienceve.com, Alex Boersma/PNAS – 2022

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..