माणसाला निकालाची खूपच उत्सुकता असते. कारण त्यावर अनेक गोष्टी अवलंबून असतात. पण सगळ्यात लहानपणापासून एका निकालाची उत्सुकता तर असतेच पण धडधडही असते. आल ना लक्षात? वर्षभर अभ्यास केलेला असतो. मेहनत घेतलेली असते. त्यामुळे तो दिवस कधी उजाडणार असे होऊन जाते.
लहानपणी मात्र याचे फार महत्व वाटायचे. त्या दिवशी सकाळी लवकर उठून आवरुन देवाच्या. मोठ्यांच्या पाया पडून मैत्रीणी बरोबर शाळेत जातांना एकमेकांना धीर देण. वाटेतल्या एखाद्या मंदिरातील देवाला नवस करणं. शाळेत गेल्यावर संख्या थोडीच असायची. वर्गात बसून बाईंची वाट पहात नामस्मरण करत बसायचे. बाई आल्यावर त्या क्रमाने एकीकीला बोलावून प्रगती पुस्तक द्यायच्या. निळी पिवळी थोडे जाडसर ते हातात घेऊन. बाईंच्या पाया पडून जागेवर बसण्याची व आपल्याला शंभर पैकी किती गुण मिळाले आहेत हे बघायचे. बाईंनी जायला सांगितले की पळत सुटायचे. घरी जाऊन ते दाखवले की कृतकृत्य व्हायचे. शंभर पैकीचे गुण. उपस्थिती. शेकडा गुण वगैरे पाहून झाले की शेरा यात पास असे लिहिलेले वाचले की स्वर्गीय आनंद व्हायचा पण प्रगती पुस्तकात ठळक अक्षरात लिहिलेला शेरा अगोदर डोळे भरून पाहिले की मग बाकी सगळे. नापासांची संख्या फारच कमी. एक दोन विषयात नापास झालेल्यांना गुणांखाली लाल शाईने रेघ मारली जायची. आणि वरच्या वर्गात ढकलत असत. काहींच्या घरी पेढे वाटले जायचे. पण घरात मुलांची संख्या जास्त असल्याने खवा आणून घरीच पेढे तयार करून देवापुढे ठेवून मग वाटले जायचे. नंतरच्या काळात मुलांना वरच्या वर्गात नेऊन बसवून मग शाळा सुटली जायची. त्यामुळे आपण कोणीतरी झालो आहोत असे वाटायचे.
पुढे एक मे ला शाळेत झेंडा वदंन झाल्यावर निकाल वाटप केले जाई. आणि मग घरी जाताना या वर्षी वर्ग शिक्षक. विषय शिक्षक यांची उत्सुकता वाटायची. मात्र आता हे सगळे बदलून गेले आहे. कोरोनाने शाळा घरी. परीक्षा घरी. निकालही घरीच. ना उत्सुकता ना आनंद. आणि पेढे तरी कुणाला वाटायचे? शिवाय शाळा सुरू झाली की कपडे. शैक्षणिक साहित्य खरेदी हे ही नाही. नातू पास झाला आहे. आणि त्याला बघून वाटले की या आनंदाला ही लेकरं नव्हे तर आम्ही पारखे झालो आहोत. कारण शाळेतील मुलांना जसा तसाच आनंद शिक्षकांनाही वाटतो. आपल्या मुलांच्या चेहऱ्यावरील भाव या वेळी त्यांनाही दिसणार नाहीत. आमच्या साठी नव्हे तर या मुलांच्या आयुष्यातील एक फार महत्वाचा दिवस यंदा नाही पण पुढच्या वर्षी नक्की यावा म्हणून देवाला प्रार्थना.
धन्यवाद.
— सौ. कुमुद ढवळेकर.
Leave a Reply