नवीन लेखन...

इतिहास पुसलेलं नांदेड

Nanded - Forgotten History

नंदीग्राम हे नाव नांदेडला असो अथवा नसो, हे भरताचं आजोळ असो किंवा नसो नि ते सात हजार वर्षाचं पुराणं असो वा नसो; पण ते किमान 2 हजार वर्षांपूर्वी अस्तित्वात होतं याचे मात्र पुरावे आहेत. वर्‍हाडातील वत्सगुल्म (आजचं वाशीम) येथे सापडलेल्या चौथ्या शतकातील वाकाटक नृपती याने दिलेल्या ताम्रपत्रात गोदावरीच्या इतर तीरावरील नंदीतट हे गाव ब्राह्यणांना अग्रहार म्हणून दान केल्याचा उल्लेख आहे. (अग्रहार म्हणजे जेथे वेद विद्यादान केले जात असे, असे स्थळ किंवा विद्यापीठ) तेव्हा चौथ्या शतकात एवढं विद्याकेंद्र असलेलं नांदेड त्यापूर्वी दोन चारशे वर्षे अस्तित्वात असलंच पाहिजे.
नांदेड शहर किती प्राचीन आहे? प्रभू रामचंद्रांचा कालखंड इसवीसनापूर्वी ५ हजार वर्षांचा होता असं नुकतच ऐका ज्योतिर्विज्ञान शास्त्रज्ञानं शोधून काढलं आहे. भरताचं आजोळ नंदीग्राम होतं. भरताचं आजोळ असलेलं नंदीग्राम हेच आजचं नांदेड अशी नांदेडवासीयांची ठाम समजूत आहे. वास्तविक हे भरताचं आजोळ असणं तर सोडाच पण या नगरीचं नाव कधी कधी नंदीग्राम असं होतं असाही पुरावा सापडत नाही. तरीही नंदीग्राम हे नाव लोकांच्या मनात ऐवढं रुतून बसलं आहे की इथे नंदीग्राम हौसिंग सोसायटी, नंदीग्राम मार्केट अशी कितीतरी स्थळं सापडतात. वास्तविक रामाच्या काळी विंध्य पर्वताखाली आर्यांची वसाहत नव्हती. हेच नंदीग्राम भरताचं आजोळ असतं तर किष्किधेकडे जाताना राम, लक्ष्मण आपल्या भावाच्या आजोळी चहा पाणी करुन पुढे गेले नसते काय, असा गंमतीचा विचार लहानपणी माझ्या मनात येत असे.
नांदेड हे शंकराचं वाहन नंदीचं क्षेत्र आहे. एकदा पार्वती रुसून कुठे तरी निघून गेली. तिला शोधण्यासाठी शंकरांनी नंदीला पाठविलं. फिरत फिरत नंदी गोदातटी आला. तिथे असलेल्या उर्वशीवर तो ऐवढा भाळला की आपले कर्तव्य विसरुन इथेच रमला. भगवान शंकरांना हे कळताच ते संतापले. त्यांनी नंदीला शाप दिला आणि त्याला भुलविणार्‍या अप्सरेलाही शाप दिला की, तू एवढी वाहवलीस, आता कायमची नदी बनून वाहत रहा. तेव्हापासून उर्वशी नदी रुपानं वाहू लागली. गोदा-उर्वशीच्या संगमात स्नान केल्यानंतर नंदीचं पाप फिटलं आणि हे स्थळ नंदीक्षेत्र म्हणून प्रसिद्ध झालं. आज गोदा-उर्वशी संगम ही नांदेड शहराची पश्चिम हद्द आहे.
नांदेड हे २ हजार वर्षांचं प्राचीन असल्यामुळं इथं धार्मिक बाबीच्या आख्यायिका भरपूर आहेत. उर्वशी तीर्थ ही नांदेडची पश्चिम सीमा तर तारातीर्थ ही पूर्व सीमा होत. जुन्या पुलाजवळ गोदेच्या दक्षिण तीरावर तारातीर्थ आहे. याही स्थळाला आख्यायिका आहेत, पण विस्तारभयास्तव त्या टाळतो. सुमारे ९०० वर्षापूर्वी महात्मा चक्रधर नांदेडीयास आले होते. त्यावेळी ते नांदेड गावाच्या बाजूला भाळेश्वर क्षेत्री नृसिंहाच्या मंदिरात तारातीर्थ सन्मुख बसले होते असा लीळाचरित्रात उल्लेख आहे.
नांदेड हे गोदाक्षेत्रही आहे. ते गोदावरीची नाभीस्थान आहे. त्यामुळे नाशिक-पैठणच्या बरोबरीने नांदेडचा धर्मक्षेत्र म्हणून उल्लेख होतो. पूर्वी गोदाप्रदक्षिणेची रीत होती. त्र्यंबकेश्वर ते राजमहेंद्री व परत, त्र्यंबकेश्वर ते नांदेड आणि परत तसेच नांदेड पंचक्रोशी अशा तीन प्रकारे ही परिक्रमा होत असे. संत दासगणू महाराजांनी १९३२ साली व त्यांचे शिष्य अनंत महाराज (वरदानंद स्वामी) यांनी १९६८ साली नांदेड ते त्र्यंबकेश्वर आणि त्र्यंबकेश्वर ते  नांदेड (शंखतीर्थ) अशा प्रदक्षिणा केल्या. जिथून गोदावरी ओलांडतात त्या शंखतीर्थ क्षेत्री उजव्या वळणाचे शंख सापडतात. जगात फक्त इथेच हे जीव वाढले, परंतु लोकांनी शंखांची एवढी लूट केली की आता ते जवळजवळ नामशेष झाले आहेत.
प्राचीन इतिहासात न रमता इतिहास काळात येऊ. नांदेड हे प्राचीन धर्मक्षेत्र आहे असं म्हटलं खरं, पण प्राचीनत्व सिद्ध करण्याजोगा इथे कोणताही पुरावा नाही. मलिक अंबरच्या स्वारीत नांदेडचा एवढा विध्वंस झाला की इथे २०० ते ४०० वर्षांपूर्वीचं एकही मंदीर, वाडा, ग्रंथ शिल्लक राहीला नाही. गाडीपुर्‍यात शहरातील सर्वात मोठं महादेव मंदीर होतं. त्याचं दर्ग्यात रुपांतर झालं, पण प्रवेशद्वारावर सूर्यचंद्राच्या प्रतिमा कोरलेल्या तशाच होत्या. बाबरी मशिद प्रकरणानंतर या प्रतिमा व इतर काही मशिदीवरील कोरीव खांब सिमेंटने बुजवून टाकण्यात आले. यवनांच्या भीतीनं उग्रमूर्ती नृसिंहही भुयारात लपला आहे. राम मंदीर, कृष्ण मंदीर, गोदा मंदीर ही होळीवरील मंदिरं बाहेरुन मंदिर न दिसता वाडे दिसतात.
होळीवर एक त्रिविक्रमाचे मंदीर असल्याचा उल्लेख आहे. इतिहास तज्ज्ञ वि. भा. कोलते यांचे म्हणजे असे की, होळीवर आज सरदेशपांडे यांच्या वाड्यासमोर जे कबरस्थान आहे तिथे हे त्रिविक्रमाचे मंदीर असावे. त्यामुळे नांदेडला ‘इतिहास पुसलेलं ऐतिहासिक शहर’ असं म्हणणं भाग पडतं. असो, पूर्वी नांदेड हे बीदरच्या अमलाखाली होतं. आजही नांदेडचे जुने लोक दक्षिण दिशा दाखविण्यासाठी ‘बेदराकडं’ असं म्हणतात. त्यावेळी नांदेडचा समावेश तेलंगणात होत होता व तेलंगण सुभ्याचं मुख्यालय नांदेड हेच होतं. (त्यामुळं नांदेडचं नंदीयाड याड म्हणजे गाव) हे तेलगू रुप स्वीकारार्ह वाटतं).
निजामनं इंग्रजांचं मांडलिकत्व स्वीकारल्यावर शांतता निर्माण झाली. १८३५ मध्ये संस्थानात जिल्हा निर्मिती होऊन नांदेड हे जिल्ह्याचं ठिकाण झालं. १९०० मध्ये रेल्वे इथे आली. १९०३ मध्ये लोकमान्य टिळक त्यांचे स्नेही खापर्डे यांच्या चिरंजीवांच्या लग्नासाठी कुबरेला आले होते. ते करखेलीला उतरले आणि बैलगाडीचा कष्टमय प्रवास करुन कुबेर जहागिरीला गेले. परत जाताना लोकमान्य नांदेडला उतरले. त्यांचा पानसुपारीचा सत्कार केल्याचा लेखी उल्लेख आहे. ते गोदावरीतही पोहले अशी माहिती इतिहास संशोधक तात्यासाहेब कानोले यांनी सांगितली.
साहित्य प्रांतात नांदेड फार सुदैवी आहे. प्रख्यात कवी वामन पंडित (शेष) हे नांदेडचे. त्यांच्या वंशजांच्या मालमत्तेच्या वाटण्यांचे कागदपत्र आहेत. त्यांचे शेषकुलोत्पन्न वंशज आजही नांदेडमध्ये आहेत. मलिकांवरच्या स्वारीत बरेच ग्रंथ नष्ट झाल्याने मध्यकाळात कुणी विद्वान पंडित असल्याचा पुरावा मात्र शिल्लक नाही. अलिकडच्या काळात म्हणजे मागच्या पिढीत संतकवी दे. ल. महाजन आणि वा. रा. कांत ही दोन नावे महाराष्ट्र ख्यात आहेत. निजामाच्या राज्यात केवळ उर्दू हेच शिक्षणाचे आणि राज्य कारभाराचे माध्यम होते. सरकारी शाळांतून मराठी हा विषय शिकविला जात नसे तरीही पंतोजींच्या खाजगी शाळांतून लोकांनी मराठीचा अभ्यास सुरु ठेवला. पुढे ज्या मोजक्या खाजगी शाळांना परवानगी मिळाली. त्यांनी उर्दू माध्यम स्वीकारुन मराठी हा ऐच्छिक विषय शिकवून विद्यार्थ्यांना मातृभाषेचं ज्ञान देणं सुरु ठेवलं. अशा परिस्थितीत १९३० मध्ये वजिराबादला नांदेडकरांच्या पुंडलिकवाडीत हनुमान वाचनालयाची स्थापना झाली. नंतर नगर वाचनालय सुरु झालं. संस्थानाबाहेरुन पुस्तकं मागविणे जिकिरीचे असे. पुस्तकात राजकीय असे काही नाही हे पटवून द्यावं लागे तेव्हा करोडागिरीतून पुस्तकांची सुटका होई.
१९३४ साली पहिले मीडल स्कूल स्थापन झाले. त्याकाळी मराठीसाठी सारे शिक्षक पुण्याहून येत. काटदरे, गोडबोले, जोशी हे काही प्रख्यात शिक्षक! पुढे १९३९ मध्ये प्रतिभा निकेतन शाळेची स्थापना झाली.
गोदावरीवर पहिला पूल १९२७ साली झाला. त्यापूर्वी हैद्राबादहून येणारे निजामचे ओहरेदार, सरदार नबाब गोदावरीच्या दक्षिण काठावरील मुजामपेठमध्ये मुक्काम करीत आणि दुसर्‍यादिवशी मोठ्या समारंभाने नावेने नदी ओलांडून नंदीगिरी किल्ल्याच्या पश्चिमेकडील राजघाटावर उतरत आणि तिथून किल्ल्यात मुक्कामाला जात असत. नंदगिरीच्या पूर्वेला नावघाट आहे. पूर्वी नांदेड हे नदी बंदर होतं. परदेशातून आलेला माल पैठणहून नावेत भरुन नांदेडला आणण्यात येई. पूर्वेकडूनही तेलंगणातील धान्यधुन्य असंच नावेतून येऊन नावघाटावर उतरे. व्यापार्‍यांच्या सोयीसाठी काठावरच ऐक सराय बांधलेली आहे. ती आजही तशीच आहे. १०० वर्षापूर्वी शहावली नावाचे एक फकीर तिथे मुक्कामाला आले. त्यांचा लौकिक सर्वत्र पसरला. त्यांची कीर्ती ऐकून निजामाच्या वजिरांनी त्यांचे दर्शन घेण्याची इच्छा व्यक्त केली. नबाबानं साधेपणानं यावं असं वजीर साहेबांन फर्मावलं, पण नवाब लवाजाम्यासह वाजत गाजत आले. ते सराईच्या कमानीत येताच शहावली कडाडले, ‘कौन कम्बख्त अंदर आने की जुर्रत कर रहा है? हकालो उसको’. अपमानीत होऊन वजीरसाहेब परत गेले.
वली शहा सर्वधर्म समान मानणारे होते. त्यांचे अनुयाची सर्व धर्मांत होते. काशीनाथराव गोडबोले हे शिक्षक त्यांची सेवा करीत. वलीच्या पायात अळ्या झाल्या होत्या. मास्तरसाहेब रोज जखम पुसून चिमट्यानं अळ्या काढून पट्टी बांधून जात. ते गेल्यावर शहासाहेब पट्टी सोडून सर्व अळ्या जखमेत पुन्हा सोडून देत. ‘अल्ला की यही मर्जी है’ असं त्याचं म्हणणं असे. वलीशहांची मजार आज सराईत असून पौषी अमावस्येला येळेगावाहून १५० किमी अंतरावरुन येणारी पालखी सराईत मुक्काम करते आणि मजारवर चादर चढवून तारातीर्थला रवाना होते. १०० वर्षांपासून ही प्रथा चालू आहे.
पूर्वी लोकांचा जीवनक्रम नदीवर अवलंबून असे, म्हणून वस्त्याही नदीजवळ पुरापासून सुरक्षित जागी असत. नावघाटावर उतरले की होळी. ही ब्राह्यणांची वस्ती म्हणजे नांदेडची सदाशिव पेठ! पूर्वापार सारं राजकारण होळीवरुनच चाले. होळी आणि सराफा, मारवाडगल्ली हे एक युनिट समजल्यास हैद्राबाद मुक्ती संग्रामातील इतिहास इथेच घडला. श्यामराव बोधनकर, भगवानराव गांजवे, गोपाळशास्त्री देव, विनायकराव डोईफोडे, सरस्वतीबाई सरदेशपांडे, शकुंतलाबाई साल्ये, कावेरीबाई बोधनकर, ताराबाई परांजपे हे स्वातंत्र्यवीर होळीवरचेच.
सराफाचा इतिहास समजल्याशिवाय नांदेड समजणार नाही. सराफातील मंडळींचं ‘अर्क’ या एकाच विशेषणानं वर्णन करता येईल. महाराष्ट्रात मुंबई, सांगली, जळगाव येथील सराफ बाजार प्रसिद्ध आहेत, पण तिथे सर्वच दुकानं सोन्या चांदीच्या विक्रीची नाहीत. नांदेडला पूर्वेला सराफा चौकापासून (अलिकडेच नाव भोजालाल गवळ चौक) व्यंकटीच्या हॉटेलपासून पूर्वेला कामधेनू हॉटेलपर्यंत दोन्ही बाजूंना केवळ सोने चांदीचीच दुकाने! अपवाद म्हणून दुसरं दुकान नाही. सराफा बाजार एवढा अरुंद की एका ठिकाणी तर दोन लठ्ठ माणसं ऐकमेकांना ओलांडू शकत नाहीत. एका दुकानात सौदा न पटला तर गिर्‍हाइक सरळ उठून समोरच्या दुकानात जातं. तेव्हा पहिला दुकानदार ओरडून दुसर्‍या दुकानदाराला आपण काय भाव सांगितला ते जाहीरपणे सांगतो आणि गिर्‍हाइकाची फालुदा होतो! सराफ व्यापार्‍यांत देशस्थ ब्राह्यण, मराठा, सोनार, कोमटी (आर्यवैश्य) आणि मारवाडी जमातीचा ठेपा आहे. येथे ना परांजपे, गाडगीळ आदी कोकणस्थांचे दुकान आहे ना गुजराती ज्वेलरांचे! सर्वांचे संघटन घट्ट! बरीच मंडळी दुकानांच्याच वरच्या मजल्यावर राहतात तर बाकीचे मारवाडगल्ली आणि होळीवर. रात्री जेवणं झाल्यावर यांचा बंद दुकानाच्या ओट्यावर अड्डा जमतो आणि ज्या गप्पा होतात त्या ऐकून तुम्ही थक्क व्हाल! जगातील प्रत्येक गोष्टीची त्यांना माहिती असते आणि प्रत्येक गोष्टीवर त्यांच्याजवळ तोडगा असतो! कश्मिरचा प्रश्न कसा चुटकीसरशी सोडवावा हा तोडगा त्यांच्याकडून ऐकावा ‘तुला काय माहिताय बे, इंदिरा गांधीनी १५ ते २० अटम बम करुन बळदात लपवून ठेवलेत’ ही माहिती इथंच मिळू शकते. रात्री १२ ते १ वाजता हा अड्डा उठतो. मात्र, गेल्या काही वर्षांतील दंगली, वारंवार लागणारी संचार बंदी यामुळे आता या रात्र अड्ड्यांना ग्रहण लागल्यानं, नांदेडचं ऐक इरसाल वैशिष्ट्य नष्ट होऊ लागलं आहे.
सराफ मंडळी ही अत्यंत धाडशी आणि चळवळी! निजाम काळात स्टेट काँग्रेसचं ऑफिस सराफ्यातच होतं. सत्याग्रहीच्या तुकड्या इथूनच रवाना होत तेव्हा त्यांना जोशात निरोप दिला जाई. वर सांगितलेली बोधनकर, डोईफोडे, गांजवे, सरसर ही सराफ मंडळीच. नांदेडचं झेंडा प्रकरण फारच गाजलं. हैद्राबाद विलिनीकरणापूर्वीही काँग्रेसच्या कार्यालयावर इंडियन युनियनचा झेंडा फडकत होता. एकदा १० हजार रझाकारांची मिरवणूक निघाली. ‘परकी’ झेंड्याखालून जाण्याला त्यांची तयारी नव्हती. झेंडा उतरवा असं त्यांचे सांगणं, मिरवणूक ऑफीसजवळ येऊन थांबली. इकडे सर्व सराफ मंडळी बंदुका-भाले तलवारी, गावठी बॉम्ब घेऊन गच्ची गच्चीवर उभे! कुणी थोडी आगळीक केली असती तर सारं नांदेड जळून भस्म झालं असतं असं अनंत भालेरावांनी लिहून ठेवलं आहे, पण गाजलेल्या सिनेमाचा शेवट फ्लॉप व्हावा त्याप्रमाणं होळीवरुन केलेल्या एका बंदुकीच्या बारानेचं रझाकार पळत सुटले. नांदेड वाचलं. सराफा मंडळींच्या शौर्याला सलाम!
प्रत्येक सराफाचंही काही वैशिष्ट्य काही खोडी! त्यांना बाबूराव हत्ती, पिलू भिंगरी, डबलशेठ अशी नावं दिलेली. नावं एवढी रुढ की बाबुराव म्हणून हाक मारली तर ती दुसर्‍याला आहे असं समजून बाबूराव हत्तीप्रमाणे डोलत पुढे जाणार. प्रत्येकाला वेगळ्या चवीचा चहा लागतो आणि त्या चहाला त्याचंच नाव दिलेलं. नवशिक्या गिर्‍हाइकानं ‘कामधेनू’ त जाऊन दूध कमी साखर जास्त चहा सांगितला की वेटर ओरडून सांगणार ‘एक कप अण्णा औंढेकर बनवा!’ सराफा हीच नांदेडची खरी ओळख. पाहुण्यांनी सराफाला अवश्य भेट द्यावी!
निजाम राज्यात मराठवाड्यात औरंगाबाद आणि नांदेड हीच दोन शहरे गणली जात. इथे लाइट होती. नळाचे पाणी होते. लातूर, परभणीला या सोयी अॅक्शननंतर १९६० साली आल्या. नांदेड हे मराठवाड्यातील ऐकमेव औद्योगिक शहर! उस्मानशाही मिल्सचे कापड परदेशात जात असे. १९५० मध्ये मराठवाड्यात सर्व प्रथम कॉलेज स्थापन झाले ते नांदेड आणि औरंगाबादला. म्हणून ही दोन शहरे उच्च शिक्षणाच्या गंगोत्री, जन्मोत्री आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी २० जून १९५० रोजी औरंगाबादेत मिलींद महाविद्यालय सुरु केलं. त्याच तारखेला स्वामी रामानंद तीर्थ यांनी नांदेडला पीपल्स कॉलेज सुरु केलं. त्यामुळेच पुढे चालून औरंगाबादच्या विद्यापीठाला डॉ. बाबासाहेबांचे नाव तर नांदेडच्या विद्यापीठाला स्वामी रामनंद तीर्थ यांचं नाव देण्यात आलं.
कॉलेजच्या निमित्तानं नांदेडची रयाच पालटली. ज्येष्ठ गांधीवादी नेते दादासाहेब बारलिंगे यांचे बंधू सुरेंद्र बारलिंगे कुसुमाग्रजांचे बंधू के. रं. शिरवाडकर, ज्येष्ठ समीक्षक प्रा. स. रा. गाडगीळ, राम शेवाळकर, नरहर कुरुंदकर हे आम्हाला शिक्षक म्हणून लाभले हे आमचं केवढं भाग्य! यांच्यासहित म. म. यज्ञेश्वर शास्त्री कस्तुरे, इतिहास संशोधक तात्यासाहेब कानोले, संगीताचार्य अ. ह. गुंजकर, चित्र महर्षी त्र्यं. शां. वसेकर, रसिकाग्रणी अण्णासाहेब अंबेकर, नास्तिकाचार्य ग. धों. देशपांडे गुरुजी, हे एकत्र बसले म्हणजे काव्यशास्त्र विनोदाला भर येत असे. १९५५ ते १९६५ चे दशक म्हणजे नांदेडचा सुवर्णकाळ म्हटला जातो. ग. धों. गुरुजी यज्ञेश्वर शास्त्रीच्या घरी राहत. शास्त्रीबुवा पूजेला बसले की हे नास्तिकाचार्य शेजारी पाट टाकून हे कर्मकांड कसं थोतांड आहे हे सांगत. पूजा आटोपल्यावर शास्त्रीबुवा देवाला नमस्कार करुन ‘चला आता जेवायला, उरलेला उपदेश जेवताजेवता ऐकतो’ असं हसून म्हणत. त्याकाळी कुठे ना कुठे व्याख्यानं असेच. वक्ते हेच कधी यज्ञेश्वर शास्त्री पूर्वरंग करीत तर उतररंग करण्यास कुरुंदकर गुरुजी, गाडगीळांच्या जडजंबाल भाषणाला शेवाळकरांच्या नर्म विनोदाचा शिडकावा असे. खरोखरच आम्ही शतकोटी भाग्यवान !
नांदेड हे पूर्वीपासून व्यापारी गाव, नांदेड ही लक्ष्मी पुत्रांची पेठ, कापूस, भुईमुगाचा जबर व्यवसाय. इथे शेकडो वर्षांपासून हातमागाचा व्यवसाय होता. मुसलमान मोमीन, तेलगू पद्मशाली आणि मराठी शाळू (विणकर) या धंद्यात होते. पद्मशाली आणि व्यापारी कोमपटी (जे हल्ली स्वत:ला आर्यवैश्य म्हणवितात) मूळचे तेलगू भाषिक, आता ते शंभर टक्के मराठी झाले आहेत.
नांदेडची उस्मानशाही मिल्स ही निजाम संस्थानातील सर्वात मोठी कापड गिरणी. नंतरच्या काळात मफतलाल यांच्या मार्गदर्शनाखाली टेक्सटॉइल मिल्स सुरु करण्यात आली आणि नांदेडची समृद्धी कळसावर पोचली. पण गैरकारभार आणि भ्रष्टाचार यामुळे उस्मानशाही मिल्स व टेक्सटाईल मिल्स बंद पडल्या. मिल बंद पडल्या म्हणून १४ जिनिंग मिल्स बंद झाल्या. (तिथं आता हौसिंग सोसायट्या आणि मॉल्स सुरु झाले आहेत). कामगार बेकार झाले. सराफी, कापड दुकानदार हातावर हात ठेवून बसून राहू लागले. दरम्यान मिल मध्ये बेकार झालेले विणकर पुन्हा हातमागाकडे वळले. कुणी तरी हातमागावर टेरिकॉट कापड विणलं. पाहता पाहता ते लोकप्रिय  झालं. कोलकत्यापासून कोईमतूरपर्यंत नांदेड म्हटलं की हॅण्डलूम टेरिकॉटचं गाव असं लोक ओळख सांगू लागत. पण हा व्यवसायही फार दिवस टिकला नाही.
आज औद्योगिक शहर ही नांदेडची ओळख राहिली नसली तरी निरनिराळ्या व्यवसायानं नांदेड फुलत फळत आहे. गुरुगोविंदसिंगजींचं वास्तव्य हे नांदेडला आर्शीवादपर ठरलं. गुरुजी नांदेडला आले नसते तर नांदेड हे केवळ कसब्याचं गाव राहिलं असतं. श्री गुरुजींनी नांदेडला लिहिलेल्या ग्रंथा साहेबाला ३०० वर्षे झाली. त्यानिमित्त नांदेडचा कायापालट झाला. केंद्र सरकारच्या हजारो कोटी रुपयांच्या अनुदानातून सारे शहर बदलून गेले. मी जेव्हा नांदेडकडे प्रवाशाच्या त्रयस्थ नजरेने पाहतो तेव्हा हे महाराष्ट्रातील सर्वात सुंदर शहर असावं असं भासू लागतं. (सध्याच्या रस्ते खोदाइकडे मात्र थोडे दिवस दुर्लक्ष करावं)
आता नांदेडहून देशाच्या प्रत्येक मोठ्या गावी थेट रेल्वे जाते. पुणे, मुंबई, ओखा, जयपूर, अजमेर, श्रीगंगानगर, अमृतसर, दिल्ली, पाटणा, कोलकत्ता, भुवनेश्वर, विशाखापट्टणम, हैद्राबाद, चेन्नई, तिरुपती, रामेश्वर, तिरुअनंतपुरम, बेंगळूर, कोल्हापूर येथे जाण्यासाठी नांदेडहूनच सुटणार्‍या थेट गाड्या आहेत. पुणे, नागपूर येथूनही एवढ्या थेट गाड्या सुटत नाहीत. नांदेडशी हवाई सेवेनं मुंबई, नागपूर, दिल्ली, बंगळूर ही शहरं जोडली आहेत. एवढंच कशाला, काळेश्वराच्या घाटावरुन ३५ ते ३० खेड्यांसाठी लाँच सर्व्हिस आहे. जमीन, आकाश व जलवाहतूक असलेलं (पण समुद्र किनार्‍यावर नसलेलं) महाराष्ट्रातलं हे ऐकमेव शहर असावं. आता शहरानं लोकसंख्येचा ७ लाखाचा आकडा ओलांडला आहे. येथे महापालिका आहे आणि महसूल आयुक्तालयही होणारच आहे. असं हे सुंदर प्रगतीशील शहर, एकदा नव्हे, वारंवार भेट द्यावंसं वाटणारं!
— किरण केंद्रे
संपर्क : ९४२२१४८५०८

Avatar
About किरण केंद्रे 4 Articles
किरण केंद्रे हे महाराष्ट्र शासनाच्या जनसंपर्क विभागात कार्यरत आहेत.

4 Comments on इतिहास पुसलेलं नांदेड

  1. मुखेड येथे श्रावण बाळाची कथा घडल्याचे सांगितले जाते

  2. सर मला तुमची भेट घ्यावयाची आहे …
    खूप सुंदर लिहिलं आहे..म्हणजे मी जिथून येन जण करतो . तिथे एवढा सारं इतिहास घडला आहे हे आपलं लेख वाचल्यानंतर समजलं..

Leave a Reply to Kamalakar Deshmukh Cancel reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..