नवीन लेखन...

ममींची कार्यशाळा

इजिप्तमध्ये कायरोच्या दक्षिणेला सुमारे तीस किलोमीटर अंतरावर ‘सकारा’ नावाचं ठिकाण आहे. इथे ममींच्या स्वरूपातले अनेक पुरातन अवशेष सापडले आहेत. इथल्या पुरातन अवशेषांचा शोध घेताना इ.स. २०१६ साली, रमादान हुसैन या ज्येष्ठ इजिप्शिअन अभ्यासकाला इथल्या जमिनीखाली दडलेली, कूपाच्या स्वरूपातली एक वैशिष्ट्यपूर्ण रचना सापडली. उनास राजाच्या पिरॅमिडजवळ सापडलेल्या या खोल कूपात सत्तावीसशे वर्षांपूर्वीचे, भांडी व तत्सम वस्तूंचे अवशेष आढळले. या कुपात सापडलेल्या वस्तूंचं आणि या कुपाच्या रचनेचं निरीक्षण केल्यानंतर, त्यातून एक अनपेक्षित गोष्ट स्पष्ट झाली – हा कूप म्हणजे ममी तयार करण्यापासून ते ममी कायम स्वरूपात ठेवण्यापर्यंतच्या सर्व सोयी असणारी एक कार्यशाळाच होती! या कार्यशाळेत ममीच्या निर्मितीतील विविध टप्प्यांसाठी वेगवेगळ्या जागा राखून ठेवल्या होत्या. हा कूप म्हणजे ममी तयार करण्याची कार्यशाळा आहे हे स्पष्ट होताच, या ठिकाणाला ममीच्या निर्मितीवरील संशोधनाच्या दृष्टीनं मोठं महत्त्व प्राप्त झालं. मॅक्झिम रॅगिओट आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं संशोधन याच कार्यशाळेत सापडलेल्या विविध वस्तूंवर केलं गेलं आहे.

या कूपाच्या वरच्या भागात मोकळी जागा आहे. ही मोकळी जागा ममी तयार करण्याच्या क्रियेतील सुरुवातीच्या टप्प्यासाठी राखून ठेवली असावी. या सुरुवातीच्या टप्प्यात मृताचं शरीर हे त्यातील पाणी काढून टाकण्यासाठी विविध क्षारांच्या मिश्रणात ठेवलं जायचं. ही क्रिया या मोकळ्या जागेत केली जात असावी. त्यानंतर या कूपात तेरा मीटर खाली, एका खोलीसारख्या मोकळ्या जागेत, दगडी फरशीपासून तयार केलेले ओटे दिसतात. पाणी काढून टाकलेल्या शवाचं प्रत्यक्ष ममीत रूपांतर करण्यासाठी या ओट्यांचा वापर होत असावा. ओटे असलेल्या जागेच्या सुमारे सतरा मीटर खाली, म्हणजे एकूण तीस मीटर खोलीवर मृताचे, ममीच्या स्वरूपातील शव कायम स्वरूपात ठेवण्याची जागा आहे. याशिवाय विविध वस्तू ठेवण्यासाठीही या कूपात मोकळी जागा ठेवली आहे. या साठवणीच्या जागेत भांडी, ताटं, वाडगे, धूपदाणी, अशा मातीपासून बनवलेल्या अनेक वस्तू ठेवलेल्या आढळल्या. कूपातल्या या सर्व जागा एका स्तंभासारख्या उभ्या आणि अगदी अरुंद मार्गिकेनं जोडल्या आहेत.

या कूपात सापडलेल्या भांड्यांपैकी काही भांडी चांगल्या स्थितीत आहेत, तर काही भांडी ही मोडक्या स्थितीत आहेत. यांतील काही भांड्यांवर, त्या भांड्यात काय साठवलं आहे, किंवा या भांड्यातील पदार्थ कशासाठी वापरायचा, याची नोंद केलेली आहे. मॅक्झिम रॅगिओट आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी, या कूपातल्या एकूण पस्तीस भांड्यांची व वाडग्यांची आपल्या संशोधनासाठी निवड केली. या संशोधकांनी, या भांड्यांच्या आणि वाडग्यांच्या पृष्ठभागावर चिकटलेल्या पदार्थांचं, तसंच त्या भाड्यांच्या मातीत शोषल्या गेलेल्या पदार्थांचं रासायनिक विश्लेषण केलं. शोषल्या गेलेल्या पदार्थांच्या विश्लेषणासाठी या संशोधकांनी, छोट्या गिरमिटाच्या साहाय्यानं या भांड्यांच्या आतल्या भागातील मातीचे, एक-एक ग्रॅम वजनाचे नमुने घेतले. ममी बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पदार्थांचं यापूर्वीही अनेक वेळा रासायनिक विश्लेषण केलं गेलं आहे. परंतु त्या सर्व वेळी, ज्या पदार्थांचं विश्लेषण केलं गेलं, ते सर्व पदार्थ एकतर थेट ममीतून घेतले गेले होते, किंवा काही पदार्थ ममीला गुंडाळलेल्या कापडातून वेगळे केले गेले होते. आताच्या संशोधनात मात्र ममी बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या प्रत्यक्ष पदार्थांचंच विश्लेषण केलं गेलं. त्यामुळे ममी बनवण्याच्या प्रक्रियेत वापरले गेलेले मूळ पदार्थ आता अधिक खात्रीनं ओळखता येणार होते.

भांड्यातून व वाडग्यांतून घेतल्या गेलेल्या सर्व नमुन्यांच्या विश्लेषणात जी रसायनं सापडली, त्यावरून त्या भांड्यांत कोणते पदार्थ असावेत, याचा व्यवस्थित अंदाज या संशोधकांना आला. या विश्लेषणातून, त्यांना भांड्यांत आणि वाडग्यांत प्राणिजन्य स्निग्ध पदार्थ, वनस्पतिजन्य तेल, मेण, डांबर, राळेचे विविध प्रकार, अशा अनेक पदार्थांचं अस्तित्व दिसून आलं. काही भांड्यातील पदार्थ हे शुद्ध स्वरूपात होते, तर काही भांड्यांतील पदार्थ मिश्रणाच्या स्वरूपात होते. हे पदार्थ गरम केले गेले असल्याचे पुरावेही या संशोधकांना सापडले. यावरून, ममी तयार करताना, विविध पदार्थ वा त्यांचं मिश्रण वितळवलं जात असावं व त्याद्वारे वेगवेगळ्या प्रकारचे लेप तयार केले जात असल्याचं दिसून येत होतं. यातील काही लेप मृताच्या शरीरावर थेट दिले जात असावेत. काही लेपांच्या बाबतीत मात्र, शवाभोवती गुंडाळण्याचं कापड प्रथम या लेपांत बुडवून नंतर ते शवाभोवती गुंडाळलं जात असावं. ममींत वापरलेल्या या लेपांतील पदार्थांना जीवाणूप्रतिबंधक गुणधर्म असल्याचं या संशोधकांना आढळलं. त्यामुळे या शवाच्या कुजण्याला अटकाव होत असावा. तसंच सापडलेल्या पदार्थांत सुवासिक पदार्थांचाही समावेश होता. इथे सापडलेल्या काही भांड्यांवर, त्यातील पदार्थांची नावं लिहिली होती. त्यातला एक शब्द म्हणजे ‘अंटिऊ‘. हा शब्द इजिप्तमधल्या प्राचीन लिखाणात अनेकवेळा आढळतो. आतापर्यंतच्या उपलब्ध लिखाणानुसार, या शब्दाचा अर्थ हिराबोळ ही राळ असल्याचं समजलं जात होतं. मात्र अंटिऊ हा शब्द लिहिलेल्या भांड्यात, देवदाराच्या वृक्षापासून तयार झालेली राळ आढळली. यावरून अंटिऊ हा शब्द विशिष्ट प्रकारच्या राळेसाठी न वापरता जाता, तो सर्वच प्रकारच्या राळांसाठी वापरला जात असल्याचं स्पष्ट झालं. तसंच ‘सेफेट’ हा शब्द आतापर्यंत एका पवित्र तेलासाठी वापरला जात असल्याचा समज होता. प्रत्यक्षात, सेफेट लिहिलेल्या भांड्यात सुरूच्या झाडापासून मिळवलेली राळ आणि प्राणिजन्य स्निग्ध पदार्थांचं मिश्रण आढळलं. इथे सापडलेल्या काही भांड्यांवर, ‘स्वच्छतेसाठी’, ‘सुवासासाठी’, ‘डोक्यासाठी’, असे त्यांतील पदार्थांच्या वापराशी संबंधित शब्दही आढळले. त्यामुळे कोणते पदार्थ कशासाठी वापरतात, हे या शब्दांवरून काही प्रमाणात स्पष्ट झालं. या पदार्थांच्या संबंधातली आणखी एक गोष्ट म्हणजे, ममी तयार करण्यासाठी वापरले जाणारे अनेक पदार्थ इजिप्तमध्ये तयार होत नव्हते. त्यामुळे हे सर्व पदार्थ इजिप्तबाहेरून आणले गेले असावेत. उदाहरणार्थ, देवदारासारख्या वृक्षापासून तयार केलेली राळ ही भूमध्य सागराच्या परिसरातून, तर डांबर मृत समुद्राच्या परिसरातून आणलं गेलं असावं. राळधूप आणि एलेमीसारख्या राळी या तर आग्नेय आशिआतील उष्णकटिबंधीय जंगलांतून – म्हणजे खूपच दूरवरून आणल्या गेल्या असाव्या.

ममी तयार करणं, हा त्याकाळच्या इजिप्तमधला एक मोठा, पैसे मिळवून देणारा व्यवसाय होता. त्यामुळे त्याची माहिती गुप्त ठेवली जात असावी. म्हणूनच ममी तयार करण्याच्या प्रक्रियेबद्दल फारसं लिखाण उपलब्ध नाही. रमादान हुसैन यांनी शोधून काढलेली सकारा इथली ममींची कार्यशाळा, ही प्रक्रिया समजण्यात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत आहे. मॅक्झिम रॅगिओट आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या, या कार्यशाळेत सापडलेल्या वस्तूंवरील संशोधनामुळे, या निर्मितीप्रक्रियेमागचं रसायनशास्त्र आता थोडंफार समजू लागलं आहे. ममी बनवण्यासाठी कोणते मूळ पदार्थ वापरले जायचे व ते कोणत्या स्वरूपात वापरले जायचे, याची आता कल्पना येऊ लागली आहे. ममी तयार करण्यामागची प्रक्रिया गुंतागुंतीची आहे. ममी तयार करणाऱ्यांना मात्र या प्रक्रियेमागचं उपयोजित रसायनशास्त्र नक्कीच अगवत होतं. ममी तयार करण्याच्या या तंत्राचा विकास हा काही सहजी झालेला नाही. सदर तंत्रज्ञान विकसित होण्यास सुरुवात झाली असावी, ती इ.स.पूर्व ४,३०० सालाच्या सुमारास. त्यानंतर ते प्रगत स्थितीला पोचलं असावं, इ.स.पूर्व ३,१०० सालाच्या सुमारास! हा काळ थोडा-थोडका नव्हता… तो होता तब्बल बाराशे वर्षांचा!

(छायाचित्र सौजन्य – Nikola Nevenov / Saqqara Saite Tombs  / Susanne Beck / University of Tubingen / Project)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..