नवीन लेखन...

मर्चंट नेव्ही रियालिटी

बॅकग्राऊंडला अथांग निळा समुद्र आणि महाकाय जहाज यांच्या पुढ्यात पांढऱ्या स्वच्छ रुबाबदार युनिफॉर्म मध्ये काढलेले फोटो. केवळ रुबाबदार युनिफॉर्मच नव्हे तर अनेक देश फिरायला मिळणे आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे अमेरिकन डॉलर्स मध्ये मिळणारी घसघशीत सॅलरी. वर्षातले सहा महिने देशाबाहेर राहिल्याने मिळणारे एन आर आय स्टेटस आणि मिळणाऱ्या घसघशीत सॅलरीवर मिळणारी इन्कम टॅक्स मधील सूट. हे सर्व पाहून किंवा ऐकून कोणालाही या करियरबद्दल हेवा वाटणे स्वाभाविक आहे.

मर्चंट नेव्ही मध्ये जहाजांवर कामं करणारे अधिकारी आणि खलाशी हे संपूर्ण जगभरात असंख्य देशात जात असतात. त्यामुळे जगभर पर्यटनाचा आनंद घेतात. जहाजावर भरपूर दारू प्यायला मिळते. अनेक देशात आणि अनेक बंदरात त्यांच्या मैत्रिणी असतात. एकूणच काय तर सगळ्यांना असे वाटते की मर्चंट नेव्ही मध्ये सगळे खूप एन्जॉय करत असतात.

मी 2008 साली पहिल्यांदा जहाजावर गेलो आणि तेव्हापासून आतापर्यंतच्या गेल्या बारा ते तेरा वर्षांच्या कालावधीत मी प्रत्यक्ष जहाजावर एकूण 52 महिने म्हणजेच फक्त साडे चार वर्ष माझ्या सोयीनुसार काम केले. ज्या कंपनीत पहिल्यांदा जॉईन झालो तेव्हापासून अजूनही त्याच कंपनीत आहे.

2009 साली आमच्या कंपनीतील जहाजावर बियर आणि हार्ड लिकर दोन्हीही मिळायचे पण 2010 साली फक्त बियर मिळायला लागली, हार्ड लिकर पूर्णपणे बंद, काही महिन्यात तर बियर सुद्धा बंद कारण कंपनीने जहाजांवर झिरो अल्कोहोल पॉलिसी लागू केली. जहाजांचे आणि जहाजावर होणारे अपघात हे बहुतेक करून दारूच्या नशेमुळे होतात असा जगभरातील शिपिंग कंपन्यानी निष्कर्ष काढला होता.

अनेक देशात आणि अनेक बंदरात मैत्रिणी असणे हा सगळ्यांचा एक मोठा गैरसमज असतो. ज्यांचे स्वतःच्या बायकोवर किंवा प्रेयसीवर खरे प्रेम असते त्याला अशा मैत्रिणींची गरजच नसते. जहाजावर शंभरातील पन्नास टक्के दारू पिणारे तर वीस ते पंचवीस टक्के जिथे जातील तिथे मैत्रिणी शोधणारे असतात.

शेकडा नव्वद टक्के शिपिंग कंपनीत झिरो अल्कोहोल पॉलिसी आल्याने बियर सुद्धा बघायला मिळत नाही. आताच्या काळात जहाजावरुन कोणत्याही देशातील किंवा कोणत्याही पोर्ट व शहरात जाणे येणे जवळपास बंद झाले आहे. प्रत्येक देशातील कायदे, नियम आणि इतर फॉर्मॅलिटी पूर्ण होईपर्यंत जहाज त्या बंदरातून बाहेर निघून पुढच्या बंदरासाठी मार्गस्थ झालेले असते.

मागील काही वर्षांपासून जहाजांवरील मॅन पॉवर कंपन्यांकडून कमी कमी केली जात आहे. त्यामुळे एखाद्या बंदरात किंवा शहरात जाण्याची संधी असूनही जवाबदारी सोडून कोणालाही सहजा सहजी जाता येत नाही. वरिष्ठ अधिकारी सुद्धा कोणालाही जहाज सोडून काही तासांसाठी बाहेर पाठवण्यास अनुत्सुक असतात.

जहाजांवर खाणे पिण्याची मौज मजा असते हा सुद्धा एक मोठा गैरसमज असतो, जहाजांवर जेवण बनवणारा कुक चांगला नसला की त्याच्याजवळ कितीही चांगल्या प्रकारचा किराणा, भाजीपाला आणि मांस मच्छी असली तरीही जेवण नकोसे होऊन जाते.

महिन्यातून किंवा दीड महिन्यातून एकदा जहाजावर प्रोव्हिजन म्हणजे किराणा, मांस, मच्छी आणि भाजीपाला पुरवला जातो आणि पुढील महिना दीड महिना तो कोल्ड रूम मध्ये ठेवून वापरला जातो.

काही काही कुक असे असतात की घरचे किंवा हॉटेलचे जेवण सुद्धा विसरायला होते, परंतु असे कुक दहापैकी तीन चार जहाजावर मिळतात.

दुरून डोंगर साजरे किंवा दिसतं तसं नसतं असा काहीसा प्रकार मर्चंट नेव्ही जॉईन करणाऱ्यांना सुरवातीलाच अनुभवायला मिळतो.

सुरवातीला जॉईन करणारे खलाशी हे पहिल्यांदा ट्रेनी म्हणून तर नेव्हीगेशनल ऑफिसर हे कॅडेट म्हणून आणि इंजिनियर ऑफिसर्स हे जुनियर इंजिनियर म्हणून जॉईन होतात.

सुरवातीचे काही वर्ष या सगळ्यांना जी कामे सांगतील ती त्या त्या वेळी करावी लागतात, कोणलाही उलट उत्तरे न देता किंवा कोणत्याही कामाला कुठल्याही वेळेला नाही बोलता येत नाही. दिवसातून पंधरा सोळा तास काम.

जसं जसा कामाचा अनुभव येतो तसं तसं प्रमोशन मिळते पण प्रमोशन मिळवण्यासाठी घरी असताना भारत सरकारच्या समुद्री वाणिज्य विभागाकडून घेण्यात येणाऱ्या परीक्षा पास कराव्या लागतात.

जसजसे प्रमोशन मिळते तस तशी जवाबदारीही वाढते, पगार वाढतो पण या सगळ्यात झोप सुद्धा उडते, ताण तणाव वाढतो.

हवामान खराब झाले की झोपही नाही आणि जेवणही नाही अशी परिस्थिती होऊन जाते.

ज्या कालावधी साठी कंपनी जहाजावर पाठवते तेवढा कालावधी संपल्यावर पुढील महिने दोन महिने सुद्धा रिलीव्हर नाही, एखाद्या देशात किंवा पोर्ट मध्ये फॉर्मॅलिटी पूर्ण नाहीत म्हणून अडकून राहावे लागते.

युनिफॉर्म वर असणाऱ्या सोनेरी पट्टयांच्या आड खूप मोठी मेहनत आणि परिश्रम लागलेले असतात, इंजिनियर्स चे हात मशिनरी आणि इंजिन चालू ठेवण्यासाठी ग्रीस आणि ऑइल मध्ये कितीतरी वेळा काळेकुट्ट झालेले असतात. नेव्हिगेशनल ऑफिसर्सचे हाताना मोठं मोठाले दोर ओढून फोड आलेले असतात.

उन्हाळ्यातील उष्णतेने घामाघूम होऊन आणि बर्फ पडत असताना थंडीत हाडे गोठलेली असताना काम करण्याचा अनुभव फक्त जहाजावरच येतो.

वेगवेगळ्या जाती धर्माचे, प्रांतांचे एवढेच काय वेगवेगळ्या देशातल्या सहकाऱ्यांसह काम करावे लागते.

कोण कुठल्या वेळेला कसा रिऍक्ट होईल कसा वागेल याचा कोणालाही अंदाज करता येत नाही. जहाजावर कोणाच्या मनात काय चाललंय आणि कोणते हेतू आहेत हे सुद्धा कोणालाच ओळखता येत नाहीत. घरचे प्रॉब्लेम्स, टेन्शन्स घेऊनच सगळे जहाजावर काम करत असतात.

मर्चंट नेव्ही मध्ये जॉईन होण्यापूर्वी या करियर मध्ये काम करणाऱ्यांबद्द्ल ऐकलेले वूमनायझर, अल्कोहोलिक ही विशेषणे अतिशयोक्ती आणि मोठ्या प्रमाणावर चुकीची असल्याचे वास्तव मला अनुभवायला मिळाले. वूमनायझर आणि अल्कोहोलिक या दोन विशेषणांमुळे कितीतरी पालक आपल्या मुलांना या क्षेत्रात करियर करायला पाठविण्यासाठी कचरतात. एवढंच काय काही पालक तर मर्चंट नेव्ही मधील मुलाचे त्यांच्या मुलीसाठी स्थळ आले तर लगेचच नकार कळवून टाकतात.

माझ्या संपूर्ण करियर मध्ये आजपर्यंत मी कोणालाही त्याच्या मनाविरुद्ध जहाजावरील कामाशिवाय इतर कोणतेही कृत्य करण्यासाठी जबरदस्ती करताना पाहिले नाही मग जहाज पोर्ट मध्ये असताना शहरात बाहेर फिरायला जाणे असो की दारू पिणे असो वा अन्य काही.

पंधरा ते वीस टक्के लोकांच्या मुळे संपूर्ण मर्चंट नेव्हीला ही विशेषणे लागली त्यामुळे ताडाच्या झाडाखाली एखाद्याने ग्लासात दूध प्यायले तरी बघणाऱ्याला तो ताडीच पीत आहे असा समज होणे स्वाभाविकच आहे.

अधिकाऱ्यांना वर्षातले सहा महिने जहाजावर राहण्याचे कोणालाही बंधन नसते तसेच सलग सहा महिने सुद्धा राहावे लागत नाही. खलाशांना मात्र सलग सहा ते नऊ महिने राहावेच लागते. वर्षातून किती महिने जहाजावर राहायचे आणि घरी किती राहायचे हे ज्याच्या त्याच्यावर अवलंबुन असते परंतु कंपनी सांगेल त्याप्रमाणे कधी कधी जॉईन सुद्धा व्हावे लागते हे सुद्धा तितकेच खरे आहे.

कुठल्याही क्षेत्रात पुढे जाण्यासाठी मेहनत आणि परिश्रम याचसोबत तडजोड ही करावी लागतेच परंतु पंधरा वर्षांच्या करियर मध्येच वयाच्या पस्तिशी किंवा चाळीशीच्या आत निवृत्ती घेण्या इतपत आर्थिक स्थैर्य मर्चंट नेव्ही शिवाय अन्य कोणत्याही करियर मध्ये नसावे.

— प्रथम रामदास म्हात्रे.

मरीन इंजिनियर,

B. E. (Mech), DME, DIM.

कोन, भिवंडी, ठाणे.

प्रथम रामदास म्हात्रे
About प्रथम रामदास म्हात्रे 184 Articles
प्रथम म्हात्रे हे मरिन इंजिनिअर असून मर्चंट नेव्हीमध्ये आहेत. ते एका ऑईल टॅंकरवर असतात आणिेील जीवनावर लेखन करत असतात..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..