आज कॅमेरा मोबाईलच्या रुपाने प्रत्येकाच्या हातात असतो. पण तरीही छायाचित्रकाराने काढलेल्या छायाचित्राला स्वत:चे असे वेगळे ग्लॅमर असते. या सदरातून विविध क्षेत्रांतील मान्यवर त्यांच्या छायाचित्रांच्या माध्यमातून आपल्याशी गप्पा मारत आहेत…
चित्रपट, नाटक, मालिका, कला, संगीत, साहित्य, क्रीडा, जाहिरात, उद्योग ते आताच्या वेब सीरीज अशा विविध माध्यमांसाठी फोटोग्राफी करत असताना मला अनेक व्यक्ती भेटल्या. माणूस कोणत्याही क्षेत्रातला असो, त्याची प्रतिमा टिपताना त्याची चांगली बाजू, डोळ्यातली चमक आणि चेहऱयावरचे भाव हे प्रत्येक वेळी महत्त्वाचं असतं. शिवाय ज्याचा फोटो टिपायचा आहे ती ‘व्यक्ती आणि फोटोग्राफर’ यांच्यातला संवाद, त्यांच्यातलं नातं, समजूतदारपणा आणि विश्वास हे महत्त्वाचं असतं. या सगळ्याचा एकंदरीत परिणाम हा फोटोग्राफरने टिपलेल्या प्रतिमेच्या तजेलदारपणावर होत असतो. या लेखमालेतून एरवी आपल्यासमोर विविध माध्यमातून येणाऱया नामांकित व्यक्ती पडद्यामागे कशा असतात, त्यांचा मला समजलेला स्वभाव, शूटच्या वेळी आलेले गोड-तिखट अनुभव आणि एकूणच शूटच्या प्रक्रियेतून मी टिपलेल्या ‘प्रतिमा’ उलगडण्याचा प्रयत्न ‘फोटोच्या गोष्टी’मधून करत आहे.
साधारण २००७-८ सालची गोष्ट असेल. एका सिनेमाच्या कंटिन्युटी स्टील्ससाठी मी ठाण्यातल्या हॉटेल ब्ल्यू रूफमध्ये होतो. तेव्हा मराठीतली तगडी स्टारकास्ट असलेल्या एका सिनेमाचं रात्री उशिरा शूट सुरू होतं. शूटसंबंधित सगळे जण एकीकडे सेटवर गुंग होते. तर मधल्या वेळेत माझ्यासोबत नृत्यदिग्दर्शक राजेश गमरे आणि तेव्हाचा कार्यकारी निर्माता,कला दिग्दर्शक, माझा मित्र फोटोग्राफर विश्वास राख अशा आमच्या साऱयांच्या गप्पा चालू होत्या. तिथेच एका बाजूला छोटीशी मुलगी शांतपणे हे शूट बघत होती. मध्ये मध्ये पुस्तक काढून वाचत होती आणि फार काही न बोलता ते सगळं अभ्यासत होती.
साधारण १५-१७ वर्षांची, दोन वेण्या घातलेली, पांढरा-गुलाबी फ्रॉक, हातात सतत पुस्तक, आपल्याच विश्वात गर्क असलेली ही चिमुरडी सिने इंडस्ट्रीचा बारकाईने अभ्यास करत होती. नंतर सतत या न त्या कारणाने ती दिसत राहिली. काळानुरूप तिच्यातले बदल मी पाहत होतो. तिच्यातला अबोला हळूहळू कमी होत होता. एकेकाळी एका बाजूला बसलेली ही तरुणी काही वर्षांतच या इंडस्ट्रीशी एकरूप झाली आणि सेटवर सगळ्यांशी मनमुराद गप्पा ठोकत सहज बागडू लागली. तिच्या वेशभूषेत, राहणीमानात आणि एकूणच पेहरावात फरक झालेला दिसू लागला. सिने इंडस्ट्रीतलं ग्लॅमर म्हणजे काय, हे तिने तिच्या साध्या राहणीमानातून, पण कुठेही आपल्या प्रतिमेला धक्का न लावता पुढे दाखवून दिलं. ती म्हणजे स्पृहा जोशी.
एक चेहरा १० पेहराव
स्पृहा जितकी परखड आहे तितकीच मदत करणारीसुद्धा! एका व्यावसायिक शूटच्या वेळी वेळेची मर्यादा लक्षात घेऊन स्पृहाला चक्क दहा वेगवेगळे पेहराव करावे लागले होते, ते तिने कोणतीही तक्रार न करता केले. हिंदुस्थानी सणांवर हे शूट बेतलं होतं. वेगवेगळे हिंदुस्थानी सण आणि एकच चेहरा अशी थीम होती. कल्पना सुरेख असली तरीही ती तडीस नेणं हे तसं कठीण होतं. आपल्या चेहऱयावर एकाच दिवशी दहा प्रयोग होणार होते. त्यातून आपली वेगळी प्रतिमा जगासमोर येणार होती. या सर्वांचा अभ्यास करूनच स्पृहाने या शूटला होकार दिला असावा.
मेकअपनंतर स्पृहाने साडीवरील मॅचिंग ब्लाऊजबाबत माझ्या स्टायलिस्टला खडसावलं. तिच्या मनाप्रमाणे तो नव्हता. तिच्यातला हा परखडपणा तिथे अनुभवला. पुढे काही मिनिटांतच माझ्या टीमने दोन – तीन ब्लाऊज आणले. तेही तिला फारसे पटले नाहीत. मात्र, वेळेची मर्यादा लक्षात घेऊन नंतरच्या ऑप्शनला तिने पसंती दाखवली आणि आम्ही शूट सुरू केलं. यावेळी स्पृहा थोडी नाराज वाटली. कलाकाराचा चेहरा किती बोलका असू शकतो, हे तिथे क्षणोक्षणी जाणवत होतं. काही वेळ गेला. मला फोटो मिळत नव्हते. आम्ही थोडं थांबलो. कॉफी घेतली आणि थोडय़ा गप्पा सुरू केल्या. स्पृहा बोलती झाली. तिचा मूड बदललाय हे हेरून पुन्हा आम्ही शूट सुरू केलं आणि मला तिचे उत्तम फोटो टिपता आले. बोलकी देहबोली, चमकदार डोळे, मराठमोळा शृंगार आणि तिचं स्मितहास्य हे सारं कॅमेऱयात टिपण्याचा मी प्रयत्न करत होतो.
हिंदुस्थानी रेखीव चेहरा, मोहक हसू, नजरेतील तेज आणि शरीर कितीही दमलेलं असलं तरीही ते चेहऱयावर न दाखवता काम पूर्णत्वाकडे नेण्याची जिद्द यामुळेच हे शूट यशस्वी झालं. शूट संपल्यानंतरही स्पृहाची ऊर्जा पाहण्याजोगी होती. हेच हेरून व्यावसायिक शूटनंतर तिचे काही ब्लॅक अँड व्हाईट पोर्ट्रेट मी टिपले. हे पोर्ट्रेट माझ्या नेहमीच लक्षात राहतात. कारण त्यामागे दिवसभराची मेहनत आणि स्पृहाचं मोहक हसू.
‘यू गेट व्हॉट यू सी’ असा इंग्लिशमध्ये वाक्प्रचार आहे. याचा अर्थ असा की, तुम्ही जे पाहताय अगदी त्याचप्रमाणे एखाद्या व्यक्तीचं व्यक्तिमत्त्व तुम्हाला दिसतं. याची प्रचीती मला स्पृहासोबत ठाण्यातल्या पितांबरी स्टुडिओत मी एका नामांकित वृत्तपत्रासाठी शूट करताना आली. नवरात्रीचे नऊ दिवस,नऊ रंग आणि सिनेतारका अशा थीमवर हे शूट बेतलं होतं. शूटच्या आधी माझ्या स्टायलिस्टने (फॅशन) कलाकारांची देहबोली लक्षात घेऊन साडय़ांच्या रंगाची निवड केली होती, तर दुसऱया स्टायलिस्टने (कॉश्च्युम) त्या त्या साडयांवर लागणाऱया इतर बाबींची तयारी केली होती. स्पृहासाठीही साडी,ऍक्सेसरी ठरली. दिलेल्या वेळेत स्पृहा शूटसाठी सेटवर आली. मेकअप करता करता आम्ही तिच्या आगामी सिनेमाबाबत बोलत होतो. अनेकदा कलाकाराला बोलतं केल्याने तो शूटच्यावेळी अधिक खुलतो.
— धनेश पाटील
dhanuimages@gmail.com
Leave a Reply