नवीन लेखन...

देखभाल आणि आपत्कालीन यंत्रसामग्री

रेल्वेसेवा व्यवस्थित सुरू राहण्यासाठी तिची देखभाल ही अत्यंत महत्त्वाची ठरते. त्यासाठी विशेष प्रकारची यंत्रे वापरावी लागतात. तसेच, अपघातासारख्या संकटकालीन परिस्थितीतसुद्धा विशेष प्रकारच्या सामग्रीचा वापर करावा लागतो. देखभालीसाठी आणि आपत्कालीन परिस्थितीत वापरल्या जाणाऱ्या यंत्रसामग्रीची ही ओळख…

मराठी विज्ञान परिषदेच्या ‘पत्रिका’ या मासिकातील मिलिंद काळे यांचा हा पूर्वप्रकाशित लेख


रेल्वे ही जरी वाहतुकीचे एक प्रमुख साधन असली, तरी रेल्वेशी संबंधित अनेक सुट्या भागांची वाहतूक रस्ते, जलमार्ग व हवाईमार्गाने केली जाते. त्यामुळे “कभी नाव गाड़ी पर, तो कभी गाड़ी नाव पर…” ही हिंदी म्हण रेल्वेच्या बाबतीत सार्थ ठरते. सुरू असलेल्या रेल्वेमार्गाच्या देखभालीसाठी आणि संकटकालीन मदतकार्यासाठी रेल्वेमार्गावरून जाणाऱ्या विशिष्ट वाहनांची गरज भासते. रेल्वेमार्ग टाकण्यासाठी आणि वापरात असणाऱ्या रेल्वेमार्गाची देखभाल करण्यासाठी वापरले जाणारे, यांतले एक वाहन म्हणजे ‘ट्रॅक मशीन’. या ट्रॅक मशीनची क्षमता, दिवसाला सुमारे दीड किलोमीटर लांबीचा लोहमार्ग उभारण्याइतकी असते. या यंत्रांद्वारे रेल्वेमार्गाखाली योग्य प्रमाणात खडी भरून रेल्वेरुळांची योग्य पातळी साधली जाते. काही दशकांपूर्वी लाकडी स्लिपरचा वापर रेल्वेमार्गासाठी केला जात असे. त्या वेळी या यंत्रांची उपयुक्तता मर्यादित होती. आधुनिक काँक्रीटच्या स्लिपरच्या वापरामुळे मात्र या यंत्रांचा वापरही मोठ्या प्रमाणावर होत आहे.

ट्रॅक मशीनव्यतिरिक्त रेल्वेरुळांवर विविध कामे करण्यासाठी सहज इकडून तिकडे हलवता येईल अशी यंत्रसामग्रीही विकसित झाली आहे. उदाहरणार्थ, पेट्रोल इंजिनावर चालणाऱ्या ‘ॲब्रेसिव्ह रेल कटर’ या यंत्राच्या मदतीने मोठ्या जाडीचा पोलादी रूळही पाच मिनिटांपेक्षा कमी वेळेत कापता येतो. पूर्वी याच कामासाठी दोन मजुरांच्या जोडीला एका तासाहूनही अधिक वेळ लागत असे. ‘रेल ड्रिलिंग मशीन’ या पेट्रोल-केरोसिनवर चालणाऱ्या मशीनच्या मदतीने रेल्वे रुळांना जलदगतीने योग्य अशी भोके पाडता येतात. या यंत्रांमुळे रेल्वेरूळ जोडणीचे काम वेगात पार पाडता येते. रेल्वेरुळांचे वेल्डिंग व ग्राइंडिंग करणारी यंत्रसामग्रीही मोठ्या प्रमाणात वापरली जाते. या सर्व यंत्रसामग्रीची योग्य हाताळणी करण्यासाठी जगभरातील रेल्वे कंपन्या कर्मचारी प्रशिक्षणावर मोठा खर्च करीत असतात.

रेल्वेमार्गाप्रमाणेच गाडीला विद्युत्पुरवठा करणाऱ्या ओव्हरहेड यंत्रणेची देखभालही गरजेची असते. या यंत्रणेची देखभाल करणाऱ्या वाहनाला ‘टॉवर वॅगन’ असे म्हटले जाते. कमी क्षमतेच्या चारचाकी आणि जास्त क्षमता असणाऱ्या आठचाकी वेगवान टॉवर वॅगन वापरात आहेत. ओव्हरहेड वायरशी संबंधित विविध भागांची देखभाल या टॉवर वॅगनच्या मदतीने केली जाते. या वाहनाच्या छतावर उभे राहून काम करण्याची व्यवस्था केलेली असते. देखभालीसाठी लागणारे सुटे भाग, अवजारे आणि कर्मचाऱ्यांना काम करण्यासाठी पुरेशी जागा, अशा सोयी या टॉवर वॅगनमध्ये असतात. चारचाकी टॉवर वॅगन या डीझेल इंजिनावर चालवल्या जातात. आठचाकी टॉवर वॅगन डीझेल इंजीन व विद्युत्पुरवठा या दोन्हींवर चालवल्या जातात. या टॉवर वॅगनमध्ये असणाऱ्या ‘कार्यशाळे’तील यंत्रसामग्री चालवण्यासाठी वेगळी जनित्रे बसवलेली असतात.

रेल्वे इंजिनावर बसवलेल्या पेंटोग्राफच्या मदतीने इंजिनात विद्युत्प्रवाह सोडला जातो. लोहमार्गांवरील विद्युत्पुरवठा करणाऱ्या यंत्रणेत दोष असेल, तर विद्युत्प्रवाहात मोठा अडथळा येऊ शकतो. यामुळे मोठ्या प्रमाणावर ठिणग्या पडून ओव्हरहेड वायर व पेंट्रोग्राफचे नुकसान होते. यापेक्षा गंभीर प्रकारात पेंटोग्राफ हा ओव्हरहेड वायरमध्ये अडकून अनेक मीटर लांबीच्या वायरचे नुकसान होऊ शकते. या सर्व शक्यता टाळण्यासाठी ओव्हरहेड यंत्रणेचे नियमित परीक्षण करणे गरजेचे असते. परंतु, या यंत्रणेमधून २५,००० व्होल्ट या उच्च दाबाचा विद्युत्प्रवाह सोडलेला असतो. त्यामुळे निरीक्षणाच्या कामासाठीही या वायरच्या जवळ जाणे प्राणघातक ठरू शकते. यामुळे ओव्हरहेड यंत्रणेच्या निरीक्षणासाठी विशिष्ट रचना व व्हिडिओ शूटिंगची व्यवस्था असणाऱ्या वाहनाची गरज निर्माण झाली. अशी व्यवस्था असलेली वाहने वापरात आल्यामुळे ओव्हरहेड यंत्रणेतील दोष ओळखून संभाव्य नुकसान टाळता येणे शक्य झाले.

रेल्वेसेवेतील विविध यंत्रणांच्या देखभालीसाठी, रेल्वेरूळ बदलण्यासाठी किंवा ओव्हरहेड वायरींची निगा राखण्यासाठी काही काळ रेल्वेसेवा बंद ठेवावी लागते. याला ‘ट्रॅफिक ब्लॉक’ असे म्हणतात. जेव्हा रेल्वेगाड्यांची वाहतूक कमीतकमी असेल, तेव्हाच असे ब्लॉक घेतले जातात. ही वेळ साधारणपणे रात्रीची असते. परंतु, गाड्यांची वाहतूक सतत असेल तेव्हा रात्रीचे काही तासही रेल्वेसेवा बंद ठेवता येत नाही. अशा परिस्थितीत रेल्वे यंत्रणांची देखभाल न झाल्यामुळे रेल्वेयंत्रणेत दोष निर्माण होऊन गर्दीच्या वेळी रेल्वेसेवा खंडित होण्याची शक्यता असते. देखभालीला वेळ न दिल्यमुळे ही किंमत चुकवावी लागते. असे होऊ नये म्हणून, ‘जंबो ब्लॉक’ किंवा ‘मेगा ब्लॉक’ची पद्धत वीस वर्षांपूर्वी सुरू झाली. या दीर्घकाळ चालणाऱ्या ब्लॉकमध्ये रविवारी सकाळचे व दुपारचे काही तास पूर्वनिर्धारित पद्धतीने रेल्वेसेवा बंद ठेवण्यात येते.

अत्यंत काटेकोर नियोजन करून देखभालीसाठी आवश्यक असणाऱ्या, मनुष्यबळ, ट्रॅक मशीन, टॉवर वॅगन, इत्यादी सर्व गोष्टी हा ब्लॉक सुरू होण्याअगोदर नियोजित स्थळी आणून ठेवल्या जातात. त्यानंतर एकाच वेळी रेल्वेमार्ग, सिग्नल आणि विद्युतपुरवठ्याशी संबंधित सर्व कामे सुरू केली जातात. प्रत्येक विभागाने आपापल्या ठिकाणी चाललेले काम पूर्ण करून, चाचण्या घेऊन निर्धारित वेळ संपण्यापूर्वी रेल्वेमार्ग खुला करणे हे अपेक्षित असते. त्यामुळे जंबो ब्लॉक संपण्याची वेळ पुढे ढकलली जाऊ नये, या दृष्टीनेही पूर्ण काळजी घेतली जाते. सभा-संमेलने, सणवार, अशा दिवशी मात्र हे जंबो ब्लॉक ठेवले जात नाहीत. काही वेळा, दुरुस्तीसाठी नव्हे, तर रेल्वेमार्गांवरून जाणारे पूल बांधणे पाडणे किंवा तत्सम कामांसाठीही असे ब्लॉक घ्यावे लागतात.

रेल्वे अपघाताच्या प्रसंगी यांत्रिक मदतीसाठी ‘अॅक्सिडेंट रिलीफ ट्रेन’चा वापर केला जातो. या गाडीत अपघातग्रस्त डब्यांचे पत्रे कापण्यासाठी गॅस कटिंग मशीन, रुळांवरून घसरलेले डबे पूर्ववत करण्यासाठी री-रेलिंग यंत्रणा, अपघातस्थळी निवाऱ्यासाठी झटपट उभारता येणारे तंबू, दिवाबत्तीची सोय करणारी जनित्रे, अशी अनेक साधने उपलब्ध असतात. अपघाताच्या जागी पिण्याचे पाणी आणि भोजन यांची व्यवस्थाही या गाडीद्वारे करण्यात येते. रेल्वेच्या टेलिफोन यंत्रणेशी आणि इतर संपर्क व्यवस्थेशी सहज-सुलभपणे जोडता येणारी उपकरणेही त्यात असतात. मोठ्या अपघाताच्या वेळी, नदी-नाल्यामध्ये पडलेले रेल्वे डबे उचलणे, अपघातात निर्माण झालेले अडथळे दूर करणे, यासाठी याऱ्यांची व्यवस्थाही या गाडीत केलेली असते. पूर्वी या गाडीत ७५ टन क्षमतेच्या, वाफेवर चालणाऱ्या याऱ्या वापरल्या जात. आता त्याऐवजी डीझेलवर चालणाऱ्या १४० टनी हायड्रॉलिक याऱ्या वापरल्या जातात. अपघातस्थळी लोकांशी संवाद साधण्यासाठी ध्वनिवर्धकही उपलब्ध असतात. कमीतकमी वेळेत अपघातग्रस्त गाडीचा भाग रेल्वेमार्गावरून दूर करून वाहतूक पूर्ववत करणे, हे यामागील उद्दिष्ट आहे. अॅक्सिडेंट रिलीफ ट्रेन ही इंजिनाद्वारे ओढून न्यावी लागले. ही गाडी इच्छितस्थळी लवकरातलवकर पोहोचावी, म्हणून या गाडीला ताशी १२० किलोमीटर वेगाने नेऊ शकणारी यंत्रणा या गाडीत बसवलेली आहे.

रेल्वे अपघाताच्या प्रसंगी वैद्यकीय मदतीसाठी अॅक्सिडेंट रिलीफ मेडिकल इक्विपमेंट व्हॅन वापरली जाते. या गाडीमध्ये अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांच्या उपचारासाठी लागणाऱ्या सोयी उपलब्ध असतात. जखमींची नोंदणी, किरकोळ जखमींवरील उपचार, गंभीर जखमींवरील अत्यावश्यक असे किमान उपचार आणि शस्त्रक्रिया, इत्यादींसाठीची संपूर्ण व्यवस्था अपघाताच्या ठिकाणी या वाहनाद्वारे उभारली जाते. गंभीर जखमींना अपघातानंतर लगेचच जर योग्य उपचार मिळाले, तर त्यांचे प्राण वाचू शकतात. रक्तस्राव थांबवणे, मानसिक धक्का बसलेल्यांना धीर देणे आणि लवकरातलवकर जवळच्या रुग्णालयात दाखल करणे, अशा प्रकारची कृती या ‘गोल्डन अवर’ मध्ये होणे अपेक्षित असते.

प्रत्येक रेल्वे विभाग काही विशिष्ट स्थानकांवर ही दोन्ही प्रकारची वाहने उपलब्ध करून ठेवतात. जेणे करून त्यांना शंभर किलोमीटरपेक्षा जास्त अंतर कापावे लागू नये. या वाहनांमध्ये काम करणारे कर्मचारी व अधिकारी प्रशिक्षित आणि अनुभवी असतात. तसेच, त्यांना कायम तयारीत ठेवले जाते. केवळ पंधरा ते पंचेचाळीस मिनिटांत ही वाहने संपूर्ण तयारीनिशी अपघाताच्या दिशेने रवाना करता येतात. वेळोवेळी यासाठी सराव करून घेतला जातो.

रेल्वेसेवा सुरळीत सुरू राहावी यासाठी, या देखभाल आणि आपत्कालीन यंत्रसामग्री व मदत पुरवणाऱ्या वाहनांचे महत्त्व फार मोठे आहे. या सोयीसुविधांत कोणतीही त्रुटी न राहण्याच्या दृष्टीने जास्तीतजास्त काळजी घेतली जाते. कारण, रेल्वेसेवेत शक्यतो खंड पडू नये आणि जर एखाद्या कारणाने पडलाच, तर रेल्वेसेवा लवकरातलवकर पूर्ववत व्हावी, यासाठी हे अत्यंत आवश्यक आहे.

मिलिंद काळे
विद्युत अभियंता

milindkale@khagolmandal.com

मराठी विज्ञान परिषदेच्या ‘पत्रिका’ या मासिकातील हा पूर्वप्रकाशित लेख 

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..