नवीन लेखन...

मागणे आणखी न काही

अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०१८ मध्ये प्रा. लक्ष्मीकांत तांबोळी यांनी लिहिलेला हा लेख


‘मनसा चिंतितम् एकं दैवं अन्यत्र चिंतयेत’ असं संस्कृतात एक वचन आहे. आपल्या मायमराठीत एक कवन आहे, त्या कवनात स्वच्छ अशी शाहिरी भाषा आहे.

‘मनात येती हत्ती घोडे, पालखीत बैसावे, ।
देवाजीच्या मनात आले, पायी चालवावे ।।
मर्जी देवाची…

एकूण देवाची मर्जी म्हणून निःश्वास टाकावा.

आपल्या आयुष्यात हे असं नेहमीच घडत असतं. मनातलं सगळं प्रत्यक्षात घडेलच असं नाही. अपेक्षित घडणं यालाही नशीब लागतं आणि अनपेक्षित पण चांगलं (म्हणजे-मनासारखं) घडणं यालापण नशीबच लागतं. नशीब, दैव इत्यादि शब्द आले की आपण खुशाल त्यावर दैववादी असा शिक्का मारून मोकळे होतो. खरंतर तसं काही नसतं. निखळ बुद्धिवाद हा चांगलं-वाईट, भलंबुरं याच्या पलिकडे असतो. आपण सामान्यजन मध्येच कुठेतरी घोटाळणं. पाऊल स्वतःची वाटचाल विसरणं. असं का होतं? सांगता येत नाही. हे घडतं येवढं मात्र खरं!

आयुष्याचा धांडोळा घेताना अशा काही जागा आढळतात की वाटतं ‘हे टाळता आलं असतं’ थोडा विचार केला की मग कळतं की ‘हे अटळ होतं.’ शेवटी असं गाठोडं घेऊनच वाटचाल करावी लागते. यालाच प्रारब्ध, प्राक्तन म्हणावं लागतं. प्राक्तनाचं हे ओझं वाहणं म्हणजे जगणं. उगीच जगण्याला जीवन वगैरे म्हणून त्याचं उदात्तीकरण नको. सिधंसाधं जगणं असावं. मी तर असाच सिधासाधा जगलो.

आज मितीला वयाच्या ८० या वर्षात पाऊल ठेवलं आहे. ऐंशी वर्षे म्हणजे तसे दीर्घायुष्यच. (पूर्ण नऊ महिने नऊ दिवस न भरता सातव्या महिन्यातच जन्मास आलो येवढी घाई जिवाला झालेली! आठव्या महिन्यात जन्मतो तर…. जाऊ द्या.) एकूण दीर्घायुष्य लाभलं हे प्राक्तन ! नकळत्या वयाचं सोडलं तर कळत्या वयापासून विचार करू लागलो की जाणवतं. ते इतकंच आपण अत्यंत सुमार बुद्धीचे आहोत. मॅट्रिक जेमतेम पास. गुणवत्ता पस्तीस चाळीस टक्क्याच्या आसपास. एकवेळ नाही चक्क दोनवेळा बी.ए. परीक्षेत नापास. शाळेत गणित विषयात नि कॉलेजात इंग्रजी विषयात बोंबाबोंब. एकूण सुमार कर्तृत्व. (कर्तृत्व नाहीच. घडले, घडत गेले) एक मात्र खरे की शालेय जीवनापासूनच मला लेखक, कवी वगैरे व्हावसं वाटायचं. का? ते सांगता येणार नाही. अगदी आठवीत असतानाच मी एक कथा लिहिली नि ती चक्क शाळेच्या हस्तलिखित मुखपत्रातून गुरुजींनी प्रसिद्ध केली. मी लेखक असल्याचं शिक्कामोर्तब झालं. आमच्या शाळेत ‘वर्गवाचनालय’ नावाची एक योजना राबविली जायची. त्यातून पुस्तकं मिळत. खांडेकर, फडके, अत्रे, सानेगुरुजी, यशवंत, माधव ज्युलियन, गिरीश वगैरे नावे अभ्यासक्रमीय पुस्तकातून परिचयाची झाली होतीच.

वाचनालयातील लहान मुलांसाठी ची पुस्तके आणि अभ्यासातील पुस्तके यांचा मेळ जमून आला. वाचायचा नि लिहायचा नाद वाढत गेला. इतर वर्गमित्र मैदानावर खेळत असायचे मी वर्गात वाचत बसायचो. माझे मुख्याध्यापक कृष्णाजी कल्याणकर मला ‘पेन्शनर’ म्हणायचे. वर्गमित्र ही चिडवायचे. मी मॅट्रीक मध्ये असतानाच माझा एक निबंध ‘विज्ञान: शाप की वरदान’ हा परभणीच्या ‘समर्थ’ नावाच्या छापील मासिकातून प्रसिद्ध झाला. आपले छापील नाव पाहताना जो आनंद झाला, तीच कदाचित माझी लेखकीय ऊर्जा असावी. दरम्यान नागपूरच्या ‘मुलांचे मासिक’ मधून ‘शाळा’ नावाची कविताही छापून आली. एकूण शालेयजीवनातच माझ्या ‘लेखकीय जीवनाची’ पेरणी झाली.

मॅट्रिकनंतर मी हैदराबादी पुढील शिक्षणासाठी गेलो. नि मराठी, संस्कृत, भारतीय तत्त्वज्ञान असे विषय घेऊन बी.ए -ची परीक्षा देत गेलो. माध्यम इंग्रजी. इंग्रजांनी देशाला छळले नसेल तेवढे इंग्रजी विषयाने मला छळले. असो.

अिथे. म्हणजे हैदराबादी, उस्मानिया विद्यापीठात शिकताना डॉ. नांदापूरकर, कहाळेकर, श्री. रं. कुळकर्णी, ए. वि. जोशी वगैरे प्राध्यापक मंडळी भेटली. त्यांच्या एकंदर व्यक्तिमत्वाचा प्रभाव म्हणा की आदर्श म्हणा आयुष्यात प्राध्यापकच व्हायचे हे मनावर पक्के ठसले. कारकुन, मास्तर अशा नोकऱ्या त्याकाळी थोडा प्रयत्न केला तर सहज मिळत. मीही व्हाया मास्तरकी प्राध्यापकीपर्यंत पोहोचलो. १९६० ते ६३ हा काळ तसा धडपडीतच गेला. एकदाचा प्राध्यापक झालो. गंगेत घोडं न्हालं. दरम्यान चांगल्या सरकारी नोकऱ्या मिळण्याच्या संधी आल्या. मीच त्या गमावल्या. मराठवाडी पठडी प्रमाणे वडिलांची इच्छा मी वकील व्हावे अशी होती. मी त्या वाटेनं गेलोच नाही. वडिलोपार्जित पंरपरेने मी वैद्यकी करायला हवी पण तिथेही मी नकार दिला. आयुर्वेद कॉलेजला प्रवेश मिळत असतांनाही मी तो मार्ग टाळला. कारण आंतरिक ओढ कथा, कविता, कादंबरी अशा ललित साहित्याची – ही ऊर्मी सारखी उचंबळत असायची. त्यातून हातून थातुरमातुर लेखन झाले. ते अखंड सुरु राहिले. हयातभरात सतरा पुस्तके निघाली. त्यांना ग्रंथ म्हणण्याची माझी हिंमत होत नाही. लिहून झाले. छापून आले. पाहता पाहता लेखक, कवी वगैरे झालो. काही किरकोळ पुरस्कार प्राप्त झाले. किरकोळ पदे मिळाली. एकूण काय तर एक किरकोळ साहित्यिक म्हणून उरलो. तीनचार पानांचा ‘बायोडाटा’ तयार झाला; म्हटली तर ही उपलब्धी. साहित्यक्षेत्री क्षेत्रस्थासारखा वावरलो. प्रस्थ निर्माण केले नाही. साहित्याची आवड, लेखनाला सवड मिळते म्हणून  प्राध्यापकी पेशाची निवड, असा समसमासंयोग झाला नि मी घडत गेलो. जिद्दीने प्राध्यापक झालो. करिअर म्हणून अध्यापन क्षेत्र निवडले. सेवानिवृत्तीपर्यंत त्यात रमलो. ज्या ठिकाणी नोकरी केली तिथे वातावरण तसे अनुकूल नव्हते. आयुष्यभर अस्वस्थता व अस्थिरता घेरून होती. परिणामी स्वभावात एक वित्रित ‘कुढेपणा’ आला. एकटा नव्हतो पण एकाकीपण कायम सोबतीस आले. त्यातूनच कदाचित् –

एकटा न मी पण एकाकी, कितनी

जगणे तरीही –

अजून बाकी!

असे लिहून गेलो.

दरम्यान जिथे प्राध्यापक होतो तिथेच प्राचार्यपदही चालून आले. आणि जसे आ तसेच निघून गेले. मीच प्राचार्यपदाचा राजिनामा देऊन मोकळा झालो. हे काम आपले नाही अशी खूणगाठ मनाशी बांधली नि अक्षरश: त्या पदावर लाथ मारली. कुठलाही मोह बाळगला नाही. निर्मम, निरिच्छ असा सगळा प्रकार. (पुढे अन्यत्र प्राचार्यपदाचे दशावतारी खेळ पाहात मस्त जगत राहिलो.) प्राचार्यपद गेल्याचे तीळमात्र दुःख आज नाही. जे काही दुःख आहे ते हे की प्राचार्यपदामुळे माझे लेखन मंदावले नि काहीकाळ लेखन चक्क थांबले. अधिकार, व्यवस्थापन, सत्ता आणि स्वच्छंद, स्वतंत्र वृत्ती यांचा ‘मेळ’ कधी जुळत नाही हेच खरे. प्राचार्यपद ही कुलगुरूपदाकडे जाण्याची दिशा समजून तशी वाटचाल करणारे माझ्या समकालीनांचे वर्तन मी जवळून पाहिले आहे. यासाठी अंगी नाना कळा व तत्सम बळ लागते. ते माझ्याठायी नव्हते हे कबुल. शिवाय वर्तमान शिक्षण क्षेत्राला राजकारणाची जी लागण झाली आहे तिचाही प्रादुर्भाव मला भोवला. रेल्वे यार्डात इंजिन बिघडल्यामुळे काही गाड्या जशा ‘सायडिंग’ला पडतात तशी शिक्षणक्षेत्रातील माझी वाटचाल सायडिंगला पडली. साहित्य आणि शिक्षण या क्षेत्रातील सृजनशीलता आजमावताना जाणवले ती स्वत:ची हतबलता, अगतिकता, असहाय्यता आणि असमर्थता.

ज्या महाभागांचा सहवास मला लाभला त्यात नरहर कुरुंदकर, ना. य. डोळे, अनंत भालेराव, वा. ल. कुळकर्णी अशी काही महनीय नावे आहेत. राजकीय अशी कुठलीच पार्श्वभूमी मला नव्हती. एका साध्या भिक्षुकाच्या पोटी जन्मलेला मी एक मुलगा. परंपरेने लोक महाराज म्हणत कारण आमचे घराणे शिष्यपरंपरेने विस्तारलेले. त्या घराण्याच्या आठव्या पिढीतला मी एक वंशज. त्या घराण्याचे दायित्व म्हणून काही गोष्टी करण्याचे राहिलेही खंत तेवढी आहे. महाराज घराणे, म्हणून परांपराप्राप्त कुलधर्म-कुलाचार, यात्रा – उत्सव, व्रत-वैकल्ये, सण-वार, यात मी कधी रमलो नाही. गुंतलो नाही.

वैयक्तिकस्तरावर आचरण कधी बिघडू दिले नाही. भजन, कीर्तन यात्रा- दिंडी यात अडकलो नाही. कायम त्यापासून अलिप्त राहिलो. अंतरी या साऱ्यांचा कल्लोळ होता. (त्यातूनच माझी ‘दूर गेलेले घर’ ही कादंबरी निर्माण झाली) प्रसंगोपात माझ्या ललितलेखनातून (सयसावल्या, झिरपा) माझी भावविव्हलता प्रगटही झाली. स्फुट आत्मपर लेखनातून आध्यात्मिक अनुभवाचे कवडसे उमटले. मात्र साक्षात्कारी पुरूष म्हणून, संतत्वाची गादी चालवणारा म्हणून विशिष्ट प्रकारच्या आचरणशील व्यक्तिमत्वाची जपणूक करणारी एक विभुती म्हणून मला स्वतःला सिद्ध करता आले नाही. हे खरे तर माझे खुजेपण. सर्व क्षेत्रातील खुजेपणाचा स्वीकार करून जे लाभलं ते पतकरून इथवर आलो. प्रवास सुंदर नसला तरी सुकर झाला. जे चांगले वाटले त्याचा पतकर केला. धिक्कारलं काहीच नाही. आले ते स्वीकारलं.

प्रारब्ध, संचित, क्रियमान याशिवाय आयुष्यात दुसरं काय असणार? आस्तिक-नास्तिक या द्वंद्वात अडकलेल्या मनाला दिलासा देणारं काही असेल तर ते आंतरिक बळ.आंतरिकबळ नसतं तर ऐंशीची उमर गाठणं शक्यच नव्हतं. वाटतं: आपण प्राध्यापक झालो नसतो तर ‘ह.भ.प. कांता महाराज जिंतूरकर’ म्हणून गावोगाव नाम सप्ताह करीत हिंडलो असतो. ‘ॲडव्होकेट लक्ष्मीकांतराव तांबोळी. बी.ए.एल.एल.बी’ अशी दारावर पाटी लावून कोर्ट एके कोर्ट करीत काळ्याकोर्टात मिरवलो असतो. किंवा कुठल्यातरी तहसीलमध्ये हयातभर नोकरी करून ‘नायब तहसीलदार’ म्हणून सेवानिवृत्त झालो असतो. कदाचित् ‘डॉ. लक्ष्मीकांत तांबोळी’ ‘आयुर्वेद विशारद’ अशी पाटी दारावर लटकली असती. प्राध्यापक झालो खरा. पण पुढील काळात शिक्षणक्षेत्रातील बाजार पाहण्यात गेला याचा ‘सल’ अजूनही मनात आहे.

मिळालं ते घेतलं. मागितलं काहीच नाही. अधूनमधून संगीतक्षेत्र खुणवायचं. गळा नसल्यामुळे ते राहून गेलं. एखादं वाद्य वाजवता यावं ही उत्कट इच्छा. विशेष करुन तबला. पण तेही हुकलं. तबला आणि मृदंग आमच्या संस्थानातील भजन-कीर्तनाचं अविभाज्य अंग त्यामुळे वाद्याचं आकर्षण होतं. पण शिकवणाऱ्या तबलजीनं अशी बोटं मोडली की मी तबल्याकडे चुकूनही कधी बोट दाखविलं नाही. तसा वारसा महाराज घराण्याचा. वेदान्त खूप ऐकलेला. पण तो माझ्या धादांतापुढे कधी टिकला नाही. ‘शुचितां श्रीमतांगेहे योगभ्रष्टोऽपि जायते’ असं नियतीनं घडवलं. योगभ्रष्ट म्हणून जन्मलो की काय असं आता वाटतंय. ‘नतदृष्ट’ होण्यापेक्षा योगभ्रष्ट होणं त्यातल्या त्यात बरं!

आयुष्याचा जमाखर्च मांडताना, आढावा घेताना एक गोष्ट नक्की – न मागता खूप काही लाभलं. पुरस्कार मिळाले. अध्यक्षपदे मिळाली. महाराष्ट्रभर कविता ऐकवल्या. चक्क चार विद्यापीठाचे. माझ्या लेखनावरील साहित्य संशोधन करणाऱ्यांला Ph.D. (आचार्य) या पदव्या दिल्या. अभ्यासक्रमातून कविता/ कथा विद्यार्थ्यांसमोर आल्या. मराठवाडाभर मराठवाडी मानध्वजा हे ‘मराठवाडागीत’ स्तंभावर कोरलं गेलं. कवितेचे स्तंभ उभारले गेले. लिखित, मुद्रित, स्वरांकित, शिल्पांकित असा माझ्या गीतांचा सन्मान झाला. आता याहून काय हवे? (हे सगळे न मागता मिळाले)

ज्या मराठवाडी मातीत माझा जन्म झाला त्या मातीचे पांग फेडण्याची क्षमता माझ्या अक्षरातून उमटली हे मी माझे भाग्य मानतो. निजामी राजवटीत जन्म झाला पण त्या राजवटीतून मुक्त झाल्यास आनंदही लाभला. म्हणून तर ‘या मातीच्या पुण्यायीचा टिळा कपाळी लावून मराठवाडी मानध्वजा फडकवत गेलो. आता मागणे तर काही उरले नाही. उरली ती विनवणी. काकुळती. त्यासाठी प्रार्थना.

मागणे आणखी न काही, पाय राहो चालता।

ना कधी कोणापुढेही, हात पसरो मागता ।।

न मागता मिळते ते अंगी लागते; त्यासाठी भुईचे अंग व्हावे लागते. आता इच्छा येवढीच-‘दयाळा, येवढे द्यावे, फुलांचे रंग ना जावे उडाया पाखरांसाठी, जरा आभाळ ठेवावे”आणि -‘दयाळा, येवढे द्यावे भुईचे अंग मी व्हावे शेवटी श्वास जाताना, फुलांचे रंग मी व्हावे.” या माझ्या मागण्याने महाराष्ट्रातील ८ व्या इत्ततेत शिकणाऱ्या बाल-बालिकांनी मला जे बळ दिले त्यातून कसा उतराई होऊ? सूर निरागस हो असे गायकाला वाटते ‘शब्द निरागस हो’ असे कवीला का वाटू नये? अशा निरागस शब्दाचा धनी झालो हे माझे संचित, प्रारब्ध की क्रियमान याची चर्चा वाङ्मयक्षेत्रीच्या मुखंडांनी आपल्या फडावरील गुऱ्हाळगप्पात करावी.

प्रा. लक्ष्मीकांत तांबोळी

(अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०१८ मधून)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..