नवीन लेखन...

जपानमधील अप्रतिम साकुरा

कॉलेज मध्ये असण्याच्या वयात रेडिओवर ‘बिनाका गीतामाला’ मध्ये जवळजवळ दर बुधवारी २ गाणी हमखास लागायची…’ ले गयी दिल गुडिया जपानकी’ व ‘ऍन इव्हिनींग इन पॅरिस’. सगळ्या माणसांना या गाण्यांनी जणू वेड लावलं होतं म्हणाना! तरुणांच्या मनावर त्या गाण्यांनी गारुड केलं होतं. आम्ही पण त्या वयातच होतो. त्यामुळे हे देश कसे असतील विशेषत: जपान कसे असेल या विषयीचे कुतूहल मनात खूप पूर्वीपासून घर करून होते. खरंतर जपान अणुबाँबमुळे अगदी लहान वयातच माहिती झाला होता. त्या देशातील लोकांनी दुसऱ्या महायुद्धातून देश वर आणण्यासाठी घेतलेले अविरत कष्ट, राष्ट्राला परत जगाच्या नकाशात मानाचे स्थान मिळवून देण्यासाठी केलेली मेहनत शालेय जीवनापासून ओळखीची झालेली होती. त्यामुळे जपान पहायला जाण्याची इच्छा संधी मिळताच उसळी मारून वर आली.

भारताच्या पूर्वेला अगदी चिंचोळा, चारी बाजूंनी समुद्राचे संरक्षण असणारा, निसर्गसौंदर्याने नटलेला देश. हिमालयाच्या काही शिखरांशी स्पर्धा करू पाहणारा माउंट फुजी सारखा पर्वत, ‘लेक अशी’ सारखी विस्तीर्ण व निर्मळ तळी, पॅगोडा सारख्या उतरत्या छपरांच्या वैशिष्ठ्यपूर्ण इमारती, रस्त्याचे चढउतार, त्यावरून लगबगीने चालणारी मध्यम उंचीची गोरीपान चपट्या नाकाची माणसे….. कायकाय अन् कशाकशाचं वर्णन करावं…पण त्यातही तिथल्या चेरीब्लॉसमच्या वर्णनांनी मनावर भुरळ घातली अन् जरी ऑस्ट्रेलिया, अमेरिकेतील ब्लॉसम बघितला होता तरी जपानचा चेरिब्लॉसम पहायला जायचंच असं ठरवून एका वर्षी एप्रिलच्या पहिल्याच आठवड्यात जपानकडे कूच केले.

जपान हा मुळातच देखणा देश . एखादी रुपवती नार पूर्ण यौवनात असावी व त्यातही ती सालंकृत नटावी तसे जपान ‘साकुराच्या’ म्हणजे ‘चेरीब्लॉसमच्या’ दिवसात दिसते. खूप वर्षापूर्वी जपानमध्ये ‘इंपीरियल पॅलेसचा परिसर सजविण्यासाठी उत्तर भागात आढळणाऱ्या ‘प्रुनस’ या जातीतील विविध झाडांची लागवड केली व बघता बघता त्याची जपानभर भरभराट झाली. या झाडांना जपानमधला उन्हाळा सुरु होण्याच्या वेळेला वर्षाभरातून एकदाच पांढरी, गुलाबी, पिवळसर रंगाची, क्वचित पांढया फुलांवर राखाडी छटासुध्दा असलेली असंख्य छोटी छोटी फुले येतात. जपानमध्ये प्रामुख्याने ‘पुनस सेरुलता’ म्हणजेच ‘जॅपनीज चेरीज’ या जातीची झाडे मोठ्या प्रमाणावर आढळतात. खेरीज जवळ जवळ २० प्रकारची याच गटातील झाडेही यात मोडतात. या झाडांना जी फुले येतात त्यांचे गुच्छ असतात. प्रत्येक गुच्छात ३ ते ५ फुले असतात. पण सगळी फुले फुलली की जो मोठ्ठा घोस तयार होतो तो अगदी एखाद्या ढगासारखा दिसतो. त्यावरुनच या झाडांच्या फुलांच्या अप्रतिम बहराला जपानी भाषेत ‘साकुरा’ म्हणतात. थंडीत पानगळ झालेली असते. सूर्य प्रकाशाचा अभाव जाणवतो व संपूर्ण वातावरणातच थोडी मरगळ येते. अशा वेळी उन्हाळ्याच्या सुरवातीला फुलणाऱ्या या फुलांच्या बहरामुळे प्रसन्नता येते म्हणून या बहराला ‘चेरीब्लॉसम’ असेही म्हणतात.गळालेल्या
पानांमुळे ओक्याबोक्या झालेल्या फांदीचा थोडासुध्दा भाग दिसू नये इतका या फुलांचा बहर असतो. या फुलांचे आयुष्य जेमतेम एक आठवड्याएवढेच असते. त्याच कालावधीत दिसणाऱ्या या फुलांच्या सौंदर्याचा उपयोग पर्यटकांना आकर्षित करण्याकरता जपानमध्ये भरपूर करुन घेतलेला दिसतो. आता तर जपानमधील ‘चेरीब्लॉसम’ बहर बघायला जाणे हा एक जागतिक इव्हेंट झालेला आहे. दर वर्षाच्या सुरवातीलाच जपानच्या कोणकोणत्या भागात केंव्हा साकुराचा बहर असणार आहे याचे अचूक वेळपत्रक जाहीर केले जाते. (हा बहरही अगदी आज्ञाधारकपणे बरोबर त्याच भागात त्याच दिवसात येतो हे विशेष). संपूर्ण जपानभर ही झाडे फुललेली असतात. अगदी रस्त्याच्या कडेला सुध्दा. पण म्हणून केवळ ती झाडे येता जाता पाहून लोकांनी समाधान करून घ्यावे याऐवजी हा बहर पाहण्यासाठी, तो मनमुराद उपभोगण्यासाठी जपान सरकारने ठिकठिकाणी बागा तयार केल्या आहेत. हा बहर प्रत्येक ठिकाणी फक्त चार-सहा दिवसच टिकतो. सौंदर्याच्या आस्वादाबरोवरच या फुलांच्या बहराचे भावनिक नाते भगवान बुध्दाच्या कृपाप्रसादाशीही जोडले जाते. त्यामुळे पर्यटकच काय पण जपानी नागरिकही जास्तीत जास्त बागांना भेटी देण्याचा प्रयत्न करतात. आम्ही तर काय हाच बहर पाहण्यासाठी आलो होतो. त्यामुळे जास्तीत जास्त सौंदर्य पहाणे व कॅमेऱ्यात कैद करणे यात मग्न झालो तर नवल नाही.

आम्ही टोकियोमधला बहर पहाण्यासाठी एप्रिलच्या ४ ता.ला नरिटा विमानतळावर टेकलो व आमच्या प्रिन्स हॉटेल मध्ये जाण्यासाठी शिनागावा स्टेशन गाठले. संध्याकाळची वेळ होती त्यामुळे हॉटेलच्या खोलीतून आजूबाजूचा परिसर फारसा दिसत नव्हता. पण आमच्यासाठी सौंदर्याची कोणती मेजवानी वाट पहात आहे याची झलक हॉटेलकडे जाणाऱ्या रस्त्यावरच आली. रस्त्याच्या दोन्ही बाजूंच्या प्रफुल्लित झाडांच्या कमानींनी आमचे स्वागत केले.फूटपाथच्या बाजुला पडलेला फुलांचा सडाही मोठा आकर्षक दिसत होता. १४ व्या मजल्यावरच्या गॅलरीतून पाहिल्यावर फक्त झाडांचे एकात एक गुंतलेले शेंडे दिसत होते..

कालचेच दृश्य आज एकदम वेगळे दिसले. आमच्या गॅलरीतून लांबवरचे दृश्य दिसत होते. आकाशाला गवसणी घालू पहाणाऱ्या उंच इमारती एकमेकींशी स्पर्धा करीत होत्या पण खाली वाकून पाहिले तर अगदी वेगळाच नजारा दिसत होता. सगळीकडे कळ्याच कळ्या, काही मुक्या, काही अर्धोन्मिलीत तर काही पूर्ण फुलून फुलात रुपांतरित झालेल्या. त्यांचा पांढरट गुलाबी रंग नाजूक कोवळ्या फांद्यांना झाकून टाकत होता.पाने अगदी तुरळकच-नगण्यच म्हणांना. त्या सगळ्यांच्या फटीतून खाली जमिनीवर पडलेले उन्हाचे कवडसे मोठे मस्त दिसत होते. जपान मधल्या चेरीब्लॉसमचे वैभव दाखणारे शिनागावा उद्यान अगदी आमच्या हॉटेलच्या खालीच आपल्या पूर्ण दिमाखात आपला पसारा मांडून आम्हाला बोलावत होते. त्या आमंत्रणाला मान देऊन आम्ही लगेचच खाली गेलो.

खाली आल्यावर खालून वर पहाताना आता बागेचा पसारा खूप वेगळा दिसत होता. इतका वेळ मोठ्या झाडांमुळे न दिसलेले ट्यूलिप्स, वेगवेगळ्या रंगांचे गुलाब, ऑफिस लिलिज पूर्ण फुललेले होते. मोठ्या झाडांच्या भोवती या फुलझाडांची रांगोळी मोठी आकर्षक दिसत होती. जागोजागी छोट्या छोट्या पुष्करणी, त्यांच्या भोवती फुलझाडांची महिरप, त्याच्यावर आपल्या पाने, फुले, फांद्यांच्या पसाऱ्याची मेघडंबरी तोलून धरणारी प्रुनस जातीची झाडे व त्याच्यावर उमलू पहाणारी छोटी छोटी फुले या सगळ्यांच्या मधून केलेल्या फरसबंदी पायवाटेवरून चालताना खूपच मजा वाटत होती. बागेचा आकार जरी खूप मोठा नव्हता तरी बाग खूप सुंदर होती हे नक्कीच.

बागेच्या नैसर्गिक चढ उतारांचा बागेची शोभा वाढविण्यासाठी मोठ्या कौशल्याने उपयोग केला होता. ठिकठिकाणी लाकडी प्लॅटफॉर्म, काही ठिकाणी पायऱ्या, काही ठिकाणी बसण्याचे बाक तर कुठे लाकडी गॅलऱ्या केल्या होत्या. संध्याकाळच्या वेळी तिथे जपानचा प्रसिद्ध ‘टी सेरिमनी’ आयोजित केला जातो. त्या लाकडी फरसबंदीवरून आजूबाजूचे सौंदर्य डोळ्यात साठवत फिरताना दिवस कसा मावळला तेच कळले नाही.

संध्याकाळचा झाडांचा नजारा काही औरच होता. सूर्याची केशरी सोनेरी किरणे लेऊन फुलांचा रंग आणखीनच वेगळा, नयनरम्य दिसत होता. काल रात्री हॉटेलकडे आम्हाला घेऊन आलेला रस्ता आज अगदीच वेगळा दिसत होता. मुख्य रस्त्याला जोडणाऱ्या छोटया रस्त्यावर दोन्ही बाजूंनी असणारी झाडे हलक्याश्या वाऱ्याच्या झुळुकेवर डोलत आमच्यावर छत्र चामर ढाळताहेत व आम्हाला उगीचच कोणीतरी आमच्यासाठी “बा आदब…बा मुलाहीजा…” अशी ललकारी देते आहे असा भास होऊ लागला होता. आमची पावले आपोआपच तालात पडू लागली. टोकिओ शहरात मनसोक्त भटकून थकले भागले आम्ही हॉटेलकडे वळलो.

बागेत झाडांच्या फांद्यांवर झाडांच्या फुललेल्या शेंड्याकडे नेमका प्रकाशझोत टाकणारे दिवे होते, रात्रीचा साकुराही विलक्षण खुलून दिसत होता. पायवाटेच्या दोन्ही बाजूंना जमिनीकडे उजेड टाकणारे दिवे होते. चिनी जपानी पद्धतीचे लाल नारिंगी रंगांचे कागदी व रेशमी शोभेचे दिवे बागेची शोभा वाढवत होते. आता दिव्यांच्या प्रकाशात फुलांचे रंग आणखीनच मोहक झाले होते. लाकडी पायऱ्या पायऱ्या करून मध्येच तयार केलेला एक छोटासा प्लॅटफॉर्म सकाळी बाहेर जाताना पाहिला होता.

आता त्याच्यावर लाल सोनेरी नक्षी काढलेला हिरव्या रंगाचा गालीचा अंथरलेला होता. गालिच्याच्या एका टोकाला १-२ कलाकार जपानी वाद्ये वाजवीत आपली कला सादर करीत होते, तर मधोमध तक्क्याला टेकून ३-४ मंडळी मस्त, आनंदी मूड मध्ये गप्पा मारत होती. त्यांच्यापासून योग्य ते अंतर राखून एक-दोन जपानी गेईशा-म्हणजे अमीर उमरावांच्या करमणूकीसाठी खास शिक्षण घेतलेल्या जपानी स्त्रिया त्या लोकांशी गप्पा मारत, नर्म विनोद करीत खास जपानी पारंपारिक किमोनो घालून बसल्या होत्या. मुळातच गोऱ्यापान अशा त्या गेईशा त्यांच्या खास वेशभूषेमध्ये व रंगभूषेमुळे स्वर्गातील अप्सरा असाव्यात असा भास होत होता. त्यांचे ते आदब राखून यजमानांशी बोलणे, हावभाव, त्यांना सोनेरी नक्षीच्या किटलीतून, खास जपानी छोट्या छोट्या कपातून चहा देतानाची नजाकत….. सगळेच अप्रतिम! हाच तो जपानमधला टी सेरीमनी! सर्व बोलणे, विनोद, गप्पा जपानी भाषेतल्या असल्याने अर्थ समजत नव्हता. पण हावभाव व हालचाली पाहायलाही खूप गंमत वाटली.

सकाळी बागेत आलो तर आज कळ्या थोड्या जास्त प्रमाणात उमललेल्या होत्या. आता जमिनीवर पडणारे उन्हाचे कवडसे कमी झाल्याचे दिसत होते. बाकीची बाग तशीच आनंदी व प्रसन्न होती. हे सगळे पहात आज दुसऱ्या बागेकडे जाण्यासाठी निघालो. पण ही बाग काही आमचे पाय बाहेर पडू देत नव्हती. किती पहावे तेवढे थोडेच असे वाटत होते. या सगळ्या सौंदर्यात भर पडावी म्हणून की काय त्या दिवशी एक जपानी पद्धतीचा पोशाख केलेले नवपरिणित जोडपे बागेतून हिंडत आपले ‘मिलनाचे संकेत स्थळ फोटोग्राफरच्या मदतीने कॅमेऱ्यात टिपत होते. आम्हाला त्यामुळे अगदी खेळण्यातील बाहुलाबाहुली वाटावी अशी लालचुटुक जपानी पोशाखातली नवरानवरी अनपेक्षितपणे जवळून न्याहाळता आली.

दिवसें दिवस बागेचा डौल काही वेगळाच दिसू लागला होता. हॉटेलमधून खाली पाहिले तर पांढऱ्या, गुलाबी रंगाच्या फुलांचा गालीचा जास्त घट्ट विणीचा होत चालला होता. फुले खूप प्रमाणात उमलली होती पुढचे २-३ दिवसात हा गालिचा पूर्ण दाट झाला व जिकडे पहावे तिकडे फक्त पांढरा व गुलाबी रंगच दिसायला लागला. त्यावर फुलांचा मध खाण्यासाठी येणारे पक्षी व कीटकही दिसायला लागले. बागेत उतरून पाहिले तर आकाश नाहीसे होऊन फुलांची मेघडंबरी बागेवर आच्छादल्यासारखे दृश्य दिसत होते. ५ व्या दिवसानंतर हळूहळू फुलांचा रंग विटायला लागला, आकार लहानलहान व्हायला लागला, पाकळ्या गळू लागल्या. बागेत तर पाकळ्यांचा सडा पडायला लागला. जोराचा वारा आला की त्याबरोबर तरंगत पाकळ्यांची जी रंगीबेरंगी मिरवणूक निघे ती अगदी बघत रहावी अशी होती. आणि आपण त्यात अवचित सापडलो की अशी मस्त मजा येते की काय सांगू…. आपल्या दोन्ही बाजूंनी थंडगार वारा वहात असतो. त्याच्याबरोबर वहात येणाऱ्या नाजूक फुलांच्या मृदुमुलायम पाकळ्या दोन्ही बाजूंनी आपल्याला खेटून वाऱ्याशी शर्यत करत पुढेपुढे धावत असतात तर आपल्या पाठीला चिकटलेल्या पाकळ्या गुदगुल्या करत असतात. समजा वाऱ्याचा झोत आपल्या समोरून आडवा जात असेल तर खूप छोटीछोटी फुलपाखरे अगदी एकमेकांना खेटून उडत आहेत असा भास होतो. टोकियो मधल्या ज्या दहा बागा ‘साकुराच्या’ खास दर्शनासाठी तयार केलेल्या आहेत, त्यातली ‘शिनागावा गार्डन’ प्रिन्स हॉटेलमधल्या आमच्या मुक्कामात अगदी सहज पाहता आले. इतकेच नव्हे तर फुलांच्या उमलण्यापासून बागेतले होणारे सगळे बदल अनुभवता आले.

माणसाची थोडक्यात तृप्ती होत नाही. आमचेही तसेच होते. जपानमधला हा साकुराचा बहर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या वेळी पूर्णपणे फुलतो. तो ‘शिंजूकू गिऑन’ उद्यानात पूर्णत्वाला पोहोचल्याचे कळल्यावर आम्ही ते उद्यान पहायला गेलो. शिंजूकू स्टेशनपासून चालत अगदी ५ मिनीटांच्या अंतरावरच हे उद्यान आहे. इडो कालखंडात जपानचे मूळचे रहिवासी नाईटी कुटूंबियांनी त्यांच्या परिसरात ही बाग प्रथम स्वतःपुरती, मग आसपासच्या लोकांच्यासाठी तयार केली. आता ती मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरन्मेंटने विकसित करून सर्वांसाठी खुली केली. सुमारे ६० हेक्टर आकारमान असलेली ही प्रचंड मोठी बाग साधारण गोल आकारात आहे. सुमारे ४ कि.मी. इतका हिचा घेर आहे. बागेच्या मधोमध अंदाजे १ कि.मी. चालले की दुसरे टोक गाठता येते इतका मोठा या उद्यानाचा पसारा आहे. बाग फ्रेंच, इंग्लिश व जपानी अशा तीन भागात विभागलेली आहे. प्रत्येक विभाग आपापल्या देशाची वैशिष्ट्ये दाखवतो. फ्रेंच विभागात गुलाबाच्या असंख्य जाती पहायला मिळतात, इंग्लिश विभागात लांबचलांब पसरलेली हिरव्यागार गवताची कुरणे तर जपानी भागात लहानमोठी तळी, त्यांच्यावरचे छोटेमोठे पूल, पॅगोडा पहायला मिळतात. या उद्यानात अंदाजे वीस हजार तरी झाडे असतील. यापैकी नुसती पुनस जातीची १५०० ते २००० झाडे आहेत. याशिवाय हिमालयन सेडर्स, सायप्रस वृक्षही मोठ्या प्रमाणात आहेत. ट्युलिप, गुलाब तर जागोजागी दिसतात. या बागेत हिरोहितो या राजकुमाराला तैवानमधल्या लोकांनी प्रेमाने भेट दिलेले तैवानी पॅव्हेलियनही आहे. या बागेच्या मधोमध असलेल्या रस्त्याच्या दुतर्फा चेरीब्लॉसम पूर्ण बहरात असलेला दिसत होता. दोन्ही बाजूंच्या झाडांच्या फांद्या एकमेकात पूर्ण गुंतून त्याची या रस्त्यावर फुलांची मनमोहक लांबलचक छत्री तयार झाली होती. पांढऱ्या गुलाबी फुलांच्या खाली असणाऱ्या फांद्यांवर टांगलेले लाल, केशरी रंगांचे दिवे व रंगीबेरंगी पताकांच्या माळा वाऱ्यावर झोके घेत सगळ्या सौंदर्यात भरच घालत होत्या. त्या छत्रीखालून चालताना अंतर कसे संपले ते कळलेच नाही. या बागेत खूप पूर्वीपासून फुलांच्या सौंदर्यावर कविता रचण्याची, त्यांचे नयनमनोहर चित्र काढण्याची, ती चित्रे रंगवण्याची पद्धत आहे. आता या सगळ्याबरोबरच सर्व कुटुंबियांनी, एकत्र जमून या झाडांखाली एक दिवस आरामात मनसोक्त गप्पाटप्पा करत, खाणेपिणे करत घालवायचा ही कल्पनाही रूढ झाली आहे. त्यासाठी खानपान सेवा पुरवणारी छोटीछोटी उपहारगृहेही आपला पसारा मांडून बसलेली होती.

यानंतर आम्ही गेलो ते ऊएनो (उनो) पार्क पाहायला. ही बागही ऊएनो स्टेशनच्या जवळच होती. लोकलमधून उतरल्यावर कोणाला पार्कमध्ये कुणीकडून जायचे हे विचारावे लागलेच नाही. गाडीतून उतरलेल्या लोकांच्या लोंढ्यामागोमाग आपण फक्त चालत रहायचे की आपण बागेतच प्रवेश करतो.

अगदी गणपतीच्या दिवसातल्या गर्दीची आठवण झाली. या बागेला सुमारे ४०० वर्षांचा जुना इतिहास आहे. एकंदर ८००० झाडांपैकी सुमारे ११०० ते १२०० झाडे चेरीब्लॉसमचे वैभव आपल्या अंगाखांद्यावर मिरवणारी होती. या झाडांवर केशरी, लाल, पिवळे, दिवे व पताकांच्या माळा होत्याच पण जवळ जवळ प्रत्येक झाडाखाली निळ्या हिरव्या पिवळ्या रंगांची प्लॅस्टिकची ताडपत्री नीटसपणे अंथरलेली होती. कुठेकुठे त्यांच्या भोवती दोऱ्या बांधून पाट्याही लावलेल्या होत्या. त्या अर्थात जपानी भाषेत असल्याने आम्हाला कळल्या नाहीत पण जरा एकदोघे इंग्लिश जाणकार हेरल्यावर उलगडा झाला की. टोकियो मधल्या मोठमोठ्या कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसाठी या जागा राखीव केल्या आहेत. कर्मचाऱ्यांनी त्यांच्या कुटुंबियांसह तिथे येऊन वेळ घालवावा, मौजमजा करावी, खावे प्यावे यासाठी ही सोय. फुलांच्या पूर्ण बहराचा आनंद उपभोगत गाणी गावी, काव्य रचावे, मजा करावी अशी पद्धत जपानमध्ये सुमारे ९ व्या शतकापासून चालत आली आहे. त्याला ‘हनामी’ असेही एक नाव आहे. त्याचे पारंपारिक स्वरूप पालटून मौजमजा करणे व फुलांच्या बहराचा मनसोक्त उपभोग घेणे असे झाले आहे. खरोखरच डोळ्यांचे पारणे फिटावे असा एकंदर माहोल होता.

काही लोक जपानी पारंपारिक वेषातही आलेले होते. ते तर या झाडाखाली फिरताना खूपच छान दिसत होते. तेवढ्यात जोराचा वारा आला व फुलांच्या गळलेल्या पाकळ्यांचा शॉवरही अनुभवता आला. थंडगार वारा व त्यापेक्षा गार पडलेल्या पाकळ्यांचा वर्षाव अंगावर गोड शिरशिरी उठवून गेला. थोड्याच वेळात सूर्य क्षितीजाकडे झुकला व या बागेतली संध्याकाळची दिव्यांची शोभा आम्हाला पहायला मिळाली.नंतरच्या मुक्कामात क्योटोमधल्या इंपिरीयल पॅलेसचा प्रसिद्ध किं काकुजी देवळाच्या आसपासचा, ओसाका मधला चेरिब्लॉसम पाहिला. रेनबो ब्रिज, नदीतली छोटीशी सफर, आसाकुसा देऊळ….सगळीकडे शहरी भाग नसून फक्त बागाच बागा पसरलेल्या आहेत असा भास होत होता. उन्हाळ्याचे स्वागत अशा प्रसन्न वातावरणात फुलांच्या, निसर्गाच्या सान्निध्यात कुटुंबियांबरोबर आनंदात करण्याची जपानी पद्धत खूपच छान आहे. कितीही पाहिलं, फिरलं तरी डोळ्यांची व कॅमेराची तृप्ती न होऊ देणारा हा चेरीब्लॉसमचा बहर पाहून म्हणावेसे वाटते…

“ले गया दिल, साकुरा जपानका…….

* सौजन्य (हा लेख यापूर्वी ‘मस्त भटकंती, २०१५’ या अंकात प्रसिद्ध झाला आहे.)

-अनामिका बोरकर

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..