नवीन लेखन...

हवामान पूर्वानुमान

मराठी विज्ञान परिषदेच्या ‘पत्रिका’ या मासिकातील कृष्णानंद होसाळीकर यांचा हा पूर्वप्रकाशित लेख


हवामान खात्याने “आज कडकडीत ऊन पडणार” म्हटले असेल तर बाहेर पडताना नक्की छत्री बरोबर ठेवावी असे एकेकाळी उपहासात्मक बोलले जायचे. परंतू त्याच हवामान खात्याचे अंदाज आता हमखास बरोबर ठरू लागले आहेत. हवामानाची माहिती मिळविण्यासाठी आधुनिक प्रगत साधने आणि हवामान प्रारूपांमधील अचूकता यामुळेच ही नेत्रदीपक प्रगती हवामान विभागाने साधली आहे. याचीच साद्यंत माहिती देणारा हा लेख…

अंक दिवाळीमध्ये प्रसिद्ध होत असला, तरी हा लेख हा लिहिताना मॉन्सून अजून देशामध्ये आणि राज्यांमध्ये सक्रिय आहे. पण सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात असल्याकारणाने बऱ्याच लोकांना एक उत्कंठा आहे, की मॉन्सून राज्यातून कधी परतणार? एकंदर मॉन्सूनचा देशातला आणि आपल्या राज्यातला प्रवास बघितला, तर असे चित्र दिसते, की देशामध्ये तो भारतीय हवामान विभागाने (इंडिया मीटीऑरॉलॉजीकल डिपार्टमेंट: आयएमडी) दिलेल्या पूर्वानुमानानुसार तो सर्वसाधारण सरासरीइतका किंवा थोडासा जास्त पडला आहे. राज्यात बहुतांश जिल्ह्यांमध्ये मॉन्सून सरासरीपेक्षा जास्त झालेला आपल्याला दिसतोय. मॉन्सून २०२२ने जून महिन्यात जरी ओढ दिली असली, तरी नंतरच्या तीन महिन्यांत मॉन्सून राज्यामध्ये कमी-अधिक प्रमाणात सक्रिय राहिला. भारतीय हवामान विभागाने २०२२च्या मॉन्सूनचे दीर्घकालीन पूर्वानुमान (लाँग रेंज फोरकास्ट) एप्रिलच्या मध्यावर व नंतर जूनच्या सुरुवातीला दिले होते, ज्यामध्ये असे म्हटले होते, की देशात पाऊस समाधानकारक राहील. राज्यातही तशाच प्रकारचे पूर्वानुमान भारतीय हवामान विभागाने दिले होते आणि आता मॉन्सून सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात असताना, केलेले पूर्वानुमान बरोबर येताना बघून, एक हवामानतज्ज्ञ म्हणून मला आनंद होत आहे.

ज्या वेळी आपण पूर्वानुमान म्हणतो, त्या वेळी इथे मी आपल्याला सांगू इच्छितो, की भारतीय हवामान विभाग वेगवेगळ्या कालावधीच्या टप्प्यांमध्ये, वेगवेगळ्या प्रकारची आणि वेगवेगळ्या क्षेत्रांसाठी पूर्वानुमाने देत असतो. विमानतळावर हवामानसेवा पुरवताना दर अर्ध्या तासाने लागणारे पूर्वानुमान, हे सर्वांत छोट्या अवधीसाठी दिले जाणारे पूर्वानुमान आहे, ते २४ तास अखंड दिले जाते. ‘नाऊकास्ट’ हे ३ ते ४ तासांसाठी असते. त्याचबरोबर, आपल्या सर्वांना माहीत आहे, की २४ ते ४८ तासांचे पूर्वानुमान, ५ ते ७ दिवसांचे पूर्वानुमान, ४ आठवड्यांचे पूर्वानुमान (एक्स्टेंडेड रेंज फोरकास्ट) आणि संपूर्ण ऋतूचे पूर्वानुमान याला आपण ‘दीर्घकालीन पूर्वानुमान ‘ (सीझनल फोरकास्ट) असे म्हणतो. अशा वेगवेगळ्या प्रकारची अनेक क्षेत्रांसाठी लागणारी पूर्वानुमान सेवा भारतीय हवामान विभाग गेल्या अनेक दशकांपासून देत आहे.

पूर्वानुमान म्हटले, की आपल्या डोळ्यांसमोर वेगवेगळ्या प्रकारचे हवामानाचे नकाशे दिसायला लागतात आणि मग त्या नकाश्यांमधून दिसणाऱ्या रेषा, काही चिन्हे आणि वेगवेगळी माहिती त्याच्यावर असलेली आपल्याला दिसते. ज्या वेळी आपण पूर्वानुमान देतो, त्या वेळी त्याचे वेगवेगळे प्रकार आहेत, जे मी वर उल्लेख केलेले आहेत; पण त्याचबरोबर त्याच्या काही पद्धतीसुद्धा आहेत. आपल्याला मी काही पद्धतींची माहिती सांगू इच्छितो. एक जुनी पद्धत आहे, त्याला आपण ‘कल पूर्वानुमान ‘ ( ट्रेंड फोरकास्ट) असे म्हणतो. म्हणजे, गेल्या काही दिवसांपासून ज्या पद्धतीने हवामान बदलत आहे, त्याच पद्धतीने येणाऱ्या दोन ते तीन दिवसांमध्ये हवामान बदलेल, अशा प्रकारची शक्यता त्याच्यात वर्तवली जाते.

दुसरी पद्धत आहे संख्याशास्त्रावर आधारित ‘हवामानशास्त्र’ (क्लायमॅटॉलॉजी). भारतीय हवामान विभागाकडे प्रत्येक ठिकाणच्या, प्रत्येक दिवसाच्या हवामानाच्या नोंदी आहेत, ज्यांवरून त्या ठिकाणचे सरासरी हवामान काढता येते. त्यावरूनही सांगता येते, की आज कशा प्रकारचे हवामान अपेक्षित आहे. अजून एक महत्त्वाची पद्धत म्हणजे ‘सारांशी’ (सिनॉप्टिक) पद्धत. या पद्धतीमध्ये रोज आपल्याकडे वेगवेगळ्या केंद्रांकडून जी हवामानाची निरीक्षणे येतात, त्या निरीक्षणांच्या आधारावर हवामानाचे नकाशे बनवले जातात आणि सर्वसाधारणत: पुढच्या दोन ते तीन दिवसांमध्ये कशा प्रकारचे हवामान असेल हे सांगितले जाते. ही पद्धत बऱ्याच काळापासून चालू आहे आणि भारतीय हवामान विभागामध्ये ह्या पद्धतीचाही अवलंब केला जात आहे. अर्थात, या सर्व पद्धतींना काही मर्यादा आहेत.

पण समजा, आपल्याला दोन ते तीन दिवसांपेक्षा अधिक दिवसांचे पूर्वानुमान करायचे, तर मग आपल्याला हवामानाच्या गणितांचा आधार घेऊन संबंधित असलेली पद्धत, असलेली पद्धत, ज्याला ‘संख्यात्मक हवामान पूर्वानुमान’ (न्यूमरिकल वेदर प्रेडिक्शन: एनडब्ल्यूपी) म्हटले जाते, ती पद्धत वापरणे गरजेचे आहे. या पद्धतीमध्ये आपल्याला दोन ते तीन दिवसांपेक्षा जास्त कालावधीचे पूर्वानुमान देता येते. भारतीय हवामान विभागाने अशा प्रकारच्या गणितावर आधारित असलेल्या हवामानाच्या पूर्वानुमानाचा खूप चांगल्या प्रकारे, गेल्या अनेक वर्षांमध्ये उपयोग केलेला आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे संशोधन होत आहे आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या चांगल्या सुधारणा होताना आपल्याला दिसत आहेत. उदाहरणादाखल, वीस-पंचवीस वर्षांपूर्वी आपण गणितावर आधारित पूर्वानुमान देत होतो, त्याचे वियोजन (रेझोल्यूशन) खूप कमी, म्हणजे सर्वसाधारणपणे दीडशे ते दोनशे किलोमीटर होते, त्यामुळे त्याच्यात अचूकता नव्हती. सध्या आपल्याकडे जे पूर्वानुमान गणितावर आधारित दिले जाते, त्याचे वियोजन बारा किलोमीटरपर्यंत आहे; म्हणजे काय की, एखाद्या गटपातळीवरसुद्धा (ब्लॉक लेव्हल) आम्हांला पूर्वानुमान देता येऊ शकते. अशा प्रकारच्या प्रणालींसाठी उच्च क्षमतेच्या संगणकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. ‘आदित्य’ आणि ‘मिहिर’ सारखे महासंगणक यासाठी उपलब्ध आहेत.

भारतीय हवामान विभाग हा भारत सरकारच्या ‘पृथ्वी विज्ञान मंत्रालया’च्या अंतर्गत येतो. अशा प्रकारचे ‘एनडब्ल्यूपी’वर आधारित पूर्वानुमान देण्यासाठी आज भारतीय हवामान विभागाकडे अनेक प्रारूपे (मॉडेल्स) उपलब्ध आहेत, जी पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या अन्य वैज्ञानिक संस्थांकडून हवामान विभागाने विकसित करून घेतलेली आहेत. ‘भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था’, पुणे (इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मीटिऑरॉलॉजी), ‘राष्ट्रीय मध्यम श्रेणी पूर्वानुमान केंद्र’ (नॅशनल सेंटर फॉर मीडियम रेंज वेदर फोरकास्टिंग), ‘भारतीय राष्ट्रीय महासागर सूचना सेवा केन्द्र (इंडियन नॅशनल सेंटर फॉर ओशन इन्फॉर्मेशन सर्व्हिस) यांच्याकडून, तसेच अन्य देशांकडून अनेक आवश्यक प्रारूपे विकसित करून घेतली आहेत.

१८८६मध्ये पहिले दीर्घकालीन पूर्वानुमान दिले होते आणि आजही २०२२मध्ये आम्ही अशा प्रकारचे दीर्घकालीन पूर्वानुमान देत आहोत; त्याच्यामध्ये अनेक सुधारणा आता झालेल्या आहेत. बरेचदा आपल्याला असे वाटते, की गणितावर आधारित पूर्वानुमान, जे आपल्याला अनेक संकेतस्थळांवर (वेबसाइट) दिसते आणि त्याच्यामध्ये असे दाखवले जाते, की पंधरा दिवसांनी काही तीव्र बदल होण्याची शक्यता आहे, तेव्हा सर्वसाधारण लोक थोडेसे उत्सुक होतात, आणि मग त्याच्याविषयी चर्चाही व्हायला लागते. पण भारतीय हवामान विभाग या सर्व गोष्टींकडे अत्यंत डोळसपणे पाहतो. हवामान विभाग वेगवेगळ्या प्रकारची गणिते वापरतो, जी आपल्या भारतीय क्षेत्राला आणि भारत देशाला अनुरूप आहेत. त्यांच्यासाठी ती खास प्रकारे तयार केलेली आहेत. एक पद्धत आम्ही अवलंबिली आहे, की देशामध्ये सर्वसाधारणतः पुढचे पाच ते सात दिवस काय होणार आहे, हे आम्ही जिल्हास्तरीय किंवा गटस्तरीय पातळीवर सांगतो जे सर्वसामान्यांना उपयोगी उपयोगी असते, असते, तसेच तसेच ते कृषीसाठीसुद्धा उपयोगी असते. पूर्वानुमान कालावधी एका आठवड्यापासून एका महिन्याचा झाला, की ते जिल्हा स्तराऐवजी विभागीय स्तरावर दिले जाते.

आजकाल पंधरा दिवसांनी, एक महिन्याने काय माहिती याच्याविषयी होणार हवामान विभागाव्यतिरिक्त इतर वेबसाइट्सवर आणि वेगवेगळ्या माध्यमांतूनसुद्धा उपलब्ध आहे. त्यामुळे हवामान विभागाने जाहीर करायच्या अगोदरच आपल्याला दिसते, की असेअसे काही होण्याची शक्यता आहे म्हणून. पण मी सर्वांना असे सांगू इच्छितो, की गणितावर आधारित पूर्वानुमानाचे फायदे, अनेक आहेत, पण त्याचबरोबर त्याला मर्यादाही पुष्कळ आहेत. ती जशीच्या तशी वापरता येत नाहीत. आज हवामान विभाग ज्या वेळी गणितावर आधारित एक पूर्वानुमान देते, त्याच्यामध्ये तीन टप्पे आहेत. सर्वांत प्रथम टप्पा हा की, सध्या हवामानाची निरीक्षणे काय आहेत: (प्रारंभीची अवस्था – इनिशिअल कंडिशन), ज्याची संपूर्ण माहिती घेतली जाते. आताची परिस्थिती काय, हे गणितामध्ये अतिशय अचूकपणे व्यक्त करता आले, तर मग त्याचा नक्कीच चांगला फायदा पूर्वानुमानाच्या अचूकतेमध्ये होतो.

पूर्वानुमान देताना हवामान विभाग, पूर्वानुमान कुठल्या वेळेच्या निरीक्षणावर आधारित आहे आणि ते कुठपर्यंत लागू आहे, याची तारीखही देतो. जगात अनेक प्रारूपे ही ००:०० युटिसी ( समन्वयित जागतिक वेळ कोऑर्डिनेटेड युनिव्हर्सल टाइम, म्हणजेच ०५:०० भारतीय प्रमाण वेळ: इंडियन स्टॅन्डर्ड टाइम – आयएसटी) व १२:०० युटीसी ( १७:३० आयएसटी)च्या निरीक्षणावर आधारित आहेत. प्रारूपांचे निष्कर्ष प्राप्त होण्यासाठी तीन ते चार तासांचा अवधी लागतो. नंतर ते वापरण्यासाठी उपलब्ध होतात. ह्या पूर्वानुमानाचा उपयोग करून भारतीय हवामान विभाग रोज सकाळी, येणाऱ्या पाच ते सात दिवसांमध्ये हवामानामध्ये काय बदल अपेक्षित आहेत, कुठे जोरदार पाऊस होईल, कुठे मुसळधार पाऊस होईल, कशा प्रकारचे वारे वाहतील, उष्णतेच्या किंवा थंडीच्या लाटा असतील का किंवा गडगडाटासह पाऊस होईल का किंवा काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे का, काही ठिकाणी बर्फ पडण्याची शक्यता आहे का, अशा सर्व बाबतींत पूर्वानुमान देते. अशा प्रकारे, संपूर्ण देशामध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या हवामानांचा अभ्यास अशा सर्व गणितांच्या माध्यमातून होत असतो.

अर्थातच, भारतीय हवामान विभाग अशा प्रकारचे पूर्वानुमान देतो, त्या वेळी तो फक्त गणितावर आधारित असलेल्या पूर्वानुमानावर अवलंबून न राहता बाकीच्याही ज्या पद्धती, ज्या मी मघाशी वर सांगितल्या, त्या सर्व पद्धतींचा त्यांच्या उपयुक्ततेनुसार वापर केला जातो आणि तशा प्रकारचे पूर्वानुमान दिले जाते. आपल्याकडे हवामानविषयक खूप संकेतस्थळे आहेत, जी जनसामान्य रोज बघतात आणि त्यामुळे हवामानाविषयी असणारी उत्सुकता लोकांमध्ये वाढते, हे नक्कीच चांगले आहे. पण अशा प्रकारच्या केवळ गणितावर आधारित असलेल्या पूर्वानुमानावर अवलंबून राहणे नेहमी योग्य असेलच असे नाही; निष्कर्ष चुकू शकतात. त्यामुळे ज्या वेळी भारतीय हवामान विभाग पूर्वानुमान देतो, त्या वेळी एकच एक गणित आणि पद्धत न बघता वेगवेगळ्या प्रकारची गणिते आणि वेगवेगळ्या प्रकारच्या पद्धती वापरतो आणि मगच पूर्वानुमान देतो.

तरी एनडब्ल्यूपी पद्धतीमध्ये आपल्याला अनेक फायदे आहेत. त्यांतले काही फायदे मी इथे सांगू इच्छितो. अशा प्रकारच्या पद्धतीमुळे सुसूत्रता येते. पूर्वानुमानाचा कालावधी वाढवता येतो. आजकाल आपल्या अपेक्षा वाढल्या आहेत, म्हणजे पाच ते सात दिवसांत, पंधरा दिवसांत, एक महिन्यात हवामानात काय घडणार आहे, ते आपल्याला हवे असते. अशा वेळी एनडब्ल्यूपीचा उपयोग व त्यातून मिळणारे मार्गदर्शन योग्य प्रकारे वापरणे गरजेचे आहे. या गणिताच्या आधारावर आपल्याला बऱ्याच अंशी होणाऱ्या हवामानबदलाच्या शक्यतेचा खूप चांगला अंदाज बांधता येतो. अर्थात, त्याच्यासाठी लागणारी गणिते नेहमी अचूक करावी लागतात. एका देशात चालत असेलेले गणित, दुसऱ्या देशात तसेच चालेल असे नाही. प्रत्येक देशामध्ये हवामानाची परिस्थिती वेगवेगळी असू शकते.

आपल्याकडे असलेली प्रारूपे म्हणजे हवामान विभागाची जीएफएस म्हणजे ‘ग्लोबल फोरकास्टिंग सिस्टिम’, ‘ग्लोबल ऑसॉम्बल फोरकास्टिंग सिस्टिम’ (८ ते १० दिवसांचे पूर्वानुमान), डब्ल्यूआरएफ म्हणजे ‘वेदर रिसर्च फोरकास्टिंग’ (दोन ते तीन दिवसांचे पूर्वानुमान) ही आहेत. ‘एक्स्टेंडेड रेंज फोरकास्ट’ (ईआरएफ): चार आठवड्यांचे, ‘लाँग रेंज फोरकास्ट’ (एलआरएफ) संपूर्ण हंगामाचे पूर्वानुमान आपल्याला देऊ शकतात. मेघगर्जनेसह पाऊस पडताना ज्या सिस्टिम असतात, त्यांच्यासाठी ‘मेसो स्केल’ प्रारूपे वापरली जातात (३-४ तासांचे पूर्वानुमान) दिल्ली, मुंबई इ. मोठ्या शहरांचे पूर्वानुमान देताना काही वेगळ्या प्रारूपांचाही वापर करता येतो. डब्ल्यूआरएफ प्रारूपे, ज्यांचे अंतर वियोजन तीन किलोमीटर किंवा एक किलोमीटरपेक्षा कमी असते, त्याचा फायदा त्या शहराला नक्की होऊ शकतो. अर्थात, जेवढे वियोजन जास्त, तेवढे ते जास्त किचकट, आणि तेव्हढी त्याला लागणारी संगणकक्षमता अधिक.

ज्या वेळी भारतीय हवामान विभागाने ५० आणि ६०च्या दशकांमध्ये अशा प्रकारचे गणितावर आधारित पूर्वानुमान देण्यास सुरुवात केली, त्या वेळी भारतीय हवामान विभागाकडे तशा प्रकारचे प्रगत संगणक नव्हते आणि त्यामुळे हवामान विभागातील शास्त्रज्ञ दुसऱ्या ठिकाणी, जिथे आवश्यक क्षमतेचा संगणक असेल, तिथे जाऊन ती गणिते सोडवत असत. नंतरच्या काळामध्ये अशा प्रकारचे संगणक आणि महासंगणक पृथ्वी विज्ञान मंत्रालयामध्ये आणि भारतीय हवामान विभागांमध्ये आणि वेगवेगळ्या संस्थांमध्ये आले आणि त्याचा खूप मोठा फायदा संपूर्ण हवामानाविषयीचे पूर्वानुमान देण्यासाठी होत आहे. हवामानाचे पूर्वानुमान ऊर्जा क्षेत्र, कृषी क्षेत्र, आपत्ती नियंत्रण, आरोग्य, उद्योगधंदे, दळणवळण, उत्पादने, अशा विविध क्षेत्रांसाठी आवश्यक असते. थोड्या या आधी मी आपल्याला एनडब्ल्यूपी प्रारूपांचे फायदे सांगितले. परंतु, त्याचबरोबर अन्य बाबींकडेही लक्ष देणे तितकेच आवश्यक आहे.

दिवसातून कधीकधी एकापेक्षा जास्त वेळा, पण एनडब्ल्यूपी प्रारूपे चालवली जातात. त्यामुळे त्यांना लागणारे अवाढव्य क्षमतेचे संगणक आणि मग त्यांची देखभाल करण्यासाठी लागणारा खर्च एक गोष्ट आहे. दुसरी गोष्ट म्हणजे, हे जे रोज निष्कर्ष काढले जातात, त्या निष्कर्षांचे सुयोग्य विश्लेषण करण्याची गरज आहे. आज काढलेला निष्कर्ष जर दाखवत असेल, की दहाव्या दिवशी हवामानात तीव्र बदल होणार आहे, तर ते तीव्र बदल दुसऱ्या दिवशी काढलेल्या निष्कर्षांमध्येपण तसेच दिसणे गरजेचे आहे. म्हणजेच, प्रारूपाच्या निष्कर्षांमध्ये सुसंगती (कन्सिस्टन्सी) असणे अत्यंत आवश्यक आहे. प्रत्येक वेळी जर का प्रारूप एखाद्या तीव्र हवामानाबद्दल वेगवेगळे निष्कर्ष देत असेल तर त्या निष्कर्षांवर अवलंबून राहता येत नाही. त्यामुळे एखादे प्रारूप जर का एखाद्या वेळेस काही दिवसांनंतर होणाऱ्या तीव्र हवामानबदलाविषयी निष्कर्ष देत असेल, तर पुढच्या काही दिवसांमध्ये त्याने ते सतत देणे गरजेचे आहे. अन्य दुसऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या गणितांमध्येदेखील तशा प्रकारची चिन्हे दिसणे गरजेचे आहे.

एनडब्ल्यूपी हे दिवसेंदिवस विकसित होणारे एक तंत्रज्ञान आहे. लोकांच्या आणि हवामान विभागाच्याही अशा प्रकारच्या गणितावर आधारित अचूक पूर्वानुमानाच्या मोठ्या अपेक्षा आहेत. पण या गणितातसुद्धा बऱ्याचदा काही समस्या असतात, उदाहरणार्थ भौगोलिक रचना, समुद्रकिनाऱ्याजवळचा भाग, डोंगराळ भाग, बर्फाच्छादित भाग, इत्यादी इत्यादी. अशा वेगवेगळ्या भौगोलिक परिस्थितीचा त्या प्रारूपावर अथवा त्यातील गणितावर कमी-जास्त प्रभाव होऊ शकतो.

या वेळी अशा प्रकारच्या समस्यांना हाताळण्यासाठी त्या प्रारूपांमध्ये काही सुधारणा कराव्या लागतात आणि त्या सुधारणा वेळोवेळी केल्या जातात. भारतीय हवामान विभागाकडून लोकांच्या अपेक्षाही वाढत आहेत. हवामानामध्ये होणारे तीव्र बदल, त्यांची संख्या, त्यांची वारंवारता आणि त्यांचा पसारा आज आपल्याला जागतिक तापमानवाढ हवामानातील बदल यांमुळे वाढताना दिसतोय. लोकांच्या मनांमध्ये शंका आहे; मॉन्सून बदलला आहे का, त्याचे स्वरूप बदलले आहे का? त्याच्या येण्याजाण्याच्या तारखा बदलल्या आहेत का? तो सप्टेंबरमध्ये जायचा, आता ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये परत जातोय, की दिवाळीपर्यंत राहतोय?

असे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न बऱ्याच लोकांच्या मनांमध्ये असतात व अशा प्रकारचे प्रश्न हवामान विभागाला विचारले जातात आणि एकंदरच अशा प्रकारच्या प्रश्नांची उत्तरे देताना मी असे म्हणेन, की भारतीय हवामान विभागाला एक चांगला फीडबॅक मिळतो; लोकांना नेमके काय अपेक्षित आहे आणि कशा प्रकारे सुधारणा करता येतील.

नाऊकास्टमध्ये सध्या ८० टक्क्यांपेक्षा जास्त अचूकता आहे, दोन ते तीन दिवसांसाठी हवामानाच्या इशाऱ्यांमध्ये अचूकता ७० ते ८० टक्के आहे. पाच दिवसांच्या जिल्हास्तरीय पूर्वानुमानाची अचूकता ६० ते ७० टक्के आहे. अर्थात, येणाऱ्या कालावधीमध्ये ही अचूकता अजून विकसित करण्यासाठी हवामान विभाग कटिबद्ध आहे, तशा प्रकारचे प्रयत्न चालू आहेत, तशा प्रकारची यंत्रणा आणि निरीक्षण केंद्रे उभारली जात आहेत. त्याचबरोबर, उच्च दर्जाचे संगणक हवामान विभागामध्ये आणले जात आहेत. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर हवामानाच्या माहितीची, पूर्वानुमानाची देवाणघेवाण होत असते. हवामान एका देशापुरते मर्यादित असू शकत नाही, ते संपूर्ण विश्वासाठी आहे. आपल्याला ज्या वेळी आपल्या देशाच्या हवामानाविषयी माहिती हवी असते, त्या वेळी आपल्याला संपूर्ण जगामध्ये काय चालले आहे, याचा अभ्यास करणे गरजेचे आहे. अर्थातच, आत्ताच्या पिढीला ‘अल-निनो’ आणि ‘ला निना’ हे शब्द आता तोंडपाठ झाले आहेत. सध्या समाजामध्ये हवामानविषयक असलेली ही सजगता, हवामान विभागासाठी एक चांगले सुचिन्ह आहे, तसे ते आव्हानही आहे. कशा प्रकारे, चांगल्या प्रकारची हवामान सेवा सर्व क्षेत्रांमध्ये देता येईल, ती लोकांपर्यंत त्यांना समजेल अशा भाषेत कशी पोहोचवता येईल आणि त्यांनी त्याचा वापर कसा करावा, हे जर का आम्हांला त्यांना अजून व्यवस्थितपणे सांगता येऊ शकले तर मला असे वाटते, की त्याचा फायदा आपल्या कृषिप्रधान देशाला नक्की होईल.

हवामान विभागाची महाराष्ट्र राज्यात तीन मुख्य केंद्रे आहेत: पुणे, मुंबई, नागपूर येथे आणि इतर जिल्ह्यांत निरीक्षण केंद्रे आहेत. हवामानाच्या कुठल्याही बाबतीत जर तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधलात, तर तुम्हांला त्याविषयी अजून चांगली माहिती मिळू शकेल. तसेच, भारतीय हवामान विभाग कशा प्रकारे निष्कर्ष देतात, त्याच्यापुढे काय काय आव्हाने आहेत, विषुववृत्तीय प्रदेशांमध्ये कशा प्रकारची वेगवेगळी आव्हाने आहेत, प्रारूपातील गणिते का किचकट होतात, इत्यादी सर्व गोष्टींची अजून माहिती आपल्याला मिळेल. त्याचबरोबर, हवामान विभागाशी असलेला आपला संपर्क अजून चांगला दृढ होईल. आणि मला असेही वाटते, की ते देशासाठी चांगलेच चिन्ह असेल. आपल्या सर्वांना भारतीय हवामान विभागाकडून दिवाळीनिमित्त खूप खूप शुभेच्छा !

– कृष्णानंद होसाळीकर
हवामान तज्ज्ञ
ks.hosalikar@yahoo.co.in

मराठी विज्ञान परिषदेच्या ‘पत्रिका’ या मासिकातील हा पूर्वप्रकाशित लेख 

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..