नवीन लेखन...

गंगा-गोदावरी

घरात पोरीला बघाय पावणं येणार म्हणून ती पाय भराभरा उचलत होती. डोक्यावरचा पाण्याचा हंडा डुचमळत होता. पाणी केसावरनं चेहऱ्यावर ओघळत होतं. चार मैलावरनं पाणी आणाय लागायचं. पाच-सात गावात तेवढ्या एकाच विहिरीला पाणी राहिलं होतं. दिवसातनं दोन हंडे पाणी आणायचं म्हटलं तरी मान आणि पाय भरून यायचे. त्यात तिथं विहिरीवरही झुंबड असायची. मारामाऱ्या, शिवीगाळ रोजची चालायची. कोण तरी एकदा म्हणालं तिथं ‘हीच परिस्थिती राहिली तर पाण्यासाठी मुडदं पडतील मानसांचं,’

एवढं करूनही विहिरीतलं गढूळलेलं पाणी घेऊन यायला लागायचं, घरात म्हातारी सासू अंथरुणाला खिळलेली. हागणं-मुतणं सगळं जागेवर दोन हंडे पाण्यात काय काय करायचं?

प्यायलाच कसंतरी पुरवायला लागायचं. दोन-चार दिवसातनं एकदा टँकर यायचा. तो दिसला की गावातली तरणी, म्हातारी, पोरं सगळी मिळेल ती भांडी घेऊन त्यामागं धावायची.

ओळीनं भांडी लावायला सांगायचा तो माणूस आणि टँकरचा पाईप सोडून हत्तीच्या सोंडेसारखा पाण्याचा लोंढा त्या भांड्यावरनं फिरवायचा. निम्मं पाणी आजूबाजूला सांडायचं. त्या टँकरच्या पाण्यालाही मातकट वास यायचा. टँकरच्या येण्याची काय वेळ नसायची. कधी पण यायचा. त्यामुळं घरात असतील ती सगळी माणसं टँकरभवती गोळा व्हायची.

कोणीतरी म्हटलं, ‘कागदोपत्री रोज टँकरची फेरी या गावासाठी हाय, पण चार दिसातनं
यकदा येतोय ह्यो.’

त्यावर एक म्हातारी म्हणाली,

‘असू दे बाबा. न्हाय तर येतोया त्यो बी बंद हुयाचा.’

गोदावरी घराजवळ आली. डोक्यावरचा हंडा उतरायला पोरगी बाहेर आली.

‘उषे, तांब्याभर पाणी दरवाजा बाहीर ठेव. पावणं येतील तासाभरात तुझा बा गेलाय स्टँडवर. म्हातारी जवळबी तांब्या भरून ठेव. तिला तहान लागली आसल.’

गोदावरीनं पदरानं मान चेहरा पुसला. घाम आणि पाणी जणू एक झालेलं.

मग एकदा तिचा नवराच म्हणाला होता.

तुझ नाव गोदावरी म्हणून तुझ्या संगट लगीन केलं, पण खोदलेल्या हिरीला काय पाणी लागलं न्हाय. नुस्तीच नावाचीच गोदावरी तू.’

तेव्हा मात्रा तिच्या डोळ्यात गोदावरी अवतरली होती.

ती रोज जाऊन खोदलेल्या विहिरीत डोकावून यायची. पण वाळली खड्ड विहीरच आसुसल्या नजरेनं आपल्याकडे पहातीय असं तिला वाटायचं. शेवटी विहिरीला उमाळा फुटला नाहीच. मग तिनं विहिरीत डोकावणं सोडून दिलं.

कुणी सांगितलं म्हणून तिच्या सासूनं विहिरीला कोंबडं पण दिलं. त्याच्या रक्तानं विहिरीचा तळ लाल झाला. पण पाण्यानं ओला झाला नाही.

मागं एकदा तिचा नवराच विहिरीच्या डोक्यावर कर्ज मात्र झालं.

गोदावरी विचारात असतानाच बाहेरून नवऱ्याची हाक आली.

‘गोदे! पावणं आल्याती गं.’

तिनं पदराला हात पुसत पदर डोक्यावरून घेतला.

तांब्याभर पाणी पायावर घेऊन पावणे आत आले. चारजण होते. मुलाचा काका, वडील, मुलगा आणि मुलाचा मित्र.

मुलगा अंगानं बारीक दिसत होता. वयही तिशीच्या दरम्यान वाटत होतं. गोदावरीला वाटलं पोरीपेक्षा दहा वर्षानं मोठा दिसतोय. उषा गोरी नसली तरी नाकी डोळी तरतरीत होती. दहावी पास होती. तिच्यासमोर मुलगा जरा डावाच दिसत होता.

मुलगा टक लावून उषाकडे पाहत होता. त्याची नजर गोदावरीला आवडली नाही.

पण हुंडा द्यायला जवळ पैसा नव्हता. तीन एकर कोरडवाहू शेती. त्यात काही पिकायचं नाही. सोनं नाणे घालायची ऐपत नव्हती. नवऱ्याला वाटायचं कुठल्या तरी स्थळानं ‘हो’ म्हणावं. म्हणजे जबाबदारी संपेल.

मुलाच्या बापानं तिला नाव, शिक्षण वगैरे विचारलं. उषानं उत्तरं दिली. मुलगा नुसताच मुंडी हलवत होता.

मुलाचा मित्र मधूनच त्याला चिमटा काढत होता.

उषाला मुलगा आवडला नाही.

मुलाच्या वडिलांनी, ‘तुमाला पोराला काय इच्चारायचं असेल तर इच्यारा.’ म्हटलं.

नवरा गप्प आहे बघून शेवटी गोदावरीच म्हणाली,

‘काय शिकल्यात म्हणायचं?’
‘सातवी पास हाय.’
मुलाचा बापच म्हणाला.
‘काय करत्यात?
‘शेतीच करतो न्हवं का.’
मग गोदावरी काय बोलली
नाही. उषा दहावी पास होती.
एकदम उषानंच विचारलं,
‘गावाला पाणी हाय का?’
तिनं तसं विचारलेलं तिच्या वडिलाला आवडलं नाही.
‘पाणी जरा लांबनं आणाया लागतंय.’
मुलाचा बाप म्हणाला तसं उषानं वळून गोदावरीकडं पाहिलं आणि उषा उठून आत गेली.
सगळी एकमेकाच्या तोंडाकडं बघायला लागली. शेवटी गोदावरीच म्हणाली, ‘पोरीची तब्बेत थोडी बरी न्हाय, तुमी समद्यांनी चा घ्या.’
माणसं निघून गेली तशी उषा आईला म्हणाली,
‘पाणी नसलेल्या गावात मला जायचं न्हाई आणि शेतकरी नवरा नको मला. शिपाई असला तरी चालंल.’

तसा बाप चवताळून तिच्या अंगावर धावला. ‘तर तर, लई इनामदारीण गेलियास, लागून
हिथं काय तुझ्या विहिरीला पाझर फुटल्यात का? जसं दारात पाणी येतंया तुझ्या.”

‘म्हणून काय समदं आयुष्य पाणी भरत घालवू का?’

“तुझ्या बापाकडं पैसा न्हाई हुंडा द्यायला. शिपाई बी हल्ली लाखभर हुंडा मागत्यात. कुठनं आणू पैसा? ‘

माझ्या मनाविरुद्ध देणार असला तर फास लावून मरीन मी.’
‘तू कशाला मरतीस, मीच मरतो फास लावून.

तशी गोदावरी त्या दोघांमध्ये पडली.

‘का उगा भांडतासा! पोरीचं बी काय चूक न्हाई. गावाला पाणी नसलं की किती हाल हुत्यात बघतायसा नव्हं? मग पुना ईषाची परीक्षा कशापायी?.. आणि पोरगं बी मला न्हाय आवडलं. कसं बगत हुतं उषीकडं कधी बाई बगितली नसल्यावानी.’

‘मग तुच बग कुटं राजपुत्र भेटतोय का तुझ्या पोरीला. माणसानं हाथरून बगून पाय पसरावं, म्हणत तो बाहेर निघून गेला.

म्हातारी भिंतीला टेकून बसली होती, पण तिला फारसं ऐकू येत न्हवतं काहीतरी वादावादी चाललीय एवढंच तिला समजत होते. शेवटी तिनं विचारलं,

‘काय झालंया गोदे? म्हादा का चिडलाया? ‘

गोदावरीनं म्हातारीला काय झालं ते मोठ्या आवाजात सांगितलं.म्हातारीनं थरथरणारी मान हलवंत ऐकलं. शेवटी म्हणाली,

या पान्यापायी म्हाद्याचा बाप मेला. निम्मी जिंदगानी हिर खोदत घालवली. पण पाणी न्हाई लागलं हिरीला. उषी म्हणतीया ते खरं हाय पाणी पायजे..’
असं म्हणत नवऱ्याच्या आठवणीने तिने रडायला सुरुवात केली. हल्ली म्हातारीची ही
सवय झाली होती, जुन्या आठवणी काढायच्या आणि रडायचं.

म्हातारीचंही खरंच होतं. म्हादाच्या बापानं गावातली पाण्याची टंचाई बघून विहीर खणायला सुरुवात केली. पाण्याड्या आणून जागा ठरवली. घराच्या मागच्या बाजूल हातात नारळ घेऊन पाण्याड्यानं दाखवली होती. लगेच जागेची पूजा करून विहीर खणायला सुरुवात केली. सुरुवातीला उत्साहानं गावातली काही लोकंही मदतीला आली. नंतर मग हळूहळू येण्याची बंद झाली. नंतर बापलेकं दोघंच विहीर खणत राहिले. पैसा संपत होता. खड्डा वाढत होता पण ओल लागत नव्हती. म्हाद्याचा बाप भर उन्हात विहिरीत जाऊन बसायचा. घाम निथळत राहायचा डोळे ओले व्हायचे.

विहीर खोल गेली तरी पाणी लागेना. म्हाद्याचा बाप गावात एक चेष्टेचा विषय बनून गेला. त्यानं गावात जायचं बंद केलं. गावात गेला की, माणसं हसायची. विचारायची ‘काय रं लागलं का पाणी हिरीला? ‘मग त्याच्या डोळ्यात पाणी यायचं. मागनं माणसं हसायची.

पाणी लागावं म्हणून सगळे प्रयत्न करून झाले. सुरुंग लावला. आडव्या पारा मारल्या. म्हातारीनं कोंबडं पण दिलं. पण वर्षभर खणून पाणी लागलं नाहीच. म्हातारा खचला. मोकळ्या विहिरीकडे पाहत तासन्तास बसायचा. एके दिवशी झोपला ते उठलाच नाही.

गाव म्हटलं, ‘विहिरीला पाणी लागलं नाही म्हणून म्हाताऱ्यानं हाय खाल्ली,’

म्हातारीला ते सगळं आठवायचं. पाणी पाणी करत म्हातारा मेला होता. म्हाद्यानं विहीर खणायचा नंतर प्रयत्न केला पण पैसा हाताशी नव्हता, विहिरीसाठी आधीच कर्ज काढलं होतं. मग त्यानंही तो विचार सोडून दिला.

गोदावरीनं सकाळी सगळं आवरलं. तेवढयात उषा बाहेरनं आत आली, ‘सकाळ सकाळचं कुठं गेली होतीस ‘आये, सुषमा होती आज गावात मीटिंग हाय संध्याकाळी, समद्या गावानं पंचायती समोर यायचं हाय.’

‘आता आनी कसली मीटिंग? जत्रा अजून लांब हायकी,’
‘अगं जयंसाठी न्हाय काय.’
‘मग कशापायी मीटिंग? ‘
‘अगं, पाणी कमिटी का काय म्हणत्यात.. जमिनीत पाणी मुरवायचं म्हणं.. कोणतरी पोळ नावाचं डॉक्टर माहिती सांगणारेत. होतीस?’ सगळ्या गावानं मिळून ते सांगतील तसं केलं तर गावाला पाणी मिळणारे म्हणं.’

‘खरं म्हंतीस? तुझ्या बाला सांगितलंस का? ‘

वाटतच भेटला बा. ठावं हाय.’
‘मग जाऊ या राती.’

‘हे कायच न्हाई, नंतर आपल्या गावात आमीर खानबी येणारे असं सुषी म्हणत होती.’

‘तिला बरं माहिती हे समदं?
आणि त्यो का येणार या गावात? ‘
‘अगं त्याचंच पाणी फौंडेशन हाय. त्याच्या पुढाकारानं हे काम हाय.’

‘ते काय का आसना, गावात पाणी आलं म्हंजी झालं.’

गोदावरी आनंदानं म्हणाली. संध्याकाळी गावातली बरीच मंडळी पंचायतीसमोर जमा झाली. कधी नव्हे ती बायकांची संख्याही बरीच होती. रोज दोन-तीन मैलाची

पायपीट त्यांनाच करायला लागायची. काय करायचं, कसं करायचं हे पोळ डॉक्टर सांगणार होते,

डॉक्टरांनी सांगायला सुरुवात केली, तसे सगळे जिवाचा कान देऊन ऐकत होते. सगळं श्रमदान गावानं करायचं होतं, डोंगर पायथ्याजवळ बांध घालायचा होता. पावसाचं वाहून जाणारं पाणी अडवायचं होतं, एक जुनं तळं पुन्हा खोदायचं होतं, असे छोटे छोटे बांध घालून पावसाचं वाहून जाणारं पाणी अडवायचं होतं. जेणेकरून ते जमिनीत मुरणार होतं. ती ओल शेतीला उपयोगी पडणार होती. तळ्ळ्यातले उमाळे पुन्हा जिवंत होणार होते, तळं भरलं तर गावाला वर्षभर पाणी पुरणार होतं. लांब लांब पायपीट करून पाणी आणायला लागणार नव्हतं.

हे सगळं ऐकताना सगळ्यांना स्वप्नवत वाटत होतं. असं होईल का? अशी शंकाही येत होती. श्रमदानाची तारीख ठरली. कसा कोठे बांध घालायचा याची आखणी करण्यात आली. सकाळी सकाळी गावातली तरणी, म्हातारी, बायकापोरं मिळेल ते टिकाव, फावडं, पाट्या घेऊन डोंगराकडं निघाली. जणू छोटी जत्राच गावाबाहेर भरली. गावातला सगळ्यात म्हातारा समजला जाणारा शंकरनाना काठी टेकत टेकत येऊन बसला होता. कोणी म्हणायचं त्यानं शंभरी गाठलीय म्हणून. चेहऱ्यावर सुरकत्यांचं जाळं बनून कंबरेत काटकोनात वाकलेल्या शंकरनानाला कानानं कमी ऐकू यायचं.

शंकरनानाच्या हस्ते कामाला सुरुवात होणार होती. गोदावरी, उषा, म्हादा तिघंही कामाला आले होते. गावात वेगळा उत्साह आला होता.

उन्हाळ्याचे दिवस होते, हळूहळू गरम व्हायला सुरुवात झाली, शंकरनानानं कुदळ मारली आणि कामाला सुरुवात झाली. हजार हात एकसाथ काम करत होते. जाणकार माणसं मार्गदर्शन करत होती. गाव करेल ते राव करेल का? ही म्हण खरी भासत होती. ओढ्याला छोटे बंधारे घातले गेले. तळंही आणखी खोल खोदलं गेलं.

गोदावरी, उषा रोज श्रमदानाला जायच्या. तिथं अनेक तरुणही यायचे. नोकरीला बाहेरगावी असलेलेही दहा दिवसांची रजा काढून गावाकडे आले होते. जनार्दनही शहरात जिल्हा परिषदेत शिपाई होता. गावात जलसंधारणाचं काम चालल्यावर तो रजा काढून गावात आला होता. रोज टिकाव फावडे घेऊन श्रमदान करायला यायचा. तिथंच उषाची त्याची ओळख झाली आणि वाढली.

गोदावरीच्या ते लक्षात आल्यावर ती उषाला म्हणाली, ‘तुझ्या बा ला तू कोणा पोराशी बोललेलं आवडायचं न्हाई, त्यात ते पोरगं बी आपल्या जातीचं न्हाई.’

‘आपल्या जातीतला त्यो हिरा परवा बघाय आला होता की. बगत होता पाहिलास नव्हं?’

‘अगं बया! त्या पोराशी लगीन कराय निगालीस का?’ ‘काय वाईट हाय त्याच्यात? नोकरी हाय चांगली लक्षात कसा वीस हजार पगाराची आणि ती बी शहरात. रोज डोक्यावर हंडा घेऊन पाणी आणाय लागत न्हाई तिथं. नळाला पाणी येतं खोलीतच.’

‘अगं माणसं काय म्हणतील आमास्नी? ‘ ‘काय घरात पाणी भराय येतीका तुझी जात? इथून तिथून समदी माणसंच की. जात बदलली म्हणून रगत बदलतंय का माणसाचं?
‘ गोदावरी गप्प बसली मग म्हणाली,

‘तुझा बा कसा हाय ठावं हाय नव्हं? तुला आनी मला दोगीस्नी जित्ता गाढील.’

‘मग गाडू दे. रोज थोड थोडं मरण्यापेक्षा एकदाच मेलेलं बरं.’
पोरीसमोर काय बोलून उपयोग नाही हे गोदावरीच्या लक्षात आलं. एक जात सोडली तर पोरगं चांगलं होतं.

महिनाभर बांधाचं काम चाललं होतं. सगळं गाव राबत होतं. पावसाचे दिवस तोंडावर आले होते. सगळं गाव पावसाची वाट पाहत होतं. पाणी साठणार का? साठलं तर मुरणार कसं? खोदलेलं तळं भरणार का?

या आधी पिढ्यान्पिढ्या गावानं दुष्काळच बघितलेला. पाण्याचा हंडा वाहून बायकांच्या माना मोडत आलेल्या.

तसा पाऊस कमीच पडायचा या भागात. पडलेलं सगळं पाणी वाहून जायचं. या वर्षी ते साठलं जाईल असं जाणकार मंडळी सांगून गेलेली.

गावात याच विषयावर चर्चा चालायची. कोणतरी म्हणायचं,
‘पाणी साठलं की, आमीर खान येणारे बघायला म्हणून.’
उषा मधून मधून मैत्रिणीच्या मोबाईलवरून जनार्दनला फोन करायची. त्यानं तिला लग्नाचं वचन दिलं होतं. पावसाळा झाला की तो लग्न करणार होता.

जणू सगळेच पावसाळ्याची वाट बघत होते.
गोदावरी डोक्यावरून पाण्याचा हंडा आणताना आता लवकर हे कष्ट संपतील याचा विचार करायची. म्हातारी भिंतीला टेकून खोकत असायची. घशाला शोष पडला की जवळ ठेवलेल्या तांब्यातलं घोटभर पाणी ओठाआड करायची. एक तांब्या पाणी ती दिवसभर पुरवायची. मधूनच सुनेला विचारायची,

‘गोदे, पावसाळा कधी चालू हुयाचा? सगळी जिंदगानी पावसाचं पाणी कदी पडतंय बगण्यात गेली… म्हातारा त्या तसा गेला… त्याच्या सपनात बी पाणीच दिसायचं त्याला.

मग ती पुन्हा म्हाताऱ्याच्या आठवणीत रमायची. बोलत राहायची.समोरनं गोदावरी निघून गेली तरी ती एकटीच बडबडत राहायची.

उषा तिच्या मनोराज्यात गुंग असायची. कधी कधी तिला हाक मारलेलीही ऐकू यायची नाही. गोदावरी मग तिच्यावर वैतागायची.

म्हाद्यानं पावसाळा तोंडावर आला पाहून त्याच्या शेताची नांगरणी केली. शेताचा छोटासा तुकडा त्यानं तयार करून ठेवला. उकलून वर आलेली ढेकळंही तोंड वासून पावसाची वाट पाहायला लागली.

आणि एके दिवशी अंधारून आलं. आकाशात ढगांनी दाटी केली. मोठमोठे थेंबाडे पडायला सुरुवात झाली. बघता बघता पावसाचा जोर वाढला.

गोदावरीच्या घराच्या पत्र्यावर पावसाच्या धारा कोसळू लागल्या तसा ताशा वाजल्यासारखा ताड्ताड् आवाज येऊ लागला. तसं गंजक्या भोक पडल्या पत्र्यातून गळायला लागलं. जिथं म्हातारी बसायची तिथंच तिच्या डोक्यावर गळायला लागलं. त्या गळणाऱ्या पावसाच्या थेंब थेंब पाण्याच्या स्पर्शानं म्हातारी तरारल्यासारखी झाली बसल्या जागीच.

‘गोदे, गोदे पाऊस आला गं.’ करत गळणारं पावसाच पाणी तळहातावर घेऊन सुरकतल्या चेहऱ्यावरून फिरवू लागली.

गोदावरी आणि खिडकीतून बाहेर पडणारा मुसळधार पाऊस बघत होत्या. तेवढ्यात
ओलाचिंब भिजलेला म्हादा घरात आला.

‘आवो किती भिजलासा!’
म्हणत गोदावरीनं वळणीवरचा टॉवेल त्याच्या समोर केला.
‘आगे पयला पाऊस, भिजू दे. हत्तीच्या सोंडंगत पडतूया बगं.’

त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद लपत नव्हता. गोदावरीनं सगळ्यांसाठी चहा केला. म्हाद्यानं म्हातारीला दुसऱ्या जागेवर सरकवलं. उषानं जिथं जिथं गळत होतं तिथं खाली भांडी ठेवली. त्या भांड्यात पाणी ठिबकण्याचा ठिबक ठिबक आवाज येत राहिला.

चार दिवस पावसाची संततधार चालू होती. नंतर पावसानं उघडीप दिली.

कोणीतरी बातमी आणली तळ्यात पाणी साठलंय. डोंगर पायथ्याला जिथं बांध घातले होते त्या सर्व ठिकाणी पाणी साठलं होतं. जमिनीत मुरलं जात होतं.

सगळं गाव तळ्याभोवती गोळा झालं. तळ्यात नवीन उमाळे फुटले होते. त्यातनं तळ्यात पाणी पाझरत होतं.

गावातल्या बायकांनी तळ्याच्या पाण्याची पूजा केली.

तरणी पोरं बांधा बांधावरनं फिरून आली. असं साठलेलं पाणी गाव पहिल्यांदाच बघत होतं.

महिनाभर कमी-जास्त प्रमाणात पाऊस पडत होता. तळ्यातलं वाढतं पाणी बघून गाव हरकलं होतं.

एके सकाळी गोदावरीनं घरापाठीमागच्या सहज म्हणून विहिरीत वाकून पाहिलं आणि तिनं मोठमोठ्यांदा नवऱ्याला हाक मारायला सुरुवात केली.

म्हादा आणि उषा धावत बाहेर आले. क्षणभर गोदावरी का ओरडतीय त्यांना कळेना. त्या
दोघांना पाहून गोदावरी आनंदाने म्हणाली,

‘आवं, हिरीला पाणी आलंया… बघा की वाकून.’

म्हादानं वाकून विहिरीत पाहिलं. विहिरीत दोन-तीन फूट पाणी साठलं होतं. दोन-चार
ठिकाणी उमाळे दिसत होते. त्यातून पाण्याची छोटी धार पडत होती.

‘गोदे! आक्रीतच झालं की. इतकी वर्ष कधी हिरीला पाणी लागलं न्हाय आणि आज काय जादू झाली गं.’

तशी वाकून पहात उषा म्हणाली,
‘जादू नव्हं बा ही. ते डॉक्टर म्हणालं होतं. जमिनीत पाणी मुरलं तर विहिरी, बोरींगलाबी पाणी येईल म्हणून. बांध घालून गावानं जमिनीत पाणी मुरवलं, इतकी वर्ष ते वड्याला वाहून जात होतं. म्हणून आता आपल्या विहिरीला उमाळे फुटलेत.’

गोदावरी पोरीकडे कौतुकानं पहात होती.
‘काय का आसं ना, देव पावला बग.’ गोदावरी म्हणाली.
आतनं म्हातारी ‘म्हादा म्हादा’ करून ओरडत होती. तिला सगळी बाहेर पळत का गेली समजत नव्हतं.

म्हादा घरात गेला आणि म्हातारीला पाठकुळीला घालून बाहेर आला. त्यानं म्हातारीला विहिरीला आलेलं पाणी दाखवलं.

म्हातारीला हुंदका दाटून आला. तिच्या डोळ्यातनं अश्रूंच्या धारा लागल्या. ती आभाळाकडे पाहत म्हणाली,

‘बगितलासा का, तुमच्या हिरीला पाणी लागलं… राब राब राबलासा… तुमच्या कष्टाचं सोनं झालं… गंगा आली भेटाया… पण ते बघाय तुमी न्हाईसा.’

बातमी पसरली तसा म्हादाच्या विहिरीभोवती गाव जमा झाला. म्हाद्याचं एक स्वप्न पुरं झालं. उषा तिचं स्वप्नं पुरं होण्याची आशा बळकट करत होती. तर गोदावरीनं आतनं जाऊन गंगेची ओटी भरायची तयारी केली होती.

गावच्या कष्टानं गंगा घराघरात आणि शेतातही अवतरणार होती.

दिवसभर म्हातारी विहिरीजवळ बसून नवऱ्याच्या कष्टाची कहाणी सांगत होती.

-डॉ. राजेंद्र माने

व्यास क्रिएशन्सच्या कस्तुरी – महिला विशेषांकातून साभार

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..