आपल्या दारासमोर एक गाडी असावी, असं प्रत्येक मध्यमवर्गीयाचं स्वप्न असतं. त्यासाठी त्याची पैशाची जुळवाजुळव सुरू असते.
गर्भश्रीमंतांसाठी लाख-दोन लाख म्हणजे फुटकळ खर्च. अगदी चणे-फुटाण्यासारखा. त्यामुळे या श्रीमंत वर्गाकडून पैसे कमावण्याचा एक धंदा वाहतूक विभागानेही सुरु केला. त्याला यश येऊन वाहतूक विभागाने मोठी कमाईसुद्धा केली आहे.
त्यामुळेच जेवढ्या पैशांत किमान 20 मध्यमवर्गीयांचे गाडीचे स्वप्न पूर्ण होऊ शकते, तेवढे पैसे खर्च करून अब्जाधीश उद्योगपती मुकेश अंबानी यांनी आपल्या नव्या ‘रोल्स रॉईस’ गाडीसाठी खास क्रमांक मिळवला. उद्योगजगतातील आपला अव्वल क्रमांक गाडीवरही असावा म्हणून मुकेश अंबानींनी १२ लाख रुपये भरून ‘००१’ असा क्रमांक आपल्या नव्या गाडीला मिळवला. मात्र, त्यांच्या ‘ज्योतिषा’ने हा क्रमांक अशुभ असल्याचे सांगितले. त्यामुळे या क्रमांकापुढे आणखी एक ‘शून्य’ जोडण्यासाठी त्यांनी आणखी १२ लाख मोजले!
जगातील गर्भश्रीमंताच्या यादीतील हमखास भारतीय असलेल्या मुकेश अंबानी यांच्या साडेचार कोटी रुपयांच्या ‘रोल्स रॉईस’साठी हा ‘अंक’प्रपंच झाल्याची माहिती ताडदेव येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयाने दिली. ‘रोल्स रॉईस’ खरेदी करण्याचे अंबानींचे स्वप्न अलीकडेच पूर्ण झाले. त्या गाडीची नोंदणी 16 एप्रिल रोजी ताडदेव येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयात करण्यात आली. त्या वेळी 12 लाख रुपये खर्च करून या गाडीसाठी 001 हा क्रमांक घेण्यात आला होता. मात्र, ज्योतिषांनी हा क्रमांक फायदेशीर ठरणार नसल्याचे सांगितल्यावर अंबानी यांनी दुसर्या क्रमांकासाठी प्रयत्न केले. त्यानुसार त्यांना 0001 हा क्रमांक मिळालादेखील, पण त्यासाठी त्यांना आणखी 12 लाख रुपये खर्च करावे लागले. अशा प्रकारे अंबानींना गाडीच्या क्रमांकासाठी 24 लाख रुपये भरावे लागले. ‘0001’ हा क्रमांक अंबानींसाठी कितपत फायदेशीर हे अद्याप उघड व्हायचे आहे. मात्र, अंकज्योतिषाच्या सल्ल्याचा प्रादेशिक परिवहन कार्यालयाला मात्र फायदा झाला आहे. परिवहन कार्यालयांच्या नियमानुसार आवडीचा क्रमांक घेण्यासाठी ऑनलाईन पद्धत सुरू करण्यात आली आहे. उपलब्ध व्हीआयपी क्रमांकांची किंमतही ठरवण्यात आली असून त्यासाठी सात हजार रुपयांपासून पुढे 12 लाख रुपयांपर्यंतचे शुल्क भरावे लागते.
गेल्या वर्षभरात एकट्या ताडदेव विभागाने 34978 वाहनांद्वारे या व्हीआयपी क्रमांकांच्या नोंदणीपोटी 25.28 लाख रुपये उत्पन्न मिळवल्याची माहिती ताडदेव कार्यालयातील सूत्रांनी दिली. विशेष म्हणजे यंदा मुकेश अंबानींच्या एकाच गाडीसाठी दोन वेळा रक्कम भरावी लागल्याने यंदा विशेष क्रमांकातून गोळा होणार्या महसुलाची सुरुवात चांगली झाल्याचेही सूत्रांनी स्पष्ट केले.
Leave a Reply