नवीन लेखन...

एका महासिद्धाचे जीवनदर्शन

स्वामी स्वरूपानंद हे संत म्हणून ख्याती पावलेले होते. संतत्वा करता कर्म, भक्ती व ज्ञान या तिन्हींचा समन्वय होऊन एक उच्च दशा प्राप्त व्हावी लागते. य दशेलाच योगी म्हण्याची प्रथा आहे. म्हणून स्वामी स्वरूपानंद हे योगी होते. योगीपणातून अधिक तरल, सूक्ष्मतर व सूक्ष्मतम अशा अवस्थांची द्वारे उघडली जातात. या द्वारांची वर्णने उपनिषदे, पुराणे व शास्त्रे यांतून निरनिराळ्या नावांनी केलेली आहेत. यातील एक द्वार असे असते की हृदयांतर्गत परिवर्तन क्षेत्रातील एक नाडी ऊर्ध्वमुखी होते, ज्या मध्ये आदित्याची किरणे प्रवेश करतात.

खालून प्राप्तीची उत्सुकता तीव्र झालेली असते आणि वरून प्राप्तव्याची किरणे तेवढ्याच तीव्रतेने खाली प्रवेशित होतात. हा आदित्य म्हणजे आपला सूर्य नव्हे तर आकाशापासून पृथ्वीपर्यंत जी पंचमहाभूते पसरली आहेत त्या पंचमहाभूतांचेही आधी निर्माण झालेली महत् शक्ती. ती सर्व ब्रह्मांडाला व्यापून असते. म्हणजेच आदित्यशक्तीने जो व्याप्त योग्याचा मनासह देह व्यापून टाकला जातो. तो महासिद्ध. अशा तऱ्हेचे महासिद्धपण स्वामी स्वरूपानंदांनी प्राप्त करून घेतले होते. महासिद्ध हा सर्व सिद्धींचा प्रणेता असतो व दाताही असतो. सिद्धीचा अर्थ शक्ती वा सामर्थ्य असा होतो. त्यांच्यांच प्रकारातून अष्ट महासिद्धी व सदतीस गौणी शक्ती, त्रेचाळीस प्रकारच्या सामर्थ्यासह त्याला प्राप्त असतात. यालाच उद्देशून संत नामदेवांनी “रिद्धिसिद्धी दासी । उब्या सादर सेवेसी” असे म्हटले आहे. या सर्व सिद्ध मिळून एक महासामर्थ्याचा तेजोगोल म्हणजेच महासिद्ध. असे महासिद्ध आपल्या देशात अनेक झालेले आहेत. त्यातून आपल्या संप्रदायापुरता मर्यादित विचार ज्ञानेश्वरांच्याच प्रकाशात न्हाऊन निघालेला दुसरा गोल म्हणजे स्वामी स्वरूपानंद.

मला गवसलेले स्वामी स्वरूपानंद या स्तरावरचे होते. कुठल्याही प्रकारची भौतिकतेची भेसळ न होऊ देता, शुद्ध आध्यात्मिक स्तर किंवा उच्चावस्था असे याला म्हणता येईल. प्रत्येक मानवी जीव, भौतिक, आध्यात्मिक सामर्थ्य घेऊनच जन्माला आलेला असतो. काळाच्या ओघात तुरळक व्यक्तींना आपल्या आध्यात्मिक सामर्थ्याची जाणीव होते व ते स्थिर जाणीवेनंतर त्या सामर्थ्याच्या संपूर्ण विकासाकरिता धडपड करू लागतात. या उच्च दशेलाच काही लोक ईश्वरत्व किंवा दिव्यत्व असेही म्हणतात. शुद्ध आध्यात्मिक सामर्थ्यातून अधिक प्राप्तीची हाव म्हणजे अभिलाशा त्यांचे ठिकाणी निर्माण होते. ही हाव म्हणजे भौतिक जीवनातील भौतिक सुखाकरिता असणारा हावरटपणा नसून ती एक तळमळ, धडपड असते जी असोशी मधून जन्माला येते. त्यातून काय श्रेयस व काय प्रेयस याची आपापत:च निवड होऊ लागते व तो बिनधास्तपणे प्रेयसामधीलही जे श्रेयस आहे त्या सर्व श्रेयसाचा बिनदिक्कतपणे पाठलाग करू लागतो. भौतिकतेच्या कड्यावरून आध्यात्मिकतेच्या तरल व सूक्ष्म स्पंदनात उडी घेतली जाते व त्याला ईशप्रेमाचा आधार मिळतो. याच अवस्थेला उद्देशून स्वामींनी देवीच्या प्रार्थनेत म्हटले आहे, “अनन्यभावे कड्यावरून जे उडी घेतली खाली । भक्त वत्सला माउली मला फुला सारखे झेली।।” अशा अटीतटीच्या अवस्थेतच भक्तीचे वर्म अंतरातून कळू लागते आणि भक्तीचे सूत्र आत्म्याशी गोवले जाऊन कठीण आंब्यातून रसयुक्त गर मिळतो, त्याप्रमाणे भक्तीतून ज्ञान वैराग्य संपन्नता येते व साधक किंबहुना सिद्ध आत्मस्थितीच्या महाद्वारातून विश्व न्याहाळू लागतो. स्वामी म्हणतात, “निढळावरती नीट लावूनी आत्मस्मृतीची तीट।
भक्ती सुखाचा मुखी घालते साखर धांस अवीट।।” यातून निर्माण होणारी उभारी फार विलक्षण असते. या अवस्थेत “जे जे करू जाय कर्म । तेथ तेथ प्रकटे परब्रह्म ।” अशी संत एकनाथांनी वर्णिल्याप्रमाणे स्थिती येते आणि स्वामी तर असे म्हणतात, “आता ठेवू कुठे पाय। जेथे जातो तेथे देव।।” देवाशिवाय भौतिक जीवनातला ही कोणतीही क्षेत्रे रिती नसतात हा त्याचा अनुभव असतो. त्यातून ईश्वराविषयीचा कृतज्ञेतेचा भाव आपाल्यात उत्स्फूर्त होतो. तेही वर्णन स्वामींनी केले आहे. ज्यात ते म्हणतात, “भले दिले निज पद जगदंबे मज अक्षय अविभाज्य । म्यां आत्मबले आज जिंकिले लोकात्रय साम्राज्य।।”
उच्चावस्था प्राप्त झाल्यानंतरचे हे अद्भुत असे वर्णन आहे. तथापि वर्णनाला शब्द लागतात आणि ते मात्र शब्दांचे काम नाही. त्या वेळी होणारी मतीची कुंठित अवस्था तेवढ्याच तोलामोलाच्या भावातून स्वामींनी वर्णन केली आहे. ते म्हणतात, “माते, त्वद्गुण गाणी वाणी श्रुती-कीर्तन श्रवणी । रूपी लोचन सहित बुद्धीमन चित्त गुंतले ध्यानी।। अगाध अनुपम अगम्य महिमा माझ्या जगदंबेचा। अनुभविता मती – गतीही कुंठीत, काय पाड शब्दांचा ।।”

अशीही भौतिकतेच्या चिखलातून अध्यात्माच्या सोनेरी स्त्रोतात प्रवेश करण्याची व संपूर्ण प्रवासात आनंद घेण्याची कहाणी स्वामींनी वर्णन केली आहे.

भगवत् गीतेचा शब्दानुवाद करणारी विनोबांची गीताई असे म्हणते, “लक्षावधीत एखादा प्रेमाने भजतो मज। त्यातूनही एखादा तत्वतां मज जाणतो।।” अमृत बिंदू आध्यात्मिकतेतच आहे हे खरेच परंतू त्या करता प्रवास भौतिकतेतूनच करावा लागतो. भौतिक म्हणजे ऐहिक ऐहिकावर अध्यात्माचे म्हणजे दिव्यत्वाचे अथवा ईश्वरत्वाचे आवरण असते. शिवाय भौतिकतेच्या गर्भातही तेच स्थापित असते, पण ते दिसत नाही. किंबहुना भौतिक जीवनातले शोध ज्या निकषावर सिद्ध केलेले असतात तो निकषही येथे लागू पडत नाही. तरीही सत्य हे सत्यच आहे भौतिकतेच्या मनोहर कोंदणात ते बसलेले असल्याने व कोंदण सहजी उघडता न येण्यासारखे असल्याने भौतिकातील साधकाला प्रेमपूर्ण याचना करावी लागते, आर्ततेने ईश्वराला हाक द्यावी लागते. अनेक जन्मांतून प्रगत होणऱ्या जीवाला कुठल्या तरी जन्मात त्याच्या आर्त होकेला प्रतिसाद मिळतो. परिणामत: त्याला सद्गुरूची प्राप्ती होते. खऱ्या अर्थाने येथूनच अध्यात्मांची सुरुवात होते. स्वामींनी स्वच्छ सांगितले आहे, “गुरुकृपेवीण नाही आत्मज्ञान।” आत्मज्ञान हीच मानवी जीवनातील संजीवक वल्ली आहे. तीच भौतिकाच्या मनोहर कुपीत अमृत रूपाने दडलेली आहे. आणि कुपी उघडण्याचे तंत्र, ज्याला पुष्कळदा मंत्र म्हणण्यात येते, केवळ गुरुच्याच कहात असते, ते उघडले जाते. प्रामाणिक व महाज्ञानी गुरु किंबहुना ज्ञानाचे कोठार असणारा गुरु काही तांत्रिक साधना, सेवा करून घेऊन काही रहस्ये उलगडून दाखवतो. त्याच दर्जाचा प्रामाणिक शिष्यही असल्याने त्याच्या ठिकाणी आध्यात्मिक ग्रहणशक्ती वाढलेली असते. त्यामुळे तो हे ज्ञान आत्मसात करतो. ज्ञानाच्या बळकट प्राप्तीकरता शिष्याची धडपड सुरू होते. अशा धडपडीचा एक नमुना छांदोग्य उपनिषदात वर्णन केला आहे. खरे व उच्च उपनिषदांमध्ये ग्रंथित केलेले आहे. त्यात अतिउच्चतेचे म्हणजे आत्यंतिक दुःख निवृत्ती व परमानंद प्राप्तीचे खोलवर दडलेले रहस्य विशद झाले आहे. अर्थात ज्ञानदेवांसारख्या संतांनी हे खोल ज्ञान ग्रंथित करून आपल्या शब्दांतून मांडले व लोकांच्या प्रगतीचा मार्ग खुला केला. स्वामी स्वरूपानंद ज्ञानदेवांचेच प्रतिबिंब आहे. म्हणून ते सहज म्हणत गेले, “सहज साधन गुरुकृपा जाण । जीवाचे कल्याण तेणे होय।।.” अशा या सनकऋषी नावाच्या ज्ञानसंपन्न गुरुकडे, भौतिकातील सर्व शास्त्र, कला, ज्ञान आहेत असे नारदमुनी एकदा गेले. आपल्या ज्ञानाची तहान त्यांनी ऋषींना निवेदन केली. त्यावर ऋषी म्हणाले, “तू जे जाणतोस ते सर्व नाम आहे. या नामाचा शोध तू घे. त्याचे चिंतन कर व त्याचेच ध्यान धरून आत शिरण्याचा प्रयत्न कर. त्या करिता भौतिक जीवनातली काही पथ्ये सांगितली. ती पथ्ये म्हणजे चार प्रकारचे भौतिक वर्तन, ज्याला ब्रह्मचर्य म्हटले आहे. हे ब्रह्मचर्य आपल्या सामान्य कल्पनांपेक्षा वेगळे आहे. परब्रह्माचे प्राप्तीसाठी होणारे आचरण म्हणजे ब्रह्मचर्य. त्याचे चार प्रकार असे. १) यज्ञ २) सत्स्त्रोत ३) मौन व ४) अनशन. या चारही प्रकारांचे विस्तारपूर्वक निवेदनही त्यांनी केले. आजच्या आपल्या जीवनात यज्ञाला पुराण काळात होते तेवढे महत्त्व राहिलेले नाही. पण त्यांनी त्रिकालाबाधित असा यज्ञाचा अर्थ सांगितला. आपले कर्तव्य कर्म म्हणजे यज्ञ. आसक्ती न ठेवता, कर्माची परतफेड कुठल्याही स्वरूपाने न इच्छिता, निरलसपणे केलेले कर्म हा यज्ञ. स्वामींच्या मनोधारणेचा विचार केला तर सखोल निरीक्षणाने हे लक्षात येईल की स्वामी कर्म करताना जरी दिसत नसले तरी लहानशा खेड्यातील एका खोलीत बसून त्यांनी जगात संचार केला स्वत:च्या आत्मसंपादनांतून अनेकांच्या भौतिक जीवनात सौदार्द्र व प्रेम निर्माण केले एकूण समाजात आस्तिक्य बुद्धी वाढवली व खूप लोकांना ईश्वरप्रवण केले व हे सर्व कुठलीही उपेक्षा न ठेवता केले, असा हा त्यांचा महान यज्ञ होता. त्यांना प्रेरणा नेहमी आत्म्याकडून येत असे. कारण ते महासिद्ध होते. बोलणे अत्यंत सीमित, फारच थोडे, आणि त्यांचे भोजन म्हणजे काही न खाणे याच स्वरुपाचे होते. अत्यंत अल्प आहार असे. अशा रीतीचे ब्रह्मचर्य स्वामी स्वरुपानंद राखून होते. आजच्या परिभाषेनुसार त्यांचा विवाह झालेला नव्हता. म्हणून त्या अर्थानेही ते ब्रह्मचारी होते. अशी अवस्था प्राप्त करून घेतलेली आपण आपल्या डोळ्यांनी पाहिली आहे. ती अवस्था ही त्यांनी अत्यंत यशस्वीपणे राखली होती. कोणत्याही प्रसंगी त्यांचा तोल गेलेला दिसत नाही. आत्यंतिक शांती, आंतरिक प्रेमभाव, सस्मित मुद्रा आणि आनंदवर्धक व ज्ञानाची पखरण करणारे शब्द हा त्यांच्या जीवनातील स्थायी भाव होता. यातून त्यांच्या आध्यात्मिक प्रगतीचा सोपान कसा चढत गेला ते आता आपण बघू या.

आध्यात्मिक उच्चावस्था येण्यासाठी सत्यसंकल्प व सत्यकाम होणे गरजेचे आहे. भौतिक जीवनात म्हणजे आपल्या नेहमीच्या प्राकृतिक क्षेत्रात ज्याला आपण माया म्हणतो त्या क्षेत्रात देखील आपले वर्तन सत्यसंकल्पाने व सत्यकामाने परिपूर्ण असायला हवे अभिप्रेत आहे. या दोन्हीची पूर्णत: सिद्धी अवघड आहे हे खरेच. तथापि प्रयत्न आणि प्रयत्नाकरीता ध्येयरूप म्हणून सत्यकाम व सत्यसंकल्प आपल्या वर्तन क्षेत्रात आपण खचित बसवू शकतो. आपल्या आशा, आकांक्षा, इच्छा, भावना, वृत्ती व प्रवृत्ती या सगळयांना सत्याच्या प्राप्ती करताच, असे वळण दिले, तर भौतिकातलेही सत् तत्त्व आपल्या सहाय्याला येते आणि त्यातूनच सत्य संकल्प नीटसपणे व शिस्तबद्ध रीतीने कार्यवाहीत आलेला आपल्याही अनुभवास येतो. त्याकरता मनाची बैठक पक्की करावी लागते. तसे घडले की देहादी प्रपंच कशाही रीतीने व्यहारात उतरलेले असले तरी चिंतेचे कारण राहात नाही. यालाच उद्देशून ज्ञानेश्वर म्हणातत, “देह तरी वरीचिलीकडे। आपुलिया परी हिंडे। परी बैसका न मोडे। मानसीची।।” आणि स्वामी म्हणातात, “धन सुत दारा। असू दे पसारा। नको देवू थारा। आसक्तिते।।” अशा या सुदृढ मनोभावनेला वैचारिक तथा दैवी शिस्तीचे वळण दिले की आपापत: सत्यकामाला सत्यसंकल्पाची जोड मिळते आणि जीवनाचे तारू कधीही दोलायमान होणार नाही अशा पद्धतीने उक्ती व कृती या दोहोंमध्ये समरसता निर्माण होते. समर्थ रामदास म्हणतात, “बोल तैसा चाले त्यांची वंदावी पाऊले।।”. असा मनुष्य खचितच वंदनीय ठरतो कारण तो सत्यान्वेषी असल्याने बोलण्यातून सहजतेने सत्याभिनिवेशी देखील होतो. तो सत्याचाच पाठपुरावा करतो.
त्यामुळे तो सत्याभिमानी होतो तथापि हा अभिमान अहंकार नसतो, तर तो अस्तितेतून उदय पावलेला असतो. संत तुकाराम सहजतेने म्हणून गेले, “श्रुतीचा तो अर्थ आम्हाशीच ठावा। येरांनी वाहवा भार माथा।।” आणि स्वामी म्हणतात, “आज कालचे नव्हेत आम्ही जुने पुराणे जाणे।।” त्याचबरोबर सत्याच्या बाबत स्वामींनी आणखी एक नोंद करून ठेवली की बाबा रे “सत्य बोलाया कारणे मनोधैर्य संपादणे।।” एवढी सलगीची भाषा करून स्वामी शिष्याचे ठिकाणी धैर्य प्रासादित करतात आणि म्हणतात. “तुज कशाचे गा भय।, कोण नेते तुजे काय।” येणेप्रकारे ईश्वरावर दृढ श्रद्धा, केवळ ईश्वरप्राप्ती हाच ध्येय भाव साधक जीवनात आत्यांतिक महत्त्वाचा ठरतो. यातून बाहेर पडणारी वाणी ही साधी वाणी नसते तर उद्गीध असते. स्वामींचे साधे आणि थोडकेच बोल ऐकत असताना असे वाटत असे की, जणू संपूर्ण ब्रह्मांडाला वस्त्रगाळ करून जे अल्पसे धवलपीठ बाहेर पडते तेच स्वामीचे मुखातून उत्स्फूर्तपणे येते. निमित्त कारण जरी सामान्य असले तरी स्वामींच्या मुखातून बाहेर पडल्याने परिणाम असामान्य असे. साधी वाणी व उद्गीथ या मध्ये फरक पडतो. उद्गुथ प्रेरणेतून उत्स्फूर्त झालेले असते. पुढे ते पंश्यतीत उतरते, नंतर तिला मध्यमेचे आवरण मिळते. आणि बोलणाऱ्याच्या शब्दज्ञानानुसार ते वैखरीत पदार्पण करते. अशा प्रकारेचे बोल जे परेतून उगम पावतात ते उद्गीथाच्या तोलामोलाचे ठरतात. त्याकरता सत्यसंकल्प आणि सत्यकसम हे उक्तीच्या थेंबाथेंबात भिनलेले असावे लागतात, त्यांतूनच अभिनिवेष निर्माण होतो. यालाच उद्देशून संत नामदेव म्हणतात, “बोलू ऐसे बोल । जेणे बोले विठ्ठल डोले।” त्या करता ते पाळत असलेले पथ्याही ते सांगतात. “परेहून परते घर तेथे राहू निरंतर।” असा आत्मविश्वासही त्यांनी प्रकट केला. कारण त्याशिवाय मुखात सतत खेळणारा विठ्ठल आणि देहाच्या कणाकणांतून बाहेर पडत असलेले सृष्टीप्रेम प्राप्त होणार नाही. असा मनुष्य तृप्त असतो, शांत, समाधानी आणि निरंतर आनंदी व निर्भय असतो. स्वामी स्वरुपानंदांनी सांगितले. “आम्ही ठायीचे अभिन्न। आम्हा कैचे जन्ममरण।।” आणि भावार्थ गीतेत त्यांनीच वर्णन केलेली अवस्था ते उपभोगीत होते. “जरी आदळती डोंगरही दुःखाचे। असे अढळ मन नांव न उद्वेगाचे।।” स्वामींनी आपल्या अनेक शिष्यांना प्रबोधनातूनही अध्यात्मज्ञान वितरीत केले. आणि अध्यात्म्याच्या चौकटीत भौतिक जीवन कसे बसवावे याचा अनुबोध केला. याचे खूप दाखले पत्रमंजूषेत सापडतील.

अध्यात्म सोपानाच्या अशा अनेक पायऱ्या स्वामी चढून गेले होते. या पायऱ्यांचे सुंदर विश्लेषण छांदोग्य उपनिषदात केलेले आहे. यातील जवळजवळ शेवटची पायरी “भूमा” म्हणून सांगितली आहे. “भूमा” च्या अवस्थेत मनुष्य आत्मस्थितीतून वैश्विक चैतन्यात शिरतो. आत्मप्राप्ती हा एक टप्पा आणि वैश्विक चैतन्यात प्रवेश हा परब्रह्म अवस्थेचा दुसरा टप्पा. या अवस्थेत अत्यंतिक दुःख निवृत्ती तसेच परमानंद प्राप्ती याची झलक त्याला कळते. “अमृतधारा” या स्वामींच्या बृहत् ग्रंथातून अगदी शेवटी स्वामींनी स्वतःचेही वर्णन केले आहे. ते म्हणतात, “तुझ्या ज्ञानामृताने ज्याचे पोषण झाले आहे, तुझ्या भक्ती प्रेमाचे भरजरी वस्त्र ज्याने परिधान केले आहे असा मी, हे जगन्माते, अनंत तत्त्वाच्या, शाश्वताच्या, राऊळात तुज पुढे नृत्य करीत आहे.” स्वयंस्पष्ट अशा या स्वामीच्या बोलातून छांदोग्यातील सुखाची कल्पना मांडली गेली आहे. नव्हे, प्रत्यक्ष अनुभव यावा इतकी ती जोरकस व स्पष्ट आहे. पुढील “भूमा” या अवस्थेत एका बाजूला अत्यंत विशालता व दुसरीकडे अत्यंत सूक्ष्मता या दोहोंचा अनुभव आपल्या मिटलेल्या डोळ्यांतून महासिद्ध घेत असतो. “शब्देविण संवादिजे। इंद्रिया नेणता भोगिजे।।” या दर्जाचा तो अनुभव आहे. “आम्ही लोकत्रय साम्राज्या जिंकले आहे” अशा शब्दात स्वामींनी त्याचेही वर्णन केलेले आहे. परेहून परत्या घरात स्वामींचे वास्तव्य होते व आत्यंतिक प्रीतीच्या महासागरात स्वामी आपल्या सर्व शिष्यांना ओढून घेत होते, आनंदाचे दान करीत होते व दुःखाचा संक्षेप करून त्यातून आनंद कसा निर्माण करून घ्यावा याचे रहस्यही सांगत होते.

स्वामी स्वरूपानंद आत्मज्ञानी होते. आत्मज्ञानी मनूष्य ब्रह्मज्ञानाच्या तेजोवलयात वास करीत असतो. तसे स्वामी होत. म्हणून जनात असूनही ते जनावेगळे होते. हाडामांसाचा देह त्यांनी धारण केला होता. तथापि त्याच्या बंधनात ते वावरले नाहीत. किंबहुना हाडामांसाचा देह ज्या पंचतत्त्वांपासून निर्माण होतो त्या पंचतत्त्वाशी त्यांनी एकरूपता साधलेली होती. त्यामुळे ते श्रीमंतीचे वैभवही भोगत होते आणि दीन दरिद्री दुःखी, दुबळ्यांची आर्तताही आत्मीयतेने जाणत होते. एक विराट विलक्षण तथा सहज, सामान्य या सगळ्यांची राखण करून प्रेमाने ओतप्रोत भरलेले जीवन ते जगत होते.

स्वामींचे जे जीवन दर्शन मला घडले ते येथे कथन केले. तथापि हे सर्व शब्दिक आहे याची मला जाण आहे. मात्र शब्दांच्या फोलपटातून बाहेर पडणारे आंतरिक सोहार्द्र, जो अत्यंत तेजस्वी व महान असते. तेच आपणा सर्वांचे असावे अशी मझी त्यांच्या जवळ नित्य प्रार्थना असते. स्वामींची प्रार्थना करून स्वामींनाच हे अर्पण करीत आहे.

।। हरि ॐ तत्सत् ।।

— स्वामी विद्यानंद

साभार: गुरुतत्व मासिक, वर्षं ३ रे, अंक ९ वा.

छायाचित्र सौजन्य: www.swamiswaroopanandpawas.org

पुणे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..