नवीन लेखन...

बदलती जीवन शैली व शिक्षण

एका अदृश्य शक्तीने दोन वर्ष शाळा बंद ठेवल्या व भविष्यातही त्याचं अस्तित्व राहणारच आहे, हे लक्षात घेऊनच आता मुल्यमापनाच्या निकषांचा नव्याने विचार करावा लागणारच आहे. अशीच वर्ष वाया गेली तर विद्यार्थ्यांची व्यक्तिमत्त्वें पोकळीत वाढतील व हे व्यक्तिमत्व विकासाला बाधक ठरेल.

तातडीने मूल्यमापनाच्या संबंधी खालील काही मार्गदर्शक सूचना पालकांना कळवाव्या लागतील.

१) तज्ञांच्या सहाय्याने  मूल्यमापन आराखडा तयार करून राज्य स्तरावर सर्व जिल्ह्यांचे संकलन करून एक आदर्श मूल्यमापन आराखडा, शाळा भरणार नसतील त्या परिस्थितीत कसा असावा व शाळा जर भरत असतील तर आराखडा कसा असावा याबाबत काही उपाय ताबडतोब अमलात आणावे लागतील, त्यासंबंधी शाळांना वेळोवेळी मार्गदर्शन करावे लागेल.

२) अभ्यासक्रम व त्याचे उपयोजन करण्याची क्षमता विद्यार्थ्यात कशी आणि कोणत्या घटकाने वाढेल हे ठरवावे लागेल. पाठांतर व घोकंपट्टी पेक्षा प्रत्यक्ष कार्य व त्याचा अनुभव विद्यार्थ्यांनी कसा घ्यावा याचे नियोजन हवे.

३) प्रत्येक जिल्ह्यात सर्वेक्षण करून किती विद्यार्थी ऑनलाइन ने शिकू शकतात याची नोंद ठेवावी.

४) ऑनलाइन ने शिकवण्याचे वेगळे विषय व घटक ठरवावेत.

५) ऑनलाईन व ऑफलाईन असे वेगवेगळे नियोजन करून पाहावे लागेल.

६) स्वयं अध्ययन नें काय शिकता येईल हे परिपत्रक काढणे  व शाळेने पालकांना कळवावे.

७) होम स्कूलींग साठी किती पालक तयार आहेत त्या दृष्टीने त्यांना वेळोवेळी सूचना पाठवाव्यात.

८) इंटरनेट सुविधांचा अभाव आहे, पालक लक्ष व वेळ देऊ शकत नाहीत  अशा विद्यार्थ्यांना साठी वेगळे नियोजन करून त्यांना मूळ प्रवाहात आणणें, याकडे लक्ष द्यायला हवे ते कसे करायचे हे त्या त्या स्थानिक पातळीवर ठरवावे.

९) प्रत्येक पाठा मागें स्वाध्याय म्हणून जे दिलेले असते ते व  अजून नवीन स्वाध्याय देऊन नियोजनाच्या संदर्भात विद्यार्थ्यांनी घरी व समाजात काय काय करावे याचे नियोजन त्यांना कळवावे व त्याची नोंद त्यांनी ठेवावी.

१०) स्वयंमूल्यमापन वर जास्त भर देत त्याचे रेकॉर्ड कसे ठेवावे याचे नियोजन करावे.

विषाणूनें अस्तित्वाचा प्रश्न निर्माण केला व शिक्षणाचाही प्रश्न नर्माण केला आहे.शिक्षणच शिक्षणाचे प्रश्र्न सोडवू शकतनाही ही परिस्थितीआहे.शिक्षणाचे बदलते संदर्भ, शिक्षणाचा आशय, प्रक्रिया काळानुसार बदलतें तेंव्हा आपण शिक्षणाचे संदर्भ बदलले आहेत असे म्हणतो,व त्यानुसार आपल्याला स्वतःला तडजोड करून घ्यावी लागते. संदर्भ बदलण्याआधी आपण बदलायला हवं नाहीतर आपण प्रवाहा पासून दूर फेकले जाऊ. काळ बदलला की संदर्भ बदलतात मानवी हस्तक्षेपामुळे किंवा निसर्गाच्या आपत्तीमुळे किंवा भौगोलिक रचनेतील बदलामुळे नवीन घटनांची नोंद घ्यावीच लागते. इतिहासातल्या गोष्टीपासून सुधारणा करावी लागते, झालेल्या चुका पुन्हा होऊ नयेत म्हणून नव्याने आखणी करावी लागते या सर्व प्रक्रियेत जुन्या गोष्टींना चिकटून चालणार नाही.

नवीन आराखडा, नवीन संकल्पना रूजवायलां लागतीत, माणसे बदलली की सत्ता बदलते, सत्ताबदलली की विचारसरणी बदलतें आणि ती विचारसरणी कळत-नकळत शिक्षण प्रक्रियेत रूजतें.परंपरेला छेद देण्याची वेळ आली आहे, त्यानिमित्ताने एक वेगळेच प्रारूप तयार करण्याची संधी आली आहे.

एक विषाणू मानवजातीला उध्वस्त करायला निघतो तेव्हा  जीवनपद्धती तर बदलतेच, शिक्षण घेण्याच्या देण्याच्या प्रक्रिया ही बदलतात. तडजोड नाही केले की अस्तित्व संपतं.

जगायचं असेल तर जीवनशैली बदलावी लागते. शिकायचं असेल तर शिक्षण प्रक्रियेत बदल करावा लागेल. मूल्य चिरंतन असतात, मूल्ये बदलत नाहीत पण ती देण्याची व घेण्याची प्रक्रिया राबवताना  नवीन परिस्थिती लक्षात घ्यावी लागते. संकल्पना स्पष्ट करताना नवीन दाखले द्यावे लागतात.जिवन पद्धती बदलू शकतें, शिक्षण पद्धती कां नाही?

पूर्वी शिकलेल्या अनुभवाच्या शिदोरीवरच नवीन संकल्पना विद्यार्थ्यांना समजावून घ्याव्या लागतील.शाळेत शिकून व विसरल्यानंतर  जो शैक्षणिक अनुभव त्यांना मिळाला असेल त्याच्यावरच त्यांची शैक्षणिक अनुभूती ठरणार आहे.

शिक्षणाचे संदर्भ इतके बदलले आहेत की विद्यार्थ्यांना शैक्षणिक अनुभव पुस्तकांच्या बाहेरचेही शिकावे लागणार. करोना पूर्व शिक्षण व करोना उत्तर शिक्षण याचा वेगळा विचार करावा लागेल. कोरोना च्या काळात कळत नकळत मुलांनी अनौपचारिक शिक्षणाद्वारे अनेक चांगल्या गोष्टी, तंत्र कौशल्य, कला, छंद जोपासले. हा अभ्यासक्रमांचा भागंच समजला गेला पाहिजे. अनौपचारिकपणे जे कौशल्य, मूल्य मुले शिकतात त्याची नोंद व्हायलाच पाहिजे.

सजग पालक home schooling मध्ये अभ्यास,छंद पुर्ण करून घेतातच.पालकांच उदबोधन करून याची व्याप्ती वाढवावी.

आता ऑनलाईन मध्ये पालक जास्त सज्ज,सजग झाले आहेत.हे चित्र सार्वत्रिक झाल तर?खरंच मुले शिकली, तंत्रज्ञानाच्या जवळ  गेली. काहीना त्यांच्या पालकांनी जबरदस्ती केली. काही शाळांनी त्यांचा वेळ रिकामा जाऊ दिला नाही. केवळ पाठ घेणारी, अभ्यासक्रम शिकविणारी औपचारीक पद्धत इथून पुढे आपल्याला सोडून द्यावी लागेल का?  निदान काही काळासाठी तरी, यादृष्टीने नियोजन हवें आहे

शैली आणि सवयी, पध्दती बदलाव्या लागतील.शिक्षण औपचारिकच नव्हें तर अनौपचारिक पद्धतीनेही राबवावे लागेल. की काय अशी परिस्थिती आपल्यासमोर आहे.अशी ही निरीक्षणे पाहायला हवीत जिथे काहीच एक घडले नाही,घडत नाही.२००५च्या शैक्षणिक आराखड्यानुसार शिक्षण ही वाटण्याची भौतिक गोष्ट राहिली नाही. मुले अनुभवातून, कृतीतून, व्यक्त होण्यातून चर्चा करण्यातून प्रश्न विचारण्यातून, ऐकण्यातून,निरीक्षण करण्यानं शिकत असतात असे म्हणले आहे,आणि आताही शिकायलाही हवेत. काहीशा बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेणे, कामाचा अनुभव घेता येणे, कौशल्य निवडणे, कलाप्रकार याचे रसग्रहण करता येणे, सर्जनशीलता वाढवणे ही शिक्षणाची मूलभूत उद्दिष्टे आहेत. ही ध्येय साध्य होतील अशी साधने व संधी शिक्षण व्यवस्थेने,समाजव्यवस्थेने उपलब्ध करून दिली पाहिजेत. शिक्षकांनी, पालकांनी प्रेरणा द्यायची गरज आहे.

आज पर्यंत हे अपेक्षेप्रमाणे झालं नाही, पण आता करायचेआहे.अशाही विद्यार्थ्यांचा विचार करावा लागेल ते शाळेत जातच नाहीत,अभ्यास करत नाहीत, त्यांना कोणी काही म्हणत नाही. जिथे पालक  शिक्षणाबद्दल अनभिज्ञ आहेत, जिथे आर्थिक विवंचना आहे जिथे विद्यार्थ्यांची गरज पालकांना हवी आहे.

जिथे आई वडील घरी नसतील कामानिमित्त बाहेर असतील तिथे मुले मोबाईल सहवासात राहणार. शिकवणे कंटाळवाणे असेल तर मुले ऑफ स्क्रीनहोणार.सामाजिक अंतर राखणे, मास्कचा वापर,sanitiser वापर साठी नवीन नवीन योजना आखाव्या लागतील. शाळे शिवाय अनौपचारिक शिक्षण व्यवस्थेतून विद्यार्थ्यांनी शिकावं असं वाटत असेल तर अभ्यासक्रम बदलावा लागेल. अचानक अभ्यासक्रम बदलता येणार नाही, पण काही मार्गदर्शक सूचना वितरित करता येतील. अभ्यासक्रमातून अनौपचारिक शैक्षणिक अनुभव त्यांना कसा मिळेल याची तरतूद करायला हवी.शिकण्याच्या संधी मुलांना आपण किती आणि कशा उपलब्ध करून देतो यावरही ते अवलंबून आहे. राहू दे तुला जमणार नाही असाच पालकांचा कल असतो. किती मुले भाजी आणतात ,व्यवहार करतात, घरात उपकरणांची दुरुस्ती करतात ,घरात स्वयंपाकात मदत करतात, नवीन म्हणून एखादा पदार्थ करणं वेगळं आणि आईला मदत करणं वेगळं. भांडे घासायला मदत करतात का? श्रम प्रतिष्ठा कशी व किती रूजते. मुले घर झाडतात कां,अंगण झाडतात का ? सुट्टीत मुलं काही गोष्टी करतात.ते नेहमीच करतील तरच मूल्यं रुजतील.

आपल्याला वेगळ्या मूल्यमापनाचा विचार करता येईल का? ज्याच्यामुळे विद्यार्थी काही कौशल्य शिकु शकतील, याची नोंद घेता येईल .काही ज्ञान त्यांचे वृद्धिंगत झाले काय याची चाचणी घेता येईल. हे सगळं नवीन करण्याची संधी आहे. एकीकडे स्क्रीन टाईम वर वेबिनार घ्यायचे व त्यांच्या हातात जास्त वेळ स्क्रीन द्यायचा हे बदलायला हवं.

निर्जीव समूह संपर्क साधनातून विद्यार्थ्यांना  शिकावे लागणार.  ऑनलाइन शिक्षण प्रक्रिया एकतर्फी चालेल. ऑफलाईन मध्ये संवादाला जास्त वाव आहे. अनेक द्रोणाचार्य ऑनलाईन उपलब्ध होतील पण  मुलांना ऑफलाइन एकलव्य व्हावं लागेल. मूल्य बदलले की व्यवस्था बदलावी लागते. समान मूल्य अभ्यासक्रमात असतांना मूल्ये समान झिरपली नाहीत,याची जबाबदारी कोणाची? मूल्य झिरपले पाहिजेत,केवळअभ्यासक्रम नाही.

अभ्यासक्रम माहीत आहे पण मूल्यें माहीत नाही अशी आज अवस्था आहे.अभ्यासक्रम केव्हा ही पूर्ण करता येतो. पूर्ण झाला असं लिहिता येतं. मूल्यात्मक बदल होतोच असं नाही. ते होण्याची संधी  आली आहे. शैक्षणिक संदर्भ बदलतील याची कल्पना कोणीही केली  न्हवती. शिक्षणाचे आता दोन प्रवाह झाले आहेत एक ऑनलाईन व दुसरे ऑफलाईन. शिक्षण परिस्थितीजन्य झाले आहे. शिक्षणतज्ञा पासून ते पालक, विद्यार्थ्यां पर्यंत सर्वांनाच परिस्थितीस सामोरे कसे जायचे हा प्रश्न पडला आहे.पुस्तक जेव्हा निरुपयोगी ठरतं, आयुष्यातले प्रश्न सोडायला तेव्हा, मस्तकच कामाला येतं. परिस्तिथी  संधी  बनून आली आहे.आपत्ती मध्ये शिक्षण वरदान ठरू शकतं. प्रत्येक जण आपल्या गतीने, सजग होऊन, स्वअनुभवाने, स्वयंअध्ययनाने शिकणार आहे. ऑनलाईन चे प्रश्न वेगळे व ऑफलाइन चे प्रश्नवेगळे. प्रश्न वेगवेगळ्या पातळीवर वेगवेगळ्या संदर्भात सोडवावे लागतील. आता सरसकट एकच फुटपट्टी शिक्षण क्षेत्राला लागू करता येणार नाही. मूल्यमापनाच्या मापदंड बदलावे लागतील.शिकवण्यापेक्षा शिकणे याला आता महत्त्व प्राप्त झाले आहे. अभ्यासक्रमाचे वर्गीकरण करावे लागेल. काही घटक स्वयंअध्ययनासाठी गृहपाठ सारखे विद्यार्थ्यांना द्यावे लागतील.

आता समंत्रणcouncelling ही मुक्त विद्यापीठातील पद्धत अंमलात आणता येईल. केवळ सगळं शिकवायचे नाही, वाचून शंका निरसन करायचे.तास कमी करून त्या तासांमध्ये आधी मुलांना वाचायला सांगून, नंतर एक दिवस चर्चेचा ठेवता येईल. हुशार ,मध्यम व अभ्यासात कच्ची असणारे विद्यार्थी यांची उत्तरे ऑनलाईन किंवा ऑफलाईन घेता येतील.,आणि त्याच्यावर  चर्चा करता येईल. शिकवायचं नाही.पाठावर चर्चा करायची. मुलांच्या शंकेचे निरसन करायचे.  मुक्त विद्यापीठात सर्व अभ्यासक्रम हा शिकवला जात नाही तर समंत्रणा मार्फत शिकवला जातो.विद्यार्थ्यांनी वाचून तो अभ्यासक्रम पूर्ण केला जातो. त्या दिवसात फक्त चर्चा करायची.

अनेक घरात पुस्तकें काय, खायला भाकरी नाही अशी परिस्थिती आहे. अशा परिस्थितीचाही आपल्याला विचार करावा लागेल. काही बाबींचेअजून  सर्वेक्षण करून पाठबळ मिळाले पाहिजे.  होम लर्निंग साठी चांगली संधी आहे.जिथे शक्य आहे तिथे सुशिक्षित पालकांच उदबोधन अभ्यासक्रमाबाबत ऑनलाईन करता येईल. मग तो मुलाकडून करून घ्यायला सांगा. काही ठिकाणी हे घडतं ते सार्वत्रिक व्हायला हवं. प्रत्येकाचं जगणं हाच अभ्यासक्रम व प्रत्येकाचे अनुभव हेच त्याला उत्तर. अशा रीतीने जिवनानुभावावर आधारित मुलांना व्यक्त होऊ द्या. मुलांच्या कृतीतूनही त्यांचे

मूल्यमापन करावे लागेल,केवळ अभ्यासातून नाही.

मुले काहीच शिकणार नाही त्याचा बाऊ नको.अभ्यासक्रम  शिकणार नाही,पण जीवनानुभव शिकतील तो महत्त्वाचा आहे. कौशल्य शिकतील ती महत्त्वाची आहेत. करोना सुट्टीत मुलांनी केले ते नाविन्याची कास धरणारं आहे पण त्यात सातत्य हवं.  कोणती मूल्यं मुलांमध्ये रुजली हे पाहायला हवं,  व्यवहारात ते दिसायला हवं. तात्पुरती प्रसंगानुरूप एखादी गोष्ट करणं वेगळं व अंगवळणी पडणं,रुजणं वेगळंं. जे जे रूचतं ते रुजतं.

शिक्षकांना,पालकांना,विद्यार्थ्यांना प्रयोग करायला वाव आहे. सृजनात्मक काहीतरी करण्यासाठी वावआहे.प्रत्येकाला आपापल्या पातळीवर जे करायचे आहे ते करू द्या.

अब्राहम लिंकनने मुख्याध्यापकास लिहलेल्या पत्रातल्या प्रमाणे विद्यार्थी घडायला हवेत, केवळ परीक्षेत यशस्वी असणारी मुले नको, जीवनात यशस्वी होणारी हवीत,केवळ पुस्तकी नको.प्रतिज्ञेच्या प्रत्येक वाक्यापुढील प्रश्नचिन्ह काढायचे असेल तर शिक्षणाचा वेगळ्या संदर्भात विचार करावा लागेल.

काहीतरी व सूजनात्मक नक्कीच घडेल,फार काही भयंकर घडणार नाही, पण सुंदर घडेल. थोडं पाठबळ हवं.

शिक्षणाने प्रक्रियेचाच पराभव केला आहे.शिक्षणाची कोंडी करणारे घटक अजून कितीतरी आहेत.शिक्षणाने खरंतर व्यवस्थेची,माणसांची कोंडी केली आहे.अजून कितीतरी महाविद्यालयें नॅक पासून दूर आहेत, स्वयंमूल्यमापन पासून दूर आहेत.विनाअनुदान,कसल्याच सुविधा नसलेल्या शैक्षणिक संस्थांमध्ये अपात्र प्राध्यापकांनी अध्यापन केले याचे उत्तरदायित्व कोणाचे? प्राध्यापकांना आवश्यक असणाऱ्याअंतरराष्ट्रीय जर्नल मध्ये पेपर छापवून आणणाऱ्या यंत्रणा आहेत.अनेक प्रश्नांनी शिक्षण व्यवस्थेला ग्रासलें आहे. आधी अस्तित्व मग शिक्षण असा प्राधान्यक्रम आता ठरवावां लागणार आहे.सामाजिक अंतर ठेवावं लागणार आहे पण अध्यापनाला अंतर देवून चालणार नाही. प्रवेशाचे वय, शिक्षण हक्क कायदा, त्याची अंमलबजावणी न होणें, परीक्षा न घेता पास करणे, पुन्हा परीक्षा घेण्याचा निर्णय, अंतर्गत गुण रद्द करणे, अशा अनेक धरसोड निर्णयाने शिक्षणाची कोंडी झाली आहेच.

आरोग्य व वैज्ञानिक दृष्टिकोन शिक्षणात रूजलाच नाही. तो रूजवण्याची संधी आता आली आहे. आरोग्य हेच आता शिक्षण असणार आहे. अस्तित्व हेच आता शिक्षण राहणार आहे.

अध्ययन अध्यापन प्रक्रिया व मूल्यमापन अडचणीचे होऊन बसले आहे. निर्जीव समूह संपर्क साधनाने एकतर्फी अध्यापन प्रक्रिया होत आहे.

मूल्यमापन करताच येत नाही अशी परिस्थिती आहे. स्वयंम अध्ययन व स्वयंमूल्यमापन यानेच आता व्यक्तिमत्व विकास होणार आहे.

शिक्षणाने परिवर्तन घडलेच नाही.तकलादू शिक्षणामूळे माणसें कोलमडून पडतायेत.

शिक्षणानेच माणसांची कोंडी केली आहे.

शिक्षणाने शिक्षणाची उकल करता येत नाही,अशी परिस्थिती आहे. समृद्ध नसलेली, अनेक प्रश्न असलेली  आपली शिक्षण व्यवस्थाआहे.

समाजाचे वैचारिक दारिद्र्य वाढलेंच आहे.

शिक्षण व्यवस्था कागदांवरच आहे.

शिक्षण प्रक्रियेत एवढे प्रश्न निर्माण झाली आहेत की त्याची उकल करण्यास मनुष्यबळ असमर्थ ठरत आहे.

प्रवेश ते परीक्षा व K.G to P.G.येवढाच शिक्षणाचा प्रवास आहे. शिक्षणाच्या पलीकडे जाऊन विचार केला तरच व्यक्तिमत्व विकास होणार आहे.

बदललेली शिक्षणपद्धती, निरीक्षण, विविध संकल्पनांचे विश्लेषण, स्वहस्ते सांघिक प्रयोग, स्थानिक पातळीवर सृजनात्मक संशोधनात्मक जे घडत आहे त्याची नोंद घेणे.  परीक्षांपलीकडे शिक्षणाला नेण्यासाठी वैचारिक, चिकित्सक, संशोधक आणि निरीक्षणात्मक शिक्षणाची आवश्यकता या गोष्टीच आता शिक्षणाला तारणार आहेत. केवळ शिक्षण पद्धती बदलून चालणार नाही तर शिक्षणाच्या पद्धती बदलाव्या लागतील हे आजचं वास्तव आहे.

— डॉ. अनिल कुलकर्णी.

९४०३८०५१५३

anilkulkarni666@gmail.com

पुणे.

डॉ. अनिल कुलकर्णी
About डॉ. अनिल कुलकर्णी 28 Articles
डॉ. अनिल कुलकर्णी हे पुणे येथे स्थायिक असून ते शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांची ३ पुस्तके प्रकाशित झाली आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..