नवीन लेखन...

‘बूमरँग’ अशनी!

अशनीच्या बाबतीत अभ्यासल्या जाणाऱ्या अनेक घटकांपैकी एक घटक म्हणजे त्याची अंतर्गत रासायनिक रचना. या रासायनिक रचनेवरून अशनीच्या उगमस्थानाबद्दल कल्पना येऊ शकते. एनडब्लूए १३१८८ हा अशनी, ‘दगडी अशनी’ असल्याचं त्याच्या स्वरूपावरून स्पष्टच दिसत होतं. व्हिन्शिआन डिबेले आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जेव्हा या अशनीचं रासायनिक विश्लेषण केलं, तेव्हाही या अशनीत त्यांना मुक्त स्वरूपातील धातूंचा अभाव असल्याचं दिसून आलं. या अशनीतील विविध खनिजांचं स्वरूप, हा अशनी बेसाल्टिक अँडिझाइट या अग्निजन्य प्रकारचा असल्याचं दाखवत होतं. या प्रकारच्या खडकात सिलिकाचं प्रमाण, बेसाल्ट खडकातील सिलिकाच्या प्रमाणापेक्षा काहीसं कमी असतं. ज्वालामुखींद्वारे निर्माण झालेले हे खडक, ज्वालामुखींचं अस्तित्व असलेल्या काही विशिष्ट ठिकाणांच्या परिसरात आढळतात. व्हिन्शिआन डिबेले आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या दगडात असणाऱ्या खनिजांतील ऑक्सिजनच्या विविध समस्थानिकांचं सापेक्ष प्रमाणही जाणून घेतलं. हे प्रमाण पृथ्वीवरच्या ऑक्सिजनमधील विविध समस्थानिकांच्या सापेक्ष प्रमाणाशी जुळत होतं. हे पुरावे, मोरोक्कोत सापडलेला हा अशनी म्हणजे पृथ्वीवरचाच एक दगड असल्याचं दर्शवत होते.

अशनीच्या अभ्यासात समावेश असणारा आणखी एक घटक म्हणजे अशनीचा पृष्ठभाग. पृथ्वीच्या पृष्ठभागाकडे येताना अशनीचं वातावरणातील हवेशी घर्षण होऊन उष्णता निर्माण होते. या उष्णतेमुळे या अशनीचा पृष्ठभाग काही प्रमाणात वितळतो. मोरोक्कोत सापडलेल्या या अशनीसदृश दगडाचा पृष्ठभागही काही प्रमाणात वितळलेला दिसत होता. त्याचबरोबर या अशनीच्या पृष्ठभागावरच्या थरात बेरिलिअम, हिलिअम, न्यूऑन, इत्यादी मूलद्रव्यांचे विशिष्ट समस्थानिक लक्षणीय प्रमाणात अस्तित्वात होते. हे समस्थानिक मुख्यतः अशनी अंतराळात फिरत असताना निर्माण होतात. अशनी हा अंतराळात चहुबाजूनं होणाऱ्या वैश्विक किरणांच्या माऱ्याला तोंड देत असतो. हे वैश्विक किरण म्हणजे सूर्याकडून, विविध अतिनवताऱ्यांकडून किंवा आपल्या आकाशगंगेच्या बाहेरील काही स्रोतांकडून उत्सर्जित होणारे शक्तिशाली विद्युतभारित कण आहेत. वैश्विक किरणांच्या या माऱ्यामुळे अशनीच्या पृष्ठभागाजवळच्या थरात, बेरिलिअम, हेलिअम, न्यूऑन, क्रिप्टॉन यासारख्या मूलद्रव्यांच्या काही विशिष्ट समस्थानिकांची निर्मिती होते. अशनी पृथ्वीवर पोचला, की त्यावरील वैश्विक किरणांच्या माऱ्याची तीव्रता खूपच कमी होते व या समस्थानिकांची निर्मितीही थांबते. साहजिकच, या समस्थानिकांच्या प्रमाणावरून तो अशनी किती काळ अंतराळात फिरत होता हे समजू शकतं. जेव्हा व्हिन्शिआन डिबेले आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी, या अशनीच्या पृष्ठभागाजवळच्या थरातील बेरिलिअम, हिलिअम, न्यूऑन, इत्यादी मूलद्रव्यांच्या समस्थानिकांचं प्रमाण मोजलं, तेव्हा हा अशनी फार तर दहा हजार वर्षं अंतराळात वावरला असल्याचं त्यावरून दिसून आलं. या अशनीची निर्मिती ही अलीकडच्याच काळात झाली असल्याचं, यावरून स्पष्ट होत होतं.

व्हिन्शिआन डिबेले आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आपल्या संशोधनातून काढलेले हे निष्कर्ष बुचकळ्यात टाकणारे होते. हा दगड पृथ्वीवरचाच असल्याचं दिसून येत होतं, आणि त्याचबरोबर हा दगड अंतराळातून आला असल्याचंही दिसतं होतं! या दोन्ही परस्परविरोधी निष्कर्षांवरून एक वेगळीच शक्यता दिसून येते आहे – ती म्हणजे हा अशनी मुळात पृथ्वीवरचाच दगड होता. काही कारणानं तो अंतराळात भिरकावला गेला व अंतराळात फेरफटका मारून काही हजार वर्षांनी योगायोगानं तो पुनः पृथ्वीवर येऊन पोचला. मात्र जर असं असलं, तर हा खडक अंतराळात भिरकावला कसा गेला असावा, हा एक प्रश्न निर्माण होतो. या बाबतीतली पहिली शक्यता म्हणजे हा दगड एखाद्या ज्वालामुखीच्या अतितीव्र उद्रेकादरम्यान अंतराळात फेकला गेला असावा. दुसरी शक्यता म्हणजे हा दगड, पृथ्वीवर आदळलेल्या दुसऱ्या एखाद्या प्रचंड अशनीच्या आघातादरम्यान अंतराळात फेकला गेलेला, पृथ्वीवरचाच एखादा दगड असावा.

निव्वळ ज्वालामुखीच्या उद्रेकातून एखादा दगड पृथ्वीपासून इतका दूरवर फेकला जाणं, हे कठीण दिसतं. कारण हुंगा टोंगा-हुंगा हापाई या बेटांवर २०२२ सालच्या सुरुवातीस झालेल्या ज्वालामुखीच्या प्रचंड उद्रेकात उंच फेकल्या गेलेल्या दगडांनी गाठलेली उंची, हीसुद्धा जास्तीतजास्त ५८ किलोमीटर इतकीच होती. आणि एखाद्या पृथ्वीवरच्या दगडाला अंतराळातला प्रवास करायचा असला, तर त्यासाठी त्यानं यापेक्षाही अधिक उंची गाठायला हवी! ज्वालामुखीच्या इतक्या प्रचंड उद्रेकाची आतापर्यंत तरी कधीच नोंद झालेली नाही. आता जर हा दगड दुसऱ्या एखाद्या अशनीच्या आघातादरम्यान इतक्या दूरवर फेकला गेला असला, तर त्यासाठी निदान एक किलोमीटर आकाराच्या अशनीनं पृथ्वीवर आघात करायला हवा. असा अशनी सुमारे वीस किलोमीटर व्यासाचं विवर निर्माण करू शकतो. सहारा वाळवंटातील या परिसरात, गेल्या दहा हजार वर्षांत इतकं मोठं विवर निर्माण झालेलं आढळत नाही. (इतकं मोठं विवर या परिसरात निर्माण झालं होतं ते, बारा कोटी वर्षांच्याही पूर्वी.) त्यामुळे या एनडब्लूए १३१८८ अशनीचा उगम स्पष्ट नाही. त्यावर अधिक संशोधन होणं गरजेचं आहे.

जर हा दगड खरोखरीच पृथ्वीवरून भिरकावला गेलेला एखादा दगड असला (मग त्यामागचं कारण काहीही असो), तर तो पृथ्वीवर पुनरागमन करणारा पहिलाच ज्ञात दगड किंवा अशनी ठरणार आहे. पृथ्वीवरून भिरकावला गेल्याची शक्यता असणारा एक दगड, १९७१ सालच्या अपोलो १४ या चांद्रमोहिमेतल्या अंतराळवीरांना चंद्रावर सापडला. परंतु पृथ्वीपासून दूर जाऊन पुनः पृथ्वीवर आलेला, असा दुसरा कोणताही अशनी आतापर्यंत सापडलेला नाही. साहजिकच काही संशोधकांनी स्वगृही परतणाऱ्या या अशनीला उपमा दिली आहे ती चक्क बूमरँगची – बूमरँग अशनी!

(छायाचित्र सौजन्य  – Albert Jambon / : Jérôme Gattacceca – CEREGE)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..