नवीन लेखन...

असा छंद असा आनंद : मराठी आडनावांचा संग्रह.

(हा लेख, मी 1974 च्या सुमारास लिहीला. तो, अमृत मासिकाच्या फेब्रुवारी 1975 च्या अंकात प्रसिध्द झाला. या लेखासंबंधी, वाचकांच्या बर्‍याच चांगल्या प्रतिक्रीया आल्या)

कुणाला वडिलोपार्जित इस्टेट भरपूर मिळते तर कुणाला अजिबात मिळत नाही पण आडनावाचा वारसा मात्र, अगदी नको असला तरी मिळतो. आडनाव कसेही असले तरी आपण ते आपल्या नावासमोर मोठ्या अभिमानाने लावतो. पिढ्यान पिढ्या आडनावाचा वारसा चालू राहतो. आनुवंशिकतेचे साधर्म्य दर्शविण्यासाठी आडनावांची प्रथा मुळात रूढ झाली असाव, परंतू कालांतराने या प्रथेचा गैरवापर होऊन बरीचशी विचित्र, विक्षिप्त, लाजिरवाणी आडनावे निर्माण झाली आणि ती पिढ्यान्पिढ्या चालू राहिली. अशा आडनावांची संख्या थोडीच असली तरी, ती धारण करणार्‍या कुटुंबांना खूपच मनस्ताप सहन करावा लागतो हे मात्र निश्चित.इतकी विविध आणि वैचित्र्यपूर्ण मराठी आडनावे कशी प्रचारात आली? रूढ झाला? इतकेच नव्हे तर त्या आडनावांचा वारसा पिढ्यान्पिढ्या कसा चालू राहिला, हा खरोखर सामाजिक संशोधनाचा विषय आहे.

लेखात ज्या ज्या आडनावांचा मी उल्लेख केला आहे ती आडनावे खरोखर प्रचारात आहेत, रूढ झालेली आहेत, म्हणूनच मी ती विचारात घेतली आहेत, कुणाचीही स्तुती, उपहास, हेटाळणी किंवा टिंगलटवाळी करण्याचा माझा उद्देश नाही. वाचकांना माझी नम्र विनंती आहे की त्यांनी कोणत्याही प्रकारचा गैरसमज करून घेऊ नये. मराठी आडनावांसंबंधी, मला जडलेल्या एका आगळ्याच छंदाचा मी आपणास परिचय करून देत आहे. वैशिष्ठ्यपूर्ण, विचित्र, आगळेवेगळे असे एखादे आडनाव, ऐकण्यात किंवा वाचनात आले की ते, अक्षरानुक्रमे कागदावर लिहून ठेऊ लागलो आणि मराठी आडनावांची यादी भराभर वाढत जाऊन बघताबघता तिचे आडनावांच्या संग्रहात, मराठी आडनाव कोशात, केव्हा रूपांतर झाले कळलेही नाही. ह्या संग्रहाचा फार मोठा फायदा असा झाला की, मराठी आडनावांचे अनेक पैलू माझ्या लक्षात आले आणि त्या अनुभवातूनच प्रस्तुत लेख लिहीता आला.वृत्तपत्रे, मासिके, पुस्तके वगैरेत एखादे वैशिष्ठ्यपूर्ण मराठी आडनाव आढळले आणि ते जर, मी केलेल्या कोशात नसले तर, नवीन आडनाव सापडल्याचा मला कोण आनंद होतो म्हणून सांगू ! आडनावे मिळविण्यासाठी पंचांगे, निरनिराळया ज्ञातींच्या याद्या, वृत्तपत्रे, मासिके, मतदारांच्या याद्या, काही संस्थांच्या सभासदांच्या याद्या वगैरेंचा संदर्भ घेतला आहे. माझ्या ओळखीच्या बर्‍याच व्यक्तींनाही ह्या छंदाची लागण झाली आहे. एखाद वैशिष्ठ्यपूर्ण आडनाव आढळले किंवा आठवले की ते ताबडतोब मला सांगतात किंवा अशा बर्‍याच आडनावांची यादी मला देतात.

आतापर्यंत संग्रह केलेली अक्षरानुक्रमाने लिहून ठेवली असल्यामुळे एकच आडनाव, दोनदा लिहिले जात नाही.प्रत्येक व्यक्तीचे, बारशाच्या दिवशी पाळण्यात घालून ठेवलेले असे, एक स्वत:चे नाव असते. बव्हंशी स्त्रियांना लग्नाच्या वेळी आणखी एक नाव ठेवले जाते. म्हणजे लग्नानंतर तिचे आडनाव आणि नावही बदलल्यामुळे तिची लग्नापूर्वीची ओळख म्हणजे आयडेंटिटी पूर्णतया पुसली जाते. आई-वडील, वडिलधारे नातेवाईक किंवा नवरा यांचीच, ही नावाची निवड असते. दुसर्‍या कुणी नावे ठेवलेली आपण अजिबात सहन करीत नाही. पण आई-वडील किंवा नवरा यांनी ठेवलेली नावे मात्र जन्मभर खुशाल खपवून घेतली जातात. आडनावांच्या बाबतीत मात्र कुणाचीच निवड उपयोगी नसते पिढ्यान्पिढ्या आडनाव चालत आलेले असते. पिढयान्पिढया चालत आलेले

आडनाव प्रत्येक कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती आपल्या नावासमोर मोठ्या अभिमानाने जन्मभर लावीत असते.आडनावात वैचित्र्य, विविधता, संस्कृती आणि बरेच काही सामावलेले असते. महाराष्ट्रीय आडनावेही अपवाद नाहीत. कागद-पेन्सिल घेऊन दहा-पंधरा मिनिटात आठवतील तितकी मराठी मातृभाषिकांची आडनावे लिहून काढा, म्हणजे मराठी आडनावातील विविधता तुमच्या चटकन लक्षात येईल. एखाद्या कुटुंबातील व्यक्तिला विचारले की तुमचे आडनाव कसे रूढ झाले किवा केव्हापासून रूढ झाले तर ते त्याला नक्की सांगता येणार नाही किंवा ती व्यक्ति तिच्या आडनावाबद्दल काही आख्यायिका सांगेल. ती ऐकून तुम्हाला अचंबा वाटेल की अतक्या लहानशा व क्षुल्लक बाबीवरून हे आडनाव कसे पडले? म्हणजे रूढ झाले आणि ते पिढ्यान्पिढ्या कसे चालू राहिले?आपण आपल्या नावासमोर आडनाव का लावतो? नाव का लावतो? कारण समाजात, आपण आणि आपले कुटुंब ओळखले जावे. समाजात एखादी व्यक्ति ओळखली जावी. हे घर कुणाचे आहे? हे जर कुणाला सांगायचे असले तर आपण त्या घरमालकाचे वर्णन करीत बसत नाही. अतक्या उंचीच्या माणसाचे, कुरळ्या केसाच्या माणसाचे हे घर आहे वगैरे, तर हे घर अमुक व्यक्तिचे म्हणजे शरद लक्ष्मण कुळकर्णी ह्या गृहस्थाचे आहे. हे नाव उच्चारल्याबरोबर हे कुळकर्णी, ज्या व्यक्तिच्या ओळखीचे आहेत त्यांच्या बरोबर लक्षात येते की ते घर नेमके कुणाचे आहे…. व्यक्तिचे वर्णन करण्याची गरज नसते.एकाच नावाच्या व्यक्ति अनेक असतात. आता मनोहर या नावाच्या अनेक व्यक्ती असतील पण शंकर या नावाच्या व्यक्तिचा मुलगा मनोहर म्हटला की दुसरे अनेक मनोहर बाजूस सारले जातात. पण शंकर या नावाच्याही अनेक व्यक्ती असतील आणि त्यांच्या का ी मुलांचे नावही मनोहर असू शकेल, म्हणूनच कुळाच्या नावाची गरज भासते. ‘टोणगे’ ह्या कुळातील ‘शंकर’ या नावाच्या व्यक्तिचा ‘मनोहर’ नावाचा मुलगा म
हणजे ओळख जवळजवळ पूर्ण होते, अचूक होते, आयडेन्टीफिकेशन पूर्ण होते. पुढे पत्ता लिहीला म्हणजे ओळख आणखी अचूक होते. त्या त्या कुळातील सर्व व्यक्तिचे कुलनाम सामाईक असते म्हणून त्या कुलनामाला श्रेष्ठनाम असे म्हणण्याचा प्रघात पडला. कानडी भाषेत श्रेष्ठ या अर्थी ‘अड्ड’ हा शब्द आहे म्हणून कुळनामाऐवजी ‘अड्डनाम’ हा शब्दप्रयोग रूढ झाला आणि पुढे त्याचे ‘आडनाव’ असे रूपांतर झाले. कुलनाम हा शब्दप्रयोगही चांगला आहे पण तो क्वचितच वापरला जातो. समाजात, आडनावामुळे तो विशिष्ट कुटुंबगट ओळखला जातो.

आडनावामुळे त्या कुटुंबातील व्यक्तीच्या स्वभाव वैशिष्ठ्यांची आणि गुणावगुणांचीही ओळख पटते.आपला समाज हा पुरूषसत्ताक समाज आहे. गेल्या कित्येक शतकापासून प्रत्येक घराण्याच्या अनेक पिढ्यात पुरूषांचीच मक्तेदारी चालू आहे. अपत्याच्या नावासमोर वडिलांचेच नांव लावले पाहिजे आणि वडिलांचेच आडनाव लावले पाहिजे असा दंडक आहे. पित्याचेच गोत्र मुलांना प्राप्त होते. मुलीला विवाहापर्यंत वडिलांचे गोत्र लावतात तर विवाहानंतर पतीचे गोत्र लावतात याचा अनुभव श्राद्धकर्म करतांना सर्वांना येतो. याला भक्कम शास्त्रीय आधार नाही असे मला वाटते.एखाद्या जोडप्याला दोन किंवा तीन मुलीच असल्या तरी ते जोडपे दु:खी असते कारण काय? तर त्यांना वंशाचा दिवा म्हणजे मुलगा नाही. मुलगा नसला तर वंश खुंटला असे मानतात पण, मुलीला मात्र वंशाची पणती मानायला कुणी तयार नसतात. हे कितपत रास्त आहे?विवाहानंतर मुलगी, सासरी म्हणजे नवर्‍याच्या घ री नांदायला जाते. ही प्रथा आपल्याच देशात नव्हे तर सार्‍या जगातील देशात आणि धर्मात आहे. तिला नवर्‍याचेच आडनाव आपल्या नावासमोर लावावे लागते. महिलांवरील अन्यायांची आणि अत्याचारांची सुरूवात येथूनच होते. नवरा जर बायकोच्या घरी नांदायला गेला आणि त्याने बायकोचे आडनाव आपल्ा नावासमोर लावले तर कदाचित फरक पडेल असे वाटते. हुंडाबळींची आणि छळीत सुनांची संख्या बरीच घटेल.

आनुवंशिकता

विज्ञानीयदृष्ट्या आता अगदी निर्विवादपणे सिद्ध झाले आहे की, आनुवंशिक गुणधर्म हे अपत्य पिढ्यांमध्ये, गुणसूत्रांमुळे म्हणजे क्रोमोझोम्समुळे येतात. क्रोमोझोम्सवर जनुके आणि डीएनएचे रेणू असतात. सर्वच सजीव प्रजातींच्या बाबतीत हे खरे आहे. ते अपत्य मुलगा असो की मुलगी असो, अर्धी गुणसूत्रे, म्हणजे 23 गुणसूत्रे (गुणसूत्रांना रंगसूत्रे असेही म्हणतात पण ते, चुकीचे आहे ) वडिलांकडून व अर्धी गुणसूत्रे, म्हणजे 23 गुणसूत्रे आईकडून आलेली असतात. म्हणजेच अपत्यावर पितृवंशाचा जेव्हढा अधिकार असतो तेव्हढाच मातृवंशाचाही असतो हे ओघाने आलेच.आपल्या पूर्वजांनी, अनेक मातापित्याचे स्वभाव, सवयी, रंगरूप, डोळ्यांचा आणि केसांचा रंग, चेहर्‍याची ठेवण, आवाज, बुद्धी, संगीताचे ज्ञान, कला, दमा, मधुमेहासारखे रोग वगैरे आणि त्यांच्या अपत्यांच्या याच गुणावगुणांचा अभ्यास करून नोंदी ठेवल्या असाव्यात. या निरीक्षणांवरून कदाचित त्यांना असे आढळले असावे की पित्याकडून आलेली आनुवंशिकता जास्त प्रमाणात असते म्हणून पित्याचे आडनावच अपत्यांना लावण्याची प्रथा पडली असावी.गोत्रांच्या बाबतीतही असाच प्रकार घडला असावा. बर्‍याच प्रमाणात सारखे आनुवंशिक गुणावगुण असलेल्या कुटुंबांचे त्यांनी काही गट निर्माण केले आणि त्यांना ऋषि ची नावे देऊन गोत्रांची संकल्पना रूढ केली असावी. काश्यप, गौतम, वशिष्ठ, जमदग्नी वगैरे गोत्रे असलेली कुटुंबे त्या त्या ऋषिंचे वंशज आहेत असे नाही. या ऋषिमुनींनाही आईवडील होतेच. जनुक नकाशामुळे या संकल्पनांवर प्रकाश पडण्यासारखा आहे.स्वत: पुरूष व्यक्ती, तिचे आई-वडील, आजी-आजोबा आणि त्यांच्या पूर्वपिढ्या, तसेच त्या पुरूष व्यक्तीची पुरूष अपत्ये, नाू-पणतू वगैरे पुढील पिढ्या, या सर्वांचा एक कुटुंब गट, आनुवंशिक दृष्ट्या ओळखण्यासाठी कुलनाम या संकल्पनेचा उदय आणि विकास झाला. या गटातील सर्व संबंधित स्त्रियांनाही सरसकट तेच आडनाव धारण करावे लागते. वास्तविक या स्त्रिया वेगवेगळ्या आडनावांच्या कुटुंबात जन्मल्या होत्या. ‘जात’ म्हणजेच आनुवंशिकता असे समीकरण असल्यामुळे, आडनाव म्हणजेही जात असे समीकरण झाले. आता आपल्या लक्षात येईल की, आनुवंशिकतेचे साधर्म्य दर्शविण्यासाठी आडनावांची प्रथा मुळात रूढ झाली, परंतू कालांतराने या प्रथेचा गैरवापर होऊन विचित्र आडनावे निर्माण झाली आणि ती पिढ्यान्पिढ्या चालू राहिली. कुलनाम वापरण्याची प्रथा जरी जुनी असली तरी तिचा वापर फारसा होत नसे. इंग्रजांच्या राजवटीपासून मात्र आडनाव वापरण्याची प्रथा रूढ झाली आणि आता आडनांव नसलेली व्यक्ती जवळजवळ दुर्मीळच आहे.

गमतीजमती

आमच्यात ‘खरे’ आहेत तसे ‘खोटे’ ही आहेत. ‘गोरे’ आहेत तसेच काळे, सावळे, हिरवे, पिवळे, निळे, जांभळे, भुरे, करडे, शेंदरे आणि तांबडेही आहेत. शेवटी सगळ्या रंगांचे मिश्रण म्हणजे पांढरे, पांढरकर आणि पांढरकवडे ही आडनावे देखील आहेत. लहाने आहेत त्यांना लांबट आणि लांबे विरोध करतात. दांगट आहेत तसेच लुकडे आणि लुळे आहेत. प्रचंडांच्या बाजूला टिल्लूही असतात. लुगडे आणि धोत्रे ही देखील आडनावे आहेत. सदरे, गोटे, परकुटे, उघडे आणि दिगंबरे देखील आहेत. उखळे-मुसळे, चिमणे-कावळे, लांडगे-कोल्हे, उन्हाळे-हिवाळे, कडू-गोड, गाढवे-शहाणे, ढेकणे-चिलटे अशाही जोड्या आढळतात.निसर्गात आढळणारे प्राणी तर आम्हाला इतके प्रिय आहेत की त्यांच्याशी आडनावरूपाने आम्ही पिढ्यान्पिढ्या संबंध ठेवला आहे. वाघ, अस्वले, कोल्हे, लांडगे, जिराफे, काळवीट, गेंडे, मगर ही आडनावे वन्य प्राण्यांशी; तर गाढवे, घोडे, ढेकणे, मुंगी, चिलटे, कुत्रे, कुत्रेकर, मांजरेकर, डुकरे, इंगळे, एडके, बकरे, गायधनी, गायतोंडे, ढोरे वगैरे आडनावे माणूस वस्तीतल्या प्राण्यांशी सख्य दर्शवितात. वाघमारे, वाघडोळे, वाघमोडे आणि वाघचोरे देखील आहेत. आता वाघ ही काय चोरायची वस्तू आहे. पण आडनाव रूढ होण्याइतके वाघचौर्य त्यांच्या पूर्वजांनी करून दाखविलेले दिसते. वाघमारे सारखेच ढोरमारे आणि माणूसमारे देखील आहेत. चिमणे, कावळे, कोकीळ, गरूड, घारे, मोरे, साळुंके ही आडनावे आमचे पक्षीप्रेम दर्शवितात. आवळे, आळवे, आंबे, एरंडे, कणसे, फणसे, काकडे, कारले, कांदेकर, कोथमिरे, खारके, खोबरे, नारळे, गवारे, जांभळे, भोपळे, मुळे, भेंडे, दोडके, पडोळे, पडवळ ही आडनावे फळे आणि भाज्या तर; खराटे, दगडे, कुदळे, पावडे, कुर्‍हाडे, गोटे, कुयरे, कुलपे, खुंटे, घागरे, उगळे, मुसळे, पाटे, चाके, पलंगे, पतंगे वगैरे आडनावे नित्याच्या वस्तूंशी निगडीत आहेत.हिरे, माणके, सोने, चांदे, तांबे, पितळे, जस्ते, कथले ही रत्ने आणि धातू तर डोळे, डोके, काने, हाते, माने, पोटे, पाठे, कपाळे, मांडे, गुडघे, नाके, दाते, दाढे, सुळे, हिरडे वगैरे शारीरिक अवयव देखील आडनावरूपाने वावरतात.डोईफोडे, पाठराबे, पोटदुखे, कानपिळे, कानतोडे, कानफाटे, कानतुटे, बहिरे, आंधळे, वाकडमाने, लंगडे, लुळे, थिटे, एकबोटे, अक्करबोटे अशी आडनावेदेखील प्रचारात असून ती आम्ही स्वीकारली आहेत.काही आडनावे तर फारच भव्य व पल्लेदार आहेत. उदा. प्रचंड, अचाट, अजिंक्य, अपराजित, अयाचित, सहस्त्रबुध्दे, सहस्त्रभोजने, हजारे, लाखे, सवालाखे, कोटे, करोडे, कुबेर वगैरे.स्वभाव वैशिष्ठ्यावरूनही कित्येक आडनावे रूढ झाली आहेत. आगलावे, आडमुठे, आळशी, बोंबले, कंटक, कलंके, उदार, उदास, उकिडवे, चतुर, शहाणे, गोडबोले, थोरबोले, वगैरे शरीराच्या गुणावगुणावरूनही कित्येक आडनावे रूढ झाली आहेत. पिसाट, बहिरट, बोबडे, पाचपोर, पाचपुते, अष्टपुत्रे, सातपुते, बारपुते, दशपुत्रे, चारभाई, पाचभाई, सातभाई, बारभाई तेरभाई, वगैरे मंडळी आडनावांप्रमाणे खरोखरच वागलीत तर लाल त्रिकोणाची वाट लागलीच म्हणून समजा.पुणेकर, नगरकर, धुळेकर, नाशिककर अशी प्रत्येक गावाला किंवा खेडयाला ‘कर’ जोडून तर हजारो आडनावे रूढ झाली आहेत.कुळकर्णी, देशपांडे, पांडे, पाटील, देशमुख, सोनार, सुतार, लोहार, तेली या आडनावांसंबंधी वेगळे लिहायची गरज भासत नाही.कोकणस्थांची आडनावे त्या मानाने बरीच मर्यादित आहेत. फडके, बापट, अभ्यंकर, दामले, दांडेकर, आपटे, गाशे, भिडे, गोगटे, लेले, नेने, पटवर्धन, पेठे, पेंडसे, पोंक्षे, मराठे, साने, सोमण, दाते, गाडगीळ, कर्वे, बर्वे, खरे, गोखले, टिळक, केतकर, बेडेकर, थत्ते, मुळे, लागू अशी बारा म्हणांची आडनावे वाढत वाढत एकूण साठ आडनावे झाल्यानंतर साठावे आडनाव साठे झाले असा समज आहे. कोकणस्थांची निवासदर्शक आडनावेही बरीच आहेत. उदा. आगरकर, पाटणकर, नानिवडेकर वगैरे.सीकेपी कुटुंबातही मोजकीच आडनावे असतात. राजे, प्रधान, गुप्ते, मथुरे, फणसे, दळवी, जयवंत, सुळे वगैरे.

परंतू बंदसोडे, होनमोडे, बारसोडे, तूपसमुद्रे, तक, फळ, गदो, भातलवंडे, तरकसबंध, भूत, भुते, ब्रम्हराक्षस, रावण, हडळ, हगवणे, हगरे, चाटुफळे, पिसाट, घरबुडवे, भानचोद, झवकिरे, लवडे, माणूसमारे, ढोरमारे, चणेचोर, पगारचोर, दाढी यासारखी आडनावे देखील कशी प्रचारात आली हे खरोखर गूढच आहे.आडनावांच्या बाबतीत अनेक विनोदी किस्सेही आहेत. उदा. पिसाटांचा मुलगा घरबुडव्यांची मुलगी आणि हा विवाह जुळविणारे मध्यस्थ जर आगलावे असतील तर त्या संसाराची काय अवस्था होईल ह्याची कल्पनाच केलेली बरी !!

वाचकांना एक नम्र विनंती करावीशी वाटते की केवळ उदाहरणे म्हणून वेगवेगळ्या आडनावांचे उल्लेख या लेखात केले आहेत. त्यात ही आडनावे धारण करणार्‍या कुटुंबांची हेटाळणी करण्याचा मुळीच उद्देश नाही ही बाब कृपया लक्षात घ्यावी.गरजइतकी विविध आणि वैचित्र्यपूर्ण आडनावे कशी प्रचारात आली, रूढ झाली, अतकेच नव्हे तर त्या आडनावांचा वारसा पिढ्यान्पिढ्या कसा चालू राहिला, हा खरोखर संशोधनाचा विषय आहे आणि त्याच दिशेने मी पाऊल उचलले आहे.ष्अीडन्नीव्ीीच्ीी ख्ी**ै*ँभ्ीीख्ी*डून्न श्व्ीीीख्ी*ीव्ष् झ् ष्*

कोणतेही आडनाव रूढ होण्यासाठी कुटुंबातील व्यक्तींनी प्रथम ते स्वीकारले पाहिजे. जोशी, पाटील, कुलकर्णी, पांडे, देशपांडे, देशमुख किंवा सोनार, सुतार, वैद्य अशी व्यवसायावरून पडलेली आडनावे किंवा नागपूरकर, पुणेकर, नाशिककर यासारखी त्या गावी निवास दर्शविणारी आडनावे कुटुंबातील व्यक्तींनी स्वीकारणे फारसे कठीण नाही हे आपण समजू शकतो. तसेच धैर्यवान, अजिंक्य, अपराजित, सहस्त्रबुद्धे, बुद्धीसागर, ज्ञानसागर, महाबळ, महाजन, कोटीभास्कर अशी सद्गुणदर्शक आडनावेही स्वीकारणे फारसे कठीण नाही. परंतू गाढवे, ढेकणे, चिलटे, कुत्रे, घोडे, आळशी, बाहिरट, पिसाट, चिकटे, आगलावे, मुसळे, कानफाटे, एकबोटे, बारशिंगे, पोटदुखे, नवरे, ननवरे, डोईफोडे, बोंबले, चणेचोर, चाटुफळे, दीडमिशे यासारखी आडनावे कुटुंबातील व्यक्तींनी स्वीकारली, पिढ्यान्पिढ्या आपल्या नावासमोर लावली, यामागे काहीतरी प्रबळ कारण असले पाहिजे किंवा समाजाने बळजबरीने ही आडनावे त्या कुटुंबावर लादली असावीत आणि काही पिढ्यांतर ही आडनावे नाईलाजाने पचविली गेली असावीत.काही आडनावे तर इतकी अश्लिल आहेत की ती उच्चारणे म्हणजे देखील असभ्यपणाचे ठरेल. ही अश्लिल आडनावे कशी रूढ झालीत ह्याची कारणे शोधायला हवीत. वरवर विचार करता असे वाटते की, ज्या काळात ही आडनावे रूढ झालीत त्या काळात त्या शब्दांना वेळा अर्थ असला पाहिजे आणि कालांतराने आजचा अश्लिल अर्थ प्राप्त झाला असला पाहिजे. दुसरेही एक कारण असू शकते. परप्रांतीय भाषेतील शब्दावरून ही आडनावे रूढ झाली असावीत आणि ह्या परप्रांतीय भाषांत त्या शब्दांना वेगळा आणि चांगला अर्थ असला पाहिजे.एकच आडनाव वेगवेगळ्या कुटुंबांना वेगवेगळ्या करणांनी रूढ झाले असण्याचीी शक्यता नाकारता येत नाही.

आतापर्यंत संग्रहीत केलेली आडनावे मी अक्षरानुक्रमाने लिहून ठेवली आहेत. अक्षरांच्या क्रमातदेखील मी किंचित वेगळी पद्धत वापरली आहे. अ, आ, अ, ई तसेच क, का, कि, की असा नेहमीप्रमाणे क्रम घेतला आहे. अनुस्वारित आद्याक्षर अनुस्वार नसलेल्या अक्षरानंतर घेतले आहे. उदा. अंकलवार हे आडनाव अक्षेगिरीकर ह्या आडनावानंतर घेतले आहे. कंक हे आडनाव कळुस्कर या आडनावानंतर घेतले आहे. आद्यजोडाक्षर अर्धोच्चारित अक्षराच्या क्रमाने आणि पूर्णाक्षराच्या आधी घेतले आहे. उदा. ‘म्ह’ हे ‘म’ ह्या आद्याक्षराच्या आधी घेतलेले आहे. म्ह म्हा म्ह म्ही असा क्रम नंतर पाळला आहे. उदा. म्हाडदळकर हे आडनाव म्हशाळकर या आडनावानंतर, पण मकाशीर ह्या आडनावाच्या आधी घेतलेले आहे. तसेच ‘त्राडे’ हे आडनाव ‘ताईकर’ ह्या आडनावाच्या आधी घेतलेले आहे. टीप : आता अर्धाक्षर हे पूर्णाक्षरानंतर घेतले आहे.आद्याक्षरे आणि सध्याच्या घटकेला संग्रही असलेल्या आडनावांची संख्या यांचे नातेही ढोबळमानाने माझ्या निदर्शनास आले आहे. ‘छ’ पासून सुरू होणारी छत्रे, छपरे, छबुगावकर, छापखाने छापवाले आणि छापेकर अशी फक्त सहाच आडनावे संग्रही आहेत. तसेच ज्ञ पासूनची ज्ञाते, ज्ञानमोटे, ज्ञानसागर आणि ज्ञानी अशी फक्त चारच आडनावे माझ्या संग्रही आहेत. अ, क, प, म, स ह्यांच्या बाराखडयातील अक्षरापासून सुरूवात झालेली आडनावे संख्येने खुप नाहीत. तर झ, ठ, थ, य आणि क्ष ह्यांच्या बाराखडयातील अक्षरापासून सुरूवात झालेली एकूण आडनावे प्रत्येकी 50 पेक्षाही कमी आहेत.एखादे आडनाव मराठी आहे किंवा नाही हे समजण्यासाठी वेगवेगळया कसोटया लावाव्या लागतात. व्यक्तीचे आणि तिच्या वडिलांचे नाव उपलब्ध झाल ्यास फार उपयोग होतो. उदा. राजपूत हे आडनाव मराठी नाही असा प्रथमदर्शनी समज होतो पण देवराव बळीराम रजपूत आणि नामदेव कृ आणि क्षत्रिय ही मराठी आडनावे नक्की आहेत, असे समजायला काय हरकत आहे? आदनवाले, वाडिया, मुश्रीफ, तबीब, मुन्शी, व्यास, डुबे ही मराठी मंडळी आहेत.काही वैशिष्टयपूर्ण आडनावे कशी रूढ झाली याचा अतिहास जाणणे फार महत्त्वाचे ठरणार आहे. आज जी आडनावे प्रचलित आहेत, त्यापैकी बरीच आडनावे बदललेली असण्याची आणि भविष्यात बदलली जाण्याची शक्यता आहे.गाढवे कुटुंबातील एखादा मुलगा अतिशय बुद्धिमान निघाला आणि त्याने आपले आडनाव सहस्त्रबुद्धे असे बदलवून घेतले किंवा कारकून ह्या आडनावाचा मुलगा स्वकर्तुत्त्वामुळे मोठया अधिकाराची जागा भूषविता झाला आणि त्याने आपले आडनाव अधिकारी असे बदलवून घेतले तर त्यात काहीही वावगे नाही. ‘ढेकणेचे’ चे ‘देखणे’ आणि बोंबलेचे महाशब्दे झाले असे ऐकिवात आहे. म्हणून सध्या प्रचलित असलेल्या मराठी आडनावांची जंत्री भविष्यकाळातील संशोधकांना उपलब्ध व्हावी हा आडनावकोश करण्यामागचा माझा हेतू आहे. अशा प्रकारचा आडनावकोश किंवा जंत्री उपलब्ध नाही किंवा उपलब्ध असल्याचे ऐकिवात नाही. कोण्या जाणकाराने जर मला ह्यासंबंधी माहिती दिली तर मी त्यांचा अत्यंत आभारी होईन.प्रसारमाध्यमात मधूनमधून बन्याच व्यक्तींचे आडनावांसंबंधी लेख येतात. त्यावरून अस दिसते की मराठी आडनावांच्या याद्या बर्‍याच व्यक्तींनी केल्या असून त्यांनी आडनावांच्या गमतीजमतीसंबंधी लिहीले आहे.डॉ. केतकरांच्या ज्ञानकोशात आडनावांच्या उपपत्तींची थोडी माहिती दिली आहे आणि पंडित महादेवशास्त्री जोशी ह्यांनी भारतीय संस्कृती मंडळासाठी संपादित केलेल्या ‘भारतीय संस्कृतीकोशा’त आडनावासंबंधी, ज्ञानकोशात दिलेली माहितीच थोडया-अधिक फरकाने दिलेली आहे. परंतु मराठी मातृभाषिकांच्या आडनावांची संपूर्ण जंत्री कुठेही उपलब्ध नसावी असे वाटते. निर्दोष स्वरूपात आडनावांची संपूर्ण यादी संपूर्ण जंत्री म्हणजेच मराठी मातृभाषिकांच्या आडनावांचा कोश तयार करण्याचे काम फार जिकीरीचे आणि मोठे आहे प्रत्येक आडनावाचा खरा इतिहास किंवा उपपत्ती जाणून घेणे तर त्याहूनही कठीण आहे.

गजानन वामनाचार्य,
180/4931, पंतनगर, घाटकोपर (पूर्व), मुंबई – 400075.
फोन – 9819341841, 022-25012897.

 

गजानन वामनाचार्य
About गजानन वामनाचार्य 85 Articles
भाभा अणुसंशोधन केन्द्र, (BARC) मुंबई येथील किरणोत्सारी अेकस्थ आणि किरणोत्सारी तंत्रज्ञान विभागातून निवृत्त वैज्ञानिक. मराठीसृष्टीवरील नियमित लेखक. सेवानिवृत्तीनंतर त्यांनी मराठी विज्ञान परिषदेच्या कामात स्वारस्य घेतले. मविप च्या पत्रिका या मुखपत्राच्या संपादक मंढळावर त्यांनी १६ वर्षं काम केलं. ७५,००० हून जास्त मराठी आडनावांचा संग्रह त्यांच्याकडे आहे. आडनावांच्या नवलकथा यावर त्यांनी अनेक लेख लिहीले आहेत. बाळ गोजिरे नाव साजिरे हे मुलामुलींची सुमारे १६५०० नावं असलेलं पुस्तक त्यांनी २००१ साली प्रकाशित केलं आहे.
Contact: Website

3 Comments on असा छंद असा आनंद : मराठी आडनावांचा संग्रह.

  1. धन्यवाद. माझा फोन 9819341841
    मी मराठी सरनेमस् ग्रुप निर्माण करीत आहे. सभासद अवश्य व्हावं आणि जास्तीत जास्त सभासद करावे ही नम्र विनंती.

  2. नमस्कार,
    आपला आड नावांचा संग्रह मला आवडला..मलाही हा छंद आहे पण थोडा वेगळ्या अर्थाने मी याचा अभ्यास करतोय..मला आपल्याशी या संदर्भात चर्चा करायला खूप आवडेल..!!

    • हापण / हापन
      जयव़त रामचंद्र हापन – कासार
      या आडनावाची उत्पत्ती , संदर्भ मिळाल्यास खूप आनंद वाटेल .
      आपला उपक्रम समाजोपयोगी व अतिशय मौल्यवान आहे . अभिनंदन व शुभेच्छा .

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..