आजकाल खळखळून हसणे आढळत नाही. सभ्यतेच्या कृत्रिम बुरख्यामुळे माणसाची झोप आणि चैन हरवून गेली आहे. स्वतःला अतिव्यस्त केल्यामुळे त्याच्याजवळ कोणत्याही कामासाठी वेळ नाही. चुकून जर कधी वेळ मिळालाच तर ताण-तणाव चिंता-विवंचनेतच तो खर्च होतो. माणूस आपल्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी तसेच जीवनातील सुख-शांतीसाठी वेगवेगळ्या बाह्य साधनांची गर्दी करीत आहे, पण तो समाधानाला पारखा झालेला आहे. उलट त्याला असफलताजन्य असंतोषाला तोंड द्यावे लागत आहे.
मानवी स्वभावतज्ज्ञांचे असे म्हणणे आहे की, समस्येची शाश्वत उकल तेव्हाच शक्य आहे जेव्हा मनुष्य तणावमुक्त होईल. हे कोणत्याही औषधाने शक्य होणार नाही. यावर फक्त एकच उपाय आहे, तो म्हणजे खळखळून हसणे व स्मित हास्याचा उपभोग घेणे. निखळ हास्याच्या बहुआयामी परिणामांवर आणि त्याच्या उपयुक्ततेवर वैज्ञानिकांनी पुष्कळ संशोधन केले आहे. याच संशोधनाचा निष्कर्ष हा आहे की, हास्यासारखे दुसरे कोणतेही प्रभावशाली औषध नाही. या गोष्टीला आजच्या शास्त्रज्ञांबरोबरच प्राचीन ऋषी-मुनीदेखील स्वीकृती देतात. आयुर्वेदाच्या प्रवर्तक महर्षीनी हास्याला विशेष लाभकारक म्हटले आहे. त्यांच्या मते हास्यामुळे रक्तवाहिन्यात रक्ताभिसरण जलद होते, चेहऱ्याची कांती उजळते. शारीरिक संतुलन योग्य राहते. अॅसिडिटीचे मूळ कारण असलेल्या पित्ताचे शमन होते. हास्यामुळे आम्लपित्तरोग आपोआप बरा होतो. आज ६० टक्के रोगांचे कारण तणाव आहे. उच्च रक्तदाब, डोकेदुखी, पेप्टिक अल्सर, हृदयरोग, मस्तकशूळ, माईग्रेन, अर्धशिशी इ. रोगांचे कारण मानसिक तणाव व पित्ताचे अधिक्य असून ते हास्यामुळे नष्ट होते.
जोरात हसण्याने छातीत एकामागून एक धक्के लागतात. प्रत्येक धक्क्याला बरोबर शिरांमधील रक्त हृदयापर्यंत पोहोचण्यासाठी अनेक ठिकाणी थांबते. म्हणूनच खूप वेळ हसणाऱ्याचा चेहरा लालसर होतो. हास्यप्रक्रिया चालू असताना जी श्वासोच्छावास क्रिया होते त्यायोगे फुफ्फुसातून दूषित हवा बाहेर अधिक प्रमाणात टाकली जाते. चिकित्सकांच्या मते हसणे हा एक उत्तम व्यायाम आहे. दररोज चार-पाच किलोमीटर धावण्याने जो व्यायाम घडतो आणि शारीरिक क्षमता वाढते तितकीच हास्यानेदेखील वाढते. हास्यामुळे स्नायूंना आपोआप व्यायाम घडून शारीरिक- मानसिक ताणतणाव नष्ट होतात.
– पं. श्रीराम शर्मा आचार्य
Leave a Reply