नवीन लेखन...

दोन वेळा विंबल्डन जिंकणारी पहिली ‘काळी’ टेनिसपटू आलथिआ गिब्सन

दोन वेळा विंबल्डन जिंकणारी पहिली ‘काळी’ टेनिसपटू

टेनिसक्षेत्रात जागतिक पातळीवर गेली काही वर्षे सेरेना आणि व्हिनस विल्यम्स या काळ्या (किंवा निग्रो) बहिणी अनभिषिक्त सम्राज्ञी म्हणून वावरत आहेत. त्यांची नावे, त्यांचा खेळ, त्यांची चपळाई, त्यांचे टेनिसच्या खेळातील वादातीत प्रभुत्व आणि जागतिक पातळीवरील कोणत्याही स्पर्धे तील त्यांचे अढळ-अजिंक्यपद, या सर्वांची आपल्याला आता सवयच झालेली आहे. काळ्या असून त्यांना गोऱ्यांबरोबर कसे खेळता येते? किंवा गोऱ्यांच्या देशाचे प्रतिनिधित्व कसे करता येते? हे प्रश्न आज आपल्या मनातही येऊ शकत नाहीत! परंतु १९५० पर्यंत काळ्या स्त्रीलाच काय पुरुषालाही विंबल्डन स्पर्धेत ते काळे आहेत वा निग्रो आहेत म्हणून प्रवेशच नव्हता, हे आज सांगूनही खरे वाटत नाही.

टेनिसच्या क्षेत्रातील फॉरेस्ट हिल्स आणि विंबल्डन स्पर्धांचा मार्ग १९५० साली आलथिआ गिब्सन या काळ्या स्त्रीने आपल्या गुणांनी मोकळा केला. १९५७ आणि १९५८ या दोन लागोपाठच्या वर्षी विंबल्डनच्या स्पर्धेत अजिंक्यपद मिळवून तिने टेनिसच्या क्षेत्रातील वर्णभेद पार पुसून टाकला. फॉरेस्ट हिल्स व विंबल्डनमध्ये आलथिआमुळेच केवळ काळ्या महिलांनाच नव्हे, तर काळ्या पुरुषांनाही टेनिस खेळण्यास प्रवेश मिळाला. अशाप्रकारे काळ्यांवरची बंदी नष्ट करण्याचे ऐतिहासिक कार्य आलथिआने केले आहे. तिचे कार्य हे केवळ ऐतिहासिकच नव्हे तर क्रांतीकारकही ठरले आहे.

आलथिआपूर्वी काळी ओरा वॉशिंग्टन ही १९२० आणि १९३० च्या त टेनिसक्षेत्रात गाजली होती. अमेरिकन टेनिस असोसिएशनवर तिचे प्रभुत्व होते. कारण सातत्याने तिने लागोपाठ बारा वेळा अजिंक्यपद मिळविले होते. तरीही जेव्हा ओरा वॉशिंग्टनने हेलन विल्स या गोऱ्या टेनिसपटूला खेळण्यासाठी आव्हान दिले तेव्हा हेलनने ओरा हिच्याशी खेळण्यासच नकार दिला होता. इतकेच काय, ओरा वॉशिंग्टनला दर्जेदार स्पर्धांत खेळण्यासही परवानगी दिली गेली नव्हती. आज जर ओरा असती तर कदाचित ती जागतिक पातळीवर अजिंक्यपदही मिळविणारी ठरली असती. कुणी सांगावे काय घडले असते! परंतु जरतरला काय महत्त्व आहे? महिमा असतो काळाचा आणि एखाद्याच्या नशिबाचाही!

१९५० पूर्वी ओरा वॉशिंग्टन आणि अलिस मार्बल यांच्यासारख्या काळ्या टेनिसपटूंना फक्त काळ्यांसाठीच असलेल्या एटीए म्हणजे अमेरिकन टेनिस असोसिएशनच्या स्पर्धांत सहभागी होता येत होते. त्या स्पर्धा या तशा मान्यताप्राप्त असल्या तरी फॉरेस्ट हिल्स आणि विंबल्डन स्पर्धांपेक्षा कमी प्रतीच्या मानल्या जात असत. स्पर्धांतील हा काळा-गोरा भेद त्यावेळी फारसा कुणाला खटकत नसावा किंवा दबाव आणून तो बदलावा, असे आलथिआ गिब्सनचा टेनिसक्षेत्रात प्रवेश होईपर्यंत कुणाला कधी वाटलेही नसावे!

आलथिआ गिब्सन ही टेनिसक्षेत्रात आली आणि प्रश्न निर्माण झाले. ‘एटीए’च्या स्पर्धांतून खेळताना नेटजवळील तिचा हार न घेणारा खेळ आणि अचूक वेगवान उसळती अशी तिची सर्व्हिस करण्याची पद्धत पाहून आलथिआ ही श्रेष्ठ दर्जाच्या टेनिस स्पर्धा खेळण्यासाठीच जन्माला आलेली खेळाडू आहे, असे सर्वांनाच जाणवत होते. तिच्या चाहत्यांना आणि तिच्या स्पर्धांच्या संयोजकांना विशेषत्वाने ही जाणीव पुनः पुन्हा होत होती. ॲलथिआ ही श्रेष्ठ खेळाडू आहे, याची त्यांना खात्रीच वाटत होती. तिचे श्रेष्ठत्व हे रंगाचा काळा – गोरा हा भेद न करता लक्षात घेतले गेले पाहिजे, असेच सर्वांना वाटत होते. सर्वसामान्य टेनिसप्रेमींना आणि जाणकारांनाही असे वाटत होते, याचे कारण आलथिआने सतत एक वा दोन वर्षे नव्हे, तर दहा वर्षे लागोपाठ एटीएच्या स्पर्धेतील अजिंक्यपद मिळविले होते.

आलथिआ गिब्सन सर्वश्रेष्ठ मानल्या जाणाऱ्या टेनिस स्पर्धांत भाग घेण्यास तयारच होती. तिच्या व्यक्तिमत्त्वातील ‘तारका’ पण फक्त गोऱ्यांच्याच स्पर्धा संयोजित करणाऱ्या संयोजकांनाही हळूहळू अस्वस्थ करीत होते. फॉरेस्ट हिल्स आणि विंबल्डन स्पर्धेसाठी आलथिआ गिब्सनला का निमंत्रित करू नये असा प्रश्न त्यांना सतावू लागला. काहीतरी थातुरमातुर कारणे देऊन ती मंडळी त्यांना सतावणारा प्रश्न दूर ठेवीत होती.

अखेर शेवटी सुप्रसिद्ध टेनिसपटू अलिस मार्बल हिला आलथिआची बाजू घेऊन स्पष्टपणे बोलणे भाग पडले. अलिस मार्बलने टेनिस स्पर्धा संयोजकांची वस्त्रे उतरवणारा शेरा देत म्हटले, आलथिआ गिब्सन हिच्या टेनिस नैपुण्याचे मोजमाप गुणवत्तेच्या फूटपट्टीने केले जात नसून तिच्या शरीराचा रंग वेगळा आहे या विचाराच्या फूटपट्टीने केले जात आहे! अलिस मार्बलचा घाव अखेरचा म्हणून टेनिस संयोजकांच्या वर्मी बसला. आलथिआला फॉरेस्ट हिल्स स्पर्धेसाठी १९५० साली आणि १९५१ साली विंबल्डन स्पर्धेसाठी निमंत्रित करण्यात आले.

१९५७ हे वर्ष आलथिआच्या आयुष्यातील सुवर्णवर्ष होते. विंबल्डन आणि फॉरेस्ट हिल्स या दोन्ही स्पर्धांत त्या वर्षी आलथिआने एकेरीतील अजिंक्यपद मिळविले होते. विंबल्डनच्या अजिंक्यपदामुळे न्यूयॉर्क शहरात आलथिआचे स्वागत टिकर-टेप परेड ने झाले. टिकर-टेप परेड म्हणजे अत्यंत श्रेष्ठ प्रतीचे यश मिळविणाऱ्या व्यक्तीचे स्वागत रंगीत कागदांच्या चिपट्यांचा वर्षाव करून करणे!

१९५८ मध्ये सतत दुसऱ्या वर्षीही आलथिआने विंबल्डन स्पर्धेत एकेरीचे अजिंक्यपद मिळविले होते. हार्लेमसारख्या छोट्या खडबडीत रस्त्यावर वा टेनिस कोर्टवर टेनिस खेळण्यास सुरुवात केलेल्या एका काळ्या मुलीने स्वतःच्या अंगच्या गुणांनी जागतिक कीर्ती मिळविली होती. टेनिसक्षेत्रातील काळ्या रंगाचा अडसर पुढील पिढीसाठी कायमचा दूर केलेला होता!

१९५७ आणि १९५८ या दोन्ही वर्षी असोसिएटेड प्रेसने वुमन अॅथलेट ऑफ दि इयर हा किताब आलथिआस तिच्या विंबल्डनमधील यशाचा गौरव करण्यासाठी दिला होता.

आलथिआच्या एकूण यशाच्या इतिहासाचा विचार करता आज मनात प्रश्न निर्माण होतो की, जर तिला तिच्या कुमारवयातच श्रेष्ठ दर्जाच्या टेनिस स्पर्धांत वर्णभेद न करता खेळण्याची संधी प्राप्त झाली असती तर तिने विंबल्डन स्पर्धा किती वर्षे गाजवल्या असत्या? आज नाही का पौगंडावस्थेत वा कुमार वयातील खेळाडूंना वर्णभेदाचा अडसर येऊ न देता आपली गुणवत्ता दाखविण्यास कर्तृत्वाचे सारे आकाशच मोकळे करून दिलेले असते? आलथिआला वयाच्या तेविसाव्या वर्षांपर्यंत श्रेष्ठ प्रतीच्या स्पर्धांत भाग घेण्यासच परवानगी दिली गेली नव्हती, हा तिच्यावर केवढा अन्याय झालेला होता! अमेरिकेसारख्या आणि इंग्लंडसारख्या आज सर्व क्षेत्रात प्रगत असलेल्या राष्ट्रांतही १९५० पर्यंत वर्णभेद केला जात होता, हे आज अविश्वसनीय वाटते. माणसाची गुणवत्ता ही त्याच्या दिसण्यात, त्याच्या कातडीच्या रंगात आणि तो कुणा आईबापाच्या पोटी जन्माला आला यात नसते, हे समजायला इंग्लंड-अमेरिकेला टेनिसच्या क्षेत्रात तरी १९५० साल उजाडू द्यावे लागले होते, याची खंत वाटते!

आजही जगातून आणि आपल्या दृष्टीने महत्त्वाचे म्हणजे भारतातून, धर्मभेद व जातीभेद खऱ्या अर्थाने कुठे नष्ट झाला आहे? माणसाच्या कातडीसारखाच तो त्याच्या मनप्रवृत्तींना चिकटलेला आहे. असो. आलथिआच्या आयुष्यात १९५८ हे टेनिसक्षेत्रातील अजिंक्यपद देणारे अखेरचेच वर्ष ठरले होते. त्यानंतर तिने अनेक विषयांत रस घेतला. व्यावसायिकरित्या ती गोल्फही खेळली आणि ‘आय ऑल्वेज वॉन्टेड टू बी समबडी’ हे पुस्तकही तिने लिहिले. जवळपासच्या लहानमोठ्या शहरांतून तिने कुमारवयातील टेनिस खेळाडूंसाठी त्यांची स्वप्ने साकार करण्याच्या हेतूने काही स्पर्धाही संयोजित केल्या होत्या. आलथिआच्या कर्तृत्वानेच आर्थर अॅश हा एकमेव काळा पुरुष खेळाडू विंबल्डन स्पर्धेत १९७५ मध्ये अजिंक्य ठरला आणि आज सेरेना व व्हिनस विल्यम्स या काळ्या भगिनी काळाचा महिमा अगाध असून काळ्या रंगाचाही महिमा अगाध आहे, असे सांगू शकत आहेत!

आलथिआने आपल्याला विंबल्डन स्पर्धांत १९५७ आणि १९५८ या दोन वर्षी मिळालेले अजिंक्यपदाचे चषक स्मिथसोनियन इन्स्टिट्यूशन्स नॅशनल म्युझियम ऑफ अमेरिकन हिस्टरी या संस्थेकडे १९८८ मध्ये सुपूर्द केले होते. त्यानिमित्त झालेल्या समारंभात आलथिआ म्हणाली होती, विंबल्डनमधील यशाची नुसती कल्पना किंवा विचार तरी कुणाच्या मनात आला होता का? परंतु आज तुमच्यासमोर हार्लेम (न्यूयॉर्कमधील कृष्णवर्णीयांच्या वस्तीत) येथे वाढलेली आणि जिला टेनिस खेळाडू व्हायचे होते, अशी एक निग्रो स्त्री उभी आहे. अखेर या महिलेने जागतिक अजिंक्यपद जिंकले. खरे सांगायचे तर हे अजिंक्यपद मिळविणारी या जगातील ही पहिलीच काळी महिला !

पाच भांवडांतील सर्वात वडील असलेली आलथिआ गिब्सन ही स्वतःला अॅथलेट असे संबोधत असे. तिने केवळ टेनिसमधील वांशिक भेदाच्या तटबंद्या कोसळवल्या नव्हत्या, तर लेडीज प्रोफेशनल गोल्फ असोसिएशनच्या तटबंदीसही कोसळवून टाकले होते.

आलथिआ ही सर्वचदृष्ट्या अत्यंत प्रतिकूल वातावरणात जन्मास आली होती. न्यूयॉर्कमधील निग्रोंची आणि कृष्णवर्णीयांची बकाल वस्ती असलेल्या हार्लेमसारख्या विभागात ती लहानाची मोठी झाली होती. टेनिसविषयी तिला उपजतच आकर्षण होते. विटांच्या भिंतीवर रबरी चेंडू मारीत मारीत टेनिसच्या खेळाचे प्राथमिक धडे तिने गिरविले होते. फ्रेड जॉन्सन या एकच हात लाभलेल्या कोचने तिला टेनिस खेळाचे मार्गदर्शन केले होते.

कोणत्याही क्षेत्रात क्रमांक एकची जागा मिळविण्यास नुसती मूळची प्रतिभा असून चालत नाही. सातत्य, कठोर परिश्रम आणि दृढनिश्चय हे गुण असावेच लागतात. पण हे गुणही नुसते असून चालत नाही. उत्तम गुरू, मार्गदर्शक, मदतनीस आणि संधीही लाभणे महत्त्वाचे असते. त्यासाठी नशिबाची साथही आवश्यक ठरते. आलथिआस ही साथ तिच्या सर्व गुणांना उजळवून टाकण्यासाठी लाभली होती!

आलथिआने आपले हायस्कूलचे शिक्षण अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिना राज्यातील विलमिंग्टन येथे घेतले होते. तेथील डॉ. आर.डब्ल्यू. जॉन्सन यांनी आपल्या कुटुंबाच्या घरातच आलथिआच्या राहण्याची व्यवस्था करून तिला खेळण्यासाठी आपले गवताचे टेनिस कोर्ट उपलब्ध करून दिले होते. डॉ. ई.ए. ईटन यांनी तुथे आलथिआला टेनिसचे प्रशिक्षण दिले होते. टेनिस कोर्टवर खेळताना आणि त्या कोर्टाच्या बाहेर वावरताना जी ग्रेस आणि डिग्निटी आपणास दाखविता आली ती आपल्या व्यक्तिमत्त्वात डॉ. ई.ए. ईटन यांनी बाणविली होती. असा कृतज्ञतापूर्वक उल्लेख आलथिआ नेहमीच करीत असे. स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाच्या जडणघडणीच्या संदर्भात आलथिआ एकदा म्हणाली होती, कुणीही एकाही शब्दाने माझ्यावर टीका करू नये या दृष्टीने मी माझ्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण केली आहे. टेनिस हा खेळ सभ्य स्त्री-पुरुषांचा आहे, हे लक्षात घेऊन त्या दृष्टीने मी मला घडविले!

आलथिआ गिब्सनने वयाच्या पंधराव्या वर्षीच न्यूयॉर्क स्टेटचे काळ्या मुलींच्या एकेरी टेनिस सामन्यांतील अजिंक्यपद मिळविले होते. विशेष म्हणजे, या स्पर्धांसाठी करावा लागणारा प्रवासखर्च शुगर रे रॉबिन्सन या मुष्टियोद्धयाने आलथिआसाठी केलेला होता.

१९५८ च्या विंबल्डनमधील विजेतेपदानंतर आलथिआने टेनिसच्या खेळातून निवृत्ती जाहीर केली होती. आज विंबल्डन विजेत्यास भल्यामोठ्या रकमेची पारितोषिके मिळतात. परंतु आलथिआच्या काळात विंबल्डन विजेत्यास रोख रकमेचे पारितोषिक नव्हते! त्याचप्रमाणे छोटी-मोठी पुरस्कारित स्वरूपाची बक्षिसेही नव्हती! तशी पारितोषिके असती तर आलथिआने १९५७ आणि १९५८ मध्ये विंबल्डनचे अजिंक्यपद मिळविल्यावर निवृत्ती जाहीर केली नसती, असे वाटते. या संदर्भात आलथिआचा दीर्घकाळचा मित्र आणि न्यूयॉर्क शहराची माजी मेयर म्हणला होता, जर का आलथिआ थोडी उशिरा टेनिसच्या क्षेत्रात आली असती तर ती कोट्यधीश झाली असती!

आलथिआने टेनिसशिवाय काही काळ गाण्याचा व्यवसाय करण्याचाही प्रयत्न केला होता. गोल्फकडेही ती वळली होती. परंतु गोल्फकडे वळण्यापूर्वी प्रदर्शनीय स्वरूपाच्या टेनिस स्पर्धांत भाग घेण्यासाठी तिने एक लाख डॉलर्सच्या करारपत्रावर १९५९ मध्ये स्वाक्षरीही केलेली होती.

अनेक पुरस्कार लाभलेली आलथिआ गिब्सन १९७५ साली स्टेट कमिशनर ऑफ अॅथलेटिक्स म्हणून न्यू जर्सीमध्ये नियुक्त झाली होती. दहा वर्षे या पदावर ती होती. त्यानंतर १९८८ पर्यंत ती स्टेट अॅथलेटिक्स कंट्रोल बोर्डावर आणि गव्हर्नर्स कौन्सिल ऑन फिजिकल फिटनेस या पदावर १९९२ पर्यंत कार्यरत होती. मात्र या पदावरून खाली उतरल्यापासून दुर्दैवाने तिच्या नशिबाला उतरती कळाच लागली होती! एकेकाळची पट्टीची खेळाडू असलेली आलथिआ प्रकृतिअस्वास्थ्याने बेजार झाली. मेंदूत रक्तवाहिनीची गाठ निर्माण झाली आणि हृदयविकारही तिला जडला होता. तिची आर्थिक परिस्थितीही खालावत गेली होती. सरकारी मदतीवरच ती उपजीविका करू लागली होती. आपली दयनीय परिस्थिती कुणी पाहू नये म्हणून ती लोकांना टाळू लागली होती. एकांतच ती पत्करू लागली! परंतु हळूहळू आलथिआच्या दुर्दैवी परिस्थितीची बातमी लोकांना समजून आली. तिच्या चाहत्यांनी १९९६ मध्ये तिच्यासाठी आर्थिक निधीची उभारणीही केली होती.

विलक्षण योगायोगाची गोष्ट म्हणजे, अमेरिकेतील माझ्या वास्तव्यात आलथिआचे चरित्र वाचून तिच्याविषयी विलक्षण आत्मियता वाटून मी तिच्यावर लेख लिहिला होता. लेख लिहून संपला तेव्हा २८ सप्टेंबर २००३ चा तो रविवारचा दिवस होता. वेळ सकाळची होती. मी माझ्या जावयाच्या घरातील टी. व्ही. बातम्या ऐकण्यासाठी सुरू केला आणि धक्कादायक बातमी ऐकली. वृत्तनिवेदिकेने बातमी दिली होती. अमेरिकेची माजी विंब्लडन टेनिस स्पर्धा विजेती आलथिआ गिब्सन वयाच्या ७६व्या वर्षी ईस्ट ऑरेंज जनरल हॉस्पिटलमध्ये न्यू जर्सी येथे अमेरिकेतच आज सकाळी मृत्यू पावलेली आहे. आलथिआच्या मृत्यूच्या बातमीने आपल्या घरातीलच, आपल्या रक्ताच्या नात्याचे माणूस निधन पावल्यावर व्हावे तसे तीव्र दुःख झाले. नंतर कितीतरी काळ मन ठणकतच राहिले होते!

(व्यास क्रिएशन्स् च्या ‘जगावेगळ्या’ ह्या पुस्तकातील प्रा. अशोक चिटणीस ह्यांचा हा लेख)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..