नवीन लेखन...

आठवणी अब्दुल कलामांच्या

दिनांक २७ जुलैला संध्याकाळी, टीव्हीवर आपले माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या निधनाची दु:खद बातमी ऐकली आणि मन विषण्ण झाले. त्यांची आणि माझी मैत्री गेल्या ५२ वर्षांची! माझ्या मनात, डॉ. कलामांच्या अनेक आठवणी दाटून आल्या. त्यांची-माझी पहिली भेट १९६३च्या मार्च महिन्यात झाली, तेव्हापासून ते आत्ता, अगदी २०१३ साली आम्ही रांजणगावात भेटलो होतो, तोपर्यंतच्या अनेक आठवणी ! माझ्यासाठी डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम हे फक्त भारताचे माजी राष्ट्रपती किंवा वरिष्ठ सहकारी एवढेच नव्हते, तर गेले ५ २ वर्षे ते माझे अगदी जिव्हाळ्याचे मित्रदेखील होते.

भारत सरकारने, पृथ्वीच्या वातावरणातील आयनावरण या आयनीभूत रेणूंनी भरलेल्या थराचा अभ्यास करण्यासाठी प्रकल्प हाती घेतला होता. त्यासाठी १९६२ साली, ‘राष्ट्रीय अवकाश संशोधन समिती नेमली गेली. हा अभ्यास करण्यासाठी आवश्यक त्या उपकरणांनी सज्ज असलेल्या अग्निबाणाचे प्रक्षेपण करण्यासाठी थिरुवनंतपुरम जवळील जी जागा निवडली होती, ती भूचुंबकीय विषुववृत्ताच्या जवळ असलेली जागा होती. आम्ही सर्व त्या वेळी इलेक्ट्रॉनिकच्या क्षेत्रात काम करीत होतो. १९६३ सालच्या जानेवारी महिन्यात आम्ही अमेरिकेला गेलो. आम्ही तिथे पोहोचल्यानंतर महिन्याभरातच डॉ. कलामही आमच्यामध्ये सामील झाले. डॉ. कलाम हे आमच्या गटामधले एकमेव ‘एरोनॉटिकल इन्जिनिअर’ होते आणि ते त्याआधी डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनमध्ये (डीआरडीओ) काम करत होते.

पहिल्याच भेटीत आमची छान मैत्री जमली. १९६२ म्हणजे भारत-चीन संघर्षाचा काळ! १९६३ साली, म्हणजे त्यानंतर लगेचच आमची भेट झाली होती. राजकारणाबरोबरच जगातले अगदी सर्व विषय आमच्या चर्चेत येत असत. एकदा असेच बोलत असताना कलामांनी, या प्रकल्पावर येण्याआधी ते ‘हॉवरक्राफ्ट’ तंत्रज्ञान विकसित करण्याचे काम करत असल्याचे सांगितले.

भारतातल्या ज्या ‘थुंबा’ या ठिकाणाहून भविष्यात अग्निबाणाचे प्रक्षेपण केले जाणार होते, त्या परिसराचा भला थोरला नकाशा घेऊन प्रा. एकनाथ चिटणीस आम्हांला भेटण्यासाठी अमेरिकेत येऊन दाखल झाले. पाचशे एकर एवढ्या विस्तृत प्रदेशात पसरलेल्या या जागेचा अभ्यास करताना, एक महत्त्वाची गोष्ट आम्हां सर्वांच्याच लक्षात आली. ती म्हणजे, ह्या जागेत आम्ही फक्त परदेशी बनावटीच्या अग्निबाणांचेच प्रक्षेपण करणार नव्हतो, तर आपले स्वत:चे अग्निबाणही प्रक्षेपित करणार होतो. तेव्हा त्या दृष्टीने सर्व आराखडा तयार करून आम्ही तो भारतात पाठवला आणि त्यानुसार जून १९६३ मध्ये थुंबा इथे रस्ते आणि इतर बांधकामांना सुरुवात झाली.

आम्ही अमेरिकेहून भारतात परतल्यानंतर लगेचच थुंबा इक्वेटोरिअल रॉकेट लाँचिंग स्टेशनच्या (टर्लस) कामाने वेग घेतला. त्यानंतर मी अहमदाबादला गेलो आणि डॉ. कलाम थेट टर्लसला पोहोचले. १ नोव्हेंबर ते २१ नोव्हेंबर हा कालावधी आमच्यासाठी अविश्रांत श्रमांचा होता. अखेर २१ नोव्हेंबर, १९६३ या दिवशी थुंबा इथल्या या प्रक्षेपण केंद्रावरून, अमेरिकन बनावटीच्या ‘नायकी अपाची’ या पहिल्या अग्निबाणाचे यशस्वी प्रक्षेपण झाले आणि आमच्या श्रमांचे सार्थक झाले. तो दिवस आमच्यासाठी अत्यंत संस्मरणीय ठरला!

‘करताना एका बाजूला घन इंधन आणि यांत्रिक उपकरणे विकसित करण्याचे काम आम्हां सर्वांच्याच मनांत प्राधान्याने होते, तर दुसऱ्या बाजूला भारताचा फ्रान्सबरोबरचा ‘बेलिए सेंटॉर’ अग्निबाण तयार करण्याचा करार आकार घेत होता. अग्निबाणाचे इंधन तयार करण्याचा कारखाना टर्लस इथे चालूही झाला होता. MINSK II हा पहिला संगणक उभारला गेला होता आणि त्याचा मुख्य वापर डॉ. कलाम करत होते. अग्निबाणाचे प्रक्षेपण केल्यावर त्याच्या दिशेत नेमकेपणा येण्यासाठी, डॉ. कलाम अग्निबाणाच्या उड्डाणावर होणारा वाऱ्याचा परिणाम दर्शवणारा ‘विंड वेटिंग प्रोग्राम’ तयार करत होते आणि त्यासाठी त्यांना या संगणकाची मोठीच मदत होत होती. या सर्व कालावधीत माझी आणि कलामांची वैचारिक देवघेव खूपच वाढली. अग्निबाणाबरोबर पाठवण्याच्या उपकरणांसाठीची (पेलोड) यंत्रणा कलाम विकसित करीत होते, तर कालनियंत्रण प्रणाली आणि स्वयंचलित दूरस्थ यंत्रणा तयार करण्याचे काम मी करीत होतो. अग्निबाणातील ज्वलनाशी निगडित असणारी यंत्रणा कलाम तयार करून घेत असत, तर त्यासाठी लागणारे वायरिंग मी करीत असे.

१९६८ साली, चार टप्प्यांच्या उपग्रह प्रक्षेपकाबद्दलचा आमचा प्राथमिक अभ्यास पूर्ण झाला. या प्रक्षेपकातील विविध टप्प्यांची रचना आणि जुळवणी करण्याच्या कामामध्ये सर्वांत जास्त सहभाग हा डॉ. कलामांचा होता. या वेळी मला अमेरिकेत, नासाच्या गॉडर्ड स्पेस फ्लाइट सेंटरला उपग्रहांसंबंधीच्या अभ्यासाकरिता पाठवले गेले. त्यामुळे, या काळात माझी आणि कलामांची गाठभेट जरा कमी झाली. याच काळात डॉ. कलाम हे उपग्रह प्रक्षेपणासाठीच्या एसएलव्ही- ३ (सॅटेलाईट लाँच वेहिकल – ३ ) प्रकल्पाचे संचालक म्हणून कार्यरत झाले. डॉ. विक्रम साराभाई यांचे १९७१ साली निधन झाले. जून १९७२मध्ये भारतीय अवकाश संशोधन हे अणुउर्जा विभागापासून वेगळे करण्यात आले. प्राध्यापक सतीश धवन अंतराळ आयोगाचे अध्यक्ष आणि भारत सरकारचे सचिव म्हणून नियुक्त झाले. कालांतराने ते भारतीय अंतराळ संशोधन संघटनेचे -इस्रोचे – अध्यक्षही झाले. प्रा. सतीश धवन, डॉ. विक्रम साराभाई आणि डॉ. ब्रह्मप्रकाश (संचालक, विक्रम साराभाई अंतराळ केंद्र) या सर्वांना डॉ. कलामांविषयी कमालीचा आदर होता.

मी अमेरिकेहून परतल्यानंतर स्पेस अॅप्लिकेशन सेंटरमध्ये (सॅक) काम सुरू केले आणि पुन्हा एकदा अहमदाबाद आणि बंगळूर (आताचे बंगळुरू) इथे अनेक वेळा कलामांची भेट झाली. मी अमेरिकेत असताना डॉ. वेर्नेर फॉन ब्राउन यांच्याशी माझा खूप जवळून संबंध आला. कलामांना डॉ. ब्राउन यांच्या कामात अत्यंत रस होता आणि आम्ही बऱ्याच वेळा डॉ. ब्राउन यांच्या कामाविषयी चर्चा करत असू. एकदा डॉ. ब्राउन सॅकमध्ये आले होते आणि त्या वेळी आम्ही मुद्दाम कलाम यांनाही आमंत्रित केले. त्या चर्चेत कलामांनी अनेक बारकाव्यांनिशी मांडलेल्या तपशिलाने डॉ. ब्राउन कमालीचे प्रभावित झाले.

विक्रम साराभाई अंतराळ केंद्रामध्ये १९७६ साली एसएलव्ही- ३ विषयी एक मोठी आढावा बैठक बोलवण्यात आली. त्या बैठकीत, कलाम एक अत्यंत समर्पित भावना असलेले प्रकल्प संचालक आणि अत्यंत कुशल नेतृत्व करणारी व्यक्ती असल्याचा प्रत्यय आम्हां सर्वांना आला. त्याच वर्षी आणखीही एक छान संधी निर्माण झाली. ॲरिअन या युरोपीय अग्निबाणाच्या तिसऱ्या प्रायोगिक उड्डाणाद्वारे आपला पहिला भूस्थिर दूरसंचार उपग्रह अंतराळात पाठवण्याचा महत्त्वाचा निर्णय इस्रोने घेतला. उड्डाणानंतर उपग्रहाला अपेक्षित कक्षेत सोडण्यासाठी एसएलव्ही- ३ या उपग्रह प्रक्षेपकाच्या चवथ्या टप्प्याचा वापर यासाठी केला जाणार होता. या निमित्ताने कलाम आणि त्यांच्या सहकाऱ्यांसोबत आमच्या अनेक चर्चा झाल्या. थोड्याच काळात, म्हणजे १९७७ मध्ये, माझी इनसॅट-१ स्पेस सेगमेंट प्रॉजेक्टचा प्रकल्प संचालक म्हणून नियुक्ती झाल्याने बंगळूर येथून काम पाहू लागलो आणि कलामांबरोबर आणखी जवळून संबंध आले. एसएलव्ही- ३च्या यशस्वी प्रक्षेपणानंतर कलाम अल्प काळासाठी बंगळूरला गेले आणि तिथून डीआरडीओमध्ये परत गेले. पुन्हा एकदा आमच्या सततच्या भेटीगाठींमध्ये खंड पडला. पण आम्ही जेव्हा कधी भेटत असू, तेव्हा ‘इंटिग्रेटेड गायडेड मिसाइल डेव्हलपमेंट प्रोग्रॅम’ या क्षेपणास्त्र विकासाच्या प्रकल्पाबद्दल बोलत असू.

मिश्र स्वरूपाचे पदार्थ विकसित करण्यात डॉ. कलामांना खूपच स्वारस्य होते. विक्रम साराभाई अंतराळ केंद्रामध्ये तर त्यांनी काच आणि ग्रॅफाईट वापरून अधिक बळकट केलेले प्लॅस्टिक विकसित करण्यासाठी एक गटच स्थापन केला होता. अशा प्रकारचे अनेक मिश्रपदार्थ उपग्रह प्रक्षेपकाच्या जडणघडणीत खूपच मोलाचे ठरले. त्यांनी विकसित केलेल्या एका, वजनाने हलक्या पण अतिशय बळकट अशा कार्बनी तंतूंचा वापर केलेल्या प्लॅस्टिकचा वेगळ्याच कारणासाठी उपयोग झाला. पोलिओग्रस्त मुलांना वापराव्या लागणाऱ्या अतिशय जड अशा स्टीलच्या कॅलिपरऐवजी वजनाला हलक्या, पण बळकट अशा या मिश्रपदार्थापासून तयार केलेले कॅलिपर फारच सुखावह ठरले. हे तंत्रज्ञान त्यानंतर उद्योगधंद्यांकडे हस्तांतरित करण्यात आले आणि प्रवरा वैद्यकीय महाविद्यालयाकडून असे १५०० कॅलिपर वाटले गेले.

डॉ. कलामांच्या नेतृत्वाखाली उपग्रह प्रक्षेपण तंत्रज्ञानातील अनेक महत्त्वपूर्ण गोष्टी विकसित केल्या गेल्या. उपग्रहनिर्मितीसाठी लागणारे बरचसे यंत्र -निर्मितीचं काम हे बाहेरच्या कारखानदारांकडून करून घ्यावे लागणार हे कलामांच्या लक्षात आले होते. त्यामुळे त्यांनी कारखान्यांशी दर्जेदार कामाची हमी देणारा पद्धतशीर करारनामा तयार केला. तसेच, कामाच्या दर्जानिर्मितीवर योग्य ती देखरेख ठेवणारी व्यवस्था विकसित केली. आजदेखील इस्रोमध्ये हीच पद्धत महत्त्वपूर्ण ठरली आहे. एवढेच नव्हे, तर कलामांनीच रुजवलेली ही पद्धत डीआरडीओमध्ये आजही वापरली जात आहे.

डॉ. अब्दुल कलाम आपल्या देशाचे राष्ट्रपती झाले आणि पुन्हा एकदा त्यांच्या माझ्या भेटीगाठी वाढल्या. तोपर्यंत त्यांना लहान मुलांशी संवाद साधायला आवडत असल्याचे आमच्या लक्षात आले होते. डॉ. कलाम बालविज्ञान परिषदेच्या निमित्ताने पुण्यात आले असताना मी त्यांना भेटलो. त्या वेळी मी आणि माझी पत्नी प्रिया, आमच्या नातवाला – अर्जुनला घेऊन, डॉ.कलामांना भेटायला गेलो. ते साल होते २००६ आणि मला वाटते, त्याच दिवशी कलाम ‘सुखोई’तून प्रवास करून आले होते. त्यांनी अर्जुनला राष्ट्रपती भवनात येऊन भेटण्यासाठी आमंत्रित केले. आम्ही त्याप्रमाणे अर्जुनला तिथे घेऊन गेलो. त्यानंतर ज्या उत्साहाने आणि रस घेऊन त्यांनी अर्जुनशी गप्पा मारल्या, त्याच्या कल्पना ऐकल्या, त्याने आम्ही विस्मयचकित झालो.

लहान मुलांशी सहज संवाद साधण्याची कलामांची हातोटी पाहून मी प्रभावित झालो आणि पुण्यातल्या भारतीय विद्याभवन इथल्या मुक्तांगण सायन्स एक्स्प्लोरेटरी इथे मी त्यांना विद्यार्थ्यांशी गप्पा मारण्यासाठी बोलावले. त्यांनी माझे आमंत्रण लगेच स्वीकारले आणि त्यानुसार जानेवारी २००७मध्ये ते तेथे आले. त्या वेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी साधलेला संवाद अत्यंत संस्मरणीय ठरला अलीकडेच, शालेय विद्यार्थ्यांशी अशाच प्रकारचा संवाद साधण्यासाठी मी डॉ. कलाम यांना कोल्हापूरला आमंत्रित केले होते. वेळेअभावी प्रत्यक्ष येऊन नाही, पण व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे भाग घेण्याचे त्यांनी मान्य केले. त्याप्रमाणे कलाम यांनी, त्यांच्या दिल्लीच्या कार्यालयात बसून कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाच्या सिनेट हॉलमध्ये जमलेल्या विद्यार्थ्यांशी सुमारे एक तास अत्यंत मनमोकळी चर्चा केली. या चर्चेमुळे विद्यार्थी कमालीचे आनंदित झाले होते.

डॉ. कलाम हे अतिशय प्रभावीरीत्या दुसऱ्याशी संवाद साधू शकत असत. कामाच्या जागी ते अत्यंत मृदुभाषी, पण तितकेच काटेकोर आणि आग्रही असत. डॉ. कलामांना विद्यार्थ्यांत अतिशय रस होता. भारताच्या इतर कोणत्याही राष्ट्रपतीला साधता आला नाही, इतक्या उत्तम प्रकारे देशाच्या तरुण पिढीशी संपर्क साधण्याचे त्यांचे कार्य नेहमीच साऱ्यांच्या नक्कीच स्मरणात राहील, असे मला वाटते. त्यांनी तरुणांना प्रेरणा दिली, प्रोत्साहन दिले. डॉ. कलामांनी भारताच्या युवाशक्तीच्या कल्पनांना आणि महत्त्वाकांक्षांना ‘शब्द’ दिले आणि ‘पिकल्या’ पानांच्या सामान्य नागरिकांनाही कलाम अगदी जवळचे वाटले.

डॉ. अब्दुल कलामांच्या ‘थॉट्स फॉर चेंज- वुई कॅन डू इट’ या पुस्तकाच्या अर्पण पत्रिकेत त्यांनी लिहिलेल्या ओळी मला खूप भावल्या. त्यांच्या तरुण पिढीशी असलेल्या संवादाचा सारांश या ओळींमध्ये अधोरेखित झाला आहे.  डॉ. कलाम म्हणतात:

‘आम्ही करू शकतो’, असा आत्मविश्वास ज्यांच्यात आहे अशा भारतातील तरुण पिढीला अर्पण: त्यांच्या या ‘मी करू शकतो’तून ‘आम्ही करू शकतो’ हे निर्माण होऊ शकते आणि त्याचे पर्यवसान ‘भारत करू शकतो’ यात होऊ शकते!

– प्रमोद काळे
माजी संचालक, सॅक (इस्रो)
kalepramod1941@gmail.com

मराठी विज्ञान परिषदेच्या ‘पत्रिका’ या मासिकातील हा पूर्वप्रकाशित लेख 

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..