नवीन लेखन...

थोरले माधवराव पेशवे

थोरले माधवराव पेशवे यांचा जन्म १६ फेब्रुवारी १७४५ रोजी झाला.

पानिपतानंतर केवळ १०-११ वर्षातच मराठी साम्राज्याला उर्जितवस्था देणाऱ्या या थोर पेशव्यास मानाचा मुजरा!

अल्पवयात पेशवाईची वस्त्रे मिळालेला मराठेशाहीच्या उत्कर्षबिंदूतील हा अखेरचा पेशवा. निष्कलंक चारित्र्य, कर्तबगारी. पानिपतच्या पराभवानंतर मराठेशाही सावरून धरण्याची जबाबदारी तरुण पेशवे माधवराव यांच्यावर येऊन पडली.

माधवराव पेशवे यांच्यावर लहानपणातच पडलेली ही प्रचंड जबाबदारी निभावण्याचे यथायोग्य कौशल्याही होते पण घरचे भेदी रघुनाथराव याना सांभाळण्याताच त्यांच्या वाट्याला आलेल्या छोट्याश्या कारकिर्दीतील तब्बल ७ वर्षे वाया गेली.खरतर ज्यावेळी माधवराव पेशवे झाले त्यावेळी पानिपतावारिल मोठा विध्वंस आणी त्याचे पडसाद ,प्रचंड कर्जबाजारी,ऐकसंघतेचा अभाव,मराठ्यांची एकुण परिस्थिति पाहून निजाम व हैदर यांनी केलेले उठाव यामुळे जवळ्जवळ मराठेशाहिचा अस्तच दिसत होता,आणी असल्या परिस्थितीत ज्यांच्याकडे आधार म्हणून पाहावे असे काका राघोबादादा यांच्याशिच करावा लागलेला संघर्ष अशी एकुण परिस्थिति होती पण तरीही न डगमगता परत एकदा मराठेशाहीचा दरारा प्रस्थापित करून दाखवला.

पानिपत येथे मराठयांचा पुष्कळ नाश होऊन नंतर थोडक्याच अवधीत नानासाहेब मरण पावले, तेव्हा ही संधी मराठ्यांवर स्वारी करण्यास उत्कृष्ट आहे असे पाहून निजामाने लढाई सुरू केली. त्यावेळी राघोबा प्रमुख असल्यामुळे सेनापती राघोबाने राक्षसभुवन येथे निजामाच्या सैन्यास गाठून लढाई दिली. त्यात राघोबाचा पराभव व्हावयाचा परंतु ऐनवेळी माधवरावानें आपल्या तुकडीनिशी निजामाच्या सैन्यावर हल्ला करून जय मिळविला. त्या मुळे निजामाचा उद्देश सिद्धीस न जाऊन त्यास पेशव्यांशी तह करावा लागला. परंतु पुढे राघोबा व माधवराव यांच्यांत वैमनस्य आले, ती संधी साधून निजामाने मराठ्यांकडील बराच मुलूख परत घेतला. निजामाप्रमाणे हैदरानेहि या संधीचा फायदा घेऊन दक्षिणेत मराठ्यांचा बराच मुलूख हस्तगत केला. तेव्हा १७६४ मध्ये राघोबाशी समेट केल्यावर माधवरावाने हैदरवर स्वारी केली. या प्रसंगी हैदरने पेशव्यांचा मोड करण्याकरिता आपल्या सर्व प्रयत्नांची शिकस्त करून पाहिली; पण माधवराव पेशव्यांपुढे त्याचा टिकाव लागेना. म्हणून सावनूर व इतर बराच मुलूख, त्याचप्रमाणे लढाईचे खर्चाबद्दल म्हणून ३२ लक्ष रूपये देऊन त्याने पेशव्यांशी तह केला. या नंतर १७७० मध्ये माधवरावांनी पुनः हैदरवर स्वारी केली.

१७६० मध्ये म्हैसूरचा नामधारी राजा चिक्ककृष्णराज मरण पावला. त्याच्या जागी हैदरने त्याचा वडील मुलगा नंदराज यास गादीवर बसविले. परंतु पुढे नंदराज स्वतंत्र होण्याची खटपट करीत आह, असे पाहून हैदरने त्यास बंदीखान्यात टाकले व त्याची मालमत्ता आपणाकडे घेतली. या वर्तनाचा माधवराव पेशव्यांस राग येऊन, त्यांनी निजामांशी दोस्ती करून हैदरवर स्वारी केली. तेव्हा हैदरने मुलूख उजाड करून तलाव फोडून व विहिरीत विष टाकून मराठ्यांस अटकाव करण्याची शिकस्त केली. परंतु मराठे पुढे येऊ लागल्यामुळे निरुपाय होऊन त्याने अप्पाजीराव नावाचा वकील तह करण्याकरिता मराठ्यांकडे पाठविला. त्याने पेशव्यांस २६ लक्ष रुपये लढाईचा खर्च म्हणून् व १४ लक्ष दरसाल खंडणी म्हणून देण्याचे कबूल केल्यावरून पेशव्यांनी हैदरशी तह केला.

पानिपत येथे मराठ्यांस आलेले अपयश धुवून कढण्याची माधवरावास फार इच्छा होती. पण १७६८ पर्यंत राज्यकारभाराची सूत्रे राघोबा याजकडे असल्यामुळे माधवरावास विशेष काही करिता आले नाही. तदनंतर राघोबास ठिकाणी बसविल्यावर रामचंद्र गणेश व विसाजी कृष्ण यांजबरोबर ५०,००० फौज देऊन माधवरावाने त्यांची उत्तर हिंदुस्थानांत रवानगी केली. तिकडे शिंदे, होळकरांचे सैन्य त्यास मिळाले.

मग त्या सर्वांनी मिळून रजपूत व जाट या लोकांकडून राहिलेली खंडणी वसूल केली व पानिपतमध्यें रोहिल्यांनी त्रास दिल्याबद्दल त्यांचा मुलूख लुटून रोहिलखंडातून पुष्कळशी लूट आणली. त्यात पानिपत येथें मराठ्यांनी गमविलेली काही लूट होती. या वेळेच्या मराठ्यांच्या स्वारीने रोहिले लोकांस एवढी दहशत बसली की, मराठे येतात अशी नुसती हूल उठली की, रोहिले पळत सुटत. या वेळी मराठ्यांनी दुसरेही एक महत्त्वाचे कारस्थान तडीस नेले. त्यांत महादजी शिंदे प्रमुख होते. १७५४ मध्ये निजाम उल्मुल्काचा नातू गाझीउद्दीन याने वजिराचे पद बळकावून दुसरा आलमगीर यास तख्तावर बसविले. त्या वेळी आलमगीरचा पुत्र मिर्झा अबदुल्ला हा दिल्लीतून पळून गेला होता. तो शहाआलम या नावाने प्रसिद्ध होता. त्याने इंग्रजांचा आश्रय करून अलाहाबादेस रहाणे केले होते. त्याला या वेळी मराठ्यांनी दिल्लीस आणून तख्तावर बसविले.
निजामाला त्यानी दोनदा धूळिला मिळवले,नागपूरकर भोसले आणी हैदरचाही पुरेपुर बंदोबस्त केला होता .उत्तरेताही त्यानी नेमलेल्या रामचंद्र गणेश आणी महादजी शिंदे यानी दिल्लीवर पुन्हा एकदा भगवा फडकवला होता.त्यांनी मराठेशाहिला जुने वैभव परत मिळवुन दिले .राज्यात शिस्त व कार्यक्षम प्रशासनव्यवस्था निर्माण करून अल्पावधीतच संपूर्ण भारतवर्षात मराठ्यांचा दरारा निर्माण केला. मात्र स्वकीय वैऱ्यांची नीच साथ न दिल्याने व अतिश्रमाने १७७२ मध्ये हैदरवरील स्वारीत माधवराव आजारी पडले आणि दुखणे क्षयावर जाऊन अवघ्या २८ व्या वर्षी १८ नोव्हेंबर १७७२ रोजी त्यांचा थेऊर येथे अंत झाला. त्यांच्या अकाली मृत्यूनंतर मात्र मराठी सत्तेच्या ऱ्हासाच्या प्रक्रियेचा प्रारंभ झाला. या वेळी त्यांची पत्नी रमाबाई ही सती गेली. तिचे वृंदावन थेऊर येथे अद्याप आहे.

— संजीव वेलणकर.

९४२२३०१७३३

पुणे.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4238 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..