नवीन लेखन...

दलित रंगभूमी – दलित नाट्यचळवळ वर्णनात्मक प्रवास



हा लेख मराठीसृष्टी – दिपावली २०११ च्या अंकात प्रकाशित झाला होता.


दलित रंगभूमीचे पहिले नाटक तृतीय रत्न (1855) की जे महात्मा फुले यांनी लिहिले आहे. या नाटकाचा विषय ब्राह्यणांनी जे देवाच्या नावे गैरसमज व अंधश्रद्धा प्रस्थापित केल्या होत्या त्या विरुद्ध प्रहार करणारे हे नाटक होय. हे नाटक महात्म फुले यांनी इ.स. 1855 मध्ये लिहिले असले तरी ते महात्मा फुले समता प्रतिष्ठान वर्ष – 5 अंक-2 एप्रील-मे-जून 1879 च्या अंकात उपलब्ध झाले आहे. “प्रेमप्रताप” अर्थात “म्हातारीची सून” हे नाटक मोरेश्वर तांबे यांनी प्रयोग रूपाने 20 जुलै 1947 रोजी रंगभूमीवर आणले. या नाटकाचा विषय अस्पृश्यता निवारण्यासाठी रोटी-बेटी व्यवहारास प्रोत्साहन देणे हा होता. पुस्तक रुपाने हे नाटक मोरेश्वर प्रकाशनाने 1984 मध्ये उपलब्ध केले. तर प्राचार्य म.भि. चिटणीस यांनी “युगयात्रा” हे नाटक 14 एप्रील 1955 रोजी रंगमंचावर सादर केले. “दलितांचा मुक्तिसंग्राम” हा या नाटकाचा विषय असून प्रत्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या उपस्थितीत ह्या नाटकाचा प्रयोग मिलिंद महाविद्यालय औरंगाबाद येथे सादर झाला आहे. तसेच “चंद्रहार” हे भि.शि.शिंदे लिखित नाटक 14 एप्रील 1954 मध्ये पां.ना.राजभोग मित्रमंडळ पंढरपूर यांनी सादर केले. या नाटकाचे दिग्दर्शन भि.शि.शिंदे यांनी केले असून दलित-दलितेतर आंतरजातीय विवाह आणि शिक्षणाचे महत्व असा या नाटकाचा विषय होता. “वाट चुकली” हे ना.ग.व्हटकर लिखित व दिग्दर्शित नाटक 11 जून 1955 मध्ये रंगमंचावर सादर झाले. दलितांच्या बौद्ध धर्मांतराबद्दलची प्रतिक्रिया देणारे हे नाटक सारजां प्रकाशन सांगली यांनी 1955 मध्ये पुस्तक रुपाने उपलब्ध केले. अस्पृश्यता निवारण नाट्यस्पर्धा (1954) मुंबई राज्य सरकार कडून पहिले पारितोषिक या नाटकास प्राप्त झाले होते. तसेच “नवी वाट” हे मा.का.कारंडे लिखित नाटक 12 जाने. 1956 रोजी अभिनय कलाकुंज माजगाव मुंबई या संस्थेने सादर केले. “हिंदू समा जाच्या उद्धाराची नवी वाट दर्शविणारे” हे नाटक सुभाष प्रकाशन मुंबई यांनी पुस्तक रुपाने उपलब्ध करून दिले. या नाटकाला महाराष्ट्र कलोपासक पुणे या नाट्य संस्थेच्या वतीने 1958 मध्ये दुसर्‍या क्रमांकाचे बक्षिस दिले होते. “सर्यास्त” हे हेमंत खोब्रागडे लिखित व दिग्दर्शित नाटक 16 डिसें. 1977 मध्ये मंचावर सादर झाले. “दलित अत्याचार” हा या नाटकाचा विषय असून स्वस्तिक एज्यु.सोसा. नागपूर या संस्थेने जाने. 1981 मध्ये हे नाटक पुस्तक रुपाने उपलब्ध करून दिले. “संगीत भिक्षुणी वासवदत्ता” हे भि.शि.शिंदे लिखित व दिग्दर्शित हे नाटक नाट्य प्रबोधन पुणे या संस्थेने 1 जाने. 1978 मध्ये रंगमंचावर सादर केले. हे बौद्ध धर्मावर आधारलेले नृत्यप्रधान मुक्तनाट्य असून मयुर प्रकाशन पुणे यांनी 1975 मध्ये पुस्तक रुपाने उपलब्ध केले. तर 9हत्याकांड” हे कमलाकर डहाट लिखित व दिग्दर्शित नाटक अभिनव कला निकेतन नागपूर या संस्थेने 30 मे 1978 मध्ये रंगमंचावर सादर केले. 9 दलित कुटुंबावर झालेला अत्याचार” हा या नाटकाचा विषय असून सुशील प्रकाशन नागपूर या संस्थेद्वारे 21 डिसे. 1978 रोजी रंगमंचावर सादर झाले. “काळोखाच्या गर्भात” भि.शि.शिंदे लिखित नाटक दलित रंगभूमी पुणे या संस्थेने 11 नोव्हे. 1979 रोजी मंचावर सादर केले. “दलित मुक्तीची कहाणी” असा या नाटकाचा विषय असून नीळकंठ प्रकाशन पुणे यांनी ते ऑक्टो. 1981 मध्ये पुस्तक रुपाने उपलब्ध करून दिले. तसेच भि.शि.शिंदे यांचेच “वैरी झाला कैवारी” हे नाटक नाट्य प्रबोधन पुणे या संस्थेने 14 एप्रील 1975 मध्ये सादर केले. “बौद्ध धर्मातील जीवनमूल्यांवर प्रकाश टाकणारे नाट्य” असा या नाटकाचा विषय असून भि.शि.शिंदे यांनीच ते दिग्दर्शित केले होते.

“बद्धं शरणं गच्छामि” हे प्रेमचंद गौरकर लिखित नाटक नाट्यसुधा नागपूर या संस्थेने 28 मे 1980 रोजी सादर केले असून बौद्ध धर्मातील वैशिष्टे सांगणारे हे नाटक होते. प्रेमचंद्र गजवी लिखित “देवनवरी” हे नाटक कर्जत एज्युकेशन सोसा. कर्जत यांनी 24 नोव्हें. 1980 मध्ये सादर केले असून “देवदासी प्रथेवर प्रकाश टाकणारे प्रक्षोभक नाटक” अभिनव प्रकाशन मुंबई यांनी नोव्हें. 1981 मध्ये पुस्तक रुपाने ते उपलब्ध करून दिले.थांबा रामराज्य येतय ! हे प्रकाश त्रिभुवन लिखित नाटक 16 डिसें. 1982 रोजी दलित थिएटर औरंगाबाद यांनी सादर केले. “दलित दलितेतर मधील खेड्यातील अस्तित्वाचा संघर्ष असा या नाटकाचा विषय होता. दलित थिएटर या संस्थेनेच 1982 मध्ये पुस्तक रूपाने ते उपलब्ध करून दिले. ह नाटक अविनाश डोळस यांनी दिग्दर्शित केले होते. “इथे माणसाला स्थान नाही” हे बाजीराव रामटेके यांनी लिहिले असून करुणा कला केंद्र नागपूर या संस्थेने ते रंगमंचावर सादर केले. स्वत: बाजीराव रामटेके यांनीच ते दिग्दर्शित केले असून 18 ऑक्ट. 1981 रोजी त्याचा प्रयोग सादर झाला. “धर्मांतर प्रश्नांच्या चिकित्सा” हा या नाटकाचा विषय आहे.

“कैफियत” हे रुस्तुम अचलखांब यांचे नाटक असून प्रचार प्रकाशन कोल्हापूर यांनी ते 20 नोव्हें. 1981 रोजी पुस्तक रूपाने छापले. या नाटकाचा पहिला प्रयोग दलित नाट्य अकादमी आणि दिशांतर या संस्थेने सादर केला. स्वत: अचलखांब यांचेच दिग्दर्शन असून “दलित कलावंतांच्या व्यथा आणि वेदना” प्रकट करणारे हे नाटक होते. “साक्षीपूरम्” हे रामनाथ चव्हाण यांचे नाटक दलितांच्या मीनाक्षीपूरमच्या मुस्लीम धर्मांतरावर प्रकाश टाकणारे हे नाटक दलित थिएटर अकादमी पुणे यांनी 2 नोव्हें.1982 मध्ये सादर केले; तर मेहता पब्लिशिंग हाऊस पुणे यांनी 1983 मधे पुस्तक रूपाने ते प्रकाशित केले.

“वांझमाती” हे प्रेमानंद गज्वी लिखित नाटक प्रयोग मालाड मुंबई यांनी 10 नोव्हें. 1982 रोजी सादर केले. “मानव निर्मित विषमतेवर” आधारित ही नाट्यकृती त्रिदल प्रकाशन मुंबई यांनी 1984 मध्ये प्रकाशित केली. याच वर्षी (22 नोव्हें. 1982) देवदास गायकवाड लिखित “आम्ही देशाचे मारेकरी!” हे नाटक दलित रंगभूमी पुणे यांनी अविनाश आंबेडकर यांच्या दिग्दर्शनाखाली नाटक हे केले; तर दलित रंगभूमी प्रकाशन यांनी ते प्रकाशित केले. मार्च 1982 मध्ये. या नाटकाचा विषय “राष्ट्रीय स्वयंसेवकसंघाच्या कार्यपद्धतीवर टीका” असा होता.संपत जाधव लिखित “पोतराज” हे नाटक पोतराज ही रूढीपरंपरा नष्ट व्हावी म्हणून प्रचारार्थी लिहिलेले हे नाटक प्रतिभा थिएटर पुणे यांनी 17 ऑगस्ट 1983 मध्ये सादर केले. तर प्रपंच प्रकाशन पुणे यांनी 1986 मध्ये पुस्तक रूपाने ते प्रकाशित केले. त्याच वर्षी 11 नोव्हें. 1983 मध्ये भि.शि.शिंदे यांचे “भूमीहिन दलित व शेतमजुरांची समस्या” मांडणारे “आयोग” नावाचे नाटक सादर झाले. त दलित रंगभूमी या संस्थेने सादर केले.

27 नोव्हें. 1989 मध्ये प्रकाश त्रिभुवन यांचे “एक होता राजा“ हे नाटक रंगमंचावर आले. “शास्त्राच्या कपट नीतिमुळे राजावर ओढवलेली आपत्ती” हा या नाटकाचा विषय असून दलित थिएटर औरंगाबाद या संस्थेने ते सादर केले. तर याच संस्थेने ते फेब्रु. 1983 मध्ये पुस्तक रूपाने छापले. “झाडाझडती” हे शिल्पा मुंब्रीकर लिखित नाटक दलित स्त्रीच्या दुहेरी गुलामगिरीचे चित्रण करते. शिल्पा मुंब्रीकर यांनीच या नाटकाचे दिग्दर्शन केले असून 27 फेब्रु. 1984 मध्ये दलित रंगभूमी पुणे या संस्थेने ते सादर केले.

कमलाकर डहाट लिखित “मसन्याडुद” हे दलित रंगभूमी नागपूर या संस्थेने 11 एप्रील 1984 रोजी सादर केले तर दलित रंगभूमी पुणे या संस्थेने ते पुस्तक रूपाने प्रकाशित केले. हे नाटक पुढार्‍यांच्या मसन्याडुद प्रवृत्तीचा निषेध करणारे आहे. त्याच वर्षी भि.शि.शिंदे यांचे “पालवी” हे दलित चळवळीचा दलित समाजावर झालेल्या परिणामकारक संघर्षाचे चित्रण करणारे नाटक दलित रंगभूमी पुणे या संस्थेने 21 डिसें. 1984 रोजी सादर केले. तसेच आदिम संस्कारावर आधुनिकतेचा प्रभावकारी परिणाम हा विषय घेऊन अरुणकुमार इंगळे यांचे “काय रं!” हे नाटक प्रज्ञा रंगमंच सोलापूर यांनी 1984 मध्येच सादर केले.

रूपाली नाट्याविष्कार मुंबई या संस्थने 6 डिसें. 1985 डी सोमकुंवर लिखित “शरण बुद्धा!” हे भगवान गौतम बुद्धांनी सांगितलेल्या तत्त्वज्ञानावर आधारलेले नाटक सादर केले. तर अभिरुची नागपूर या प्रकाशनाने ते पुस्तक प्रकाशित केले. तसेच प्रेमानंद गौरकर लिखित “मशाल” हे नाटक नाट्य सुधा नागपूर या संस्थेने 14 एप्रील 1986 रोजी सादर केले. नामांतरासाठी झालेल्या संघर्षावर आधारित हे नाटक होते. तर टेक्सास गायकवाड लिखित “मन्वंतर” हे नाटक दलित रंगभूमी पुणे या संस्थेने 9 ऑक्टो. 1986 रोजी सादर केले. याच संस्थेने ते ऑक्टोबर 1985 मध्ये पुस्तक रूपाने प्रकाशित केले होते. नोव्हेंबर 1986 मध्ये ड्रॉपर्स पुणे या संस्थेने प्रा.दत्ता भगत लिखित “खेळिया” हे नाटक सादर केले तर पुण्याच्याच कॉन्टिनेन्टल प्रकाशनाने ते ऑक्टोबर 1985 मध्ये पुस्तक रूपाने छापले. दलिल चळवळीतील राजकारणावर प्रकाश टाकणारे हे नाटक होते. पुढे या नाटकाचा विद्यापीठीय अभ्यासक्रमात समावेशही झाला. प्रा.दत्ता भगत यांचेच “वाटा पळवाटा” हे दुसरे नाटक 27 डिसें. 1987 मध्ये थिएटर नाट्य अकादमी या संस्थेने सादर केले. व उपरोक्त प्रकाशनानेच ते 1988 मध्ये पुस्तक रूपाने प्रकाशित केले.. दलित चळवळ आणि राजकारणातील तीन पिढ्यांचा संघर्ष या वर प्रकाश टाकणारे हे नाटक होते. हे ही पुणे विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट झाले.

5 डिसेंबर 1987 मध्ये लोकमंच सातारा या संस्थेने तुषार भद्रे लिखित “कारान” हे नाटक सादर केले. भटक्यांच्या जीवनाचा संवेदनशील आलेख मांडणारे नाटक म्हणून त्याकडे पाहता येईल. ग्रंथालय वाचक चळवळ मुंबई यांनी डिसेंबर 1987 मध्ये ते पुस्तक रूपाने प्रकाशित केले. 29 जानेवारी 1988 मध्ये आविष्कार मुंबई या संस्थेने प्रेमानंद गज्वी लिखित “जयजय रघुवीर समर्थ” हे रामदास संप्रदायाच्या उणीवांवर बोट ठेवणारे नाटक सादर केले. या अगोदर अभिनव प्रकाशन दादर या प्रकाशनाने ते डिसेंबर 1985 मध्ये पुस्तक रूपात प्रकाशित केले होते. 5 मे 1988 मध्येच दलित रंगभूमी पुणे यांनी मुक्ता मनोहर लिखित 921 व्या शतकात” हे एकवीसाव्या शतकातील दलितांच्या जीवनावर प्रकाश टाकणारे नाटक सादर केले.

रामनाथ चव्हाण लिखित “महात्मा ज्योतिराव फुले” हे 11 एप्रिल 1990 मध्ये प्रयोग बहुरूपी व्यवस्था रक्षिकराज निर्मित नाटक सादर झाले. विषय होता महात्मा फुले यांचे क्रांतीकारी जीवनदर्शन. याच वर्षी 28 जानेवारी 1990 मध्ये संबोधी मुंबई या नाट्य संस्थेने प्रा.दत्ता भगत लिखित “अश्मक” हे नाटक रंगमंचावर आणलं. व पुढे संबोधी प्रकाशनानेच ते पुस्तक रूपाने प्रकाशितही केले. विषय होता दलित मुक्तीचा संघर्ष.

मी इथे दलित नाट्य चळवळीचा एक अभ्यासक म्हणून माहिती देवू इच्छितो ती ही की मी 1993-94 मध्ये पुणे विद्यापीठ मराठी विभागाअंतर्गत एम.फिल पदवी प्राप्त केली. माझ्या प्रबंधिकेचा विषय होता “प्रा.दत्ता भगत यांची नाटके (खेळीया, वाटा- पळवाटा, अश्मक) : एक अभ्यास” त्यानंतर या प्रबंधिकेवर पुन्हा काम करून दलित नाटक प्रेरणा आणि विकास (हे पुस्तक पुणे विद्यापीठ एम.ए. मराठी भाग 1 साठी संदर्भ ग्रंथ म्हणून निवड), “प्रा.दत्ता भगत यांची नाटके” अशी दोन पुस्तके प्रकाशित केली. दुसरे पुस्तक “वाटा-पळवाटा” मुंबई विद्यापीठाच्या एम.ए.च्या अभ्यास क्रमासाठी विद्यार्थ्यनी संदर्भ ग्रंथ म्हणून युज केले असे अनेकांनी मला सांगितले. अर्थात माझ्या एम.फिल पदवीसाठीचे संशोधन पुढील विद्यर्थ्यांना व अभ्यासकांना उपयुक्त ठरले हे मला पदवी प्राप्त करण्यापेक्षाही मोलाचे वाटते किंबहुना विद्यापीठीय संशोधनाचा तोच हेतू आहे असे मला निश्चित वाटते. आणि म्हणून हा लेख लिहित असतांना एक नाटककार किंवा दोन तीन नाटककार घेऊन हा लेख मी लिहू शकले असतो पण तसे न करता दलित रंगभूमी, नाट्यचळवळ यांचा प्रवास (1855 ते 1996 पर्यंतचा) प्रातिनिधिक स्वरूपात मी मांडला आहे. आणि तोच शीर्षक विषयानुसार मला अपेक्षित आहे.

न्नाट्य प्रवासात उगीचच खंड पाडून मी उपरोक्त मत नोंदवले त्याबद्दल क्षमस्व !.रामनाथ चव्हाण लिखित “बामनवाडा” हे नाटक अभिरुची नाट्यसंपदा मुणे या संस्थेने 9 मे 1991 रोजी नानासाहेब गोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत टिळकस्मारक मंदिर पुणे येथे सादर केला. विषय होता दलित दलितेतर जीवनाचा वेध. श्री विद्या प्रकाशन या संस्थेने ते 15 जुलै 1991 रोजी पुस्तक रूपाने उपलब्ध करून दिले.त्याच वर्षी 2 ऑगस्ट 1991 रोजी प्रेमानंद गज्वी लिखित “9किरवंत” हे नाटक रूपवेध या संस्थेने सादर केले. स्मशान कर्मे करणार्‍या ब्राह्यणाच्या जीवनाचा वेध या नाटकाने घेतला. हे नाटक पुढे विक्रम गोखले यांच्या उपसिथतीत अमेरिकेत देखील सादर झाले. घोटभर पाणी (1980) या एकांकिपासून नाट्य लेखनाचा प्रवास सुरू करणार्‍या गज्वींनी पुढे बेरीज वजाबाकी (1993), कृष्णविवर (1990), उतारा (1990) हे चार एकांकिका संग्रह आणि देवनवरी (1980) वांझमाती (1984), तन माजोरी (1985), जयजयरघुवीर समर्थ (1986) पांढरा बुधवार (1996) गांधी आंबेडकर (1998) रंगयात्री (2002) नूर महंमद सोठ (2007) शुद्ध बीजापोटी (2009) व्याकरण (2010) ही नाटके रंगभूमीला दिली. आणि रंगभूमी भक्कम झाली. प्रेमानंद गज्वी यांनी दलित जीवनदर्शनाला, समस्यांना, दलितांच्या मानसिक आंदोलनाला आपल्या एकांकिकांमधून शब्दबद्ध केले आहे. तसेच दलितत्वाच्याही पुढे जाऊन मानवी जीवन, त्यातील कुरुपता, मानवी व्यवहार यांचे समग्र दर्शन त्यांच्या नाटकातून घडते.समारोप :खरं म्हणजे जग सुंदर व्हावे म्हणून बुद्ध म्हणाला होता, स्वयंप्रकाशित व्हा (अत: दीप भव!) म्हणजे स्वत:चा दिवा व्हा! आणि अंधार कोपरे आपल्या ज्ञानाने उजळून टाका. अंधार दूर करा म्हणजे कुरुपता दूर करा म्हणजेच कुरुप जग सुंदर करा. पण हा सुंदर विचारच इथल्या कुरुप लोकांनी बाजूला केला परिणामी हे जग सुंदर होवू शकले नाही (सक्षम समीक्षा/एप्रिल-मे 2011/पृ.26) असे म्हटल्यास वावगे होणार नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेरणेने बौद्ध धर्म स्वीकरारणालर्‍या बौद्धां विषयी प्रा. दत्ता भगत परिवर्तनाचा वाटसरू (मे 2011) मध्ये दिलेले मत मला शेवटी इथे विचारात घेणे महत्वाचे वाटते. थे पुढील प्रमाणे आहे.

“आम्ही बुद्ध झालेलो आहोत म्हणून बौद्ध धर्माचा आणि त्या मधला सबंध वाङ्मयाचा अभ्यास करावा, या इच्छेपर्यंत अजून पोहचलेलो नाही. आम्ही बुद्ध झालो ते बुद्ध असण्याबद्दलच्या अहंतेमध्ये आम्ही सगळे रमलोय. त्याच्या पलीकडे आम्ही गेलो नाही, बुद्ध धर्माचा विचार करायला आम्ही आमच्या वौद्ध धर्माबद्दल पाच-सहा प्रतिज्ञा ज्या आहेत, त्यावर लक्ष केंद्रित केलंय. कारण अजूनही हिंदू धर्माचा त्याग या नशेतून आम्ही बाहेर येत नाही. बौद्ध धर्माचा स्वीकार आणि त्याचा अंतर्गत असणारे तत्वज्ञान याकडे वळायला अजून बराच अवकाश आहे.” (पृ.50) ही अवस्था जर बौद्ध धर्म स्वीकारून पन्नास पंचावन्न वर्ष झालेल्या बौद्धींची असेल तर इतरांचा विचारच न करणे बरे!

पण असे असले तरी दलित रंगभूमी आणि दलित नाट्यचळवळ यांच्या आतापर्यंतच्या प्रवासातून “भरताच्या नाट्यशास्त्रामध्ये काही नियम आखून दिलेले आहेत, काही संकेत मांडलेले आहेत. म्हणजे नायक कसा असावा ?, त्याचा जोडीदार कसा असावा? एवढंच कशाला संस्कृत नाटकात जो विदूषक असतो, तो ठराविक वर्गातीलच असावा. न्नायक जर ब्राह्यण असेल तर त्याचा विदूषक कसा असावा ? याचे नियम घालून दिलेले आहेत. आणि या नियमांचा प्रभाव पारंपारिक रंगभूमीवर फार पडलेला आहे. त्या मुळे नायक हा उच्चवर्णीयच असायचा. प्रस्थापितच असायचा आणि त्याची समस्या मांडलेली असायची. पण दलित रंगभूमीने ही चौकट तोडली. दलित रंगभूमीने मजूर, कामगार, शेतकरी, शाळामास्तर, यांना नायकपण बहाल केले व त्यांच्या समस्यांचे उच्चाटन केले. तळागाळातल्या लोकांच्या आशा आणि आकांक्षा नाटकाच्या आशयामध्ये मांडून या दलित रंगभूमीने प्रस्थापित रंगभूमीने निर्माण केलेली कोंडी फोडली हे नक्कीच!” ,(परिवर्तनाचा वाटसरू/जुलै 2011/पृ40) हे भि.शि. शिंदेंनी नोंदविलेले मत दलित रंगभूमी व दलित नाट्यचळवळीचा प्रवास (1853 ते व्याकरण 2010) मांडतांना अंतिमत: नोंदवावेसे वाटते!

प्रा. डॉ. शैलेश त्रिभुवन

बी – ५/२०६, दुसरा मजला, राहुल निसर्ग,

अतुल नगर, वारजे, पुणे -४११०५८,

मो: ९९२२१३०१५७

— प्रा. डॉ. शैलेश त्रिभुवन

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..