Web
Analytics
मारुती स्तोत्रचा मराठीत अर्थ – Marathisrushti Articles

मारुती स्तोत्रचा मराठीत अर्थ

मारुतिस्तोत्र समर्थ रामदासांनी रचले आहे.  त्यांनी शरीर कमावणे, बळ मिळवणे याला फार महत्त्व दिले होते.  बळाचे मूर्तिमंत रूप म्हणून मारुतीची उपासना त्यांनी केली  आणि करावी अशी शिकवण दिली.  या उपासनेचा एक भाग म्हणजे हे स्तोत्र. यात प्रामुख्याने मारुतीच्या शारीरिक बलाचे वेगवेगळे पैलू वर्णिलेले आहेत.

“ भीमरूपी महारुद्रा वज्रहनुमान मारुती “
भीमरूपी = प्रचंड मोठा दिसणारा,
महारुद्रा = रुद्र म्हणजे शंकराचा मारुती हा अवतार मानला आहे. त्याचप्रमाणे उग्र स्वभावाचा भयंकर असाही अर्थ होऊ शकतो.
वज्रहनुमान = ज्याची हनुवटी बज्राघात सहन करूनही वज्रासारखी अभेद्य आहे असा. मारुतीने जन्मल्या जन्मल्या फळ समजून सूर्याला गिळायला झेप घेतली तेव्हा अनर्थ टाळण्यासाठी इंद्राने त्याच्यावर वज्रप्रहार केला तो त्याच्या हनुवटीवर लागला आणि त्याने मूर्च्छित होऊन हनुमान परत पृथ्वीवर आला अशी आख्यायिका आहे. त्या प्रसंगापासून त्याला हनुमान / वज्रहनुमान अशी नावे प्राप्त झाली.
मारुती = मारुती हा वायुदेवाचा = मरुत देवाचा मुलगा. वडिलांच्या नावावरून त्याला पडलेले नाव मारुती. वायुपुत्र असल्याने तो प्रचंड वेगवान होता. पण त्याचा उल्लेख अधिक स्प्ष्टपणे पुढे येतोच स्तोत्रात.

“ वनारी अंजनीसूता रामदूता प्रभंजना “
वनारी = वनारी असा मूळ शब्द आहे. आपल्या प्रचंड बळाच्या जोरावर वनेच्या वने समूळ उपटणारा म्हणून वनाचा शत्रू = वनारी.
अंजनीसूत = अंजनीसुत असा मूळ शब्द आहे. अंजनी हे मारुतीच्या आईचे नाव. तिचा मुलगा = अंजनीसुत.
वानरी अंजनीसूता असा पाठ असण्याचीही शक्यता आहे. वृत्ताच्या दृष्टीने विचार करता तो अधिक योग्य आहे. वानर वंशाच्या अंजनीचा मुलगा असा त्याचा अर्थ होतो. वानर असा शब्द स्तोत्रात कसा असेल असे काहींना वाटते. पण तो एक वंश आहे आणि स्तोत्रांमधून असे वंशाचे उल्लेख सर्रास सापडतात. रामाचा सर्वात महत्त्वाचा दूत. दूत म्हणजे साधा निरोप्या नव्हे. राजाचा परराज्यातील प्रवक्ता / वकील असं म्हणता येईल.
प्रभंजन = बळाच्या जोरावर मोठ विनाश घडवून आणू शकतो असा.
या दोन ओळींत मारुतीचे आईवडील कोण, त्याची शरीरयष्टी कशी आहे, त्याचे बळ किती मोठे आहे, देव असलेल्या रामाचा भक्त म्हणून नव्हे तर राजा असलेल्या रामाचा एक अधिकारी म्हणून त्याचे काय महत्त्व आहे, त्याचा स्वभाव कसा आहे अशी माहिती आपल्याला मिळते.

” महाबळी प्राणदाता सकळां ऊठवी बळें “
महाबळी = प्रचंड बलवान
प्राणदाता = प्राण देणारा. हा उल्लेख संजीवनी मुळी आणून लक्ष्मणाचा जीव वाचवल्याच्या प्रसंगाशी निगडित आहे.
सकळां ऊठवी बळें = जो आपल्या बळाच्या जोरावर सगळ्यांना उठवतो = हादरवून सोडतो.

“ सौख्यकारी दुःखहारी दूत वैष्णवदायका “
सौख्यकारी = सुख देणारा
दुःखहारी = दुःखाचा नाश करणारा
दूत = रामाचा दूत. याविषयी सविस्तर आधी सांगितलेच आहे.
वैष्णवदायका = राम हा विष्णूचा अवतार = वैष्णव. मारुतीच्या उपासनेने त्याचा स्वामी असलेल्या रामाचीही कृपा प्राप्त होते अशी धार्मिक श्रद्धा आहे. वैष्णवदायक चा अर्थ इथे “विष्णूचा अवतार असलेल्या रामाची कृपा मिळवून देणारा” असा होतो.

“ दिनानाथा हरीरूपा सुंदरा जगदंतरा “
दिनानाथा = दीनानाथ असा मूळ शब्द. वृत्ताच्या सोयीसाठी दिनानाथ असा केला आहे. अर्थ – गोरगरिबांचा, दीन भक्तांचा वाली.
हरीरूपा = हरी = विष्णू = राम. त्या रामाचेच जणू एक रूप मारुती आहे अशी कल्पना केली आहे.

सुंदरा = सुंदर, देखणा (पुरुषाचे शरीर सौष्ठवपूर्ण, कमावलेले असले म्हणजे तो देखणा असतो हा संकेत इथे महत्त्वाचा आहे. मारुतीचे शरीर बळकट पिळदार होते असे सांगायचे आहे. )
जगदंतरा = जगदंतर म्हणजे परलोक. मारुती पारलौकीक आहे असे म्हणायचे आहे.

“ पातालदेवताहंता भव्य सिंदूरलेपना “
पातालदेवताहंता = पाताळातल्या दुष्ट शक्तींचा विनाश करणारा
भव्य = देहाने भव्य
सिंदूरलेपना = सर्वांगाला शेंदराचा लेप दिलेला. मारुतीच्या मूर्तीला शेंदूर लावतात. म्हणून असे म्हटले आहे.

“ लोकनाथा जगन्नाथा प्राणनाथा पुरातना “
लोकनाथा = नाथ म्हणजे आश्रयदाता, पालक. लोक म्हणजे जग. जगाचा पालक
जगन्नाथा = जगाचा पालक
प्राणनाथा = प्राणांचा म्हणजे जीवनाचा रक्षक. बलवान निरोगी शरीर दीर्घायू होते. आणि शरीर बलवान होण्यासाठी मारुतीची पूजा करावी हा संदर्भ इथे लक्षात ठेवावा.
पुरातना = पुरातन म्हणजे प्राचीन. हनुमान प्राचीन काळापासून आजतागायत अस्तित्वात आहे अशी श्रद्धा आहे. तो चिरंजीव = अमर आहे असे मानले जाते. त्या संदर्भात त्याला प्राचीन म्हटले आहे.

“ पुण्यवंता पुण्यशीला पावना परितोषका “
पुण्यवंता = पुण्यवान, पुण्यशीला = ज्याचे नित्य वर्तन हे पुण्यकर्मच असते असा.
पावना = पवित्र, परितोषका = आनंददायक

“ ध्वजांगे उचली बाहो आवेशे लोटला पुढे “
ध्वजांगे = ध्वजाचा एक भाग, उचली = उचलतो
बाहो = बाहूंनी, आवेशे लोटला पुढे = आवेशाने पुढे नेतो.
महाभारतीय युद्धात अर्जुनाच्या रथाच्या ध्वजावर हनुमान होता. त्याने आपल्या बाहुबलाने अर्जुनाचा रथ मोठ्या आवेशाने पुढे पुढे नेला, अर्जुनाच्या विजयात मोठ वाटा उचलला असा संदर्भ आहे.

“ काळाग्नी काळरुद्राग्नी देखता कापती भयें “
मारुतिला पाहून, काळ (मृत्यू)रूपी अग्नी, काळाचा (समय)रौद्र म्हणजे भयंकर अग्नी देखील भीतीने चळचळा कापू लागला. मृत्यू, समय कुणाला घाबरत नाही, ते अवध्य, अनिर्बंध आहेत अशी श्रद्धा आहे. पण मारुतीच्या बलापुढे त्यांनाही भीती वाटते.

“ ब्रह्मांड माइले नेणू आवळे दंतपंगती “
माइले = मावले, नेणू = नयनांत, डोळ्यांत
मारुतिच्या डोळ्यांत सारे ब्रह्मांड मावले आहे. तो रागाने दात ओठ खात आहे.

“ नेत्राग्नी चालिल्या ज्वाळा भृकुटी ताठिल्या बळें “
त्याच्या डोळ्यांतून रागाच्या ज्वाला जणू बाहेर पडत आहेत.
भृकुटी = भुवया. मोठ्या आवेशाने भुवया ताणून रागाने तो पाहत आहे. (अशा भयंकर रूपामुळेच काळ त्याला घाबरला आहे. )

“ पुच्छ ते मुरडिले माथां किरिटीं कुंडले बरी “
त्याने शेपूट फुलारले आहे, माथ्यावर मुकुट आणि कानात सुंदर कुंडले आहेत.

“ सुवर्ण कटी कासोटी घंटा किंकिण नागरा “
कमरेला सोन्याची कासोटी (अधोवस्त्र) बांधलेली आहे.
त्यावर त्याचा कडदोरा आपटून मंजुळ घंटानादासारखा अवाज येतो आहे.

“ ठका रे पर्वता ऐसा, नेटका सडपातळू “
असा हनुमान पर्वतासारखा उभा ठाकलेला आहे.
तो शरीराने बांधेसूद, सडपातळ आहे.

“ चपळांग पाहता मोठे महाविद्युल्लतेपरी “
चपळांग = शेपूट. त्याची शेपूट मोठी आहे आणि विजेसारखी चपळ आहे.
(हिच्याच जोरावर त्याने लंका दहन केले. )

“ कोटिच्या कोटी उड्डाणे झेपावे उत्तरेकडे “
कोटिच्या कोटी = मोठे, प्रचंड,
मोठे उड्डाण घेऊन हनुमान उत्तर दिशेला झेपावला.

“ मंदाद्रिसारिखा द्रोणू क्रोधें उत्पाटिला बळें “
त्याने मंदार पर्वतासारखा प्रचंड द्रोण पर्वत क्रोधाने मुळासकट उपटून काढला.

“ आणिला मागुती नेला आला गेला मनोगती “
तो पर्वत त्याने (लंकेच्या युद्धभूमीवर) आणला आणि परतही नेला. हा प्रवास त्याने मनाच्या प्रचंड वेगाने केला.

“ मनासी टाकिले मागे गतिसी तुळणा नसे “
खरे तर वेगाच्या बाबतीत त्याने मनालाही मागे टाकले.
संजीवनी मुळी ज्यावर सापडते तो द्रोणागिरी लक्ष्मणाचा जीव वाचवण्यासाठी हनुमानाने लंकेला उचलून आणला या घटनेचा हा सगळा संदर्भ आहे. मनाचा प्रवासाचा वेग सर्वात जास्त मानला जातो. त्या मनालाही मागे टाकणार्या वेगाने हनुमानाने हे काम केले आणि त्यामुळेच लक्ष्मणाचे प्राण वाचले. अक्खा पर्वत उचलून आणणे आणि अशा प्रचंड वेगाने प्रवास करणे यासाठी आवश्यक असलेले बळ हनुमानाजवळ होते त्या बळाची ही स्तुती आहे.

“ अणुपासोनी ब्रह्मांडाएवढा होत जातसे “
हनुमानाला अष्टसिद्धी प्राप्त होत्या. त्यातल्या दोन सिद्धींचा हा उल्लेख आहे.
अणिमा = अणुएवढा लहान देह करता येणे, महिमा = आपल्या इच्छेनुसार मोठ्यात मोठा आकार धारण करता येणे. येथे हनुमान अगदी अणुपासून ते संपूर्ण ब्रह्मांडाएवढा मोठा हूउ शकत असे असे वर्णन आहे. त्याने अणुरूप धारण करून अशोकवाटिकेत सीतेजवळ जाण्यात यश मिळवले आणि महाकाय रूप धारण करून समुद्रातील राक्षसीचा वध केला ह्यासारख्या कथांमध्ये त्याने या सिद्धीचा वापर केल्याचे उल्लेख सापडतात.

“ ब्रह्मांडाभोवते वेढे वज्रपुच्छें करू शके “
आपल्या वज्रासारख्या सामर्थ्यवान शेपटाने तो अक्ख्या ब्रह्मांडाभोवती वेढे घालू शकतो एवढे प्रचंड रूप तो धारण करू शकतो.

“ तयासी तुळणा कोठे मेरुमांदार धाकुटे “
हनुमानाशी कोणाशी तुलनाच होऊ शकत नाही.
मेरू, मांदार (मंदार) यासारखे प्रचंड पर्वतही त्याच्यापुढे धाकटे = लहान वाटतात.

“ तयासी तुळणा कैसी ब्रह्माण्डी पाहता नसे “
अशा या हनुमानाला सार्या विश्वात तुलनाच नाही.

“ आरक्त देखिले डोळां ग्रासिले सूर्यमंडळा “
त्याने जन्मल्या जन्मल्या लालभडक सूर्यबिंब पाहिले आणि त्याला फळ समजून ते गिळून टाकण्यासाठी उड्डाण केले.

“ वाढता वाढता वाढे भेदिले शून्यमंडळा “
शून्यमंडळ = संपूर्ण ब्रह्मांड, युनिवर्स. आपला आकार संपूर्ण विश्वाला भेदून जाईल असा मोठा करणे त्याला शक्य होते.

“ धनधान्यपशुवृद्धी पुत्रपौत्र समस्तही “
“ पावती रूपविद्यादी, स्तोत्रपाठे करोनिया “
हे स्तोत्र पठन करणार्याला धन धान्य पशुधन यांत वृद्धी= समृद्धी प्राप्त होते. पुत्रपौत्र रूप विद्या यांचा लाभ होतो.

“ भूतप्रेतसमंधादी रोग व्याधी, समस्तही “
“ नासती तूटती चिंता आनंदें भीमदर्शनें “
भीम = येथे मारुती. मारुतीचे दर्शन घेतले असता त्या आनंदाने भूत, प्रेत, समंध, सर्व रोग, आजार, वेदना नाहीशा होतात. चिंता नाहीशा होतात.
मारुतीची उपासना करून बल मिळवले म्हणजे शरीर निरोगी होते, आपल्या शक्तीच्या जाणीवेने भूत, प्रेत, समंध यांची भीती नाहीशी होते. निरोगी शरीरात मनही चिंतामुक्त, निरोगी राहण्यास मदत होते.

“ हे धरा पंधरा श्लोकीं लाभली शोभली बरी “
हे पंधरा श्लोकी स्तोत्र म्हणणार्यास लाभो, शोभो. म्हणजे याच्या पठनाने बल लाभूदे.

“ दृढदेहो निसंदेहो संख्या चंद्रकळागुणें “
जो हे स्तोत्र म्हणेल त्याला निश्चितपणे शुक्लपक्षातील चंद्राच्या कलेप्रमाणे सतत वृद्धिंगत होत जाणारा, बलिष्ठ देह प्राप्त होईल.

“ रामदासी अग्रगण्यू कपिकुळासी मंडणू “,
“ रामरूपी अंतरात्मा दर्शनें दोष नासती “
रामदासी अग्रगण्यू = रामाच्या सेवकांपैकी सर्वांत श्रेष्ठ,
कपिकुळासी मंडणू = कपी=वानर कुलाला भूषणावह,
रामरूपी अंतरात्मा = ज्याचा अंतरात्मा प्रत्यक्ष रामाच्याच ठिकाणी आहे अशा
अशा मारुतीच्या दर्शनाने सर्व, दोष, पापे यांचा नाश होतो.

प्रत्येक स्तोत्राच्या शेवटी फलश्रुती असते. त्यात हे स्तोत्र ऐकणे, म्हणणे, त्याचे नेमाने पठन करणे याने काय लाभ होतात याचे वर्णन असते. त्या त्या काळातील महत्त्वाचे असे जे भौतिक, धार्मिक, आध्यात्मिक लाभ असतील ते सगळे या स्तोत्राने होतील अशी योजना स्तोत्राच्या शेवटी केलेली दिसते. धनधान्य… दोष नासती या श्लोकांमध्य अशी फलश्रुती दिलेली आहे. समजून घेताना ती अक्षरशः खरी मानायची नसते. याचा अर्थ “या स्तोत्रामुळे सर्व प्रकारची समृद्धी मिळेल असा समजून घ्यावा लागतो. ”

“ इति श्रीरामदासविरचितं मारुतिस्तोत्रं संपूर्णम “
अशा प्रकारे रामदासांनी रचलेले मारुतिस्तोत्र पूर्ण झाले.

About Guest Author 512 Articles
मराठीसृष्टीवर ज्या लेखकांनी स्वत:चे अकाऊंट बनवले नाही त्यांचे लेख या Guest Author द्वारे प्रकाशित होतात. आपले सर्व लेख एकत्रितपणे मिळवण्यासाठी स्वत:चे अकाउंट मराठीसृष्टीवर जरुर बनवा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

कोकणचा मेवा – टिकाऊ पदार्थ

ताज्या कोकणी मेव्याची चव अनुभवणे ही पर्वणीच असते. मात्र वर्षभर ...

कोकणचा मेवा – जामफळ

उन्हाळ्यातील उष्णता कमी करण्यासाठी निसर्गत: डोंगर उतारावर येणारे फळ म्हणजे ...

कोकणचा मेवा – फणस

प्रवासात सामानाचे वजन वाहून नेतांना कष्ट पडतात. पण कोकणातला फणस ...

कोकणचा मेवा – जांभूळ

कोल्हापूरकडे जातांना आंबा घाटाच्या परिसरात जांभळाची झाडे अधिक प्रमाणात आहेत ...

Loading…