१३ डिसेंबर २०१५ रोजी नगर विकास मंचच्या ‘जल्लोश’ या मोठ्या इव्हेंटचे दीपप्रज्वलन माझ्या हस्ते करण्यात आले. या समारंभात आमदार संजय केळकर यांनी माझ्या एक हजाराव्या कार्यक्रमाची तारीखच जाहीर केली. मला ‘ठाणे नगर रत्न’ पुरस्कार जाहीर करून सुभाष काळे यांनी या वर्षाची उत्साही सुरुवात केली होती. सुभाषजींच्याच ‘जल्लोश’ या इव्हेंटने २०१५ या वर्षाची सांगता झाली.
१ जानेवारी २०१६ रोजी निकटवर्तीयांची मी एक कमिटी स्थापन केली आणि त्यांची सभा घेतली. “सर, तुम्ही काळजी करू नका. आपल्याकडे या आयोजनासाठी चार महिने आहेत.” एक जण म्हणाला.
“तेच तर मी सांगतोय. आपल्याकडे या आयोजनासाठी फक्त चार महिने आहेत. तेही पूर्ण नाहीत.”
माझ्या या वाक्याने मंडळी भानावर आली. प्रथम सर्व वादकांच्या तारखा घेतल्या. माझे सर्व वादक कलाकार अमेय, अजय, गिरीश, सागर, सुजित आता अनेक कार्यक्रमात साथ करत असल्याने बरेच व्यस्त झाले होते. त्यामुळे अनेकदा मलाही त्यांची तारीख मिळत नसे. त्यासाठी मी प्रत्येक वाद्यासाठी दोन वादकांचा पर्याय ठेवला होता. या कार्यक्रमासाठी मात्र मी सर्वांना साथीसाठी बोलावले. ‘अलिबाबा आणि चाळीस चोर’
या कथेचा संदर्भ देऊन भाऊ नेहमी गंमतीने म्हणत, ‘चोरांचे आणि गायकांचे काम साथीदारांशिवाय होऊ शकत नाही.’ गंमतीचा भाग सोडला तर त्यांचे म्हणणे अगदी खरे होते. माझ्या एक हजार कार्यक्रमांच्या वाटचालीत या वादकमित्रांची मोलाची साथ मला लाभली. कधी माझी गाडी ठीक नसेल तर अजय किंवा अमेय गाडी काढत असत. कधीही त्यांनी आढेवेढे घेतले नाहीत. कधी कधी स्टेजवर आयत्या वेळी गाणी बदलावी लागली तर गिरीश आणि सुजित नेमकी गाणी सुचवत. कार्यक्रमात सागर टेमघरे असेल तर साऊंड सिस्टीमबरोबर वाद्यांचा ताळमेळ तो बसवून घेत असे. मला कोणतीही काळजी नसे. अजय दामले आणि अमेय ठाकुरदेसाई हे माझे खंदे तबलजी! गाताना तबल्याच्या लयीसाठी कधीही मला त्यांच्याकडे बघावेही लागत नसे. प्रत्येक गझल आणि गाण्याला ते उत्तम साथ करत. विशेषतः गझलसाठी तबल्याची साथ देणे हे बरेच कठीण काम असते. पण या दोन्ही तबलजींनी माझ्या सर्व कार्यक्रमांची लय उत्तम सांभाळली.
हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर होणार असल्याने त्याचा अपेक्षित खर्चही बराच जास्त होता. पण त्यासाठी प्रायोजकांशी बोलताना यावेळी वेगळाच अनुभव आला. माझा हजारावा कार्यक्रम ठरतोय हे समजताच सोने चांदीची ठाण्यातील प्रसिद्ध पेढी चालवणारा माझा मित्र जय बायकेरीकर माझ्या घरी आला. “आपला एक हजारावा कार्यक्रम आहे. खर्चाचा विचार करू नको. किती पैसे हवेत ते फक्त सांग.” जय म्हणाला. त्याचा ‘आपला एक हजारावा कार्यक्रम’ हे शब्द ऐकून मला गहिवरून आले.
माझे मित्र प्रेशिया फार्मा कंपनीचे संजय पवार यांचा फोन आला, “आम्ही या कार्यक्रमाचे प्रायोजक आहोत. कार्यक्रम जोरदार झाला पाहिजे.” संजयजी म्हणाले.
कोणत्याही सांस्कृतिक कार्यक्रमाच्या पाठीशी कायम उभे राहणारे ‘पितांबरी’चे रवींद्र प्रभुदेसाई म्हणाले, “अनिरुद्ध, तुझा हजारावा कार्यक्रम ही आम्हा सर्व ठाणेकरांसाठी अभिमानाची बाब आहे. आम्ही तुझ्याबरोबर आहोतच.” या सर्व मंडळींचा आपलेपणा, प्रेम ही एक हजार कार्यक्रम करताना मला मिळालेली मोठीच कमाई होती.
या समारंभाच्या निमित्ताने एक स्मरणिका काढायचे आम्ही ठरवले. यातील जाहिरातींसाठीही उत्तम प्रतिसाद मिळाला. अनेक विद्यार्थ्यांनी यासाठी लेख लिहिले. ‘स्मरणिकेवरचा फोटो नवीन पाहिजे हं सर !’ या मागणीनुसार माझे
फोटोशूट करण्यात आले. ‘या कार्यक्रमासाठी नवीन ड्रेस हवा हं बाबा.’ असे म्हणत शर्वरी, केतकी आणि प्रियांका खरेदीसाठी मला दुकानात घेऊन गेल्या. अर्थात माझ्यापेक्षा त्यांची खरेदी जास्त होती, हे वेगळे सांगायला नकोच. कार्यक्रमासाठी नवीन ड्रेस फक्त माझ्यासाठीच नाही तर त्यांच्यासाठीही हे तेव्हा माझ्या लक्षात आले. ‘या कार्यक्रमासाठी तुमचीच काय पण आमची देखील भरपूर खरेदी झाल्येय.’ माझी विद्यार्थिनी वर्षा जोशी म्हणाली. ती आणि तिची मुलगी शताक्षी यांनीदेखील बरीच खरेदी केली होती. एकूण माझ्या एक हजाराव्या कार्यक्रमामुळे कपडे उद्योगाचा बराच फायदा होत होता.
अनेक मान्यवरांच्या उपस्थितीसाठी आमच्या कमिटीने संपर्क करताच बहुतेक सर्वांनी त्वरित होकार दिला. ‘स्वर – मंच’च्या सर्व विद्यार्थ्यांचा उत्साह तर अवर्णनीय होता. सर्व विद्यार्थी मिळून या कार्यक्रमासाठी एक गाणे बसवत होते. माझा विद्यार्थी संगीतकार विकी अडसुळे त्याचे संगीत संयोजन करत होता. या सर्व गोष्टींचा मला थांगपत्ता नव्हता. एकूणच मला नकळत यावेळी अनेक गोष्टींचे आयोजन होत होते. माझ्यासाठी हीच आनंदाची बाब होती. आजच्या काळात गुरुजनांबद्दलचा आदर कमी होत चालला आहे असे आपण अनेकदा ऐकतो. मला मात्र अगदी याहून वेगळा अनुभव येत होता.
कार्यक्रमाचा दिवस जसजसा जवळ येऊ लागला तसतसे कार्यक्रमाच्या जाहिरातीचे बोर्ड ठाणे शहरात लागू लागले. वर्तमानपत्रातून जाहिराती सुरू झाल्या. कार्यक्रमाची तिकीटविक्री सुरू झाली आणि दोन तासातच संपली. कारण प्रायोजकांसह अनेक निमंत्रित येणार असल्याने जास्त तिकीटे उपलब्धच नव्हती. दोन तासातच कार्यक्रम ‘हाऊसफुल्ल’ झाला. अशावेळी ‘कार्यक्रम हाऊसफुल्ल, रसिकांना धन्यवाद’ अशा जाहिराती वर्तमानपत्रातून झळकतात. आमच्या कमिटीची अवस्था मात्र बिकट झाली. कारण अनेकांना कार्यक्रमाला यायचे होते, पण तिकीटेच शिल्लक नव्हती. माझ्या पहिल्या कार्यक्रमाच्या वेळी गडकरी रंगायतनच्या अकराशे सीटस् कशा भरणार याची भाऊ चिंता करत होते. बरोबर तीस वर्षानंतर ‘कार्यक्रम तर हाऊसफुल्ल आहे, आता इतरांना कुठे बसवू’ अशी मी चिंता करत होतो. मी तोच होतो, गडकरी रंगायतन तेच होते, पण तीस वर्षांच्या अविरत परिश्रमांनी मी चित्र बदलले होते.
कार्यक्रमाला तीन दिवस उरले. आमच्या रिहल्सल सुरू झाल्या होत्या. कार्यक्रमाची कमिटी आणि माझे सर्वच विद्यार्थी अहोरात्र काम करत होते. मेघना देशपांडे, वर्षा जोशी, रश्मी वाळवेकर, मोहन जोशी, विनय भावे, प्रीती राणे, विकी अडसुळे, साकेत मुंद्रा, सानिका देशपांडे, शताक्षी जोशी, इशा सावंत, गांधर्वी वाळवेकर, प्रज्ञेन राऊत, आरती खूने, मंदार जोशी, आशिष नाखरे, रूद्राक्ष खूने, किरण मोहिते, रोहित ननावरे, शिवानी नेमावरकर, वंदना परांजपे, राणू दत्ता, वर्शिन गिल्डर, अनुष्का शिंदे, श्री पेंडसे, सौरभ ढगे, साहिल सोनाळकर, प्रिया कुलकर्णी, भूषण वैद्य, अनिरुद्ध नायर, दीपा गुप्ते, संजीव सोमण, विवेकानंद मुंढे, मधुरा देशपांडे, श्रीराम देशपांडे, मोहिनी आणि आदिती म्हसेपाटील, महेश गुप्ते, प्राची पेडणेकर, रेखा दामले, सुलभा पुराणिक, सोमाभाऊ भास्कर, दिनेश पाटील, कादंबरी शिंदे, मैत्रेय सोहोनी, वैशाली सोनाळकर, चंद्रशेखर दामले, आकाश गोंडाबे, कौस्तुभ दाभोळकर, कौस्तुभ सोनाळकर, ऐश्वर्या मायदेव, सुरेंद्र सरोदे किती नावे सांगू?
– अनिरुद्ध जोशी
Leave a Reply