नवीन लेखन...

दर्जेदार काव्य रचना करणारे कवि राजा बढे

कळीदार कपूरी पान’, ‘चांदणे शिंपीत जाशी’, ‘जय जय महाराष्ट्र माझा’ अशा दर्जेदार काव्य रचना करणारे कवि राजा बढे यांचा जन्म १ फेब्रुवारी १९१२ रोजी झाला. राजा बढे हे नावाप्रमाणंच राजा-माणूस होते. राजा बढे हे नामवंत गीतकाव्य आणि भावकाव्य लिहिणारे कवी… रुबाबदार,प्रसन्न व्यक्तिमत्त्व, राजस छबी, कुसुमकोमल भावनांना शब्दबद्ध करणारा, कोमलवृत्तीचा हा प्रतिभासंपन्न कवी, पण मनात देशभक्तीचा स्फुलिग सांभाळणारा राष्ट्रप्रेमी म्हणजे राजा बढे. आजच्या पिढीला कदाचित राजा बढे हे नावसुद्धा माहीत नसेल. परंतु ज्यांच्या गीतांची सुदैवाने चिरफाड न होता त्यावर रिमिक्सचा मुलामा चढलेला नाही, अशी गीते राजा बढे यांच्या नावावर आहेत. राजा बढे यांचे जन्म नागपूरचा. प्राथमिक शिक्षण छिंदवाडा येथे तर माध्यमिक शिक्षण नागपूरच्या टिळक विद्यालयात झाले.

१९३५ मध्ये त्यांनी पंजाब मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण केली. पुण्याच्या दैनिक ‘सकाळ’ मध्ये संपादकीय विभागात त्यांनी नोकरी केली. नागपूरच्या दैनिक ‘महाराष्ट्र’ मध्ये एक वर्ष ते सहसंपादक होते. त्याचवेळी ‘वागीश्वरी’च्या संपादक मंडळात ते कार्यरत होते. पुढे साप्ताहिक ‘सावधान’ मध्ये मावकर-भावे यांच्यासोबत त्यांनी कार्य केले. दरम्यान कॉलेज करून पदवी प्राप्त करण्याचा त्यांचा प्रयत्न अपुरा राहिला. त्यांनी बरचसं स्फुटलेखन “कोंडिबा’ या टोपणनावानं केलं. वयाच्या सतरा-अठरा वर्षांपासूनच कविता लिहू लागले. नवकवींच्या काव्यसंग्रहात राजा बढे यांच्या कवितांना विशेष स्थान असे. ‘ओहोळ’ हा त्यांचा पहिला काव्यसंग्रह. कवितांची आवड जोपासणाऱ्या बढे आई-वडिलांच्या निधनानंतर मोठा भाऊ म्हणून लहान भावंडांची जबाबदारी, पालनपोषण यातच सर्वस्व मानून स्वत: अविवाहित राहिले.

१९४० च्या आसपास चित्रपट व्यवसायात त्यांनी प्रवेश केला. ‘सिरको फिल्म्स’ मध्ये दोन वर्ष त्यांनी कामे केली. १९४२ मध्ये ते “प्रकाश स्टुडिओ’त रुजू झाले आणि त्यांनी “रामराज्य’ चित्रपटाची गाणी लिहिली. महेश कौल सोबत ‘अंगुरी’ चित्रपटात काम केले. पुढं १९४४ मध्ये ते मराठी रंगभूमीकडं वळले. आळतेकर यांच्या “लिट्‌ल थिएटर्स’च्या “कलेसाठी सारस्वत’ नाट्यप्रयोगात त्यांची भूमिका होती. ‘संत बहिणाबाई,’ ‘गळ्याची शपथ’ या चित्रपटांसाठी त्यांनी गीतलेखन केले. १९५६ ते १९६२ या कालखंडात ते आकाशवाणीवर ‘निर्माता’ म्हणून कार्यरत होते. आपल्या वाङ्मयीन अभिरुचीला पोषक ठरतील, अशा व्यवसायांसी धरसोड ते आयुष्यभर करीत राहिले, तरी आपले कवित्व ते सतत सांभाळून होते. “चांदणे शिंपीत जाशी, चालता तू चंचले’, “दे मला गे चंद्रिके प्रीती तुझी’, “प्रेम केले काय हा झाला गुन्हा?’ इत्यादी सुरेल भावगीतं त्यांनी लिहिली. स्त्रियांचे मनोभाव आकर्षकरीत्या शब्दबद्ध करण्यात बढे सिद्धहस्त होते. “वाट कशी चुकले रे’, “कधी न पाहिले तुला’, “होशी तू नामानिराळा’, “काय कोणी पाहिले,’ “मला मोहू नका’ इत्यादी गीतांमधून व्याकुळता, विरहार्तता, मीलनातुरता असे मनोभाव त्यांनी नाट्यपूर्ण रीतीनं चितारले आहेत. संस्कृत काव्याचा त्यांचा चांगला अभ्यास होता. आपली भाषा अलंकृत करण्याची क्षमता त्यांच्यात असली तरी संस्कृत शब्दांच्या भाराखाली ती दडपली जाणार नाही, याचं भान बढे यांच्या गीतांमध्ये दिसतं.

बढे यांचा उर्दू शायरीचाही अभ्यास होता. त्या पद्धतीच्या भावाविष्काराचा ढंग आणि कल्पनाविलासाची पद्धत बढे यांनी त्यांच्या काही गझलसदृश भावगीतांमध्ये अंगीकारली. स्वातंत्र्यवीर सावरकर हे बढे यांचं परमदैवत होतं. दिग्दर्शक विजय भट यांच्या ‘रामायण’ चित्रपटाकरिता स्वातंत्र्यवीर सावरकरांनी गीतकार म्हणून राजा बढे यांचे नाव सुचविले. या चित्रपटातील ‘सृजनहो परिसा रामकथा, जानकी जीवन विरह व्यथा’ हे बढे यांनी लिहिलेले गीत काळजाचा ठाव घेणारे ठरले. त्यानंतर महात्मा विदूर, गळ्याची शपथ अशी काही चित्रपटांसाठी गीतलेखन त्यांनी केले. हे करीत असताना व्यावसायिक हेतू त्यांनी कधीच ठेवला नाही. धोतर, कुडता असा वेष आणि वरण-भात प्रिय असणाऱ्या बढेंच्या लेखी पैशाला फारसे महत्त्व नव्हते. कामाला महत्त्व देणाऱ्या बढेंच्या अनेक भावगीतांमधून कवीच्या भावना हळुवार प्रकट होतात आणि मनाला विलक्षण आनंद देऊन जातात. म्हणूनच लता मंगेशकर, आशा भोसले बढे यांच्या गीतांवर प्रेम करीत. ‘हसताच नार ती अनार मनी फुले’ ही बढे यांची गजानन वाटवे यांनी गायिलेली, ‘हसतेस अशी का मनी’ लता मंगशकरांनी गायलेली, तर ‘चांदणे शिपीत जा’ ही आशा भोसले यांनी गायिलेली गीतरचना , कुमार गंभर्वांनी ‘प्रेम केले काय हा झाला गुन्हा’ ही बढे यांची गायिलेली रचना लोकप्रिय झाली. राजा बढे हे कट्टर हिदुत्ववादी होते. स्वा. सावरकर हे त्यांचे दैवत होते. त्यांचे राष्ट्रप्रेम त्यांच्या ‘क्रांतिमाला’ या संग्रहातून वेळोवेळी दिसून येते. त्यात २१ कविता आहेत. स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळातील देशभक्तिपर गीते आहेत.

प्रत्यक्ष सावरकरांनी ‘प्रस्तावनेत’ ‘‘आपण स्वत:च नामवंत, सुप्रतिष्ठित प्रतिभासंपन्न साहित्यिक असल्याने, माझ्या प्रस्तावनेची गरज नाही” असे गौरवोद्गार काढले आहेत. १९३५ ते १९५९ दरम्यानच्या सामाजिक-राजकीय घडामोडींचे पडसाद यात आहेत. ‘विस्मृतीत गुंफलेली क्रांतिमाला’, ‘गगनात आज जो चंद्र सुखे मिरवावा । ते तेज घेऊनी करिती काजवे कावा । तो बाबू गेनू, कोतवाल उरलेले । विसरलो अनामिक किती बळी गेलेले’, ‘सुजला सुफला देश आमचा’, ‘हिमालय थिजला । थिजला धीरचा । गंगा सिधुतुनी वाहतो प्रवाह रुधिराचा’ अशा सर्वच कवितांमध्ये मंगल पांडे, हुतात्मा फडके, चाफेकर, सेनापती बापट अशा क्रांतिवीरांची नावे गुंफून त्यांना विस्मृतीत टाकल्याचे दु:ख व्यक्त केले आहे. ‘घडू दे पुन्हा एकदा भारत’ मधून सावरकरांच्या दिव्य देशभक्तीचा गौरव केलेला असून, ‘नवोन्मेषशाली कवींच्या कवे’ असे सावरकरांना संबोधले आहे. राजा बढे यांनीच. १९६४ साली मुंबईत बढे यांच्या पुढाकाराने प्रथमच कथाकथनचा कार्यक्रम झाला, या कार्यक्रमात पु. ल. देशपांडे, गदिमा यांनी प्रथमच कथा कथन केल्या होत्या.

मुंबई आकाशवाणीवरच्या नोकरीनंतर बढे यांनी छोटे छोटे माहितीपट करून दिले. नंतर बंधू बबनराव यांच्या मदतीनं त्यांनी “स्वानंद चित्र’ ही संस्था उभी केली आणि “रायगडचा राजबंदी’ हा संभाजीमहाराजांच्या जीवनावरील चित्रपट काढला. गीत, गझल याप्रमाणेच ‘चारोळी’ हा रचनाप्रकार बढे यांनी हाताळला. ‘कोंडिबा’ हे टोपण नाव वापरून काही राजकीय वात्रटिका त्यांनी लिहिल्या… त्या मुंबईच्या ‘विविधवृत्त’ साप्ताहिकातून प्रकाशित झाल्या होत्या. राजा बढे हे केवळ कवी नव्हते. काव्याखेरीज ‘किती रे दिन झाले,’ ही पत्रमय कादंबरी; ‘स्वप्नगंधा’,‘चतुर किती बायका,’ ‘ही रात सवत बाई,’ ‘पेचप्रसंग,’ ‘अशी गंमत आहे’ अशी पाच नाटके त्यांनी लिहिलीत… तरी बढेंची ओळख कवी म्हणूनच कायम राहिली. “गर्जा महाराष्ट्र माझा’ हे महाराष्ट्रगीत म्हणजे कविवर्य राजा बढे यांच्या काव्यप्रतिभेचा परमोच्च बिंदू होय. १९६० साली संयुक्त महाराष्ट्राची घोषणा झाली. या विजयानिमित्त बढे यांच्या या रचनेची ध्वनिमुद्रिका “एचएमव्ही’नं तयार केली.

शाहीर साबळे यांच्या खड्या आवाजातील आणि संगीतकार श्रीनिवास खळे यांचा स्वरसाज असलेल्या या गीताने महाराष्ट्राची थोरवी सातासमुदापार पोहोचवली.. संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर ठिकठिकाणी कार्यक्रमांत ऐकवलं जाणारं हे गीत आजही तितकंच ताजं, टवटवीत आहे. राजा बढे यांना पान खायची भारी हौस होती. याच पानावर त्यांनी ‘कळीदार कस्तुरी पान’ लावणी लिहिली. ती सुलोचना चव्हाण यांनी अशा ठसक्यात गायिली की, भल्याभल्यांना पानाचा मोह आवरायचा नाही. पण अनेकांना ती राजा बढे यांनी लिहिली आहे, हे माहित पण नसेल.
त्यांनी एक कविता स्वतःविषयीच लिहिली… ते दोन “राजां’चं वर्णन होतं.
तेव्हा आणि आता…
एक राजा –
टोपी किंचित उंच, नीट कलती बाजूस डोकावित
खासे धोतर, पायघोळ अगदी, टाचेवरी लोळत..
ओठांनी रसरंग फेकित सदा या मंगलाचे धडे
आहे काय म्हणुन काय पुसतां? तो हाच राजा बढे..

दुसरा राजा –
टोपी सोडून, मुंबईस फिरतो, आता सदा बोडखा
बंगाली डगला, न पालट दुजा, खाक्या जुना सारखा..
आहे तोच विडा, अजूनही तसे, ते मंगलाचे सडे
जैसा नागपुरात, आजही तसा, तो हाच राजा बढे..
ज्येष्ठ दिवंगत कविवर्य वा. रा. कांत यांनी बढे यांच्याविषयी म्हटलं आहे:-
“आपल्या कवितेचा धर्म ओळखून शेवटपर्यंत मनाला आल्हाद देणाऱ्या कविता लिहिण्याचं ‘चांद्रव्रत’ त्यांनी निष्ठेनं पार पाडलं, यातच त्यांची थोरवी आहे….हा कवी जन्मभर चांदणं शिंपीत जगला आणि चांदणं शिंपीत शिंपीत अचानक निघून गेला. ह्या “चांद्रव्रती’ची आठवण विझणं अशक्य!!” राजा बढे यांचे ७ एप्रिल १९७७ रोजी निधन झाले.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..