नवीन लेखन...

कनकधारास्तोत्रम्- मराठी अर्थासह

श्रीमद् आदिशंकराचार्य विरचित  कनकधारास्तोत्रम्- मराठी अर्थासह

एका दंतकथेनुसार, आचार्यांच्या कालडि गावातील एका निर्धन ब्राह्मणाला दारिद्र्यापासून मुक्त करण्यासाठी रचलेले हे ‘कनकधारा स्तोत्र’ लक्ष्मी स्तुतिपर एक अत्यंत श्रेष्ठ स्तोत्र आहे.

पहिल्या व दुस-या श्लोकात आचार्यांनी दृष्टान्त अलंकारातून लक्ष्मीच्या सलज्ज कटाक्षांचे यथार्थ  चित्रण केले आहे. ते वाचून ‘लाजून हासणे अन हासून ते पहाणे’ या भावगीताची आठवण झाल्याखेरीज रहात नाही. एका श्लोकात लक्ष्मीच्या डोळ्यांना तर दुस-या श्लोकात लक्ष्मीलाच भ्रमरी कल्पिले आहे. सहाव्या, सातव्या व आठव्या श्लोकात श्री लक्ष्मीच्या कटाक्षांची महती वर्णन केली आहे व तिचा कृपाकटाक्ष मजवर पडो अशी प्रार्थना केली आहे.

अकराव्या श्लोकापासून लक्ष्मीच्या स्त्रीशक्तीच्या विविध वैशिष्ट्यांचे सर्वसमावेशक वर्णन व नमन आहे.

या अत्यंत रसाळ व भक्तिपूर्ण स्तोत्रात मुख्यत्वे वसंततिलका, रथोद्धता व वैतालीय/सुंदरी या वृत्तांचा उपयोग केला आहे. खिल(श्री)सूक्तातील ‘सरसिजनिलये’ हा श्लोक  औपच्छन्दसिक/पुष्पिताग्रा वृत्तात आहे.


अङ्गं हरेः पुलकभूषणमाश्रयन्ती
भृङ्गाङ्गनेव मुकुलाभरणं तमालम् ।
अङ्गीकृताखिलविभूतिरपाङ्गलीला
माङ्गल्यदास्तु मम मङ्गलदेवतायाः ॥ १॥

मराठी- ज्याप्रमाणे भ्रमरी कळ्यांनी सजलेल्या तमाल वृक्षाचा (आश्रय घेते), त्याप्रमाणे विष्णूच्या रोमांचित शरीराचा आश्रय घेणारी, जिच्यात संपूर्ण ऐश्वर्य एकवटलेले आहे, माझ्या पवित्र देवतेची अशी कटाक्ष लीला मंगलकारक होवो.

भृंगी जशी बिलगते फुलल्या तमाला
रोमांच विष्णुतनुचे जणु आस-याला ।
ऐश्वर्य एकवटले सगळे जगीचे
होवोत विभ्रम कटाक्ष शुभ देवतेचे ॥ ०१


मुग्धा मुहुर्विदधती वदने मुरारेः
प्रेमत्रपाप्रणिहितानि गतागतानि ।
माला दृशोर्मधुकरीव महोत्पले या
सा मे श्रियं दिशतु सागरसम्भवायाः ॥ २॥

मराठी- विशाल कमळाकडे जाणा-या आणि परत येणा-या भ्रमरीसारखी, श्रीहरीच्या मुखाकडे पुनः पुनः हेतुतः प्रेमाने टाकलेल्या आणि संकोचाने दूर गेलेल्या समुद्रकन्ये (लक्ष्मी) च्या कटाक्षांची मालिका मला धन संपत्ती देवो.

भृंगी जशी कुवलयाप्रत येरझारा
लक्ष्मी कटाक्ष हरिच्या वदनास फेरा ।
प्रेमे सहेतुक सलज्ज पुनश्च येती
ऐश्वर्य दान मजला दिठिगोफ देती ॥ ०२    (दिठी- दृष्टी)


आमीलिताक्षमधिगम्य मुदा मुकुन्दं
आनन्दकन्दमनिमेषमनङ्गतन्त्रम् ।
आकेकरस्थितकनीनिकपक्ष्मनेत्रं
भूत्यै भवेन्मम भुजङ्गशयाङ्गनायाः ॥ ३॥

मराठी- आनंदाने नेत्र अर्धवट मिटलेल्या (समाधि अवस्थेतील), आनंदाचा साठा असलेल्या श्रीहरीला मिळवून (पाहून) मदनाचा फौजफाटा असलेला तिरकी बाहुली व पापणीचा, शेषावर निद्रिस्त झालेल्या (श्रीहरी)च्या भार्येचा एकटक नेत्र माझ्या कल्याणाला कारणीभूत ठरो.

देखे रमा निजसुरा हरि मोदरूपा          (निजसुरा-अर्धोन्मीलित नेत्र अवस्था)
पाहात एकटक तिर्यक दृष्टिक्षेपा ।        (तिर्यक – तिरका)
भ्रू बाहुली सकट नेत्रही वक्र केला
ऐसे रती पथक दे मज दौलतीला ॥ ०३


बाह्वन्तरे मधुजितः श्रितकौस्तुभे या
हारावलीव हरिनीलमयी विभाति ।
कामप्रदा भगवतोऽपि कटाक्षमाला
कल्याणमावहतु मे कमलालयायाः ॥ ४॥

मराठी- मधु राक्षसाला जिंकणा-या (श्रीहरी) च्या जिथे कौस्तुभमणी बिलगलेला असतो त्या छातीवर रुळणा-या निळ्या पिवळ्या मोत्यांच्या माळेप्रमाणे शोभते, जी भगवंताचेही इच्छित पुरवते, ती कमळात वस्ती करणारी (लक्ष्मी) ची कटाक्षांची माळ माझे कल्याण करो.

वक्षास कौस्तुभ मणी बिलगे हरीच्या
शिति नि पीतहि मोतियांच्या ।                (शिति- निळा)
श्रीची कटाक्ष रशना हरिलाहि भावे
कल्याणकारक मला वरदान व्हावे ॥ ०४


कालाम्बुदालिललितोरसि कैटभारेः
धाराधरे स्फुरति या तडिदङ्गनेव ।
मातुः समस्तजगतां महनीयमूर्तिः
भद्राणि मे दिशतु भार्गवनन्दनायाः ॥ ५॥

मराठी- कैटभ राक्षसाच्या शत्रूच्या, काळ्या ढगाच्या रंगाच्या भुंग्यांप्रमाणे मोहक असलेल्या वक्षावर मेघांमध्ये चमकणा-या विजेसारखी जी झळकते त्या सर्व जगाची जननी असणा-या भार्गवाच्या कन्येची महान मूर्ती माझे कल्याण करो.

मेघा जशा मधुप-कृष्ण उरी हरीच्या
स्त्री-रूप वीज चमके मधुनी ढगांच्या ।
मूर्ती महान हरिणी जगमाउलीची         (हरिणी- लक्ष्मी)
दात्री ठरो भृगुसुता मम सुस्थितीची ॥ ०५


प्राप्तं पदं प्रथमतः खलु यत्प्रभावान्-
माङ्गल्यभाजि मधुमाथिनि मन्मथेन ।
मय्यापतेत्तदिह मन्थरमीक्षणार्धं
मन्दालसं च मकरालयकन्यकायाः ॥ ६॥

मराठी- खरोखर ज्याच्या प्रभावामुळे मदनाने मधु राक्षसाच्या मंगलमय शत्रू (च्या मना) मध्ये पहिले पाऊल ठेवले, तो सागर कन्येचा चंचल सौम्य किलकिला अर्धा कटाक्ष येथे मजवर पडो.

ज्याच्यामुळे प्रथम पाऊल मन्मथाचे
चित्ती पवित्र हरीच्या अवतीर्ण साचे ।
तो कोवळा किलकिला दरिया-सुतेचा
लाभो कटाक्ष मज चंचल सौम्य साचा ॥ ०६


विश्वामरेन्द्रपदविभ्रमदानदक्षं
आनन्दहेतुरधिकं मुरविद्विषोऽपि ।
ईषन्निषीदतु मयि क्षणमीक्षणार्ध-
मिन्दीवरोदरसहोदरमिन्दिरायाः ॥ ७॥

मराठी- विश्वातील देवांचा अधिपती इंद्राचे पद आपल्या लीलेतून देण्याची क्षमता असलेले, मुराचा शत्रू श्रीहरीला आनंदित करणारे, नीलकमलाच्या गाभ्याचा भाऊच असल्यासारखे (निळेशार) असणारे श्रीलक्ष्मीचे अर्धोन्मीलित नेत्र (कटाक्ष) क्षणभर तरी माझ्यावर पडोत.

देण्या सुरेश्वर पदा सहजी जगी या
इन्द्रास सक्षम, पुरे हरिला खुलाया ।
कोषातुनी किलकिल्या शितिपुष्प नेत्री
लक्ष्मी-कटाक्ष पडु दे क्षणमात्र गात्री ॥ ०७


इष्टाविशिष्टमतयोऽपि यया दयार्द्र
दृष्ट्या त्रिविष्टपपदं सुलभं लभन्ते ।
दृष्टिः प्रहृष्टकमलोदरदीप्तिरिष्टां
पुष्टिं कृषीष्ट मम पुष्करविष्टरायाः ॥ ८॥

मराठी- जिच्या कृपेने ओथंबलेल्या नजरेमुळे, इच्छित गोष्टींसाठी यज्ञ किंवा इतर बलिदान करण्यासाठी कल नसणा-यांनाही स्वर्गातील जागा सहज मिळते, त्या कमळात आसन असणारीची नजर, जिला प्रफुल्लित कमळाच्या गाभ्याचे तेज आहे, माझ्या इच्छेची भरभरून पूर्तता करो.

स्वर्गात त्या मिळतसे सहजीहि जागा
चित्ती विचार करण्या नच यज्ञ यागा ।
पद्मासना, कमल कोष प्रभा फुलोनी
दृष्टी दयार्द्र मज वांछित दे प्रदानी ॥ ०८


दद्याद्दयानुपवनो द्रविणाम्बुधारां
अस्मिन्नकिञ्चनविहङ्गशिशौ विषण्णे ।
दुष्कर्मघर्ममपनीय चिराय दूरं
नारायणप्रणयिनीनयनाम्बुवाहः ॥ ९॥

मराठी- (लक्ष्मीच्या मनात उत्पन्न झालेला भक्तांप्रतीचा) दयारूपी अनुकूल वायू दुष्कृत्य रूपी (दुष्कृत्यांमुळे येणा-या दुःखरूपी) घामाला कायमचे दूर हटवून नारायणाच्या प्रेयसीचे नेत्र रूपी मेघ या हताश कंगाल चातकाच्या पिल्लावर संपत्तीच्या धारा देवो.

टीप- काही अभ्यासकांच्या मते या श्लोकात या स्तोत्राची जन्मकथा दडलेली आहे. आचार्य एका ब्राह्मणाच्या घरी भिक्षेसाठी गेले असता, घरातील वृद्ध स्त्रीने त्यांना घरात शिल्लक असलेला एकमेव वाळका आवळा दिला. ते पाहून हेलावलेल्या आचार्यांनी या स्तोत्राची रचना केली व महलक्ष्मीने त्याला प्रतिसाद देत धनवर्षाव केला. [येथे ‘विहंग शिशू’ ही शब्दरचना द्वर्थी आहे. ढगातून पडाणारे पावसाचे पाणी पिणारा चातक पक्षी व निर्धन ब्राह्मण हे दोन्ही अर्थ विहंग (द्विज- पक्षी व ब्राह्मण) या शब्दातून सूचित होतात.]

वायू दयात्म अनुकूल, दुष्कृत्य रूपी
घामा सुदूर हटवून, सुनेत्र रूपी ।
मेघातुनी सुरभिच्या सर दौलतीची         (सुरभी – लक्ष्मी)
कंगाल चातक पिलावर खिन्न साची ॥ ०९


गीर्देवतेति गरुडध्वजसुन्दरीति
शाकम्बरीति शशिशेखरवल्लभेति ।
सृष्टिस्थितिप्रलयकेलिषु संस्थितायै
तस्यै नमस्त्रिभुवनैकगुरोस्तरुण्यै ॥ १०॥

मराठी- (या) जगताची उत्पत्ती, स्थिती आणि लय या खेळांमध्ये (अनुक्रमे) (ब्रह्मदेवाची पत्नी) वाग्देवता, ज्याच्या ध्वजावर गरुड आहे अशा (विष्णू)ची रमणी,शाकम्भरी (दुर्गा),ज्याच्या शिरावर चंद्र आहे अशा (शंकरा)ची पत्नी म्हणून स्थिर राहिलेल्या तिन्ही जगतांच्या एकमेव गुरूच्या तरुण स्त्रीला माझे नमन.

वाग्देवता, प्रियतमा गरुडध्वजाची
शाकम्भरी, प्रियतमा प्रलयंकराची ।
खेळात नाश प्रतिपाळ,निर्माण राही
त्या यौवनेस गुरुच्या जगि वंदना ही ॥ १०

टीप- काही आवृत्तीमध्ये ‘गीर्देवता’ ऐवजी ‘धीर्देवता’ असा पाठभेद आढळतो. त्यामुळे अर्थामध्ये किंचित बदल होईल.

शाकम्बरी- जगातील हिरवाईचे रक्षण करणा-या व आठही हातात वृक्ष वनस्पती धारण करणा-या दुर्गेची कथा देवी पुराणात तसेच मार्कंडेय पुराणात आली आहे.


श्रुत्यै नमोऽस्तु शुभकर्मफलप्रसूत्यै
रत्यै नमोऽस्तु रमणीयगुणार्णवायै ।
शक्त्यै नमोऽस्तु शतपत्रनिकेतनायै
पुष्ट्यै नमोऽस्तु पुरुषोत्तमवल्लभायै ॥ ११॥

मराठी- चांगल्या कामांचे फळ देणा-या श्रुतीला नमस्कार असो. मनोहर गुणांचा सागर असणा-या रतीला नमस्कार असो. जी कमळात वास्तव्य करते अशा शक्तीला नमस्कार असो. जी ऐश्वर्यमय आहे अशा पुरुषोत्तमाच्या प्रियेला नमस्कार असो.

वंदू श्रुतीस शुभ जी फळ दे कृतींचे
वंदू सुरम्य रति आगर जी गुणांचे |
शक्तीस दंडवत जी कमळी रहाते
ऐश्वर्य पोषक प्रणाम हरि प्रियेते ॥ ११

टीप- या श्लोकात स्त्रीशक्तीच्या (जगदंबेच्या) श्रुती,रती,शक्ती व पुष्टी या चार कार्यांचे वर्णन केले आहे. काही अभ्यासकांच्या मते ‘शतपत्र’ कमळाचा संदर्भ मस्तकातील सहस्रार चक्राशी असून जिचे तेथे वास्तव्य आहे अशा आदिशक्तीला नमस्कार केला आहे.


नमोऽस्तु नालीकनिभाननायै
नमोऽस्तु दुग्धोदधिजन्मभूम्यै ।
नमोऽस्तु सोमामृतसोदरायै
नमोऽस्तु नारायणवल्लभायै ॥ १२॥

मराठी- कमळाशी साम्य असणारे मुख जिचे आहे तिला माझा नमस्कार असो. जिचा जन्म क्षीरसागरातून झाला आहे तिला माझा नमस्कार असो. जी चंद्र व अमृत यांची भगिनी आहे तिला माझा नमस्कार असो. श्रीविष्णूच्या पत्नीला माझा नमस्कार असो.

राजीव सदृश जिचे मुख त्या सतीला
माझा प्रणाम दुधसागर कन्यकेला ।
लाभे बहीण म्हणुनी शशिला सुधेला
माझे असे नमन त्या हरिच्या प्रियेला ॥ १२

टीप- समुद्रमंथनाचे वेळी निघालेल्या १४ रत्नांमध्ये लक्ष्मी, चंद्र व अमृत यांचा समावेश असल्याने त्यांना सोदर म्ह. भाऊ-बहीण कल्पिले आहे.


नमोऽस्तु हेमाम्बुजपीठिकायै
मोऽस्तु भूमण्डलनायिकायै ।
नमोऽस्तु देवादिदयापरायै
नमोऽस्तु शार्ङ्गायुधवल्लभायै ॥ १३॥

मराठी- सुवर्ण कमळावर आसन असणारीला नमस्कार असो. पृथ्वी मंडलाची प्रमुख असणारीला नमस्कार असो. देवादिकांप्रती मनात करुणा असणारीला नमस्कार असो. शार्ङ्ग धनुष्य ज्याचे शस्त्र आहे त्या (विष्णू) च्या पत्नीला नमस्कार असो.

सुवर्ण पद्मासन व्यापिते जी
वसुंधरा मंडल नायिका जी ।
मनी दया देवगणां, तियेला
प्रणाम नारायण प्रेयसीला ॥ १३


नमोऽस्तु देव्यै भृगुनन्दनायै
नमोऽस्तु विष्णोरुरसि स्थितायै ।
नमोऽस्तु लक्ष्म्यै कमलालयायै
नमोऽस्तु दामोदरवल्लभायै ॥ १४॥

मराठी- भृगूची कन्या असलेल्या देवतेला नमस्कार असो. श्रीविष्णूच्या वक्षस्थळी विहार करणारीला नमस्कार असो. कमळामध्ये निवास करणा-या लक्ष्मीला नमस्कार असो. (यशोदेने दोरीने) पोटाला बांधून ठेवलेल्या (कृष्णा) च्या पत्नीला नमस्कार असो.

प्रणाम देवी भृगुकन्यकेला
विहार वक्षी हरिच्या, तियेला ।
प्रणाम पद्मालय भार्गवीला
प्रणाम दामोदर प्रेयसीला ॥ १४


नमोऽस्तु कान्त्यै कमलेक्षणायै
नमोऽस्तु भूत्यै भुवनप्रसूत्यै ।
नमोऽस्तु देवादिभिरर्चितायै
नमोऽस्तु नन्दात्मजवल्लभायै ॥ १५॥

मराठी- जी साक्षात तेजस्विता असून जिचे डोळे कमळाप्रमाणे आहेत, तिला नमस्कार असो. जी स्वतः वैभव असून सर्व जगताची जननी आहे, तिला नमस्कार असो. देवगणांकडून जिची पूजा केली जाते, तिला नमस्कार असो. श्रीकृष्णाच्या पत्नीला नमस्कार असो.

सरोज नेत्रांस, नमू प्रभेला
कल्याणकारी, जननी जगाला ।
नमूं जिला देवहि पूजिताती
जिच्यासवे सांगत नंद नाती ॥ १५


सम्पत्कराणि सकलेन्द्रियनन्दनानि
साम्राज्यदानविभवानि सरोरुहाक्षि ।
त्वद्वन्दनानि दुरिताहरणोद्यतानि
मामेव मातरनिशं कलयन्तु मान्ये ॥ १६॥

मराठी- हे थोर देवते, कमलनयने आई, जे ऐश्वर्याचे जनक आहेत, जे (पंच कर्मेंद्रिये, पंच ज्ञानेंद्रिये व मनाच्या सर्व क्षेत्रांना) इंद्रियांना आनंद देतात, ज्यांची साम्राज्याचे दान करण्याची क्षमता आहे, भक्तांचे दुखः आणि दुर्दैवाचा समूळ नाश करण्यास उद्युक्त आहेत, असे तुला केलेले प्रणाम सतत केवळ माझाच सकारात्मक विचार करोत.

ऐश्वर्य कारक, सुखावह इंद्रियांना
उद्युक्त पाप पुसण्या, क्षम राज्य दाना |
माते सरोज नयने, तुज वंदने मी
केली, करोत मम नित्य विचार नामी ॥ १६


यत्कटाक्षसमुपासनाविधिः सेवकस्य सकलार्थसम्पदः ।
सन्तनोति वचनाङ्गमानसैः  त्वां मुरारिहृदयेश्वरीं भजे ॥ १७॥

मराठी- हे मुर राक्षसाच्या शत्रूच्या हृदयाची स्वामिनी, जिच्या कटाक्षांच्या भक्तीचा विधी भक्ताला सर्व ऐश्वर्य प्रदान करतो, त्या तुझी मी काया वाचा मने सेवा करतो.

जो कटाक्ष तव अर्चना विधी देतसे सकल सेवकां निधी ।
मी तुझे मुररिपू मनस्वामिनी  भाषणें स्तवन हे तनू मनी ॥ १७


सरसिजनिलये सरोजहस्ते धवलतरांशुकगन्धमाल्यशोभे ।
भगवति हरिवल्लभे मनोज्ञे त्रिभुवनभूतिकरि प्रसीद मह्यम् ॥ १८॥

मराठी- कमळात निवास करणा-या, हाती कमळ धरणा-या, पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करणा-या, सुगंधी माळांनी सजलेल्या, रमणीय, तिहीं लोकांना संपन्नता देणा-या, श्रीविष्णूची प्रिय भार्या असणा-या, देवी मजवर कृपा कर.

कमल सदन, घे सरोज हाती, वसन सफेद, सुगंधि रम्य माला ।
मनरम हरिप्रेयसी देवते, जगहितकारक, प्रसन्न हो मजला ॥ १८

टीप- हा श्लोक ऋग्वेदातील खिलसूक्तांमधील सुप्रसिद्ध श्रीसूक्तातही आढळतो.

काही अभ्यासकांनी ‘सरसिजनिलये’चा अर्थ ज्याची वृत्ती विकसित झालेली आहे अशा साधकाच्या मनात निवास करणारी तर ‘गंधमाल्यशोभे’ चा अर्थ चंदनतिलक व मोत्यांच्या माळा यांनी शोभून दिसणारी असा घेतलेला दिसतो.


दिग्घस्तिभिः कनककुम्भमुखावसृष्ट
स्वर्वाहिनी विमलचारुजलप्लुताङ्गीम् ।
प्रातर्नमामि जगतां जननीमशेष
लोकाधिनाथगृहिणीममृताब्धिपुत्रीम् ॥ १९॥

मराठी- सुवर्ण रांजणात (आठ) दिशांच्या (आठ) ह्त्तींनी आणलेल्या मंदाकिनी (स्वर्गातल्या गंगे) च्या स्वच्छ आणि सुखद पाण्याने अंग धुतलेल्या, जगाची माता असलेल्या, आणि विश्वाचा एकमेव अधिपती असणा-या (हरी) ची पत्नी असणा-या, क्षीरसागराच्या कन्येला मी सकाळी वंदन करतो.

डेरे सुवर्ण भरले जल दिग्गजांनी
स्वर्गीय स्वच्छ सरिता शुभ कार्य स्नानी ।
जी क्षीरसागर सुता जननाथ कान्ता
सूर्योदयी नमत मी नित विश्वमाता ॥ १९

टीप- अमरकोशानुसार ऐरावत, पुण्डरीक, वामन, कुमुद, अञ्जन, पुष्पदन्त, सार्वभौम, सुप्रतीक असे आठ दिशांचे आठ श्रेष्ठ हत्ती कल्पिलेले आहेत.


कमले कमलाक्षवल्लभे त्वं  करुणापूरतरङ्गितैरपाङ्गैः ।
अवलोकय मामकिञ्चनानां  प्रथमं पात्रमकृत्रिमं दयायाः ॥ २०॥

मराठी- हे कमळासमान नेत्र असणा-या (विष्णू) ची भार्या असलेल्या कमले, तू दयेच्या महाप्रवाहाच्या लाटांप्रमाणे असणा-या (आपल्या) कटाक्षांनी, गरीब जनांमध्ये साहजिकच दयेला सर्वप्रथम पात्र असणा-या माझ्याकडे पहा.

ममता दरियात लाट जेवी, नजरांनी तव निर्धना मला या ।
अवलोकन, वस्तुतः खरा लायक जो, कर तू मुकुंद जाया ॥ २०


देवि प्रसीद जगदीश्वरि लोकमातः
कल्यानगात्रि कमलेक्षणजीवनाथे ।
दारिद्र्यभीतिहृदयं शरणागतं मां
आलोकय प्रतिदिनं सदयैरपाङ्गैः ॥ २१॥

मराठी- हे विश्वाचे नियंत्रण करणा-या, जनतेची माउली असलेल्या, आशीर्वाद देणारे अवयव असणा-या, कमळासारखे डोळे असलेल्या, सर्व जीवांची रक्षक असणा-या देवते, ज्याच्या मनात गरीबीची भीती (घर करून बसली) आहे, त्या तुला शरण आलेल्या माझ्याकडे आपल्या करुणापूर्ण कटाक्षांनी दररोज पहा.

विश्वात श्रेष्ठ, जननी जगतास होसी
जीवास राखुन, करे वर त्यास देसी ।
कारुण्यपूर्ण नजरे बघ निर्धनाला
दृष्टीत रोज करुणा बघ याचकाला ॥ २१


स्तुवन्ति ये स्तुतिभिरमूभिरन्वहं
त्रयीमयीं त्रिभुवनमातरं रमाम् ।
गुणाधिका गुरुतरभाग्यभागिनो
भवन्ति ते भुवि बुधभाविताशयाः ॥ २२॥

मराठी- जे दररोज या प्रशंसेने तीन वेद रूपी, तिन्ही जगांची माता रमेची उपासना करतात, ते या भूतलावर अत्यंत गुणवान व भाग्यवान ठरतात (आणि) विद्वान लोक त्यांच्या मनीच्या भावना जाणून घेण्यास उत्सुक असतात.

स्तुती श्रुतीमय जगमाउली मनी
उपासना तव करिती अशी दिनी ।
नशीब थोर नि ठरती बहूगुणी
सुजाण उत्सुक मन घेत जाणुनी ॥ २२

॥ इति श्रीमद् शङ्कराचार्यकृतम्  श्री कनकधारास्तोत्रं सम्पूर्णम् ॥

**********************

— धनंजय बोरकर
(९८३३०७७०९१)

धनंजय मुकुंद बोरकर
About धनंजय मुकुंद बोरकर 60 Articles
व्यवसाय इलेक्ट्रॉनिक (एव्हियॉनिक्स) इंजिनियर. संस्कृत भाषेची आवड. मी केलेले संस्कृत काव्यांचे मराठी गद्य व स्वैर पद्य रूपांतर - १. कविकुलगुरू कालिदासाचे `ऋतुसंहार' (वरदा प्रकाशन, पुणे) २. जयदेवाचे `गीतगोविंद' (प्रसाद प्रकाशन, पुणे). ३. मूकशंकराचार्याचे `मूक पंचशती' ४. जगन्नाथ पंडितांचे `गंगा लहरी' इत्यादी. मी ऋतुसंहार मधील श्लोकांवर आधारित एक दृकश्राव्य कार्यक्रम तयार केला असून त्याचे अनेक कार्यक्रम पुण्यात व इतर ठिकाणीही सादर केले आहेत.

2 Comments on कनकधारास्तोत्रम्- मराठी अर्थासह

  1. Atishay rasapurna bhavanuvad. Shankaracharya ni keleli stuti yatharth dolya paudhe ubhi rahili. Kharach artha samajun jevha stuti hoil Srinchi kripadrishti kshanat prapt hoil. Sanskrit madhil bhashecha chaturya titakyach samarthapane dakhavinari, boli arupache rup prakat Karanarya ya panditala maze shat shat pranam. Tumhavar Vijaya Laxmi chi krupa raho hi prarthana.

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..