प्रेरणादायी कर्तृत्व – मंगला हंकारे

”काही व्यक्तींना चाकोरीबद्ध विचारशैली मोडून अनोखं तसं सर्जनशील काम करण्याची आवड व सवय असते. त्यांचं हे काम अथवा कार्य जर सामाजिक असेल तर गरजूंना आपसूकच मायेचा स्पर्श मिळतो. आणि हे कर्तुत्व आपल्यालादेखील प्रेरित करुन जातं. पण काही कामं अशी असतात कि ज्याकडे समाजाचा पाहण्याचा दृष्टिकोन तितकासा बरा नाही ; ‘ एच.आय.व्ही.’ विषाणूंनी ग्रासलेल्या व्यक्तींसाठी ‘नेटवर्क इन ठाणे बाय पिपल लिव्हींग विथ एच.आय.व्ही.’ ही संस्था कार्यरत असून त्या व्यक्तींसाठी निरपेक्ष भावनेने काम करणार्‍या मंगला हंकारेंच्या कार्याचा हा लेखाजोखा”..

लहानपणापासूनच समाजातील उपेक्षितांसाठी व तळागाळातील घटकांसाठी काम करण्याची इच्छा मंगला हंकारेंच्या मनात होती. आपण करु त्या कामाचं चीज झालं पाहिजे याकडे त्यांचा कटाक्ष होता. त्यासोबतच शिक्षणाची प्रचंड आवड, या गुणांमुळेच शिक्षिकेचा पेशा त्यांनी स्वीकारला. कालांतराने म्हणजे २००६ साली ‘नेटवर्क इन ठाणे बाय पिपल लिव्हींग विथ एच.आय.व्ही.’ या संस्थेत अकाउंटन्ट या पदावर त्या रुजू झाल्या. पण एच.आय.व्ही. ग्रस्तांची वेदना आणि त्यांच्यासाठी काहीतरी भरीव कार्य करण्याची धडपड मनातून सतत सुरु होती. म्हणून कार्यालयीन कामाच्या नियमित तासांव्यतिरिक्त मंगलाजींनी अतिरिक्त वेळ संस्थेच्या समाजकार्यात देण्याचं ठरवलं. आजही आपण स्वत:ला कितीही प्रगत म्हणत असलो तरीपण एच.आय.व्ही ग्रस्तांकडे समाजातल्या व्यक्तींचा पाहाण्याचा दृष्टीकोन हा काहीसा नकारात्मक असल्याचं दिसून येतं. पण हा गैरसमज खोडून काढण्याचं काम त्यांनी आटोकाटपणे केलं. विशेष म्हणजे या कामात सक्रियरित्या कार्य करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. त्यावेळी त्यांचे पती व मुलं आणि घरातल्या सर्व मंडळींनी या कामासाठी पाठींबा जाहीर केला. ‘ आज घरच्यांच्या पाठबळामुळेच मी हे कार्य करु शकल्याचं मंगलाजी आवर्जून सांगतात.’

त्यांच्या कामाविषयीचं स्वरुप विषद करताना त्या म्हणतात, ” एखाद्या व्यक्तीला ज्यावेळी कळलेलं असतं की ती व्यक्ती एच.आय.व्ही पॉझीटीव्ह आहे, तेव्हा पहिली गोष्ट जी आम्ही करतो ती म्हणजे त्यांच्या मनातील न्यूनगंडता दूर करणं. व त्याला पटवून देतो की तू देखील सर्वसामान्यांसारखाच आहेस, तुझ्यात व इतरांमध्ये काहीही फरक नाही; या शब्दांमुळेच बर्‍याचदा त्यांना धीर वाटतो. एखाद्या लहान मुलाला आणि त्यांच्या पालकांनादेखील एच.आय.व्हीची लागण झालेली असेल तर त्यांच्यासाठी विशेष मार्गदर्शन आणि समुपदेशन केलं जातं व कार्यशाळादेखील घेतल्या जातात.”, असं हंकारे नमूद करतात.

जर लहान मुल एच.आय.व्ही पॉझीटीव्ह असेल व त्यांची काळजी वेगळ्या रितिने घ्यावी लागते. त्यांच्या औषधांच्या वेळा समजावून सांगणे, त्यांच्यासाठी योग शिबिराचे आयोजन करणे, कलाशिबिरं आयोजित करणे आणि पुनर्वसनासाठी प्रयत्नशील राहणे. हे कामदेखील या संस्थेमार्फत होतं. ”आज आमच्या प्रयत्नांनी अनेक मुलांचा आत्मविश्वास वाढीस लागला आहे. त्याशिवाय काहीतरी बनून दाखवण्याची इच्छा त्यांच्यामध्ये निर्माण झाली आहे.” हे सांगायलादेखील त्या विसरत नाहीत.

एच.आय.व्ही ग्रस्तांसोबत काम करताना अनेकदा त्यांची दु:खं व वेदना पाहून अस्वस्थ व्हायला होतं का ? या प्रश्नावर त्या उत्तरतात की, ”असे प्रसंग अनेक वेळेला उद्भवतात. आपण हळवे होतो. पण या सर्वांवर ताबा मिळवणं अत्यंत गरजेचं आहे कारण आम्ही जर भावूक झालो तर हे कार्य करणंदेखील कठीण होऊन बसेल.”

त्याशिवाय आणखी एक बाब त्या सांगतात, ”विशेषत: आजची तरूण पिढी मास्टर्स इन सोशल वर्क्समध्ये शिक्षण पूर्ण करते. व समाजकार्यासाठी सज्ज असते. हे एका अर्थी खूप चांगली गोष्ट आहे, की तरुण पिढी समाजातील दुर्लक्षित घटकांसोबत काम करायला तयार होते. ज्यामुळे या क्षेत्रात कारकिर्द घडवण्यासाठी भविष्यदेखील उज्वल आहे. पण त्यासाठी चिकाटी, जिद्द, कोणत्याही प्रसंगात काम करण्याची तयारी असायला पाहिजे” , असं मंगला हंकारे आवर्जून सांगतात.

इच्छाशक्ती आणि जिद्द यातून घडलेलं सकारात्मक आणि प्रेरणादायी कार्य असंच काहीसं मंगलाजींच्या बाबतीत म्हणता येईल. केवळ अनुभव आणि सहकार्‍यांच्या पाठींब्यामुळे मी हे करु शकले. याचं श्रेयदेखील त्यांना द्यायला त्या विसरत नाहीत; सर्वसामान्यांप्रमाणेच जीवन जगणार्‍या पण असामान्य कर्तुत्व करुन एच.आय.व्ही सोबत जगणार्‍या व्यक्तीच्या आयुष्यात मांगल्याची पहाट फुलवणार्‍या मंगला हंकारे यांना मराठीसृष्टी.कॉम चा देखील सलाम.

Avatar
About सागर मालाडकर 111 Articles
श्री. सागर मालाडकर हे आकाशवाणीवरील निवेदक असून ते मराठीसृष्टीसाठी नियमितपणे लेखन करतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती

महाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...

Loading…