नवीन लेखन...

भाषा संशोधक तथा राष्ट्रकवी गोविंद पै

गोविंद पै हे आधुनिक कन्नड कवी व एक श्रेष्ठ संशोधक होते.

गोविंद पै यांचा जन्म २३ मार्च १८८३ रोजी कर्नाटकातील द. कॅनरा जिल्ह्यातील मंजेश्वर या गावी झाला. गोविंद पै यांचे शिक्षण बी.ए.पर्यंत. विविध भारतीय भाषा, जागतिक वाङ्‌मय, तत्त्वज्ञान आणि इतिहास या विषयांचा त्यांनी स्वयंप्रेरणेने व्यासंग केला. विसहून अधिक भाषा त्यांना उत्तम प्रकारे अवगत होत्या त्यांत ग्रीक व हिब्रू यांचाही समावेश होता. त्यांच्या वाङ्‌मयीन कारकीर्दीचा काल ६० वर्षांहून अधिक होता.

गोविंद पै यांची पहिली कविता ‘सुहासिनी’ ही १९०० मध्ये प्रकाशित झाली. परंपरागत द्वितीय प्रासाचा (चरणातील दुसरे अक्षर तेच येणे) उपयोग न करता रचना करणारे गोविंद पै हे पहिले कवी होत. भावगीतांव्यतिरिक्त येशू ख्रिस्ताच्या जीवनावरील गोल्गोथा (१९३१) व गौतम बुद्धाच्या जीवनावरील वैशाखि (१९४९) ही दोन खंडकाव्येही त्यांनी लिहिली. त्यांची निवडक भावगीते गिळिविंडु (१९३०) या संग्रहात आहेत. हेब्बेरळू (१९४६) व चित्रमानु (१९४९) ही त्यांची दोन नाटके. यांपैकी पहिले नाटक एकलव्याच्या कथेवरील आहे व दूसरे १९४२ च्या छोडो भारत आंदोलनातील एका हुतात्याच्या जीवनावर आधारलेले आहे. काही जपानी ‘नो’ नाट्यांचाही त्यांनी कन्नड अनुवाद केलेला आहे.

गोविंद पै यांच्या संशोधनपर लेखांची संख्या १६० हून अधिक भरते. त्यांत कर्नाटक आणि तुळुनाडू यांचे इतिहास, प्राचीन भारत-ग्रीस संबंध, इतिहासकालीन राजांची, गौतम बुद्ध, महावीर यांसारख्या धर्मप्रवर्तकांची आणि प्राचीन कन्नड लेखक-कवींची कालनिश्चिती इ. विषयांचा समावेश होतो. धारवाड येथील ‘कन्नड संशोधन संस्थे’त दिलेली त्यांची खास व्याख्याने मुरु उपन्यासगळु (१९४०) या नावाने संगृहीत करण्यात आलेली आहेत.
सर्जनशील साहित्य व ऐतिहासिक संशोधन या दोन्हीही क्षेत्रांत गोविंद पै यांना सारखीच गती होती. देशभक्ती व सर्वधर्मीय सुसंवाद साधण्याची दृष्टी ह्या त्यांच्या कर्तृत्वाच्या प्रेरणा होत. याहीपेक्षा ते मानवतावादी होते, हे अधिक महत्त्वाचे होय. ते स्वभावाने प्रसिद्धिपराङ्‌मुख होते. ही सर्व वैशिष्ट्ये त्यांच्या साहित्यात प्रतिबिंबित झालेली दिसतात. त्यांची भाषाशैली सहजसुबोध नाही तथापि त्यांचा वैचारिक आशय उच्च कोटीतील असल्याने त्याला एक प्रकारचे शाश्वत मूल्य प्राप्त झालेले आहे.

मद्रास राज्य शासनातर्फे त्यांना १९४८ मध्ये ‘राष्ट्रकवि’ हा बहुमानाचा पुरस्कार देण्यात आला. १९५० मध्ये मुंबई येथे भरलेल्या अखिल कन्नड साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. गोविंद पै यांचे निधन ६ सप्टेंबर १९६३ रोजी झाले.

-संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

संदर्भ. मराठी विश्वकोश / बेंद्रे, वा. द.
ही व इतर पोस्ट माझ्या फेसबुक पेजवर पाहू शकता.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4238 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..