ज्योत्स्ना प्रकाशनाच्या विकास परांजपे ह्यांच्या फेसबुक वॉल वरुन
घालीन लोटांगण ही नामदेवांची एक सुंदर रचना आहे. त्याला ‘त्वमेव माता…’ ही संस्कृत रचना (बहुधा शंकराचार्यांची) कोणी चिकटवली व का हे कोडे मला सुटले नाही. मी आजपर्यंत अनेकांना विचारले. उत्तर मिळत नाही. कोण सांगू शकेल काय ?
या माझ्या प्रश्नावर माझा मित्र रवी अभ्यंकर याने संदर्भासह विस्तृत माहिती पुरवली ती पुढे देत आहे.
रविला भेटलो की ‘लोटांगण’ नाही घातले तरी ‘प्रेमे आलिंगीन’ नक्की !!!
— रवी उवाच
विकास,
‘घालीन लोटांगण’ हे कॉकटेल काव्य आहे, ह्यातली पाच कडवी कुठल्या तरी भक्ताने इथून तिथून जमवून त्यांचं मिश्रण केलं आहे.
(१) पहिलं कडवं ‘घालीन लोटांगण’ हे तू लिहिल्याप्रमाणे नामदेवांचं आहे. त्याला बिचाऱ्याला कल्पना नसेल पुढे त्याच्या काव्याला किती ठिगळं लागणार आहेत त्याची.
(२) दुसरं कडवं ‘त्वमेव माता च पिता त्वमेव’ हे गणपती किंवा कुठल्या देवाला उद्देशून नसून तो गुरुस्तोत्राचा भाग आहे. शंकराचार्यांनी श्रीगुरुस्तोत्रं लिहिलं, ज्यात आपल्याला माहिती असलेला ‘गुरुर्ब्रह्मा गुरुर्रविष्णु’ श्लोक समाविष्ट आहे.
(३) तिसरं कडवं ‘कायेन वाचा’ हे श्रीमद्भागवतपुराणातलं आहे. एकूण अठरा पुराणांपैकी हे एक, व्यासांनी लिहिलेलं. कायेन वाचा हा श्लोक स्कंध ११, अध्याय २ ह्यामध्ये ३६ वा श्लोक आहे.
(४) चौथं कडवं ‘अच्युतम केशवं’ हे ‘अच्युताष्टकम्’ ह्या शंकराचार्यांच्या काव्यातून घेतलं आहे. मजा म्हणजे काव्याचं नाव जरी ‘अच्युताष्टकम्’ आहे तरी त्यात नऊ श्लोक आहेत.
(५) पाचवं आणि शेवटचं कडवं ‘हरे राम हरे राम’ सर्वात सोपं. ते ‘कलिसन्तरण’ ह्या उपनिषदातलं आहे. ह्या उपनिषदाची सुरुवात ‘ॐ सह नाववतु । सह नौ भुनक्तु । सह वीर्यंकरवावहै । तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै । ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः ।’ आपल्या सर्वांनाच माहिती आहे.
तर अशी ही प्रार्थना जी आपण गणपतीसमोर म्हणतो, त्यातलं एकही कडवं गणपतीला उद्देशून नाही.
— रवी अभ्यंकर
ज्योत्स्ना प्रकाशनाच्या विकास परांजपे ह्यांच्या फेसबुक वॉल वरुन
नमस्कार.
नेहमी म्हटल्या जाणार्या प्रार्थनेबद्दलची फारच छान माहिती. धन्यवाद. आणखी थोडी माहिती : –
– आपण ‘नामदेवांची रचना’ म्हणतो, ते नामदेव म्हणजे, तुम्हांआम्हांला वाटतें तसें, ज्ञानेश्वरकालीन नव्हेत. या ‘घालीन लोटांगण’ काव्याची भाषा व ज्ञानेश्वरीची भाषा, किंवा यादवकालीन मराठी भाषा, यांतील फरक लगेच लक्षात येतो. एक अन्य नामदेव १५ व्या शतकातही झालेले आहेत. ‘निष्णुदास नामा’ हें नांव प्रसिद्ध आहे. ते १५व्या शतकातील. ‘घालीन लोटांगण’ची भाषा ही सुद्धा १५व्या शतकातीलच वाटते.
– भागवतपुराण ही फार नंतरची रचना आहे. ती इ.स. च्या पहिल्या सहस्रकाच्या उत्तरार्धातील रचना आहे. ही व्यासांची रचना नव्हे. व्यास हे महाभारतकालीन, म्हणजे इ.स. च्या फार आधीचे.
– अच्युताष्टकम् मी वाचलेलें नाहीं. पण जर नांवात ‘आठ’ श्लोक आहेत, व प्रत्यक्षात जर ९ श्लोक आहेत ; तर एक गोष्ट नक्की , की त्यातील एक श्लोक प्रक्षिप्त आहे. (उदा. ४० वर्षांच्या अभ्यासानंतर, महाभारताच्या चिकित्सक आवृत्तीत कितीतरी श्लोक प्रक्षिप्त म्हणून बाजूला काढलेले आहेत. )
भारतातील पुरातन रचनाकारांची ही एक सवयच आहे , की जुन्या प्रसिद्ध रचनेत, (नंतर) आपला कांहीं भाग आपण ‘जोडायचा’ (ज्याला ‘प्रक्षिप्त’ असें त्यानंतरच्या विश्लेषणानंतर अभिधान मिळतें). यात त्यांचा हेतू वाईट नसे. ( कारण, त्या प्रक्षेपाच्या रचनाकारानें स्वत:चें नांवही दिलेलें नसतें). मात्र त्यामुळे आज confusion होतें, हें खरें.
– ‘ॐ सहनाववतु’ हें ‘कलिसन्तरण’ या उपनिषदातील आहे, असें आपण म्हटलेलें आहे; पण माझ्या माहितीप्रमाणें तें कठोपनिषदातील आहे. कठोपनिषद हें कृष्ण यजुर्वेदाचा एक भाग आहे. ( दोन वेगवेगळ्या उपनिषदांमध्ये एकच — same —- ऋचा सामील असल्यास नकळे).