नवीन लेखन...

कोकणच्या इतिहासाचा ज्ञानकोश – अनंत धोंडू उर्फ अण्णा शिरगावकर

कोकणचा इतिहास अभ्यासताना अभ्यासकर्त्याला दापोली तालुकातल्या एका व्यक्तीची दखल घेणे अत्यंत अनिवार्य आहे, ती व्यक्ती म्हणजे कोकणच्या इतिहासाचा ज्ञानकोश, असंख्य अभ्यासकांचे मार्गदर्शक, अचूक टायमिंग साधणाऱ्या सहजस्फूर्त नर्मविनोदी शैलीतील लेखन करणारे  ‘श्री.अनंत धोंडू शिरगावकर’ म्हणजेच ‘अण्णा शिरगावकर.’ अण्णा शिरगावकर म्हणजे कोकणचा चालताबोलता ज्ञानकोश आहेत.

वसिष्ठी नदीच्या काठावर असलेल्या  विसापूर, ता. गुहागर या गावी वैश्यवाणी कुटुंबात  ५ सप्टेंबर १९३० रोजी अण्णांचा जन्म झाला. जेमतेम सातवीपर्यंतचे शिक्षण झाल्यावर हा अवलिया जगाच्या विद्यापीठात शिक्षण घेण्यासाठी बाहेर पडला. ‘ग्रंथ हेच आपले गुरू’ हे लोकमान्य टिळकांचे वाक्य अण्णांच्या मनावर कोरले गेले. त्यामुळे वाचनाचा सपाटा सुरू झाला. वाचन, घरचे दुकान हे सगळे सांभाळून समाजकार्यासाठी अण्णांनी स्वतःला झोकून दिले. जनसंघाचे काम तळागाळात रुजवले. बैठका, सत्याग्रह, मुक्ती लढा, आणीबाणीतील अटक या सगळ्या गोष्टींमध्ये अण्णांना, पत्नी नंदिनी काकूंचे मोठे पाठबळ लाभले. त्यावेळचे राजकारण आजच्यासारखे नव्हते. सर्व विचारधारांची मंडळी एकमेकांशी उत्तम संबंध जोडून होती. अण्णांना प्रत्येकाकडून काहीना काही शिकायला मिळाले. पण अण्णांचा मूळ पिंड समाजकार्याचा. नव्वदाव्या वर्षीही असलेली तीक्ष्ण स्मरणशक्ती आणि इतिहासावर तासन्तास गप्पा मारण्याची त्यांची क्षमता थक्क करणारी आहे.

कोकण प्रांताला प्राचीन इतिहास नाही, असे जेव्हा म्हटले जात होते. त्यावेळी (६० – ७० च्या दशकात ) ‘कोकणाला प्राचीनच नव्हे, तर अतिप्राचीन इतिहास आहे’, हे सिद्ध करणारी इतिहासाची अनेक साधनं अण्णांनी इतिहास संशोधकांना, अभ्यासकांना उपलब्ध करून दिली. त्यासाठी त्यांनी अपार कष्ट घेतले, अविश्रांत मुसाफिरी केली आणि त्यांच्या परिश्रमपूर्ण प्रयत्नातून नदीच्या गाळाखाली पूर्णपणे लपून गेलेली पन्हाळेकाजी सारखी ऐतिहासिक, वैशिष्ट्यपूर्ण लेणी जगासमोर आली. वैशिष्ट्यपूर्ण यासाठी की पन्हाळेकाजी येथील लेणे म्हणजे एकूण २८ शैलगृहांचा (लेण्यांचा) समूह आहे. दुसरे शतक ते चौदावे शतक इतक्या विस्तीर्ण कालखंडात या लेण्या आकारात आल्या. येथे हीनयान, वज्रयान,महायान, शैव, नाथ, गाणपत्य अशा विविध सांप्रदायांनीं वास्तव्य केले आहे. पन्हाळे हे आजचे छोटेसे गाव शिलाहार काळात दक्षिण कोकणाधिपती असलेल्या विक्रमादित्याचे राजधानीचे गाव होते. शशिकांत शेलार यांच्या ‘शोध पन्हाळेदुर्ग परिसराचा’या पुस्तकाच्या प्रस्तावनेत असा उल्लेख आलेला आहे, की भारतीय पुरातत्व खात्याने पन्हाळे येथील शिल्पखजिन्याचे महत्व ओळखून ही लेणी राष्ट्रीय स्मारक म्हणून अधिघोषीत करण्याचे ठरविले होते.

अण्णांनी आपल्या देदीप्यमान कामगिरीतून शिलाहार, चालुक्य, त्रैकुटक यांचा इतिहास सांगणारे नऊ ताम्रपट मिळवले. या व्यतिरिक्त इतरही काही ताम्रपट त्यांच्या संग्रही आहेत. पण व्यक्तिगत संग्रहात एका माणसाने मिळवलेल्या ताम्रपटाचे हे रेकॉर्ड आहे. ही गोष्ट तुम्हाला कशी काय साध्य झाली? असा प्रश्न विचारल्यास अण्णा त्यावर अतिशय साधं-सरळ उत्तर देतात,”छंद जोपासला म्हणून साध्य झाली.” लहानपणापासूनच अण्णांना रंगीत दोरे, रंगीत काचांचे तुकडे, पाखरांची पिसे अशा नाना वस्तू जमविण्याचे वेड होते. गो.नी.दांडेकरांच्या (प्रख्यात साहित्यिक गोपाळ नीळकंठ दांडेकर) संपर्कात आल्यानंतर या छंदाला वेगळी दिशा मिळाली. ऐतिहासिक,पुरातन वस्तूंचा पाठपुरावा घेत मग अण्णांनी विविध प्रकारची जुनी नाणी, शिलालेख, सनदा, पत्रे, हस्तलिखिते, तोफा, बंदुका, पिस्तुले, भाले, परशु, चिलखत, तलवारी, कट्यार, मूर्ती, काष्टशिल्पे इ. वस्तूंचा संग्रह केला. खरंतर सामान्य आर्थिक स्थिती असलेल्या माणसाला असा छंद वा संग्रह परवडणारा नाही; पण तरी तो अण्णांनी मोठ्या जिकरीने केला. पुढे जागेची अडचण भासू लागल्यावर मोठ्या उदार मनाने, विनामूल्य रत्नागिरीच्या नगर वाचनालयाला, दापोलीतील टिळक स्मारक मंदिरात आणि ठाणे येथील बेडेकरांच्या ‘द कोकण म्युझियम’ला देऊन टाकला.

वस्तुसंग्रहाबरोबरच त्यांनी भरपूर आणि सखोल अभ्यास करून इतिहासावरची पुस्तकेही लिहली. त्यांची इतिहासावरची जवळपास पाच ते सहा पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यापैकी ‘शोध अपरान्ताचा’, ‘गेट वे ऑफ दाभोळ’,’वाशिष्ठीच्या तीरावरून’ या पुस्तकांना विशेष प्रसिद्धी मिळाली. इतिहासाव्यतिरिक्त अण्णांनी राजकीय ,साहित्यिक, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातही स्वतःचा ठसा उमटवला. भारतीय जनसंघाचे माजी खासदार कै.प्रेमजीभाई आसर आणि लोकसेवक कै.तात्यासाहेब नातू यांचे बोट धरून अण्णांनी राजकारणात प्रवेश केला आणि ग्रामपंचायत सदस्यापासून जिल्हा परिषदेच्या (रत्नागिरी) सभापती पदापर्यंत अनेक पदे भूषवली. साहित्यिक क्षेत्रात त्यांना गो.नि.दांडेकर, मधू मंगेश कर्णिक यांच्यासारखे प्रगल्भ, प्रतिभावंत लेखकमित्र लाभले आणि वृत्तपत्रे,आकाशवाणी, दूरदर्शन या सर्व माध्यमांवर लेखन व भाषण करत त्यांनी जवळपास ‘आठ ते नऊ’ साहित्यिक पुस्तके लिहीली. अण्णांचा स्वभाव मिश्किल असल्यामुळे त्यांची लेखनशैली विनोदी आहे; पण त्याखाली असलेला गहण आशय समाजाची वास्तवता आणि मानसिकता प्रखरपणे दाखवतो. अण्णा २००१ साली दापोली तालुका कोकण मराठी साहित्य परिषदेचे उपाध्यक्ष होते. २००६ साली दापोली तालुका साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदी होते. सामाजिक क्षेत्रात काम करताना अण्णांनी गोवा मुक्ती संग्राम, संयुक्त महाराष्ट्र चळवळ,आणिबाणीविरोधी आंदोलन यात सहभाग घेतला. दोन वर्षे तुरुंगवास भोगला. अनेक कामगार संघटना काढल्या. लोकप्रतिनिधी होऊन दाभोळ पश्चिम गटात अनेक विकासकामे केली. शिक्षण क्षेत्रांत ‘सागरपुत्र विद्या विकास संस्था’ आणि ‘वाशिष्ठी कन्या छात्रालय’ स्थापन करून अण्णांनी दाभोळ मधील भोई, खारवी आणि अनेक गरीब समाजातील मुलांची शिक्षणाची सोय केली. शिवाय बालवाड्या, वाचनालय, संगीत क्लास, बालभवन, उद्योग प्रशिक्षण इ. निरनिराळे उपक्रम असलेले ‘सागरपुत्र’ संकुल उभे केले.

अण्णा हे बहुआयामी व्यक्तिमत्व असलं तरी, त्यांची खरी ओळख आहे; एक संग्रहकर्ता, एक इतिहास वेडा माणूस. अण्णांच्या मते प्रत्येक वस्तू काहींना काही इतिहास सांगते, आठवण सांगते म्हणून वस्तूंचा संग्रह केला पाहिजे. त्यांनी इतिहासाच्या साधनांबरोबरच पोस्टाची तिकिटे, लग्नपत्रिका, किचन्स, कॅलेंडर्स, शंख, शिंपले, प्रवाळ, दगड, अत्तराच्या बाटल्या, दारूच्या बाटल्या,घड्याळे, पुस्तके इ. वस्तू जमविल्या आणि त्यांचा संग्रह केला. अण्णांना वाचनाची प्रचंड आवड असल्यामुळे त्यांचा ग्रंथ संग्रह सुमारे दहा हजारांचा होता. पुढे जागेची अडचण बाळगता त्यांनी अनेक ग्रंथालयांना, व्यक्तीगत संग्रह ठेणाऱ्यांना देऊन टाकला. सध्या सहाशे ते सातशे पुस्तके त्यांच्या संग्रही आहेत. त्यातील अनेक ग्रंथ दुर्मिळ आहेत. अण्णांच्या मते प्रत्येक तालुक्याला एक स्वतंत्र वस्तू संग्रहालय हवे आणि त्या संग्रहालयात त्या प्रदेशातील दुर्मिळ, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वस्तूंचा संग्रह हवा. कोकणात तर ही बाब अत्यंत आवश्यक आहे. कारण ही गोष्ट पर्यटन विकासाच्या दृष्टीने फारच लाभदायक ठरेल. अण्णांचा जीवनप्रवास पहिला तर चकित व्हायला होते, की एखादा माणूस आयुष्यात इतक्या साऱ्या गोष्टी कसा काय करू शकतो? पण अण्णांकडे याचे उत्तर खूप सोपे आहे. त्यांनी स्वतःला एक शिस्त लावून घेतलेली आहे. वेळ पाळणे, दररोज रोजनिशी लिहणे, वर्तमानपत्रे आणि पुस्तके वाचणे या सवयी त्या शिस्तीमुळे अंगभूत झालेल्या आहेत. आणि आज वय ८९ असताना सुद्धा या सगळ्या सवयी कायम आहेत. शिवाय त्यांना त्यांच्या जीवनप्रवासात अनेक थोरामोठ्यांचा संग लाभला, आशीर्वाद लाभले. ( मा.निनाद बेडेकर, मा. बाबासाहेब पुरंदरे, मा. राजीव गांधी, पं. दिनदयाळ उपाध्याय, मा. अटलबिहारी वाजपेयी, प. पू .स्वामी स्वरूपानंद , प.पू. पांडुरंग शास्त्री इ. ) नामवंत व्यक्तींकडून सन्मान प्राप्त झाले. (मा. विलासराव देशमुख, मा. गोविंदराव निकम, मा.तात्यासाहेब नातू, मा. मनोहर साळवी ) आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कुटुंबाची योग्य साथ मिळाली. सध्या अण्णा चिपळूणला (शिरगाव) त्यांच्या मुलीकडे राहतात.फेब्रुवारी २०१९ मध्ये त्यांचा ‘दाभोळ मधील ६० वर्षाची वाटचाल’ म्हणून विशेषांक प्रसिद्ध झाला. तेव्हा सागरपुत्र आणि वाशिष्ठी कन्या छात्रालयाच्या माजी विद्यार्थ्यांनी संमेलन आयोजित केले होते आणि अण्णांचे ऋण मानले. खरतर अण्णांच्या कार्यानुसार त्यांना जितकी प्रसिद्धी लाभायला हवी होती; तितकी लाभली नाही. पण अण्णांना त्याची खंत नाही. खंत एकाच गोष्टीची आहे, की त्यांच्या कार्याला पुढे वाहणारे कार्यवाहक नाहीत. लोकांना इतिहासाबद्दल जी अनास्था आहे, ती त्यांना खटकते. पुरातत्व खातं ऐतिहासिक वस्तूंवर केवळ अधिकार सांगून आणि पाटी लावून मोकळं होतं, याची त्यांना चीड आहे. परदेशी संग्रहालयांसोबत भारतीय संग्रहालयांची तुलना करताना ते प्रचंड खेद व्यक्त करतात.

https://talukadapoli.com
https://www.annashirgaonkar.in

-संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4227 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..