नवीन लेखन...

टिप्पणी – (३) : ‘गधेगाळ’वरील प्रतिमा : ( नरेंच केली हीन किति नारी !!)

बातमी : (शीर्षक ) : बदलापुरात शिलाहारकालीन इतिहासाच्या पाऊलखुणा
– लोकसत्ता, मुंबई आवृत्ती, दि. २९ जून २०१६.

‘लोकसत्ता’मधील बातमी सांगते की बदलापुरनजीक शिरगांव येथें शिलाहारकालीन, ‘गधेगाळ’, ‘वीरगळ’ इत्यादी प्रकारची शिळाशिल्पें सापडली आहेत. शिलाहार हे राष्ट्रकूटांचे अंकित होते, व त्यांचे कोंकण, दक्षिण महाराष्ट्र भागात राज्य होते. बदलापुरनजीकाचा भाग ‘उत्तर कोंकणा’वर राज्य करणार्‍या शिलाहार-शाखेकडे होता. हा काळ होता इ.स. चें नववें ते तेरावें शतक. याचा अर्थ असा की ही शिळाशिल्पें आजपेक्षा ७००/८०० ते १२०० वर्षें जुनी आहेत. हजार वर्षें म्हणूं या. लोसत्तामधील बातमीही सादारण हाच काळ दाखवते.

आपण या ‘गधेगाळ’ नामक, शिळेवर-कोरलेल्या-प्रतिमेचा विचार करणार आहोत. ‘लोकसत्ता’च्या शब्दात-
‘शिलाहार राज्याच्या काळात, राजाज्ञा मोडल्यास कठोर शिक्षा करण्यात येण्याची ताकीद म्हणून,
गाढव व स्त्रीचा समागम होत असल्याचें शिल्प कोरलें जाई’.

राजाज्ञा मोडल्यास सज़ा होणें योग्यच आहे. आजही कायदा मोडणार्‍यांना शिक्षा होतेच. लोकांना या बाबीची आगाऊ वॉर्निंग देणेंही ठीकच आहे. राजाज्ञा, म्हणजेच तत्कालीन कायदा, मोडणार्‍याला ‘गाढव’ या सदरात टाकणें, हेंही ठीक आहे. पण ऑब्जेक्शनेबल् आहे ती ही गोष्ट की गाढवाचा स्त्रीशी समागम दाखवणें. गाढवाशी समागम दाखवून नारीला किती हीन, किती नीच पातळीला आणून ठेवलेलें आहे ! गुन्हा कुणाचा, अन् हीनत्व कुणाला !!

बिचार्‍या ‘स्त्री’नें राजाचें (आणि समाजाचें) काय ‘घोडें मारलें होतें’, म्हणून तिचा असा अवमान ? अशी ‘प्रतिमा’ कोरल्यानें ‘per se’ नारीजातिची प्रतिमा मलिन होते, याचा विचार राजा किंवा त्याच्या जबाबदार प्रधानमंडळानें केला नाहीं काय? धर्मशास्त्र्यांनी हें राजाला सांगितलें नाहीं काय ? कोणी असा बदसल्ला शिलाहार राजाला दिला असेल ? कोणत्या शास्त्रात, कोणत्या ग्रंथात, अशा प्रकारचा समागम दाखवणें रास्त म्हटलें आहे ? शिल्प कोरलें भलेही पाथरवटानें असेल, पण त्याला, ‘काय कोरायचें’ हा हुकूम तर कोणी सुशिक्षित अधिकार्‍यानेंच दिला असेल ना ? राजाला या शिल्पाची कल्पना देऊन , त्याची पूर्वसंमतीही घेतली गेली असणारच. तत्कालीन राजे काय, मंत्री काय, धर्मशास्त्री काय, सगळेच, एकीकडे, ‘यत्र नार्यस्तु पूज्यंते, रमन्ते तत्र देवता’, ‘जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी’ , ‘मातृदेवो भव’ असें म्हणत म्हणत, दुसरीकडे अशा प्रतिमा कोरायाच हुकूम देतात, याचा स्पष्ट अर्थच असा की, तत्कालीन सर्व समाजातच ‘per se’ स्त्रीला मान नव्हता, आणि असलाच तर तो फक्त तोंडदेखलाच होता. प्रत्येक व्यक्ती आपापल्या आई-बहीण-पत्नी-पुत्री यांना ममत्वानें वागवत असेलच, मान देत असेलच ; पण ‘per se’ नारीजातिला हीन समजलें जात असणार हें उघड आहे.

आणि हा ‘समागम’ कुणाच्या साक्षीनें ? तर, शिल्पांवर कोरलेल्या सूर्य, चंद्र व (मंगल-)कलश यांच्या साक्षीनें ! ‘सूर्य-चंद्र असेतो ही राजाज्ञा कायम राहील’ असा याचा अर्थ लोकसत्तामध्ये दिलेला आहे. पण, सूर्य व चंद्र हा ‘समागम’ पहाताहेत, म्हणजेच, असा हीन समागम ‘यावच्चंद्रदिवाकरौ’ चालूं असल्याचाही अर्थ यातून काढता येईल. आणि, मंगल-कलशाचें काय ? हा हीन ‘समागम’, तत्कालीन ‘प्रस्थापित-उच्चपदस्थांना’ मंगल वाटला की काय ? सगळेंच आक्रित !

प्रस्तुत शिल्पाजवळ मंदिराच्या खांबांचे अवशेष सापडले आहेत. म्हणजेच, अशी शिल्पें मंदिराजवळही प्रस्थापित केलेली असणारच. या मंदिरांमध्ये विविध स्तरातील अनेक स्त्रिया वेळोवेळी देवदर्शनाला, कथा-पुराण-प्रवचन ऐकायला, उत्सव साजरे करायला, जातच असणार. त्यांच्या नजरेला अशी शिल्पें नक्कीच पडत असणार. त्यांना ते पाहून काय वाटत असेल ? पण सांगणार कुणाला, तक्रार कोणाकडे करणार ? आणि, केलीच तर, ऐकणार कोण ? ‘तोंड दाबून बुक्क्यांचा मार’ ! ( आजच्या काळातही , जातां-जातां, स्त्रियांच्या कानांवर ‘आईबहिणीच्या’ हीन शिव्या पडतातच, आणि त्या बिचार्‍या ऐकून न-ऐकल्यासारखें करतात ! दुसरा पर्यायच काय आहे त्यांना ? )

‘थोर भारतीय संस्कृती’असें आपण सदासर्वदा म्हणत असतो, आपल्याला या संस्कृतीचा अभिमानही असतो. संस्कृतीतील चांगल्या गोष्टीबद्दल अभिमान असणें रास्त आहे ; पण संस्कृतीचें हेंही दुसरें अयोग्य रूप आहे, आणि त्याला राजमान्यता होती , ‘शिष्टजन’ यांची मान्यता होती, हेंही आपण विसरतां कामा नये. मध्ययुगात समाज एकीकडे राजकीयदृष्ट्या खाली-खाली जात होताच, व दुसरीकडे, सामाजिक दृष्ट्याही तो अधिक ‘दकियानूसी’, जुनाट, बनून खाली-खाली जात होता. पण, या शिल्पाचा काळ तर १००० वर्षांपूर्वीचा, म्हणजेच, आपण ज्याला ‘मध्ययुग’ म्हणतो, त्याआधीचा आहे. त्या काळात भारत राजकीय दृष्ट्या ‘उंच’च होता ( मध्ययुगीन परकीयांची , परधर्मियांची आक्रमणें सुरूंही झालेली नव्हती) ; मात्र सामाजिक दृष्ट्या, भारतीय समाजातील विचार, चालीरीती ‘उच्च’ पातळीच्या नव्हत्या, हेंच असली शिल्पें प्रकर्षानें दाखवतात.

म्हणूनच, एका जुन्या सुभाषिताला पॅरॅफ्रेज करून म्हणावें लागतें की, ‘नरेंच केली हीन किति नारी’ !!

कोणी म्हणूं शकेल , की, २१ व्या शतकातील विचार, अशा अनेक-शतकें-जुन्या शिल्प-प्रतिमेला लावणें कितपत योग्य आहे ? पण लक्षात राहूं द्या की, कांहीं सत्यें कालातीत असतात. किमान, नारीचा समाजातील दर्जा ‘उच्च’ ठेवणें , हें सत्य त्रिकालबाधितच असायला हवें. पण, जिथें आजही ‘स्त्री’ला, समानतेसाठी, तिच्या न्याय्य हक्कांसाठी, मंदिरप्रवेश, ‘राइट टु पी’ सारख्या गोष्टींसाठीं झगडावें लागतें, जिथें आजही सुनांच्या छळाच्या, त्यांना जाळायच्या घडना घडत आहेत ; तिथें, अनेक-शतकें जुन्या ‘प्रतिमां’मुळे डिस्टर्ब् व्हायला कुणा पुरुषाला वेळ आणि इंटरेस्ट आहे ? होय ना ?

– सुभाष स. नाईक. Subhash S. Naik
सांताक्रुझ (प), मुंबई. Santacruz(W), Mumbai.
eMail : vistainfin@yahoo.co.in
Website : www.subhashsnaik.com / www.snehalatanaik.com

सुभाष नाईक
About सुभाष नाईक 297 Articles
४४ वर्षांहून अधिक अनुभव असलेले सीनियर-कॉर्पोरेट-मॅनेजर (आतां रिटायर्ड). गेली बरीच वर्षें हिंदी/हिंदुस्थानी, मराठी व इंग्रजी या भाषांमध्ये गद्य-पद्य लिखाण करत आहेत. त्यांची ९ पुस्तकें प्रसिद्ध झाली आहेत. पैकी ६ ‘पर्यावरण व प्रदूषण’ या विषयावरील इंग्रजी न हिंदी कवितांची पुस्तकें आहेत. दोन पुस्तकें , ‘रामरक्षा’ व ‘गणपति-अथर्वशीर्ष’ या संस्कृत स्तोत्रांची मराठी पद्यभाषांतरें आहेत. अन्य एक पुस्तक ‘मृत्यू आणि गत-सुहृद ’ हा विषयाशी संल्लग्न बहुभाषिक काव्याचें आहे. गदिमा यांच्या ‘गीत रामायणा’चें हिंदीत भाषांतर. बच्चन यांच्या ‘मधुशालचें मराठीत भाषांतर केलेलें आहे व तें नियतकालिकात सीरियलाइझ झालेलं आहे. टीव्ही वर एका हिंदी सिट-कॉम चें स्क्रिप्ट व अन्य एका हिंदी सीरियलमधील गीतें व काव्य लिहिलेलें आहे. कत्थक च्या एका कार्यक्रमासाठी निवेदनाचें हिंदी स्किप्ट लिहिलें आहे. अनेक मराठी व हिंदी पब्लिकेशब्समध्ये गद्य-पद्य लेखन प्रसिद्ध झालें आहे, जसें की, महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता, सत्यकथा, स्वराज्य, केसरी, नवल, धर्मभास्कर, धर्मयुग, धर्मभास्कर, साहित्य अकादेमी चें हिंदी जर्नल ‘समकालीन भारतीत साहित्य’ , मराठी अकादेमी बडोदा चॅप्टर चें मराठी जर्नल ‘संवाद’, तसेंच प्रोफेशनल सोसायटीचें इंग्रजी जर्नल यांत लेखन प्रसिद्ध झालेलें आहे.मराठी , हिंदी व इंग्लिश वेबसाईटस् वर नियमित गद्य-पद्य लेखन. कांहीं ई-बुक सुद्धा प्रसिद्ध.
Contact: Website

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..