डॉ. अजित सावंत यांचा जन्म ११ एप्रिल १९६० रोजी झाला.
कम्युनिस्ट चळवळीतील आक्रमकतेचे बाळकडू डॉ. अजित सावंत यांना घरातूनच मिळाले. डॉ. अजित सावंत यांनी मुंबई काँग्रेसमध्ये बराच काळ महत्त्वाच्या पदावर काम केलं.मुंबई काँग्रेसचे गुरुदास कामत यांनी सावंत यांना पक्षात पद दिले व काम करण्याची संधी दिली. मुंबई काँग्रेसचे सरचिटणीस आणि प्रवक्तेपद त्यांनी भूषविले होते. प्रवक्ते म्हणून पक्षाची भूमिका ते माध्यमांमधून ठामपणे मांडत.
२००१ ते २०१२ दरम्यान ते मुंबई प्रदेश काँग्रेसचे माजी सरचिटणीस आणि प्रवक्ते होते. काँग्रेसमधून बाहेर पडून ते ‘आप’मध्ये गेले होते. आपल्या वक्तृत्वातून छाप पाडणारे अजित सावंत हे निवडणुकीच्या राजकारणात मात्र यशस्वी झाले नाहीत. माहीम विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसने त्यांना उमेदवारी दिली होती, पण स्वकीयांनीच मोडता घातला. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीतही त्यांना अपयशच आले होते. कामगारांचे हक्क आणि कामगार कायद्यांबाबत त्यांचा अभ्यास होता. आयटी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी त्यांनी सर्वात प्रथम संघटना उभारली. आयटी कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांच्या पिळवणुकीविरोधात त्यांनी ‘बीपीओ-आयटी एम्प्लॉइज कॉन्फेडरेशन’ या संघटनेच्या माध्यमातून आवाज उठवला होता.
नॅशनल कॉन्फेरेशन ऑफ युनिट्सचे वरिष्ठ अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलं. भारतीय असंघटित कामगार विकास संघटनेचे अध्यक्ष राहिले. राजकारणात येण्यापूर्वी त्यांनी विविध बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये त्यांनी कार्मिक व्यवस्थापनात काम केलं होतं. त्यांचे वडील, कामगार नेते पी. जी. सावंत हे सीटू या कामगार संघटनेत सक्रिय होते. मुंबईतील गिरणी कामगारांच्या चाळीतील हक्कांच्या रक्षणासाठी त्यांनी प्रयत्ने केले. मुंबईतील जुन्या चाळी आणि त्यांची पुनर्बांधणी व त्यावरील मालमत्ता करासाठी आंदोलनात पुढकार घेतला. रेल्वेच्या जमिनीवरील झोपडपट्ट्यांच्या पुनर्वसनाखेरीज त्यांना हटवू नये या मोहीमेत सहभाग घेतला. कोकण रेल्वेसह कोकणी माणसांच्या विविध प्रश्नांबाबत सक्रिय नेतृत्त्व अजित सावंत यांनी केले.
त्यांनी कामगारांच्या हक्कांसाठी ‘उठवा झेंडा बंडचा’ हे पुस्तकही लिहिले होते.
अजित सावंत यांचे ७ मार्च २०१९ रोजी निधन झाले.
Leave a Reply