झणझणीत मिसळ पाव

साहित्य : मटकी आणि मुग मोडाचे दोन मोठ्या वाट्या.
सुके मसाले : हळद एक चमचा, हिंग पाव चमचा, तिखट प्रेमाने 3 चमचे, जिरे-धणे पूड एक चमचा, गरम मसाला एक चमचा, काळा मसाला (घरचा) एक चमचा, मिसळ मसाला तीन चमचे, तेल सढळ हाताने, मीठ चवीप्रमाणे.
हिरवं वाटण : हिरवे टोमॅटो दोन मध्यम आकाराचे, हिरवी मिर्ची दोन, लसूण ४-५ पाकळ्या, कोथिंबीर एक मूठ
कांद्याचं वाटण : कांदे दोन मध्यम आकाराचे, आलं दोन पेरं, मिरची दोन.

कृती : हिरवं आणि कांद्याचं वाटण वाटून घ्यावे. कुकर मध्ये भरपूर तेल घालून फोडणी करावी. त्यात दोन्ही वाटण घालून तेल सुटेपर्यंत परतवावे. मग त्यात सगळे कोरडे मसाले (मिसळ मसाला आणि गरम मसाला सोडून) घालून मिनिटभर परतवावे. मग त्यात मोडाची उसळ घालून परतवावे. मग त्यात ४-५ पेले पाणी घालून मीठ घालून कुकरला झाकण लावून दोन शिट्ट्या करून घ्याव्या. कुकर दबला की वरून गरम मसाला आणि मिसळ मसाला घालून गरम तेल ओतावे आणि लागलीच झाकण ठेवून द्यावे. दोन मिनिटाने तुमची मिसळ तयार. खायला देतांना त्यात तिखट आणि कमी तिखट (जाड आणि बारीक) अशी मिक्स शेव घालून वरून कांदा आणि लिंबू ठेवून गरमा गरम मिसळ द्यावी.

काही टिप्स

१. मिसळ मध्ये काय काय असू शकते : तर बरेच काही, चमचा भर पोहे, शिजलेला साबुदाणा, वाफवलेल्या बटाट्याच्या फोडी. प्रत्येकाची आवड.
२. मिसळ मधली उसळ पण कोणी नुसती मटकी घालतं तर कोणी नुसते मुग. कोणी मिक्स घालतात. कुठे कुठे वाटण्याची मिसळ असते.
३. रश्श्यामध्ये सुद्धा वर सांगितल्या प्रमाणे खूप प्रकार असतात.
४. मिसळ बरोबर पापड पण हवाच आणि तो सुद्धा तळलेला. मी काल तांदळाचे तळले होते.
५. झणझणीत मिसळी नंतर एक घास दह्याचा घायची इथे पद्धत आहे, त्यामुळे अगदी चमचभर दही पण ठेवतात इथे.

आपल्या आपल्या आवडीप्रमाणे आणि उपलब्धतेप्रमाणे प्रकार करून पहायचे आणि चाखून पहायचे.

सोनाली तेलंग

Avatar
About सौ. सोनाली अनिरुद्ध तेलंग 5 Articles
मी सोनाली अनिरुद्ध तेलंग, विज्ञान शाखेत स्नातक आहे. सध्या "conginitive science based brain and skill development for growing child " वर काम करते. मी गेली १०-१२ वर्ष वेगवेगळ्या विषयांवर लिखाण करते. लिखाणाचा रोख मुख्यत्वे मनुष्य स्वभाव, भारतीय संस्कृती ह्यावर असतो. आपले पदार्थ आपल्या पुढच्या पिढीला वारसा हक्कात देण्याची जवाबदारी आपली असते, त्यामुळे मराठी व इतर पाककृती स्वतः करते आणि सगळ्यांबरोबर शेअर करते.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*