थकवा पळवण्यासाठी आवश्यक हेल्थ ड्रिंक्स

आपल्या सर्वांनाच विविध प्रकारची पेय पिण्यास आवडतात. सगळ्यात नैसर्गिक पेय म्हणजे “पाणी”. विविध प्रकारचे फळांचे, भाज्यांचे रस म्हणजे शरीरासाठी उत्तम, कारण त्यामध्ये विविध पौष्टिक गुणधर्म आढळून येतात. आज आपण काही आरोग्यासाठी उपयुक्त अशा पेयासंबंधी माहिती करून घेऊया :

१) नारळ पाणी = बारा महिने मिळणारे, सर्वात सहज उपलब्ध असलेले नैसर्गिक पेय म्हणजे “नारळ पाणी” होय. सकाळी नारळपाणी पिण्यामुळे आपल्याला दिवसभर ताजेतवाने राहण्यास मदत असते. नारळ पाण्यामध्ये भरपूर प्रमाणात खनिजे आढळून येतात, त्यामुळे आपल्या शरीरातील ऊर्जेची पातळी वाढण्यास मदत होते आणि आपल्याला दिवसभर ताजेतवाने वाटते. नारळ पाणी हे आरोग्यासाठी चांगला आणि पौष्टिक असा स्रोत आहे. नारळ पाणी पिण्यामुळे आपली त्वचाही टवटवीत राहण्यास मदत होते.

२) भाज्यांचा रस = आपल्याकडे विविध हंगामाप्रमाणे अनेक भाज्या मिळतात, ज्यामध्ये नैसर्गिकरित्या प्रथिन, जीवनसत्व, खनिजे आढळून येतात. जी आपल्या शरीरासाठी आवश्यक आहेत. म्हणूनच भाज्यांच्या रसांचे सेवन करणे, हा निरोगी आरोग्यासाठी उत्कृष्ट असा पर्याय आहे. ह्यामध्ये विशेषकरून हिरव्या पालेभाज्यांचा आवर्जून समावेश करावा. उदा. पालक, पुदिना इत्यादी. हिरव्या भाज्यांचा रस नियमितपणे पिण्यामुळे आपल्याला थकवा जाणवत नाही आणि शरीराला आवश्यक असलेले पौष्टिक घटक त्यातून मिळतात.

३) लिंबू पाणी = कुठलीही कोल्ड्रिंक पिण्यापेक्षा लिंबू पाणी पिणे केव्हाही उत्तम. लिंबू पाण्यामध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटिऑक्सिडंट असतात त्यामुळे शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.

४) कोरफडीचा रस = सकाळी जर आपण कोरफडीचा रस सेवन केला तर आपल्या शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर टाकण्यास मदत होते. कोरफडीच्या गरामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असल्याने शरीरातील पाण्याची पातळी योग्य प्रमाणात राहते. कोरफडीमध्ये असलेल्या अँटी इन्फ्लमेटरी तत्वामुळे शरीरातील वेदना, ताण आणि थकवा दूर होण्यास मदत होते. म्हणून योग्य प्रमाणात आणि योग्य वेळेत कोरफडीचा रस जरूर सेवन करावा.

५) आवळ्याचा रस = आवळ्यांमध्ये असलेल्या गुणांमुळे आपले शरीर नैसर्गिकपणे डिटॉक्स म्हणजेच शरीरातील नको असलेल्या पदार्थाचा निचरा होण्यास मदत होते. त्यामुळे पचनसंस्था चांगली राहण्यास मदत होते. तसेच रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.

६) जिऱ्याचे पेय = आवळ्याप्रमाणे जिऱ्याचा पाण्यानेही शरीर डिटॉक्स होण्यास मदत होते, तसेच शरीररतील पाण्याची पातळी नियंत्रित राहते. नियमितपणे जिऱ्याचे पाणी पिण्याने झोप चांगली लागते.

७) कोमट पाणी = कोमट पाणी हे शरीरासाठी केव्हाही उत्तमच. कोमट पाणी नियमितपणे पिण्याने शरीरातील ऊर्जा वाढण्यास मदत होते तसेच पचनक्रियापण सुरळीत होण्यास मदत होते.

अशा ह्या विविध बहुगुणी पेयांचा समावेश आपल्या रोजच्या आहारात जरूर करावा आणि एक निरोगी आयुष्य जगावे.

Avatar
About Sanket 7 Articles
संकेत प्रसादे हे एक प्रसिद्ध लेखक, ब्लॉगर, प्रशिक्षक, समुपदेशक आणि युटूबर आहेत. त्यांची आतापर्यंत २ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. तसेच ते नवराष्ट्र ह्या दैनिकामध्ये मानसिक आणि शारीरिक आरोग्यासंबंधी लिखाण करतात. मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्याबद्दल ते आपल्या लिखाणांमधून तसेच कार्यक्रमांमधून लोकांमध्ये जनजागृती निर्माण करतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*