चांगल्या फिटनेससाठी पौष्टिक खिचडीचा वापर नक्की करा

जेव्हा आपण कामावरून दमून घरी येतो, दिवसभराच्या थकव्याने जेवण बनवण्याचा कंटाळा येतो. पण घरातील सात्विक अन्न खाण्याची इच्छा असल्याने आपण पटकन होणारी, रुचकर आणि पौष्टिक अशा खिचडीचा पर्याय निवडतो. कारण कमी वेळात होणारी, पचायला हलकी, चवीला उत्तम अशी खिचडी घरातील सर्वांनाच आवडते. जेव्हा पोटात गडबड असते, तेव्हाही खिचडीचा पर्याय उत्तम ठरतो. रोजच्या जेवणातून बदल म्हणूनही आपण खिचडीचा आनंदाने स्वीकार करतो. तर अशी ही सर्वांची आवडती खिचडी आपल्या पौष्टिक घटकांसाठी सर्वांची प्रिय आहे. आज आपण खिचडीतील गुणधर्म जाणून घेऊयात:

१) खिचडी बनवताना आपण डाळ, तांदूळ आणि भाज्याचा वापर करतो. तसेच खिचडीत साजूक तूप वापरतो. तुपामध्ये भरपूर प्रमाणात पोषक द्रवे असतात. सर्व पदार्थामुळे आपल्या शरीराला कर्बोदके, प्रथिने, फायबर आणि व्हिटॅमिन्स मुबलक प्रमाणात मिळतात. म्हणूनच खिचडी ही सात्विक आणि पौष्टिक आहार समजली जाते.

२) खिचडी पचण्यास हलकी असल्याने पचनसंस्था चांगली राहण्यास मदत होते. त्यामुळे बद्धकोष्ठता, ऍसिडिटी, अपचन, गॅस वा पोट फुगण्यासारख्या समस्यांचा निचरा करण्यास मदत होते.

३) खिचडीमध्ये पौष्टिक घटक जास्त प्रमाणात आढळून येतात आणि चरबी अथवा कॅलरीज खूपच कमी प्रमाणात असतात. त्यामुळे खिचडी पचायला हलकी असते. पर्यायाने आपले वजन अतिरिक्त वाढत नाही. वजन नियंत्रित ठेवण्यासाठी आहारात खिचडीचा योग्य प्रमाणात समावेश जरूर करावा.

४) आपल्या आहारात नियमितपणे अख्ख्या धान्याची खिचडी खाल्ल्यास शरीरातील इन्सुलिनची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत होते. त्यामुळे मधुमेहासारख्या विकारापासून बचाव होण्यास मदत मिळते.

५) खिचडी ही पचण्यास हलकी असल्याने वात, पित्त आणि कफापासून बचाव होण्यास मदत होते. ज्यांना वारंवार वात, पित्त आणि कफ होत आल्यास नियमितपणे आहारात खिचडीचा जरूर समावेश करावा.

६) खिचडीच्या नियमित योग्य प्रमाणात सेवनाने पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. त्यामुळे नैसर्गिकरित्या शरीरातील विषारी द्रव्य बाहेर पडण्यास मदत होते आणि आपली त्वचा आरोग्यदायी तसेच चमकदार होण्यास मदत होते.

तर अशी सर्वांची आवडती, पौष्टिक घटकांनी युक्त, बनवायला सोपी, पचायला हलकी आणि शरीराला खूप सारे फायदे देणारी “खिचडी” आपल्या आहारात नियमितपणे योग्य प्रमाणात असणे हे आपल्या नक्कीच फायदाचं आहे.

Avatar
About Sanket 7 Articles
संकेत प्रसादे हे एक प्रसिद्ध लेखक, ब्लॉगर, प्रशिक्षक, समुपदेशक आणि युटूबर आहेत. त्यांची आतापर्यंत २ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. तसेच ते नवराष्ट्र ह्या दैनिकामध्ये मानसिक आणि शारीरिक आरोग्यासंबंधी लिखाण करतात. मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्याबद्दल ते आपल्या लिखाणांमधून तसेच कार्यक्रमांमधून लोकांमध्ये जनजागृती निर्माण करतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*