शेगाव कचोरी

साहित्य:
सारणासाठी: १ वाटी हिरवी मूगाची डाळ,१ चमचा आले पेस्ट,३ हिरव्या मिरच्या/ लाल तिखट, १ चमचा आमचूर पावडर, १ चमचा बडीशेप
१ चमचा गरम मसाला, दिड चमचा साखर, हिंग, हळद, कढीपत्ता, तेल, मीठ.
आवरणासाठी: २ वाट्या गव्हाचे पिठ,३-४ चमचे तेल,पिठ भिजवण्यासाठी पाणी,चवीपुरते मीठ,तळण्यासाठी तेल.

कृती:
१) मूग डाळ ४-५ तास भिजत ठेवावी. भिजवलेली मूगडाळ जाड बुडाच्या पातेल्यात घेऊन १ वाटी पाण्यात उकळवावी. उकळवताना गॅस मध्यम असावा आणि पातेल्यावर झाकण ठेवावे. मूगडाळ अगदी नरम शिजवू नये. सर्व पाणी निघून जाऊ द्यावे. नंतर मूगडाळ थोडी चेचून घ्यावी.
२) गव्हाचे पिठाची कणिक भिजवावी. अगदी घट्ट किंवा अगदी सैल भिजवू नये. कणिक झाकून ठेवावी.
३) कढईत २ चमचे तेल गरम करावे. त्यात हिंग, हळद, आले पेस्ट, मिरच्या/लाल तिखट, कढीपत्ता घालून फोडणी करावी. त्यानंतर मूगडाळ, गरम मसाला, बडीशेप, आमचूर पावडर, मीठ, साखर घालून ढवळावे. सारण थंड होवू द्यावे. हाताने एकत्र करावे म्हणजे ते मिळून येईल.
४) कणकेचे दोन-दोन इंचाचे गोळे करावे. गोल पुरीसारखे लाटावे. पुरी डाव्या हातात घेऊन उजव्या हाताने त्यात एक चमचा सारण घालावे आणि सर्व कडा एकत्र आणून व्यवस्थित बंद करावे. हे करत असतानाच तळणासाठी कढईत तेल गरम करत ठेवावे. मिडीयम हाय हिटवर कचोर्या गोल्डन ब्राउन होईस्तोवर तळून काढाव्यात. या कचोर्या गरम असतानाच खाव्यात. थंड झाल्यावर चव फार चांगली लागत नाही.
या कचोर्या कोथिंबीर-पुदीना मिरचीच्या चटणीबरोबर किंवा चिंच खजूराच्या चटणीबरोबर अगदी झकास लागतात.

टीप:
१) गरम मसाल्याबरोबर २ चमचे गोडा मसाला (काळा मसाला) वापरल्यास चव छान येते.
२) आवडत असल्यास सारण परतताना काळ्या मनुका किंवा बेदाणे घालू शकतो.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*