पालक पराठा

साहित्य: १ जुडी पालक, पाने खुडून घ्यावीत. (बारीक चिरून साधारण २ ते अडीच कप), कणीक, ६-७ लसूण पाकळ्या, ३-४ तिखट मिरच्या,
१/४ टीस्पून हळद, १ टीस्पून जीरे, चवीपुरते मीठ, तेल.

कृती: १) मिरची आणि लसणीच्या पाकळ्या मिक्सरमध्ये वाटून घ्याव्यात.
२) पालक धुवून बारीक चिरून घ्यावा. त्यात मिरची-लसणीचे वाटण घालावे. हळद घालावी.
३) त्यात मावेल इतपत कणीक घालावी (साधारण १ ते दीड कप). चवीनुसार मीठ आणि जीरे घालावे.
४) अगदी थोडे पाणी घालून मळावे. जास्त पाणी घालू नये कारण मळताना पालकाचे सुद्धा पाणी निघते, जर गोळा सैल झाला तर गरजेनुसार कणीक वाढवावी. मिश्रण एकजीव झाले की त्यात २ टेबलस्पून तेल घालावे. पीठ जास्त वेळ मळावे.
५) मळलेल्या पीठाचे गोळे करून मध्यम आकाराचे पराठे लाटावेत. परोठा गरम तव्यावर टाकावा. बाजूने तेल किंवा तूप सोडावे.
६) दोन्ही बाजूने मध्यम आचेवर भाजून घ्यावा.

टिपा :

१) आवडीनुसार परोठा बटर वर करू शकतो.
२) पालक चीरण्याऐवजी मिक्सरमध्ये भरडसर वाटू शकतो.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*