मधु आपटे

बोबडे बोल हा एकमेव गुण असुनही केवळ त्यावर अनेक मराठी तसेच हिंदी चित्रपट करणारे मधू आपटे हे एकमेव कलावंत असतील. मधुकर शंकर आपटे हे मधू आपटे यांचे पुर्ण नाव. मराठीतील जेष्ठ विनोदी अभिनेते मधुकरआपटे म्हणजेच मधु आपटे यांचा जन्म १ मार्च १९१९ रोजी झाला.

‘मधू आपटे के साथ काम करते वख्त अच्छी ऍक्टिंग करके कोई फायदा नही. लोग तो मधू को ही देखेंगें’ असा हिंदी चित्रपटसृष्टीतील मातब्बर नट ओमप्रकाश यांच्याकडून अभिप्राय मिळवणाऱ्या मधू आपटे यांचा जन्म कोल्हापूर येथे झाला.

घरची गरिबी असल्यामुळे शाळेची फी देणे परवडत नव्हते, त्यामुळेच बर्यायपैकी हुशारी, चांगली स्मरणशक्ती व उत्तम हस्ताक्षर असूनही मधू आपटे यांचे शालेय शिक्षण पाचव्या इयत्तेपुढे जाऊ शकले नाही. मधू आपटे यांच्या मामांना १९२९ मध्ये ‘प्रभात’मध्ये नोकरी लागली व त्यांनी मधू आपटे यांच्या मोठ्या भावाला – अनंत आपटे यांना बालनट म्हणून काम मिळवून दिले.

स्टील डिपार्टंमेंटमध्ये असताना शांतारामबापूंनी फोनवर मधू आपटे यांचे बोलणे ऐकल्यावर त्यांनी मधू आपटे यांना ‘संत तुकाराम’ या चित्रपटात सालोमालो या इरसाल व्यक्तिरेखेच्या भूमिकेत उभे केले.

‘प्रभात’ कंपनीचा १९५४ मध्ये लिलाव झाल्यावर मधू आपटे बेकार झाले, त्या वेळेस त्यांना सीताकांत लाड व चित्तरंजन कोल्हटकर यांच्या प्रयत्नांमुळे आकाशवाणीवर काम मिळाले. पण त्यात सातत्य नसे. येथे काम करत असतानाच त्यांनी नाटकांमध्येही कामे करायला सुरुवात केली. १९४४ मध्ये मा. दीनानाथ यांच्या पहिल्या पुण्यतिथीला ‘भावबंधन’ नाटकाचा प्रयोग करण्यात आला, त्यात मधू आपटे यांना लता मंगेशकर यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली.

वसंत जोगळेकर यांच्या ‘कारगीर’ या हिंदी चित्रपटातही त्यांना ओमप्रकाश व ललिता पवार या भांडकुदळ जोडप्याच्या इरसाल मुलाची भूमिका मिळाली.

चार्ली चॅप्लीन, डॅनी के, बालगंधर्व, नानासाहेब फाटक यांच्याविषयी त्यांच्या मनात आदर होता. मधू आपटे यांनी आपल्या सदतीस वर्षांच्या कारकिर्दीमध्ये २०० हून अधिक हिंदी-मराठी चित्रपटांमध्ये व २० नाटकांमध्ये कामे केली.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*