Web
Analytics
माणिक सीताराम गोडघाटे (कवी ग्रेस) – profiles

माणिक सीताराम गोडघाटे (कवी ग्रेस)

नामवंत साहित्यिक आणि सिध्दहस्त कवी

नामवंत साहित्यिक आणि सिध्दहस्त कवी असलेल्या माणिक सीताराम गोडघाटे ऊर्फ कवी ग्रेस यांचा जन्म १० मे १९३७ रोजी झाला.

“इन्ग्रिड बर्गमन“ या पाश्चात्य अभिनेत्रीच्या अभिनयाने प्रभावित होऊन माणिक गोडघाटेंनी “ग्रेस” हे साहित्यिक नाव धारण केले होते. मर्ढेकरोत्तर नवकवींच्या दुसर्‍या पिढीतील प्रमुख कवींमध्ये यांची गणना होते. ग्रेस यांचे वडील लष्करी व्यवसायात होते. त्यांची रसिकता कर्नल बाग या नागपुरातील वस्तीत त्यांचे कुटुंब राहत होते. ग्रेस यांचे सुरुवातीचे जीवन कष्टमय होते. आईच्या अकाली निधनामुळे घराची जबाबदारी त्यांना स्वीकारावी लागली तसंच नोकरी आणि शिक्षणासाठी सुध्दा प्रचंड संघर्ष करावे लागले. डॉ. लीला माटे यांच्याशी विवाह झाल्यानंतरही हा संघर्ष सुरूच राहिला. एम. ए. ची परीक्षा जवळ आलेली असताना त्यांना बसचा अपघात झाला.

१९६६ मध्ये मराठी विषयातील “ना. के. बेहरे सुवर्णपदक” जिंकून नागपूर विद्यापीठातून माणिक गोडघाटे एम. ए. झाले. प्लास्टर लावलेल्या हातांनी त्यांनी प्रमाणपत्र आणि सुवर्णपदक घेतले.

१९६६ ते १९६८ या काळात नागपूरच्या धनवटे नॅशनल कॉलेजमध्ये अधिव्याख्याता म्हणून त्यांनी काम केले, तर १९६८ पासून ते नागपूरच्याच वसंतराव नाईक समाजविज्ञान संस्थेत (मॉरिस कॉलेज) मराठीचे अध्यापन करू लागले. प्राध्यापक म्हणून १९९७ मध्ये ते सेवानिवृत्त झाले. त्यानंतर २००४ पर्यंत नागपूरच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठातील मराठी व ललित कला विभागात संशोधन मार्गदर्शक म्हणून ते कार्यरत होते, तसंच “सौंदर्यशास्त्र” या विषयाचे अध्यापनही ग्रेस यांनी विद्यापीठात त्यांनी केले. १९७१ ते १९७६ या काळात दिल्लीच्या भारतीय साहित्य अकादमीच्या मराठी सल्लागार समितीचे ते सदस्य होते, तर “महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळा”चे १९८२ ते १९८६ या काळात ते सदस्य होते.

त्यांचे पाच काविता व सात ललितलेखसंग्रह आजवर प्रकाशित झाले असून यामध्ये “संध्याकाळच्या कविता“, “राजपुत्र आणि डार्लिंग”, “चर्चबेल”, “मितवा”, “सांध्यपर्वातील”, “वैष्णवी”, “सांजभयाच्या साजणी”, “ओल्या वेळूची बासरी”, “असे रंग आणि ढगांच्या किनारी”, “अज्ञेयाहून गूढ गूढ दिसती झाडातली वर्तुळे”, “आठवण”, “कंठात दिशांचे हार”, “कर्णधून”, “कर्णभूल” या नावाने प्रसिध्द झालेले साहित्य लोकप्रिय ठरले आहे.

वेळोवेळी दर्जेदार वाड्मयाची निर्मिती केल्याबद्दल तसंच क्षेत्राला दिलेल्या अमूल्य योगदानासाठी ग्रेस यांना अनेक पुरस्काराने सन्मानित केले गेले आहे ज्यामध्ये “जी. ए. कुलकर्णी सन्मान पुरस्कार”, “महाराष्ट्र शासन उत्कृष्ट वाङ्मयनिर्मिती पुरस्कार, चंद्रमाधवीचे प्रदेश (काव्य)”, “महाराष्ट्र शासन उत्कृष्ट वाङ्मयनिर्मिती पुरस्कार, चर्चबेल (ललितबंध)”, “महाराष्ट्र शासन उत्कृष्ट वाङ्मयनिर्मिती पुरस्कार, संध्याकाळच्या कविता (काव्य)”, “वाग्विलासिनी पुरस्कार, दीनानाथ मंगेशकर प्रतिष्ठान, पुणे”, २०११ सालचा “विदर्भ भूषण पुरस्कार”,”नागभूषण फाऊंडेशन चा नागभूषण पुरस्कार”, “विदर्भ साहित्य संघ नागपूर चा “जीवनव्रती पुरस्कार”, “दमाणी पुरस्कारांचा” समावेश आहे;

सर्वात महत्त्वाचे म्हणजे ग्रेस यांच्या “वार्‍याने हलते रान” ह्या ललितलेख संग्रहासाठी त्यांना २०११ सालचा साहित्य अकादमी पुरस्कार देऊन गौरवण्यात आले होते; तर २०१२ साली आयोजित करण्यात आलेल्या ई-साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद देखील कवी ग्रेस यांनी भुषविले होते.

विशेष म्हणजे डॉ. जया मेहता यांनी ग्रेस यांच्या “चर्चबेल” व “मितवा” या ललित लेखसंग्रहांचे गुजरातीत भाषांतर केले असून, ग्रेस यांच्या काही निवडक कवितांचे डॉ. उमाशंकर जोशी यांनी गुजरातीत अनुवादित केलेल्या आहेत.

प्रसिद्ध संगीतकार हृदयनाथ मंगेशकर यांच्यासोबत काव्यगायन आणि विवेचन अशा द्विदल कार्यक्रमाचे सादरीकरण कवी ग्रेस यांनी २००८ मध्ये सुरू केले. इचलकरंजी येथे “मैत्र जीवाचे” या नावाने अशा द्विदल कार्यक्रमांचा पहिला प्रयोग सादर झाला होता.

कर्करोगाशी सुमारे तीन वर्षे लढा दिल्यानंतर अखेर वयाच्या पंचाहत्तराव्या वर्षी म्हणजे २६ मार्च २०१२ या दिवशी ग्रेस यांचे पुण्यात निधन झाले.

( लेखन व संशोधन – सागर मालाडकर )

कवी ग्रेस यांच्यावरील विविध लेख वाचण्यासाठी खालील लिंक्स वर क्लिक करा
ग्रेस यांची “ती गेली तेव्हा”
१० मे – कवी ग्रेस यांची जयंती

## Godghate, Manik (Kavi Grace)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


Whatsapp वर संपर्क साधा..