बळवंत मोरेश्वर (बाबासाहेब) पुरंदरे

इतिहास आणि शिवचरित्राचे गाढे अभ्यासक

छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचे गाढे अभ्यासक असलेल्या बाबासाहेब पुरंदरे यांच्याकडे इतिहासाच्या अभ्यासाबरोबरच तो अतिशय रोचकपणे सांगण्याची कला आहे. तरूण पिढीच्या रक्तात शिवचरित्र भिनवण्याची फार मोठी कामगिरी पुरंदरेंनी केली. बाबासाहेब पुरंदरेंना शिवशाहीर म्हणून संबोधले जाते. बाबासाहेब पुरंदरी यांनी शिवाजी महाराजांवर २०१५ सालापर्यंत बारा हजाराहून अधिक व्याख्याने दिली आहेत..

इतिहासाचा ध्यास घेतलेले बाबासाहेब हे तरुणपणी आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांच्या वृत्तपत्रात लेखन करीत. शिवाय आपले मेहुणे श्री.ग.माजगावकर यांच्याबरोबर ते ’माणूस’मध्येही काम करत होते. ज्येष्ठ इतिहासकार व कादंबरीकार गो.नी.दांडेकरांशी पुढे त्यांची भेट झाली. ते नेहमी गडांवर एकत्र भटकंती करीत. बाबासाहेब पुरंदरे यांनी महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांचा आणि मराठा साम्राज्य आणि शिवकालीन ऐतिहासिक दस्तऐवजांचा सखोल अभ्यास केला आहे.

बाबासाहेब पुरंदरे यांनी मुख्यत्वे ऐतिहासिक विषयांवर वर्णनात्मक लेखन, ललित कादंबरी लेखन तसेच नाट्यलेखन व जाणता राजा या नाटकाचे दिग्दर्शन केले. पुरंदर्‍यांची दौलत, पुरंदर्‍यांची नौबत, गड-किल्ल्यांची ऐतिहासिक माहिती देणारे साहित्य (गडसंच), शेलारखिंड, व राजा शिवछत्रपती हे बाबासाहेबांचे आजवर प्रकाशित झालेले साहित्य.

शिवचरित्र हे घरोघरी पोहोचावे हे ध्येय ठेवून बाबासाहेबांनी अथक संशोधनातून व परिश्रमांतून राजा शिवछत्रपती हा ग्रंथ साकार केला. या ग्रंथाच्या १६ आवृत्ती आजपर्यंत सुमारे ५ लाख घरांमध्ये पोहोचल्या आहेत.

जाणता राजा या महानाट्याचे गेल्या २७ वर्षांत १२५० हून अधिक प्रयोग झाले आहेत. पहिला प्रयोग १४ एप्रिल, इ.स. १९८४ रोजी झाला होता. या प्रयोगांच्या उत्पन्नातून बाबासाहेबांनी अनेक संस्थांना लाखो रुपयांची मदत केली आहे. हे नाटक हिंदी-इंग्रजीसह ५ अन्य भाषांत भाषांतरित केले गेले आहे. ‘जाणता राजा’ मध्ये १५० कलावंत काम करतात आणि याशिवाय हत्ती घोडे यांचाही रंगमंंचावर वावर असतो.

राजामाता सुमित्राराजे भोसले, माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील, माजी उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाण, माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, इतिहास संशोधक न.र. फाटक, कवी कुसुमाग्रज, सेतुमाधवराव पगडी, आचार्य अत्रे, शिवाजीराव भोसले, नरहर कुरुंदकर, लता मंगेशकर, डॉ. रघुनाथ माशेलकर, डॉ. विजय भटकर आदी नामवंतांनी बाबासाहेबांच्या कार्याचा गौरव केला आहे.

डी.वाय. पाटील यांच्या अभिमत विद्यापीठाने त्यांच्या इतिहास संशोधनातील योगदानाबद्दल त्यांचा सन्मान केला आहे.

डॉ.सागर देशपांडे यांनी ‘बेलभंडारा’ या नावाने बाबासाहेब पुरंदरे यांचे सचित्र चरित्र लिहून प्रसिद्ध केले आहे.

बाबासाहेब पुरंदरे यांना १९ ऑगस्ट २०१५ रोजी महाराष्ट्रभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. या दिवशी दिवस बाबासाहेबांचा तिथीने ९३ वा वाढदिवस होता. महाराष्ट्रभूषण या सन्मानाबरोबर मिळालेल्या दहा लाख रुपयांतले फक्त दहा पैसे त्यांनी स्वतःजवळ ठेवून उरलेल्या पैशात आणखी पंधरा लाख रुपये घालून ती सर्व रक्कम कॅन्सर हॉस्पिटलला दान केली आहे.

बाबासाहेबांना पुस्तकांच्या विक्रीतून आणि व्याख्यानांच्या बिदागीतून मिळालेले लाखो रुपये त्यांनी विविध संस्थांना दान केले आहेत.

बाबासाहेब पुरंदरे यांच्यावरील मराठीसृष्टीवरील लेख.

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे (29-Jul-2017)

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे (29-Jul-2021)

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे (15-Nov-2021)

## Purandare, Balwant Moreshwar (Babasaheb Purandare)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*