आचार्य प्रल्हाद केशव अत्रे

महाराष्ट्रातील एक झंझावाती व्यक्तिमत्व

Acharya Atre

प्रल्हाद केशव अत्रे हे महाराष्ट्रातील एक झंझावाती व्यक्तिमत्व मानलं जातं. साहित्य, शिक्षण, नाटक, चित्रपट, राजकारण व पत्रकारिता अशा विविध क्षेत्रांमध्ये त्यांनी आपला ठसा उमटवला. या सर्वच क्षेत्रामध्ये त्यांचा विलक्षण दबदबा होता. जनमानसावर त्यांचा प्रचंड पगडा होता. ते फर्डे वक्ते होते. आपल्या वक्तृत्वाने ते श्रोत्यांना भारावून टाकत असत. संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये त्यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली. काही काळ ते महाराष्ट्र विधानसभेत आमदारही होते. त्यांच्या काळातही विद्वान व साहित्यिकांबरोबर त्यांचे वादही खूप गाजले. आचार्य ही बिरुदावली त्यांना प्राप्त झाली होती. तेव्हाचे राष्ट्रपती डॉ. राधाकृष्णन (Dr Sarvapallli Radhakrishnan) यांनी त्यांचे `रायटर अॅन्ड फायटर ऑफ महाराष्ट्र` (Writer and Fighter of Maharashtra) असं यथार्थ वर्णन केलं होतं.

आचार्य अत्रे यांचा जन्म 13 ऑगस्ट 1898 रोजी झाला. पुणे व लंडन इथे त्यांनी उच्च शिक्षण प्राप्त केलं. भारतात परतण्यापूर्वी हॅरो येथे त्यांनी अध्यापनही केलं. पुण्यातील कॅम्प एज्यूकेशन सोसायटीच्या शाळेत ते अध्यापक होते. या शाळेचे पुढे ते मुख्याध्यापकही झाले. `नवयुग वाचनमाले` द्वारे त्यांनी लिहिलेली शालेय क्रमिक पुस्तकं हे त्यांचं शैक्षणिक क्षेत्रातील मोठं योगदान होय.

मराठी रंगभूमीच्या इतिहासात आचार्य अत्रे यांना विशेष स्थान आहे. त्यांनी एकूण 22 नाटकं लिहिली. विनोदप्रधान नाटकांची नवी परंपरा त्यांनी घडवली. `साष्टांग नमस्कार` ,मोरुची मावशी` `लग्नाची बेडी` , भ्रमाचा भोपळा` ही त्यांनी लिहिलेली नाटकं सदाबहार ठरली आहेत. निखळ विनोद हे या नाटकांचं वैशिष्टय. तो मी नव्हेच` हे त्यांचं उत्कंठाप्रधान नाटकही प्रचंड गाजलं. `उद्याचा संसार` सारखी शोकात्म नाटकांही लिहिली.

अत्रे यांची चित्रपट कारकीर्दही मोठी आहे. मास्टर विनायक यांनी दिग्दर्शित केलेल्या ब्रम्हचारी` `ब्रॅन्डीची बाटली` या चित्रपटांच्या कथा पटकथा त्यांनी लिहिल्या. पायाची दासी, `धर्मवीर` हे त्यांचे आणखी काही उल्लेखनीय चित्रपट. `अत्रे पिक्चर्स` ही संस्था त्यांनी स्थापन केली. होती. साने गुरुजीच्या कथेवर आधारित `श्यामची आई` या चित्रपटाची निर्मिती व दिग्दर्शन त्यांनी केलं. या चित्रपटाला राष्ट्रपतींच सुवर्णपदक लाभलं. याशिवाय महात्मा फुले यांच्या जीवनावरील चित्रपटाची निर्मितीही त्यांनी केली. अत्र्यांच्या बहुतांशी चित्रपटांमध्ये विनोद आणि सामाजिक आशय यांचं चपखल मिश्रण आढळून येतं. त्यांनी हिंदी चित्रपटाचीही निर्मिती केली. पं. जवाहरलाल नेहरु यांच्या मृत्यूनंतर त्यांनी लिहिलेले श्रध्दांजलीपर लेख अजोड मानले जातात.

आचार्य अत्र्यांचं लेखन विविधांगी आहे. त्यात प्रवासवर्णन, चरित्र, आत्मचरित्र व ललित साहित्याचा समावेश आहे. `मी कसा झालो ?` `हशा आणि टाळया` या आत्मकथनपर पुस्तकांबरोबरच `कऱहेचे पाणी` या आत्मचरित्राचे पाच खंड त्यांनी लिहिलेल्या विडंबन काव्याचा आवर्जून उल्लेख केला जातो. अत्र्यांनी विडंबन या काव्यप्रकाराची फक्त रुजवातच केली नाही, तर या प्रकाराला प्रतिष्ठाही मिळवून दिली.

`केशवकुमार` या टोपण नावाने त्यांनी विडंबन काव्य लिहिलं. त्यामध्ये रविकिरण मंडळ तसंच, केशवसुतादी जुन्या कवींच्या काव्यांची रंगतदार विडंबनं आहेत. `झेंडूची फुले` या शीर्षकाने या विडंबन गीतांचा संग्रह त्यांनी प्रकाशित केला. या विडंबन गीतांचा स्वतंत्र काव्य प्रकार म्हणून मराठीच्या शालेय अभ्यासक्रमात समावेश आढळतो.

आचार्य अत्र्यांचं लेखणीइतकंच वाणीवरही जबरदस्त प्रभूत्व होतं. त्यांची भाषणं म्हणजे श्रोत्यांकरिता मेजवानीचं असें. म्हणूनच त्यांच्या सभांना विक्रमी गर्दी होत असे. भाषण करताना उभे राहण्याची त्यांची ढब, हावभाव व वक्तृत्वशैली यांचा प्रभाव इतका होता की, इतर अनेक वक्त्यांनी त्यांचं अनुकरण केलं. अत्र्यांच्या वाणीतून आणि लेखणीतून त्यांचं चतुरस्त्र व्यक्तिमत्व प्रकट होत असे. शंकरराव देव, एस.एम. जोशी, बाळासाहेब ठाकरे, ना.सी.फडके, श्री.म. माटे, मामा वरेकर अशा अनेकांबरोबर त्यांनी घातलेले वादही खूप गाजले.

अत्रे राजकीय क्षेत्रातही चमकले. महाराष्ट्र विधानसभेचं आमदारपद, पुणे शहराचं नगरसेवकपद काही काळ त्यांनी भूषवलं. `भांबूर्डा` या गावाचं शिवाजीनगर` आणि `रे मार्केट`चं महात्मा फुले मार्केट` असं नामकरण करण्यात त्यांचा पुढाकार होता. 1942 साली झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. बेळगाव येथील अडतिसाव्या मराठी नाटय संमेलनाचे तसंच दहाव्या मराठी पत्रकार संमेलनाचंही अध्यक्षस्थान त्यांनी भूषवलं.

आपल्या हयातीत विविध क्षेत्रांमध्ये सारख्याच तोलामोलाची कामगिरी करणाऱया व्यक्ती विरळच असतात. आचार्य प्रल्हाद केशव अत्रे हे अशा व्यक्तींपैकीच एक. त्यांनी सुरु केलेली दैनिकं, साप्ताहिकं त्यांच्या मृत्यूनंतर कालांतराने बंद पडली, मात्र मराठी जनमानसावर त्यांचा प्रभाव दीर्घकाळ टिकून आहे.

आचार्य अत्रे यांच्यावरील मराठीसृष्टीवरील लेख

प्रल्हाद केशव अत्रे (13-Jun-2017)

प्रल्हाद केशव अत्रे ऊर्फ आचार्य अत्रे (13-Aug-2021)

## Atre, Pralhad Keshav (Acharya Atre)
## Acharya Pralhad Keshav Atre
# समाजकार्य

Was a leader in the Samyukta Maharashtra Chalwal, which was responsible for the formation of Maharashtra State in 1960. He was a multifaceted personality, active in the fields of politics, literature, education, journalism, movie and drama industry. He wrote several books and plays. He started ‘Daily Maratha’ newspaper, which was very popular. 

3 Comments on आचार्य प्रल्हाद केशव अत्रे

  1. प्रल्हाद केशव अत्रे हे महान लेखक होते त्यांच्या लेखनातून आम्ही बऱ्याच गोष्टी शिकलो. आज जरी अत्रे असते तर महाराष्ट्र साध राज्य नसत तर एक महान राज्य म्हणून गणल असते

  2. प्रल्हाद केशव अत्रे हे महान लेखक होते त्यांच्या लेखनातून आम्ही बऱ्याच गोष्टी शिकलो. आज जरी अत्रे असते तर महाराष्ट्र साध राज्य नसत तर एक महान राज्य म्हणून गणल असते. आमची माणस आपले विचार गणित इतिहास अश्या बऱ्याच गोष्टी अत्रे यांनी आम्हाला शिकविल्या. जर कोणताही लेख अत्रे यांचा वाचायला धरला तर अत्रे आम्हाला समोर आहेत असे वाटते. हा एक देव माणूस होता असे आम्ही संबोधतो. यात शंकाच नाही हे खरे आहे पण लोकांना पटत नाही.

Leave a Reply

Your email address will not be published.


*