पार्श्वगायिका आशा भोसले

चिरतरुण, चतुरस्त्र पार्श्वगायिका

आपल्या मधाळ आवाजाने पाच दशकं रसिकांच्या हृदयावर राज्य करणार्‍या भारतातील आघाडीच्या पार्श्वगायिका म्हणून आशा भोसले यांचा लौकिक आहे. हिंदी चित्रपट सृष्टीतील आपल्या प्रदीर्घ कारकीर्दीत खटयाळ, मादक, उडत्या चालीच्या गाण्यांनी माहेवणार्‍या आशा भोसले यांनी भावपूर्ण दर्दभर्‍या गीतांमधूनही आपली प्रतिमा सिध्द केली. त्यांची मराठी भावगीतं त्यांनी अजरामर केलीच, पण प्रदीर्घ काळ अनेकविध प्रकारची गीतं आपल्या सहज शैलीत गाऊन चिरतरुण, चतुरस्त्र गायिका म्हणूनही त्यांनी लोकप्रियता मिळवली.

आशा भोसले यांचा जन्म १९३३ साली झाला. त्यांचे वडील दीनानाथ मंगेशकर हे महाराष्ट्रातील संगीतक्षेत्रात ख्यातनाम होते. प्रख्यात पार्श्वगायिका लता मंगेशकर त्यांची थोरली बहीण. लता दीदीप्रमाणेच आशा भोसले यांनीही अल्पवयातच पार्श्वगायनाच्या कारकीर्दीला सुरुवात केली. वयाच्या अवघ्या दहाव्या वर्षी ‘चुनरिया‘ या चित्रपटासाठी हंसराज बहल यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली पार्श्वगायन करुन त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं.

मात्र हा सुरुवातीचा काळ त्यांच्यासाठी अतिशय प्रतिकूल होता. शमशाद बेगम, गीता दत्त, लता मंगेशकर यांच्यासारख्या गायिकांचा चित्रपटसृष्टीत जम बसलेला होता. त्यामुळे आशा भोसलेंना दुय्यम स्थान मिळत होतं. त्यात वैवाहिक जीवनातील विफलतेमुळेही ओढाताण सुरु होती. तरीही अशा खडतर परिस्थितीतही वैविध्यपूर्ण गीतं गाण्याची क्षमता, परिश्रमाची तयारी, जिद्द आणि प्रतिमा यांच्या बळावर त्यांनी आपला मार्ग काढला आणि आपलं वैशिष्टपूर्ण स्थान निर्माण केलं.

सुरुवातीच्या काळात आशा भोसले यांनी विशेषतः अवीट गोडीची मराठी भावगीतं आणि शास्त्रीय संगीताची बैठक असलेल्या आपल्या नाटयगीतांद्वारे रसिकांना प्रभावित केलं. त्यानंतर हिंदी चित्रपटसृष्टीतील विविध ख्यातनाम संगीतकारांनी त्यांच्या गायनशैलीचा वापर करुन घेतला, पण त्यांची कारकीर्द गाजली ती विशेषत: ओ. पी. नय्यर आणि आर. डी. बर्मन या संगीत दिग्दर्शकांसोबतच ! या दोन्ही संगीतकारांसोबत त्यांचे सूर जमले आणि त्यांनी त्यांच्या प्रतिभेला पूर्ण न्याय दिला.

आशा भोसले यांच्या अजरामर ठरलेल्या भावगीतांमध्ये ‘जीवलगा राहिले रे दूर घर माझे‘ ‘केव्हांतरी पहाटे‘ इत्यादी गीतांचा समावेश होतो, तर ‘शूर मी वंदिले‘, युवती मना‘, मर्मबंधातली ठेव ही‘ ही त्यांची नाटयगीतं संस्मरणीय ठरली. तसेच ‘मांग के साथ तुम्हारा‘ ‘काली घटा छाये, मोरा जिया घबराए‘, ‘ये है रेशमी जुल्फोंका‘ ‘झुमका गिरा रे‘ ‘पिया तू अब तो आजा‘ ही त्यांची विविध प्रकारची हिंदी गीतं विशेष गाजली. ‘चैन से हमको कभी‘ या दर्दभर्‍या गीतातून आशा भोसले यांनी आपल्या प्रतिभेचा विलक्षण प्रत्यय दिला. तर ‘उमराव जान‘ या चित्रपटातील खालच्या पीत गायलेल्या ‘दिल चीज क्या है‘ व इतर गाण्यामधून त्यांनी स्वर्गीय स्वरांची प्रचीती दिली. ‘मेरा कुछ सामान‘ या आगळया गाण्यासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला.

भावगीत, नाटयगीत, भजन, भक्तिगीत, लावणी, कव्वाली, डिस्को, प्रेमगीत, द्वंद्वगीत, गझल ते आधुनिक काळातल्या रिमिक्स‘ इत्यादी विविध प्रकारची गीतं गाण्याचा आवाका सिध्द करुन आशा भोसले यांनी काळावर आपली विशेष मोहर उमटवली. नवे प्रवाह, नवी संस्कृती , नवे गीतकार, संगीतकार, गायक, यांच्याशी सुराचं नातं निर्माण करुन त्या सतत पुढे झेप घेत राहिल्या आणि त्यामुळेच प्रत्येक पिढीला त्या जवळच्या वाटत राहिल्या.

वयाची साठी पूर्ण केल्यावरही ‘रंगीला‘, ‘ताल‘ मधील जोमदार गतिमान गाणी गाऊन सदाबहार पार्श्वगायिका ठरलेल्या आशा भोसले यांना इ.स. २००० सालचा ‘दादासाहेब फाळके पारितोषिक‘ देऊन बहुमानित करण्यात आलं. आपल्या प्रदिर्घ कारकीर्दीत बारा हजारांच्या वर गीतं गाणार्या आशा भोसले यांना आठ वेळा फिल्मफेअर पारितोषिक , २००१ चा जीवनगौरव पुरस्कार, राज्यपुरस्कार व दूरदर्शन वाहिन्यांचे अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत.

आशा भोसले यांच्यावरील विविध लेख वाचण्यासाठी खालील लिंक्स वर क्लिक करा
चिरतरुण, चतुरस्त्र पार्श्वगायिका आशा भोसले
आशा भोसले यांच्याबद्दल आगळीवेगळी माहिती
आशा भोसले यांच्याशी संबंधित २५ रंजक गोष्टी
आशा भोसले यांची ८३ संस्मरणीय गाणी

## Bhosale, Asha

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*