३१ डिसेंबर साठी नॉनव्हेजचे प्रकार

क्रिस्पी चिकन लॉलीपॉप

साहित्य : चिकन विंग्स:- १२ (बोन्सपासून एका बाजूने सुटे करून घेतलेले), मदा:- १ वाटी, कॉर्नफ्लॉवर:- १ वाटी, चिरलेले आले:- १ चमचा, चिरलेले लसूण:- २ चमचे, हिरवी मिरची – १ चमचा, अंडे:- १, लाल मिरची पेस्ट:- २ चमचे, व्हाइट पेपर पावडर:- चिमूटभर, मीठ:- चवीनुसार, पाणी:- आवश्यकतेनुसार, साखर:- चिमूटभर, लिंबाचा रस:- १ चमचा. टेस्टमेकर क्यूब:-) (असल्यास)
कृती : एका बाऊलमध्ये मदा, कॉर्नफ्लॉवर, अंड, लसूण, आलं, हिरवी मिरची, लाल मिरची पेस्ट, व्हाइट पेपर पावडर, मीठ, साखर व लिंबाचा रस एकत्र करून त्यात थोडे पाणी टाकून त्याचे मिश्रण तयार करा. चिकन विंग्ज या मिश्रणात टाका आणि मिश्रण एकत्र करून घ्या. १५ ते २० मिनिटे फ्रिजमध्ये ठेवा. काढून गरम तेलात मस्त क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्या. सॉसबरोबर गरमागरम सव्‍‌र्ह करा.
संजीव वेलणकर पुणे
९४२२३०१७३३

शामी कबाब
साहित्य:- मटण खिमा:- २०० ग्रॅम, काजू तुकडा ३ ते ४ चमचे, तेल:- २ ते ३ चमचे, चिरलेले आले:- १ चमचा, चिरलेले लसूण:- १ चमचा, हिरवी मिरची:- १ चमचा, चिरलेली कोथिंबीर:- २ चमचे, चणाडाळ (भिजवून ठेवलेली):- १ वाटी, चिरलेला कांदा:- १, चिरलेला पुदिना:- २ ते ३ चमचे, अंडे:- १, गरम मसाला:- १ चमचा, जिरे पावडर, धणे पावडर, रोस्टेड चणा पावडर:- २ ते ३ चमचे, लवंग:- ३ ते ४, दालचिनी:- १ छोटा तुकडा, मीठ:- चवीनुसार, पाणी:- आवश्यकतेनुसार.

कृती : एका कढईमध्ये तेल गरम करा. त्यात कांदा थोडा परतून घ्या. नंतर आले, लसूण व हिरवी मिरची टाकून चांगलं परतून घ्या. नंतर त्यात लवंग, दालचिनी टाका व परतून घ्या. नंतर खिमा, काजूचे तुकडे व भिजवलेली चणाडाळ टाकून चांगले परतून घ्या. मटण पूर्ण शिजेपर्यंत सारखे हलवत राहा. साधारण २०:-२५ मिनिटे ते मिश्रण हलवत राहा. त्यानंतर ते काढून घ्या व मिक्सरमधून फिरवून बारीक करून घ्या. नंतर त्यात जिरे पावडर, धणे पावडर, रोस्टेड चणा पावडर, मीठ, कोथिंबीर, बारीक चिरलेला पुदिना, अंडे टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्या. नंतर त्याचे छोटे छोटे गोळे तयार करून हातावर दाबून गरम तेलामध्ये तांबूस होईपर्यंत तळून घ्या. हिरवी चटणी किंवा सॉससोबत गरमागरम सव्‍‌र्ह करा.
संजीव वेलणकर पुणे
९४२२३०१७३३

रेशमी कबाब
साहित्य:- अर्धा किलो चिकनचा खिमा, एक अंडे, एक चमचा मिरचीपूड, अर्धा चमचा मिरेपूड, दीड चमचा आले पेस्ट, एक चमचा लसूण पेस्ट, दोन चमचे कोथिंबीर बारीक चिरून, पाव वाटी काजू पावडर, दोन चमचे क्रीम, एक कांदा.
कृती :- चिकन खिमा स्वच्छ धुऊन घेऊन पाणी निथळून कोरडा करावा. त्यात जिरे, लाल तिखट, मिरेपूड घालून घ्यावी. त्यातच कांदा, कोथिंबीर, आले:-लसूण पेस्ट, काजू पावडर व क्रीम मिसळून सर्व नीट कालवून 20 मिनिटे मॅरिनेट करावे. अंडे फेटून वरील मिश्रणात मिसळावे. सर्व मिश्रण नीट कालवून एकजीव करावे. या मिश्रणाचे छोटे छोटे लांबट गोळे करावे. सळ्यांमध्ये अडकवून ३०० फॅरनहाईटला बेक करावे किंवा आधी कुकरमध्ये वाफवून घेऊन तव्यावर तेलावर शॅलो फ्राय करावेत.
संजीव वेलणकर पुणे
९४२२३०१७३३

चिकन बिर्याणी
साहित्य:- अर्धा किलो चिकन, दोन कप दही, पाव किलो जुना सुवासिक बासमती तांदूळ धुऊन, ३ ते ४ कांदे लांबट स्लाइस करून, ८ लसूण पाकळ्या, २ कांदे, आल्याचा लहान तुकडा, दोन चमचे कोथिंबीर, दोन चमचे पुदिन्याची पाने, चार वेलदोडे, चार लवंगा, दोन चमचे खसखस भाजून, दोन दालचिनी तुकडे, जायपत्री (सर्व मसाले एकत्र करून मिक्सररमधून भाजून घ्यावेत.)
सजावट:- 8:-10 बदाम सोलून लांब कापून तळून, तसेच एक चमचा बेदाणे तळून, पाव चमचा केशर दोन चमचे कोमट दुधात भिजवून, सहा चमचे साजूक तूप.
कृती :- दही व बारीक केलेला मसाला एकत्र कालवून घ्यावा. तयार पेस्ट चिकनच्या तुकड्यांना लावून 2:-3 तास मॅरिनेट करावे. चिरलेला कांदा गरम तुपात कुरकुरीत तळावा. सजावटीसाठी मिसळून घ्यावा. चिकन अर्धवट शिजवून घ्यावे. जाड बुडाच्या भांड्यात अर्धे चिकन व अर्धे तांदूळ असे थर लावा. उरलेले तूप, केशराचे दूध घालून झाकण लावा व मंद आचेवर भात नीट शिजवून घ्यावा. (शक्य असल्यास कणीक वापरून झाकण बंद केल्यास वाफ बाहेर न जाता मसाल्याचा स्वाद बिर्याणीमध्ये मुरतो.) सर्व्ह करताना वरून तळलेले बदामाचे काप व कुरकुरीत कांदा घालावा. याबरोबर काकडी, टोमॅटो व कांद्याची घट्ट दह्यातील कोशिंबीर देतात.
संजीव वेलणकर पुणे
९४२२३०१७३३

आंबा आइस्क्रीम
साहित्य:- दीड वाटी व्हिपिंग क्रीम, थंडगार, २ कप आंब्याचा रस(सध्या डब्यातील), पाऊण वाटी पिठी साखर, वेलची पूड (ऐच्छिक).
कृती:- मध्यम आकाराचे खोलगट काचेचे बाऊल घ्या आणि १/२ तास फ्रिजमध्ये गार करण्यास ठेवा.
गार झालेले काचेचे बाऊल घेऊन त्यात गार व्हिपिंग क्रीम घाला आणि फेटा. क्रीम थोडे फ्लफी व्हायला लागले की २ ते ३ बॅचमध्ये साखर घालून फेटत राहा. क्रीम व्यवस्थित फ्लफी झाले की फेटणे थांबवावे. यामध्ये आता थंड आंब्याचा रस घालून लाकडी कालथ्याने फोल्ड करा. वेलची पूड घालणार असल्यास आता घाला. किंवा त्याऐवजी तुम्हाला मँगो इसेन्स घालायचा असल्यास २-३ थेंब घाला. नीट मिक्स करा. जर तुमच्याकडे आइस्क्रीम मशीन असेल तर त्यात हे मिश्रण घालून घोटून घ्या.
जर आइस्क्रीम मशीन नसेल तर हे मिश्रण फ्रीझर सेफ प्लास्टिक किंवा मेटलच्या भांडय़ात घाला. साधारण २ तास हे मिश्रण फ्रिजमध्ये ठेवा. नंतर फ्रीझरमधून काढा. मिक्सरमध्ये फिरवा. असे १-२ वेळा करून परत फ्रीझरमध्ये ठेवा. आइस्क्रीम सेट झाले की सव्‍‌र्ह करा.
संजीव वेलणकर पुणे
९४२२३०१७३३

आइस्क्रीम कॉकटेल
साहित्य:- २ स्कूप वॅनिला आइस्क्रीम, १ स्कूप मँगो आइस्क्रीम, १/४ वाटी स्ट्रॉबेरी क्रश, थोडे आंब्याचे तुकडे
डेकोरेशनसाठी:- ४ ते ५ पिस्ता, बदाम, २ चमचे स्ट्रॉबेरी जेलीचे तुकडे, २ चमचे ग्रीन जेलीचे तुकडे, २ चमचे टूटीफ्रूटी, २-३ ग्लेझ चेरीज (पाकवलेल्या), १ वेफर बिस्कीट.
कृती:- मध्यम आकाराचा उभा ग्लास घ्यावा. त्यात तळाला थोडा स्ट्रॉबेरी क्रश घालावा. त्यावर वॅनिला स्कूप घालावा. त्यावर जेलीचे तुकडे, ड्रायफ्रूट्स आणि थोडा अजून स्ट्रॉबेरी क्रश घालावा. फळांचे तुकडे घालावे. थोडे परत वॅनिला आइसक्रीम घालून वर मँगो आइस्क्रीमचा स्कूप घालावा. सजावटीसाठी १-२ पिस्ता, १ बदाम, टूटीफ्रूटी आणि चेरीज लावावे. कडेने वेफर बिस्कीट खोचून लगेच सव्‍‌र्ह करावे.
संजीव वेलणकर पुणे
९४२२३०१७३३

फालुदा
साहित्य:- ८ स्कूप्स वॅनिला आइसक्रीम, १ ते दीड वाटी रोझ सिरप, २ चमचे सब्जा बी, १/२ लिटर थंड दूध
१ पॅकेट फालुदा शेवया, ४ चमचे ड्राय फ्रूट्स, छोटे तुकडे, स्ट्रॉबेरी फ्लेवरची जेली, १/२ वाटी टूटी-फ्रूटीचे तुकडे
सजावटीसाठी चेरी.
कृती:- फालुदा बनवायच्या किमान ५ तास आधी जेली बनवून फ्रिजमध्ये सेट करण्यास ठेवावी. जेली बनवण्यासाठी जेली पावडर आणून पाकिटावरील कृती वाचून जेली बनवावी. सब्जा बी फालुदा बनवण्याच्या किमान २ ते ४ तास आधीच १ वाटी पाण्यात भिजवून ठेवाव्यात. १ लिटर पाणी उकळवावे त्यात फालुदाच्या शेवया घालून ४ ते ५ मिनिटे शिजवाव्यात. गरम पाणी काढून टाकावे व थंड पाणी घालून दुसऱ्या भांडय़ात थंड पाण्यासकट ठेवून द्यावे. दूध आणि रोझ सिरप मिक्स करून घ्यावे. गोडपणा जर कमी वाटत असेल तर अजून थोडे रोझ सिरप घालावे. ढवळून तयार ठेवावे. फालुदा बनवायच्या वेळेस ४ ग्लास घ्यावे. त्यात भिजवलेले सब्जा बी, जेली, शिजवलेल्या शेवया, आइस्क्रीमचा १ स्कूप, दूध आणि परत त्यावर १ स्कूप वॅनिला आइस्क्रीम घालावे. ड्रायफ्रूट्स आणि चेरीने सजवावे. लगेच सव्‍‌र्ह करावे. सव्‍‌र्ह करताना ग्लासमध्ये १ स्ट्रॉ आणि चमचा घालून द्यावा.
टीप : फालुदाच्या मधल्या लेयरमध्ये स्ट्रॉबेरी, द्राक्षं, अननसाचे तुकडे इत्यादी आंबटगोड चवीची फळे घातल्यास फालुदा दिसायला आकर्षक तसेच चवीला स्वादिष्ट लागतो.
संजीव वेलणकर पुणे
९४२२३०१७३३

जिंजरमिंट मॉकटेल
साहित्य : एक जुडी पुदिन्याची, आल्याचे तुकडे सोलून काप करून घेतलेले, दोन कप साखर, चार
लिंबाचा रस, शेंदे मीठ, दोन लहान चमचे भाजलेले जिरे, १०-१२ काळे मिरे, २, लवंगा, १ लहान तुकडा तेजपान, दोन मोठे चमचे मध व चुरा केलेला बर्फ.
कृती : सर्व प्रथम पुदिन्याच्या पानांना चांगल्याप्रकारे धुऊन घ्यावे. त्यात आलं, काळेमिरे, जिरं, मीठ, लवंगा, तेजपानं आणि कुटलेला बर्फ घालून मिक्सरमधून फिरवून घ्यावे. पाणी घालून घालून गाळून घ्यावे. जर मध आवडत असेल तर ते घालून थंड थंड सर्व्ह करावे. हे पेय तुम्ही बनवून सुद्धा ठेवू शकता.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

Avatar
About संजीव वेलणकर 617 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*