आप्पे

डाळ- चुरमुरे आप्पे
साहित्य : ४ वाटय़ा चुरमुरे, १ वाटी डाळ,२-३ हिरव्या मिरच्या, प्रत्येकी १ लहान कांदा आणि टोमॅटो, कोथिंबीर, मीठ, २ चमचे दही, मीठ, चिमूटभर साखर, तेल आणि तूप, चिमूटभर सोडा (ऐच्छिक).
कृती : चुरमुरे आणि डाळवं मिक्सरवर वेगवेगळे बारीक करून घ्यावेत. (हे काम आदल्या दिवशीही करून ठेवता येईल.) सगळ्या भाज्या बारीक चिरून घ्याव्यात. चुरमुरे आणि डाळव्याच्या मिश्रणात बारीक चिरलेल्या भाज्या, मीठ, साखर आणि फेटलेलं दही घालून व्यवस्थित एकत्र करावं. त्यात पाणी घालून उत्तप्प्यासारखं पीठ भिजवून अर्धा तास झाकून ठेवावं. एवढा वेळ नसेल तर ५-१० मिनिटंही पुरेशी आहेत. आप्पे करायच्या वेळेस हवे तर सोडा घालून मिश्रण व्यवस्थित मिसळून घ्यावं. पीठ जास्त घट्ट वाटलं तर थोडंसं पाणी घालावं. आप्पेपात्रला पुसटसं तेल लावून त्यात तयार पीठ घालावं. झाकण ठेवावं, ५-७ मिनिटं गॅस मोठा असू द्यावा. ५ मिनिटांनी तेल/तूप बाजूनं सोडावं. खालून लालसर झाल्यावर उलटवून गॅस बारीक करावा. दोन्ही बाजूनी खमंग झाल्यावर आप्पे उतरवून डब्यात भरावेत. बरोबर एखादी चटणी किंवा सॉस द्यावा.

पौष्टिक आप्पे
साहित्य :- दोन वाट्या रवा, एक वाटी आंबट ताक, गाजर, फुलकोबी, मटार, कांदा, सिमला मिरची, दोन चमचे चण्याची डाळ, दोन चमचे दाणे, एक चमचा किसलेले आले, एक चमचा बारीक चिरलेली हिरवी मिरची, फोडणीकरिता तेल, मोहरी, हिंग, कढीलिंब.
कृती :- रवा एक वाटी आंबट ताक व लागेल तसे पाणी घालून एक तास भिजवून ठेवा. गाजर, फुलकोबी, सिमला मिरची व कांदा बारीक चिरा. चण्याची डाळ व दाणे भिजवा.
करतेवेळी रव्यामध्ये चिरलेल्या भाज्या, मटार, हिरवी मिरची, आले व मीठ घालून सारखे करा. मग तीन चमचे तेलाची फोडणी करा. त्यात मोहरी, हिंग, कढीलिंबाची पाने, भिजवलेली डाळ व दाणे घालून एक मिनिट परता व ही फोडणी रव्याच्या मिश्रणात घाला. ढवळून घ्या. आप्पेपात्र गॅसवर ठेवा. त्याला तेल लावून घ्या.
चमचाभर पीठ टाका व झाकण लावा. दोन मिनिटे झाकण काढून आप्पे उलटवा. पुन्हा पाव-पाव चमचा तेल सोडा. बदामी रंग आला, की बाहेर काढा. गरमागरम खायला द्या.

मेथीचे आप्पे
साहित्य :- एक वाटी गव्हाची सोजी, अर्धी वाटी मुगाची सालाची डाळ, अर्धी वाटी बारीक चिरलेली मेथी, मीठ, गरम मसाला, धने-जिरे पावडर, आले-मिरची पेस्ट, दोन चमचे दाणे, दोन चमचे किसमिस, अर्धा चमचा फ्रूटसॉल्ट..
कृती :- सोजी अर्धा तास भिजवा. मुगाची डाळ तीन तास भिजवा. मग डाळ मिक्समरमधून बारीक करा. त्यात गव्हाची सोजी घाला. बारीक चिरलेली मेथी, आले-मिरची पेस्ट, गरम मसाला, धने-जिरे पावडर, भाजलेले दाणे, किसमिस व फ्रूट सॉल्ट घालून मिश्रण तयार करा. आप्पेपात्राला तेल लावून त्यात चमचा-चमचा पीठ घाला व तेल सोडून दोन्हींकडून शेकून घ्या. हेही चटणीबरोबर अतिशय स्वादिष्ट लागतात.

पंचभेळ आप्पे
साहित्य :- पाच डाळी (अर्धी वाटी चणाडाळ, अर्धी वाटी मूगडाळ, पाव वाटी उडीदडाळ, पाव वाटी तूरडाळ किंवा मसूरडाळ, अर्धी वाटी तांदूळ)
कृती :- आदल्या दिवशी वरील सर्व डाळी भिजवून वाटून ठेवाव्यात. हिरवी मिरची, कोथिंबीर, आले, जिरे व मीठ कुटून त्यात घालावे. आप्प्याच्या भांड्याला थोडे तेल लावून आप्पे करावेत. दोन्ही बाजूंनी खरपूस भाजावेत. नंतर दह्याच्या चटणीबरोबर सर्व्ह करावेत.

स्टफ आप्पे
साहित्य : भिजवलेले जाड पोहे १ वाटी, भिजवलेली चणाडाळ अर्धी वाटी, आलं-लसूण-हिरवी मिरची पेस्ट २ चमचे, कोथिंबीर २ चमचे, दही २-३ चमचे, खाण्याचा सोडा पाव चमचा, बारीक चिरलेल्या भाज्या अर्धी वाटी, शिजवलेला बटाटा १, मीठ, लिंबू, साखर (बारीक भाज्यांमधे गाजर, मटार, फ्लॉवर, फरसबी इ.)
कृती : जाड पोहे हाताने कुस्करून घ्यावे. चणाडाळ बारीक वाटून घ्यावी. त्यात ओल्या खोबऱ्याचे तुकडे, आलं-लसूण पेस्ट, कोथिंबीर, मीठ, साखर चवीनुसार, दही, सोडा घालून एकत्र मिसळून 1 ते 2 तास भिजवून ठेवावं. शिजवलेल्या भाज्यांमधे बटाटा, मीठ, लिंबू, साखर, कोथिंबीर, मिरची घालून एकत्र मिसळून छोटे छोटे गोळे बनवून पोह्याच्या पिठात बुडवून आप्पेपात्रामधे आप्पे बनवून घ्यावे. खोबरं, हिरवी मिरचीच्या चटणीबरोबर खायला द्यावे.

उपवासाचे आप्पे
साहित्यः दोन वाट्या वरी तांदूळ, अर्धी वाटी साबुदाणा, मिरची पेस्ट, आले पेस्ट, जिरे पावडर, कोथिबिर, दाण्याचे कूट, मीठ, आले पेस्ट, खायचा सोडा, तेल किंवा तूप.
कृती: आप्पे करायचे असतील त्याच्या आदल्या दिवशी वरी तांदूळ आणि साबुदाणा वेगवेगळे भिजत घालावे. ७-८ तासांनी दोन्ही एकत्र मिक्सरवर वाटावे. मिश्रण इडलीच्या पिठाइतपत असावे. रात्रभर झाकून ठेवावे. सकाळी आप्पे करण्यापूर्वी या मिश्रणात अर्धा चमचा आले पेस्ट, अर्धा चमचा मिरची पेस्ट (आवडीनुसार प्रमाण घ्यावे.), मीठ, अर्धा चमचा जिरे पावडर, २-३ चमचे दाण्याचे कूट, चिरलेली कोथिंबिर मिसळावी. पाव छोटा चमचा खायचा सोडा घालून मिश्रण एकजीव करून घ्यावे. आप्पेपात्रात नेहमीच्या आप्प्याप्रमाणे आप्पे करावे. नारळाच्या दही घातलेल्या सैलसर चटणीसोबत खावे.

रव्याचे आप्पे
साहित्य :- पाऊण वाटी जाड रवा, पाऊण ते एक वाटी आंबट ताक, चवीपुरते मिठ, अर्धा टिस्पून जिरे, ठेचलेले, तीन हिरव्या मिरच्या, बारीक चिरून, सहा-सात कढीपत्ता पाने, बारीक चिरून, पाव कप कांदा, बारीक चिरून, अर्धा टिस्पून आलेपेस्ट, दोन चिमटी बेकिंग सोडा (खायचा सोडा), पाव वाटी तेल
कृती :- रवा आणि ताक तासभर भिजवून ठेवावे. नंतर त्यात जिरे, मिरच्या, कढीपत्ता, आलेपेस्ट, कांदा चवीपुरते मिठ घालून मिक्स करावे. आप्पेपात्र गॅसवर गरम करत ठेवावे. मिश्रणात चिमूटभर सोडा घालावा आणि मिक्स करावे.

चटणीचं साहित्य – अर्धी वाटी डाळं, अर्धी वाटी ओलं खोबरं, २-३ हिरव्या मिरच्या, अर्धी वाटी कोथिंबीर, मीठ हे सगळं मिक्सरवर वाटून घ्या. वाटताना पाण्याचा वापर करा. चटणी सरबरीत हवी. वाटून चटणी भांड्यात काढा. त्यात १ टेबलस्पून दही घाला. नीट मिसळा. चटणी तयार आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*