नाशिक जिल्हा

धार्मिकदृष्ट्या महाराष्ट्रात प्रसिध्द असणार्‍या नाशिक जिल्ह्याने औद्योगिकदृष्ट्याही मोठी प्रगती साधली आहे. हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र असा सिंहस्थ पर्वातील कुंभमेळा येथे भरतो. पुराण काळात श्री प्रभु रामचंद्र, लक्ष्मण व सीतामाई यांच्या वास्तव्याने पावन झालेली ही भूमी आहे. भारतातील १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग जिल्ह्यातील त्र्यंबकेश्र्वर येथे आहे,त्यामुळेच नाशिक हे भारतीय भाविकांसाठी महत्त्वाचे धार्मिक स्थान आहे.

अलीकडच्या काळातही तात्या टोपे, स्वातंत्र्यवीर सावरकर, अनंत कान्हेरे, कृष्णाजी कर्वे, विनायक देशपांडे या स्वातंत्र्यसैनिकांची देशाला अनमोल भेट देणारी ही भूमी!
नाटक, चित्रपट, साहित्य या सर्व कलांची जोपासना करणारी भूमी म्हणजे नाशिक असेही अभिमानाने म्हटले जाते, कारण या सर्व क्षेत्रांतील अनेक दिग्गज कलावंत या भागातील रहिवासी होते.पुणे, मुंबई व नाशिक हा त्रिकोण औद्योगिकदृष्ट्या विकसित करण्याचे प्रयत्न मेठ्या प्रमाणावर केले जात आहेत.