जॉर्जिया

जॉर्जिया हा पश्चिम आशिया व पूर्व युरोपमधील एक देश आहे. कॉकासस भौगोलिक प्रदेशामध्ये वसलेल्या जॉर्जियाच्या उत्तरेला रशिया, दक्षिणेला तुर्कस्तान आणि आर्मेनिया, पूर्वेला व आग्नेय दिशेला अझरबैजान हे देश तर पश्चिमेला काळा समुद्र आहेत. त्बिलिसी ही जॉर्जियाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.

इ.स.च्या चौथ्या शतकात दोन राजतंत्रांमधून स्थापन झालेले जॉर्जिया ११-१२व्या शतकादरम्यान आर्थिक व राजकीय दृष्ट्या एक बलाढ्य राष्ट्र होते. १९व्या शतकाच्या सुरुवातीस रशियाने जॉर्जियावर कब्जा करून हा भूभाग आपल्या साम्राज्यामध्ये जोडला. इ.स. १९१७ मधील रशियन क्रांतीनंतर जॉर्जियाला स्वातंत्र्य मिळाले परंतु लगेचच १९२१ साली सोव्हियेत संघाच्या लाल सैन्याने जॉर्जियावर लष्करी आक्रमण केले. पुढील ७० वर्षे जॉर्जिया सोव्हियेतच्या १५ गणराज्यांपैकी एक होते. १९९१ मधील सोव्हियेत संघाच्या विघटनानंतर जॉर्जिया पुन्हा स्वतंत्र देश बनला. झ्वियाद गामसाखुर्दिया हा स्वतंत्र जॉर्जियाचा पहिला राष्ट्राध्यक्ष होता. स्वातंत्र्यानंतर अनेक वर्षे जॉर्जियामध्ये सामाजिक अस्थिरतेचे वातावरण होते. २००३ साली येथे घडलेल्या क्रांतीनंतर येथे लोकशाही सरकार आहे. तेव्हापासून जॉर्जियाने झपाट्याने प्रगती केली आहे. परंतु २००८ पासून चालू असलेल्या रशियासोबतच्या सततच्या तणावामुळे जॉर्जियाच्या अर्थव्यवस्थेला धक्का बसला आहे.

जॉर्जिया युरोपाच्या परिषदेचा सदस्य आहे. जॉर्जिया देशातील दोन प्रांत – दक्षिण ओसेशिया व अबखाझिया हे स्वतंत्र देश असल्याचा दावा करतात. पण रशिया, निकाराग्वा, व्हेनेझुएला, नौरू व व्हानुआतू ह्यांव्यतिरिक्त इतर संयुक्त राष्ट्रांच्या सदस्य देशांनी त्यांचे स्वातंत्र्य मान्य केलेले नाही.

राजधानी व सर्वात मोठे शहर :त्बिलिसी
अधिकृत भाषा :जॉर्जियन
इतर प्रमुख भाषा : रशियन, आर्मेनियन
स्वातंत्र्य दिवस :९ एप्रिल १९९१
राष्ट्रीय चलन :जॉर्जियन लारी

( Source : Wikipedia )

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*